कांचन सुळका प्रस्तरारोहण - किल्ले चंद्रेश्वर
दिवस १ : किल्ले कांचना आणि कांचन सुळका प्रस्तरारोहण
दिवस २ : चांदवडचा किल्ला, इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि चंद्रेश्वर मंदिर.
मागचा पूर्ण आठवडा सुट्टी मिळाल्याने कर्नाटक ते सिंधुदुर्ग किनारी भागाची १६०० किमी.ची भटकंती झाली. गुरुवारी परत आल्यानंतर उरलेले तीन दिवसही सत्कारणी लागावे म्हणून नाशिकला जायचा बेत केला. अजिंठा सातमाळ रांगेतले कांचन आणि कोळधेर हे दोनच किल्ले राहिले होते त्यामुळे कांचन करून चांदवड मार्गे कोळधेर जायचा प्लॅन असलेला एका संस्थेच्या कार्यक्रमात सामील झालो. मुख्य आकर्षण होते ते १५० फुटी कांचन सुळक्याचे प्रस्तरारोहण करण्याचे. या क्षेत्रात कधी अनुभव नसल्याने सुरक्षिततेचे उपाय योजून प्रस्तरारोहण (Rock climbing) व अवरोहण (rappelling) करायला मस्त मजा आली.
शनिवारी तांबडफुटीची वेळ कांचनबारीत पोहोचलो. १७ ऑक्टोबर १६७० चा इतिहास असा डोळ्यासमोर तरळून गेला.
आज आत्ता आपण उभे आहोत त्या ठिकाणी साडेचारशे वर्षांपूर्वी सुरतेची लूट घेऊन येणाऱ्या मराठ्यांची मुघल सरदारांशी सुमारे पाच हजार सैन्य ताकदीने लढाई झालेली. महाराज स्वतः त्यांच्या रणधुरंधर सहकाऱ्यांसमवेत लढाईस उभे. दाऊदखानाचा सैन्याची धूळधाण उडालेली. उभे असलेल्या कांचनबारी मधून परास्त सैन्य सैरावैरा धावतय.... सगळे काही कल्पित असे डोळ्यासमोर येऊन गेले.
चढाई चालू केली पण सर्व वाट मोडल्याने कांचन किल्ल्यावर पोहोचायला मोठी कसरत झाली. मुघलांशी लढताना सह्याद्रीच्या गवताच्या पात्याचे भाले झाले असे ऐकलेले त्याचा आज याची देही याची डोळा अनुभव आला. गवताची कुसळ कपडे बुटांमध्ये शिरून सुई सारखे टोचत होते. त्याच्याशी लढत मंचन माथ्यावर पोहोचलो. कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याची टाकी, उध्वस्त प्रवेशद्वाराचे अवशेष बघून कांचन च्या दुसऱ्या टप्प्यात आलो. कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती आणि दगडांच्या आकाराने बनलेला गणपती पाहून कांचन सुळक्याचे दिशेने चढाई चालू झाली. अंगावर येणारा चढ चढून कोरीव पण तुटलेल्या पायऱ्यांनी सुळक्यापर्यंत पोहोचलो. आता वेळ होती सुळक्याला भिडायची. गणेशाचे स्मरण करून एक शिलेदार फ्री क्लाईम करून वर पोहोचला आणि सुळक्याच्या माथ्यावरून "जय भवानी जय शिवाजी" घोषणा आसमंतात दुमदुमल्या.
बाकीची मंडळी योग्य ती काळजी घेऊन चढाई करून पोहोचली तेव्हा दुपारचे तीन वाजत आलेले. आरोहण करताना मनगटातली खरी ताकद कळाली. चहूबाजूला अजंठा सातमाळ डोंगर रांगांचा हा गगनचुंबी, अजस्त्र, राकट, बेलाग असा पसारा. पश्चिमेकडे ओळीने हंड्या, विखारा सुळका, त्यामागे या रांगेतला सर्वात उंच किल्ला धोडप, त्यामागे रवळ्या -जावळ्या, मार्केंडेय तर पूर्वेकडे कोळधेर, राजदेहेर, इंद्राई, चंद्रगड आसमंताशी स्पर्धा करत उभे ठाकलेले.डोळ्यात साठवून ठेवावा असा अफलातून नजारा.
कांचना सुळका उतरून उर्वरित किल्ला पाहून निघण्यास सूर्यास्त झाला आणि संधीप्रकाशात उतराई चालू झाली. ज्या वाटेने चढून आलो त्या वाटेचे दिव्य बघून तेथून उतरणे शक्यच नव्हते म्हणून कांचन सुळक्याला प्रदक्षिणा मारून दुसऱ्या वाटेने निघालो. वीस मिनिटात अंधाराने गाठले तेव्हा माचीसुद्धा उतरले नव्हतो. आता चालू झाली दुहेरी लढाई. एक अंधारातून विजेरीने मोडलेली वाट शोधण्याची आणि दुसरी गवताचा भाल्यासारख्या कुसळांशी. महत्प्रयासाने कांचना गावाच्या समोरील खिंडीत आलो तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले. येथून वाट सापडेना. विजेरीने गावाच्या दिशेने प्रकाश टाकला तसा गावातून प्रकाश आमच्यापर्यंत आला. कोणीतरी किल्ल्यावर वाट शोधतंय हे गावात कळल्याने काही लोक बॅटरी घेऊन आमच्या दिशेने वरती चढून आले. देवासारख्या धावलेल्या त्या माहात्म्यांना अनेक धन्यवाद देऊन गावात पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आलेले. पोटोबा करून टेन्ट लावून झोपून घेतले.
प्रस्तरारोहण व रात्रीच्या सुटकेचा विलक्षण अनुभव गाठीशी जोडून आजचा दिवस संपला.