रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

राजगड ते तोरणा [ Rajag Torna Range Trek ]

 राजगड ते तोरणा






पहाटे तीनच्या सुमारास गाडी गुंजवणेच्या दिशेने मार्गस्थ होत होती. मार्गासनी पासून आत वळल्यावर संपूर्ण अंधारचेच साम्राज्य. गुंजवणे पोहोचलो, पाठपिशव्या बांधल्या तोच "गाडी फूड झाडाखाली दाबा" असा किर्र अंधारातून आवाज आला. "गाडी जाणार आहे" हे समजल्यावर तो आवाज उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला निघून गेला.

विजेरीच्या प्रकाशात पहाटे साडेचारला चढाई चालू झाली. पद्मावती माचीवर चंद्र ताऱ्यांची आरास खास जुळून आली होती. सुवेळा, डुबा अंधारातच आकार घेत होते. पन्नास मिनिटात पद्मावती मंदिरासमोर उभे ठाकलो तेव्हा सर्वांगाला घामाचा अभिषेक झाला होता. तांबडफुटीला देवीचे दर्शन घेऊन तडक मंडळी बालेकिल्ल्याला प्रस्थान झाली.

बालेकिल्ल्याला पोहोचलो तशी आसमंतात केशरी झालर उमटायला सुरुवात झालेली. भाटघर जलाशयातील पाण्यात शांत पहुडलेली प्रतिबिंबे आणी त्यावर स्वार होण्यासाठी खालपर्यंत उतरलेली ढगांची चादर. इकडे पश्चिमेकडे तोरणा, भट्टी वेळवंड खोरी हळूहळू जागी होत होती. नारायणाचे आगमन झाले आणी संपूर्ण प्रदेश सोनसळी किरणांनी नाहून निघाला.या शब्दातीत सुखाची अनुभूती ज्याने त्यानेच घ्यायला हवी.




चंद्रकोर तळे, बालेकिल्ला प्रवेशद्वारात आता गर्दी जमू लागलेली. तडक सदर गाठून संजीवनी माचीचा मार्ग पकडला. दिवाळीच्या नंतर दृश्यमानता कमी होईल या विचाराने आज राजगड तोरणा बेत आखला होता तो योग्य ठरताना दिसत होता. निळेशार आकाश, हिरवेगार डोंगर आणी सोनेरी गवत यांनी निसर्गाच्या रूपात अनोखे रंग भरले गेले. ढगांची सूर्यनारायला झाकोळून आमच्यावर कृपादृष्टी चालू होतीच.



संजीवनी माचीचा मार्ग पकडल्यापासून जनता शून्य झाली होती. आता फक्त आपण आणी आपल्या दोन्ही बाजूला सह्याद्रीचे दोन पुराणपुरुष भासतील असे राजगड - प्रचंडगड. त्यांच्या बाहूं सदृश डोंगररांगेतून आमची डोंगर यात्रा.

संजीवनीचे डौलदार आणि अभेद्य रूप पाहून अळू दरवाज्याने राजगडाचा निरोप घेतला. माचीखालुन जाताना दिसणारी सुमारे ६०० वर्षे अभेद्य अशी दुहेरी तटबंदी पाहताना, त्याकाळी काय सुवर्णमयी दिवस या वास्तूने पाहिले असतील आणी तत्कालीन दुर्गवैभव काय असावे याचा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.








भुतोंडे खिंडीत पोहोचलो तसे आजूबाजूच्या पाड्यातील व मेटातील लोक ताक आणी पाणी विकण्यासाठी पोहोचले होते. पूर्वीच्या काळी किल्ल्याच्या घेऱ्यात अश्या लढाऊ वृत्तीच्या लोकांची वस्ती वसवली जायची त्यांना "मेट" म्हणत. लढाईच्या वेळी शत्रूचा पहिला मुकाबला यांच्याशी होई. आजही हि लढाऊ लोक जीवनाची लढाई समर्थपणे लढतायेत. लहान मुले दिसली कि त्यांना गोळ्या वाटप करत आमची पालखी पुढे निघाली. कचरेवाडीत उदरभरणमं झाले आणि थंडगार घरच्या ताकाने क्षुधाशांती करून घेतली.

आता डोईवरच्या ढगांनीही थोडी विश्रांती घेतल्याने तोरण्याची चढाई खडतर बनली. भर उन्हात रडतोंडी बुरुजाचा काळाकभिन्न कातळ चकाकू लागलेला. शेवटच्या टप्प्यात शिडी चढून कोकण दरवाज्याने तोरणा किल्ल्यात प्रवेशते झालो. एव्हाना मध्यान्ह प्रहार झाला होता. बुधला माचीवरून मेंगाई देवीच्या मंदिराकडे जातानाच लिंगाणा आणि त्यामागे रायगड किल्ल्यांचे दर्शन झाले. दृश्यमानता खूप चांगली असल्याने लांबचा प्रदेश नजरेत येत होता. मेंगाई मंदिरात देवीचे दर्शन घेऊन बिनी दरवाज्याने उतराई चालू केली.

आज राजगडाच्या आणि तोरणा किल्य्यांच्या प्रत्येक प्रवेशद्वारात आणि मोक्याच्या ठिकाणी एकही माणूस नसलेले फोटो मिळाले. दुपारी दिडला वेल्हे गाठून मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने रवाना झाली. आठ तासात वीस किलोमीटरची कस पाहणारी, दमदार आणि प्रेक्षणीय भटकंती झाली.

इति लेखनसीमा ! फोटोंचा आनंद घ्या!

















सागर