शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

परमार्थात स्वार्थ : गुप्त भीमाशंकर - किल्ले चावंड - कुकडेश्वर

[ पुणे - भीमाशंकर - गुप्त भीमाशंकर - किल्ले चावंड - कुकडेश्वर - अवसरी येथील जगदंबा देवालय - पुणे ] 



तर झाले असे कि , रविवारी अष्टमी असल्याकारणाने दरवर्षीप्रमाणे अवसरी येथील देवीला जायचा प्लॅन झाला. आता मंचर पर्यंत चाललो आहोतच तर अजूनही काही फिरून घेऊ या विचाराने छान प्लॅन झाला. सकाळी साडेपाच ला निघालो ते भीमाशंकरला साडेआठ. तुरळक गर्दी असल्याने दर्शन चांगले झाले. दर्शन घेऊन मंदिरासमोरची घंटा आवर्जून पाहिली. (या घंटेविषयी उत्सुकता असल्यास इथे वाचा.) दर्शन घेऊन गुप्त भीमाशंकर बघायला निघालो.





दिड तासात पार्किंग पाशी परत येऊन जुन्नरचा रस्ता धरला. घोडेगाव - कुसूर - जुन्नर - आपटाळे - चावंड प्रवास करून दुपारी दोनला चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. एका डेरेदार अंब्याच्या सावलीत उदरम भरणंम करून चढाई चालू केली. अख्ख्या किल्ल्यावर फक्त आम्ही तिघेच उपस्थित आणि संपूर्ण किल्ल्यावर पुरुषभर उंचीचे गवत. त्यातुन मार्ग काढत सगळी ठिकाणे आणि अवशेष पाहून किल्ला उतरायला घेतले. दिवसभर निळ्याशार आकाशात कापसाचे गुच्छ दिसावे असे पांढरे ढग आनंदाने बागडत होते. किल्ला उतरताना तेच वातावरण बदलून ढगातून डोकावणारी सूर्यकिरणे अद्भुत वाटत होती. पंधरा मिनिटात वातावरण बदलले आणि जोरदार विजेचा कडकडाने तुफान पाऊस चालू. "चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो" या वाक्याचा याची देही याची डोळा  अनुभव आला.

भर पावसात कुकडेश्वर पोहोचलो पण जोरदार पावसाने बाहेर पडता येईना. अर्धा तास पाऊस थांबायची वाट बघून शेवटी भिजत मंदिरात पोहोचलो. दर्शन घेऊन बाहेर पडतो तोच पाऊस थांबलेला. "देवाला आपण शुचिर्भूत होऊनच यायला पाहिजे होते" असे समजून मनोमन नमस्कार करून पुढे निघालो. 

येथून पुढे तुळा लेणी , लेण्याद्री असा प्लॅन होता पण फॅमिली बरोबर असल्याने सगळे काही होणे शक्य नव्हते. मग थेट जुन्नर आणि पुढे अवसरी खुर्द येथील त्रिपुर सुंदरी देवालय पोहोचलो. अष्टमीची कापूरआरती करून दिवस संपन्न जाहला!

 

बाकी, त्या घंटेविषयी उत्सुकता असल्यास खाली टिचकी मारून माझ्या ब्लॉगवरचा २०१३ मध्ये खरडलेला लेख वाचा. 

http://sagarshivade07.blogspot.com/2013/04/blog-post.html

असो! फोटोंचा आनंद घ्या!











बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

बागलाण मोहीम ५ : तीन दिवसात केलेली अपरिचित बागलाणची सफर


किल्ले - किल्ले कांडाळा / पिंपळा , किल्ले भिलई , किल्ले अजमेरा,  किल्ले दूंधा ,  किल्ले मुल्हेर, किल्ले न्हावीगड /रतनगड 

देवालये - महाराष्टाचे खजुराहो असे देवळाणे चे जोगेश्वरी मंदिर, श्री क्षेत्र पहाडेश्वर, आशापुरी माता देवी मंदिर, नरकोळ , कपारभवानी देवी, जामोटी, मांगीतुंगी मंदिर.  

=============================================================

नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 


दिवस पहिला :  सटाणा - मळगाव - किल्ले कांडाळा / पिंपळा - डांगसौन्दणे - दगडी साकोरे - किल्ले भिलई - सटाणा 

दिवस दुसरा : सटाणा - अजमेर सौन्दणे - श्री क्षेत्र पहाडेश्वर - किल्ले अजमेरा - जोगेश्वर मंदिर देवळाणे - किल्ले दूंधा - सटाणा - आशापुरी माता देवी मंदिर, नरकोळ - उद्धव महाराज समाधी मुल्हेर 

दिवस तिसरा : मुल्हेर - मांगीतुंगी - पाताळवाडी - किल्ले न्हावीगड /रतनगड - मुल्हेर -  कपारभवानी देवी, जामोटी - वायगाव - सटाणा 


यामध्ये तिसऱ्या दिवशी मी एकटाच असल्याने मांगीतुंगी व कपारभवानी देवी असा प्लॅन होता पण भूषणने सोमवारची सुट्टी टाकल्याने मांगीतुंगी वरून आजपर्यंत फक्त लांबून दर्शन देणारा न्हावीगड जायचे ठरले. तीन दिवसात पाहिलेले सर्व सहा किल्ले बेस्ट होते पण न्हावीगड म्हणजे त्यातला मुकुटमणी . हा किल्ला चढताना सकाळचे मिळालेले वातावरण आणि आदल्या दिवशी आशापुरी देवीला जाताना मुल्हेर किल्ल्यांच्या मागून "नरकोळ" नावाच्या गावात जाणारा रस्ता आणि तेथील निसर्ग म्हणजे या मोहिमेचा उच्चतम क्षण होता. किती कौतुक करू किती फोटो काढू असे क्षण. "मंत्रमुग्ध वैगरे तरी किती वेळा व्हायचे माणसाने?" असे काहीसे नजारे! केवळ शब्दातीत!

तीन भागांमध्ये या मोहोमेच्या पोस्ट टाकतोय. चला तर मग आज चला किल्ले पिंपळा आणि किल्ले भिलाई. 

दिवस पहिला :  सटाणा - मळगाव - किल्ले कांडाळा / पिंपळा - डांगसौन्दणे - दगडी साकोरे - किल्ले भिलई - सटाणा 



शुक्रवारी रात्री पुण्यनगरीतून सटाणा प्रस्थान केले. खूप दिवसांनी एसटीचा प्रवास घडणार होता. मधल्या दिड -दोन वर्षात ग्रुपचे आणि गाडीने ट्रेक व्हायला लागल्यापासून एसटी /टमटम/जीपड्या नि प्रवास करून किल्ल्याचा पायथा गाठावा, काटेकोर नियोजनात किल्ला करून , परतीची सोय बघत - कधी जीपला लटकत, टपावर बसून दुसऱ्या किल्ल्याला जाणे यातली मजा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. यामध्ये वेळ जातो पण तेथील लोकांचे बोलणे-जगणे अनुभवता येते. याविचारातच नाशिक आले. फोनाफोनी करून भूषणने पण सेम बस पकडली आणि दोघे निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. 

"सटाणावाले उतरून घ्या"  या कंडक्टरच्या हाळीने जाग आली. सामान उचलले आणि घराच्या दिशेने चालू लागलो. घरी फ्रेश होऊन गाडी घेऊन डांग सौन्दाने रस्त्याने मळगाव रस्ता धरला. मळगाव हे पिंपळा किल्ल्याचे पायथ्याचे गाव. एका घरासमोर गाडी लावून महाराष्टातील एकूण किल्ल्यांपैकी सर्वात मोठे नेढे असलेल्या पिंपळा उर्फ कांडाळा किल्ल्यावर चढाई चालू केली. किल्ल्याचा माथा ढगांशी सलगी करीत निवांत पहुडला होता. वाटेत एका ठिकाणी दगडावर कोरलेली नागदेवता आहे ती पाहून अर्धा तासाच्या चढाईने आपण एका पठारावर पोहोचतो. येथून गडाचा दक्षिण-उत्तर पसरलेला माथा दिसत नाही. त्याच्यातच नेढे आहे. खडी चढण चढून नेढ्यात पोहोचलो तेव्हा भन्नाट वारा स्वागताला तयारच होता. क्षणार्धात घाम नाहीसा झाला. नेढ्यातून उजवीकडे जायला वाट आहे, त्यावाटेने पुढे गेल्यास कातळात कोरलेली आणि प्लॅस्टर करून सुबक रंगवलेली देवीची मूर्ती दिसते. देवीचे दर्शन घेऊन परत नेढ्याकवलं येऊन माथ्यावर जायला सज्ज व्हायचे. गडाच्या माथ्यावर दोन पाण्याची टाकी आहेत. येथून भिलाई किल्ला, साल्हेर-सालोटा यांचे दर्शन होते पण रात्री या परिसरात पाऊस झाल्याने सगळे ढगांमध्ये गुडूप झाले होते.  






किल्ले भिलई

पिंपळा किल्ल्याच्या माथ्यावर न्याहारी आटोपली आणि परतीचा रस्ता धरला. नेढ्यात यथेच्छ फोटो काढून तासाभरात खाली उतरलो आता येथून आल्या वाटेने परत फिरलो आणि भिलाई किल्ल्याला निघालो. छोटे साकोरे- मोठे साकोरे - दगडी साकोरे अश्या चमत्कारिक गावांमधून गाडी दामटत भिलाई किल्ल्याच्या साखरपाडा खिंडीत आलो. एका घरात समान ठेऊन खिंडीत गाडी लावली आणि सरळ धारेने चढाई चालू केली. पाचच मिनिटात एका झाडाखाली शेंदूर लावलेल्या काही वीरगळ सदृश्य दगड दिसतात. त्यावर सूर्य-चंद्र पहिल्या भागात, दुसऱ्यात वाघ आणि शेवटी नाग हि आदिवासी लोकांची पूजनीय प्रतीके कोरलेली दिसतात. किल्ल्याच्या चढाई मार्गावर जोरदार घसारा आहे. पाऊसाने माती बसलेली असल्याने खूप त्रास झाला नाही पण उन्हाळ्यात अवघड होईल.  

जसा जसा किल्ल्यांचा माथा जवळ येतो चढाई बिकट होत जाते. वाटा हरवायला लागतात. वाऱ्याने झोपलेले गवत घसरगुंडीचा छान अनुभव देत. चढाई करताना दोन मोठे रॉक पॅच लागतात. एकही वास्तू सापडणार नाही एवढे गवत असल्याने गावातून वाटाड्या घेऊन जाणे उत्तम. आमच्या नशिबाने गावातील दोन मुली देवीला आल्या असल्याने त्यांनी आम्हाला गुहा, देवीचे ठाणे दाखवले. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तसे फक्त २२ किमी असलेले साल्हेर-सालोटा दिसू लागले. पश्चिमेकडे चौल्हेर किल्ला तर दक्षिणेकडे पिंपळा. एका गुहेत देवीची आणि हनुमानाची शेंदूर लावलेली मूर्ती आहे तर गुहेतून विरुद्ध बाजूस गडाला वळसा घालून पुढे गेल्यास सप्तशृंगी देवीची कोरलेली मूर्ती आहे. 





गडभ्रमंती पूर्ण करून उतरायला घेतले. वातावरण दाटून आल्याने तिसरा किल्ला चौल्हेर चा प्लॅन रद्द केला आणि भिलाईच्या एका बुरुजावर बसून निसर्गाचा खेळ अनुभवत तासभर बसून राहिलो. एव्हाना पाच वाजत आलेले. खिंडीत उतरून गाडी घेतली आणि घराच्या दिशेने निघालो. आज दिन किल्ले आणि १५ किमीची पायपीट झाली होती. रात्रभर झोप नसल्याने डोळे मिटू लागेलेले. मित्राच्या नातेवाईकांच्या घरी पोटभरून सुंदर जेवण झाले आणि मंडळी निद्रादेवीच्या अधीन झाली. आता उद्याचा प्लॅन होता - किल्ले अजमेरा, किल्ले दूंधा आणि संध्याकाळी ६:०४ ला संपन्न होणाऱ्या रासक्रीडेच्या कार्यक्रमासाठी मुल्हेर मुक्कामी. 


=============================================================


भाग दोन : दिवस दुसरा : 

सटाणा - अजमेर सौन्दणे - श्री क्षेत्र पहाडेश्वर - किल्ले अजमेरा - जोगेश्वर मंदिर देवळाणे - किल्ले दूंधा - सटाणा - आशापुरी माता देवी मंदिर, नरकोळ - उद्धव महाराज समाधी मुल्हेर 


पोटभरून जेवण झाल्यावर पाठ टेकली आणि केव्हा झोप लागली तेही समजले नाही. आजचा दुसऱ्या दिवशीचा प्लॅन होता चार किल्ले आणि एक अतिशय सुरेख असे मंदिर. सटाणा पासून १५ किमीच्या त्रिज्येत असलेले किल्ले कऱ्हा , बिष्टा , अजमेरा आणि दूंधा हे चार छोटेसे पण उत्तरेकडून येणाऱ्या वाटांवर असलेली टेहळणीची खास ठिकाणे. आज कोजागिरी पौर्णिमा. आज संध्याकाळी ५ पर्यंत मुल्हेर येथे रासक्रीडेच्या कार्यक्रमाला हि पोहायचायचे होते मग तीन पर्यंत जेवढे काय होईल ते करू या विचाराने गाडी दामटली. पहिल्यांदा पोहोचलो ते अजमेर सौन्दणे नावाच्या गावात. येथून एक वाट पहाडेश्वर शिव मंदिराकडे जाते. हे मंदिर म्हणजे किल्ले अजमेरचा पायथा. सकाळी सकाळी शुचिर्भूत अश्या वातावरणात महादेवाचे दर्शन झाले. पुजारी काकांनी पोथी वाचताना थांबवून किल्ल्याची वाट समजावली. पहाडेश्वर मंदिरापासून सरळसोट चढता येते पण दगड निसटून डोक्यात पडायची भिती असल्याने तेथून जाऊ नका असा प्रेमळ सल्ला प्रमाण मानून मंदिराच्या मागून जाणाऱ्या वाटेने निघालो. एक घर दिसले त्याच्या समोर गाडी लावून मंडळी चढाईस सिद्ध जाहली. या घराच्या चारही बाजूस वेगवेगळी फुलझाडे लावलेली होती आणि विशेष म्हणजे सगळी एकसाथ उमलली पण होती. जे आहे त्याच्यातून त्या लोकांनी स्वर्गीय अनुभूती निर्माण केलेली. बरोब्बर घराच्या दारासमोर सूर्यफुलाची शेती आणि सगळी सूर्यफूल नारायणाच्या दिशेने आस लावून बसलेली. अहाहा काय ते दृश्य!

किल्ले अजमेरा: 

पाऊण तासात किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्यावर दोन मोठी तळी, महादेवाची पिंड , त्यापुढे दोन पाण्याची टाकी आणि काही उध्वस्त वास्तू पाहायला मिळतात. शेवटच्या टोकावर झेंडा लावलाय तेथून संपूर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. कऱ्हा , बिष्टा , दूंधा दर्शन देतात. येथे थोडीफार सोनकी उमलली असल्याने फोटोंची हौस झाली. येथील शिवपिंडीवर जर आपण दक्षिणा वाहिली तर ती बाजूला जाऊन पडते आणि फुले वाहिली तर पिंडीवरच राहतात अशी दंतकथा आहे. गडावरील फुलांचा गुच्छ बनवून महादेवास अर्पण केला आणि मनोमन नमस्कार करून उतरणीचा रस्ता धरला. 

या किल्ल्यावर पण घसारा असल्याने जपून उतरावे लागते. उतरून खाली आलो, सूर्यफुलाच्या शेतीत जाऊन मालकाच्या परवानगीने एक सूर्यफूल तोडले आणि त्यातली बिया खात बसलो. थोडी भंकस झाल्यावर देवळाणे गावाच्या दिशेने निघालो. गावाच्या वेशीवरच मोठ्ठाल्या वडाच्या झाडाने स्वागत केले. येथून पुढे जायचे होते ते म्हणजे महाराष्टाचे खजुराहो म्हणता येईल असे जोगेश्वर मंदिर. 





महाराष्टाचे खजुराहो - जोगेश्वर मंदिर देवळाणे :

तींन वर्षांपूर्वी येथे येऊन गेलो होतो. महादेवाच्या आशीर्वादाने आज परत येणे झाले. मागच्या वेळेस आलो तेव्हा मंदिरात पारायण होते आणि शेवटचा दिवस असल्याने गावकऱ्यांनी आवर्जून मळ्यात नेऊन जेवण खाऊ घातलेले. आज फक्त आम्ही दोघेच होतो आणि समोर होता कामशिल्पांचा अद्भुत, अतुल्य असा कलाविष्कार. 

जोगेश्वर मंदिराच्या दर्शनी भागास कामशिल्पे कोरलेली आहेत. कामशिल्पे असुनही कोठेही भिभत्स वाटत नाही. त्या अनामिक शिल्पकाराच्या कल्पनाशक्तीस दाद देणे एवढेच काय ते आपण करू शकतो. मंदिरात प्रवेश करताना समोरच्या खांबांवर द्वारपाल शिल्पे आहेत. सर्व खांबांवर चतुर्हस्त भारवाहक यक्षिणी कोरल्या आहेत. भारवाहक यक्षिणी म्हणजे यक्ष आपल्या मागच्या दोन हातानी आपल्या पाठीवर देवळाचा भार उचलून घेत आहे असे शिल्प. पुढच्या दोन हातानी वाद्य वाजवणे, नमस्कार करताना तर काही शस्त्रे घेऊन दिसतात. मंदिराच्या सभामंडपात एक सुबक असा नंदी असून त्याच्या पाठीवर झूल कोरलेली दिसते. नागदेवता, शिवपिंडी पासून शिल्प पट्टिकेची सुरुवात होते आणि कामशिल्पे वेगवेगळ्या स्थितीत कोरलेली आढळतात. शिल्प बघून सभामंडपात प्रवेश करताच उत्तर दक्षिण बाजून दोन कोनाडे आणि त्यात भग्न अश्या विष्णू मूर्ती दिसतात. छतावरही विष्णूअवतार कोरलेले आहेत. चार मोठया खांबांपैकी एकावर गणपती, गरुडशिल्प आणि विष्णू कोरलेला आहे. गर्भगृहात मनमोहक शिवपंडी आणि त्यावर प्राजक्ताच्या फुलांची सजावट! अवघे गर्भगृह सुगंधाने भरलेले होते. 

मनसोक्त आनंद घेऊन एक घरात पाणी विचारले. "पाणी नाही समोर बिसलरी मिळेल" या उत्तराने अवाक झालो. तेवढ्यात शेजारचा म्हणाला, पाणी नाही म्हणजे आमच्या विहिरीतले पाणी आहे ते चालेल का? आपल्याला काय सगळे चालते म्हणत क्षुधाशांती झाली. येथून दूंधा किल्ल्याचा रस्ता विचारून त्या दिशेने प्रयाण केले. 




किल्ले दूंधा , दूंधेश्वर मंदिर : 

रस्त्याच्या दोन्हीबाजूने डाळिंबाच्या बागा बघत स्वारी निघाली. किल्ल्याच्या पायथ्याशी दूंधेश्वर मंदिर आहे. स्वामी समर्थांचा अवतार असलेल्या दूंधेश्वर महाराजांचे मंदिर आहे. मूर्तीचे स्वामी समर्थांसी साधर्म्य वाटते. येथून वरच्या हाताला दाट झाडीत वाट जाते . वाटेत काही पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि त्याला मदत म्हणून दोर लावला आहे. पाऊण तासात आपण शिवमंदिरात पोहोचतो. डेरेदार चिंचेचे झाड पाहून मोह आवरला नाही. ओंजळभर चिंचा पडुन चघळत पुढे किल्ला पाहायला निघालो. वरती एक महाराजांचे घर आणि समाधी आहे. त्यापुढे एक वाट दुसऱ्या बाजूला उतरते तेथे गुहा आहेत. माथ्यावर काहीही पाहायला नाही. छोटेखानी किल्ला बघून खाली उतरलो. पायथ्याच्या मंदिरात आर्मीचे ट्रेनिंग चालू होते. सटाणा, मालेगाव परिसरातील अनेक मुले ट्रेनिंगला आलेली.  एव्हाना दोन वाजत आलेले आणि घरी जाऊन मुल्हेर निघायचे असल्याने किल्ले कऱ्हा आणि बिष्टा रद्द केले. एकाच डोंगररांगेत असल्याने फार काही वेगळा व्ह्यू नसेल या विचाराने सटाणा पोहोचलो. 





येथून घरी जाऊन जेवण केले. गोड शिरा आणि चवदार जेवणाने तरतरी आली. आता निघालो श्री क्षेत्र मुल्हेर आणि त्या वाटेने जाताना मुल्हेर किल्ल्यांच्या मागील बाजूस नरकोळ नामक गावात असलेली आशापुरी देवी. 


आशापुरी माता देवी मंदिर, नरकोळ 

उद्धव महाराज समाधी मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणार नेत्रदीपक असा रासक्रीडा उत्सव. 


कोजागिरी जशी जवळ येते, तसे वेध लागतात ते मुल्हेर येथील उद्धव महाराज समाधीत उत्साहात साजऱ्या होणाऱ्या आणि सुमारे ८०० वर्षांची परंपरा असलेल्या रासनहाणाच्या सोहोळ्याची. 

आमचा बागलाण दौरा खरतर या कार्यक्रमासाठी ठरवला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी किल्ले अजमेरा, देवळाणे आणि किल्ले दूंधा झाल्यावर सटाण्यावरून निघालो श्री क्षेत्र मुल्हेर. सटाणा -ताहाराबाद हायवेने मुल्हेर जायचा रस्ता माहित होता पण मित्राच्या नातेवाईकांनी "चाललाच आहात तर नारकोळ मार्गे जा म्हणजे आजच्या कोजागिरीच्या दिवशी देवीचे दर्शन पण होईल" असे सुचवल्यावर तेथे गेलो. नरकोळ हे गाव आणि आशापुरा देवीचे ठाणे हे मुल्हेर किल्ल्यांच्या मागील बाजूस आहे. 

आशापुरी माता देवी मंदिर, नरकोळ : 

हायवे सोडून नरकोळ चा रस्ता धरला तेव्हा सूर्यनारायण नभांगणातून आपला पसारा आवरता घेण्याच्या तयारीत होते. लांबपर्यंत नजर जाईल अशी दृश्यमानता आणि मावळतीचे कोवळे ऊन हा कोरस कमालीचा जुळून आला होता. खरं सांगू तर अनपेक्षित पणे या ठिकाणी पोहोचलो पण हेच ठिकाण आमच्या पाचव्या बागलाण सफरीचे म.सा.वी होता. छोट्याश्या धरणात तुडुंब भरलेले पाणी, पाण्यात आपले प्रतिबिंब न्याहाळत मश्गुल मुल्हेर-मोरागड यासारखे  पुराणपुरुष, आसमंती चढू लागलेली सोनेरी झळाळी, आशापुरी देवी मातेचं ते मनमोहक रूप. चंदन गंधीत, भारीत वातावरण, चारही बाजूनी डोंगरकड्यानी जपलेली एक निरव शांतता. हे स्वर्गीय अनुभव ज्याचे त्यानेच घ्यायला हवेत!

निसर्ग इतका सुंदर होता कि फोटोंच्या नादात वेळेचे भान उरले नाही. पाच वाजत आलेले. सहा वाजून तीन मिनिटांनी मुल्हेर येथे रासक्रीडेचा कार्यक्रम चालू होणार होता त्यामुळे तेथे वेळेत पोहोचणे आव्हानच वाटू लागले. गाडी जोरदार दामटली आणि देवीच्या मंदिरात पोहोचलो. मंदिरात फक्त आम्हीच! मनोभावे देवीला नमन करून पुढच्या वाटचालीस आशीर्वाद मागितले. पाठीवरची बोचकी बघून पुजारी काकांनी विचारले तसे त्याच्याशी बोलण्यात तेथेही भूषणची ओळख निघाली. सगळे शुभ ग्रह योग आज आमच्या कुंडलीत जुळून आले होते तर! 





नरकोळ वरून निघालो आणि मुल्हेर किल्ल्यांच्या मागून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने मुल्हेर गाठले. मठात गर्दी जमू लागलेली. अगदी जत्रेचे स्वरूप! आता पटकन मठात जाऊन ओसरीच्या समोरील सज्ज्यांवर जाऊन फोटोग्राफीसाठी जागा पकडल्या!

उद्धव महाराज समाधी मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणार नेत्रदीपक असा रासक्रीडा उत्सव:

मुल्हेर किल्ल्याचे मूळ नाव मयूरगड!  महाभारतकालीन राजा मयूरध्वज याची राजधानी! आख्यायिकेनुसार,  मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने रासक्रीडेचा उत्सव सुरू केला. मुल्हेरच्या उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० पासून उत्सवाला अधिक प्रोत्साहन दिले. श्री काशीराज महाराज यांना साक्षात श्रीकृष्णाने दिव्य चक्षूंनी रासक्रीडा दर्शन दिले. असे ऐकिवात आहे. रासक्रीडे दरम्यान रासचक्र म्हणजेच 'मंडळ' हे रासस्तंभावर चढवले जाते. सात फुटी लाकडी रासचक्राला बांबू जोडून त्याचा व्यास चौपट म्हणजे २८ फुटी केला जातो. चक्राच्या बाजूला गोलाकार जे खांब लावले जातात ते सात फूट जमिनीत आणि १४ फूट वरती असे सात फुटांच्या हिशेबात असते. रासचक्रावर केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजावट होते. श्रीकृष्ण आणि गोपिका वृंदावनात अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असे मानले जाते. आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना म्हणजेच सायंकाळच्या संपत वेळेप्रसंगी हे रासचक्र भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते. रात्रभर हे रासचक्र हाताने फिरवले जाते. त्याचाही खास मान विशिष्ट समाजाकडे असतो. 

या रासक्रीडादरम्यान अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ पदांचे गायन केले जाते. कोजागिरीच्या रात्री रासचक्र चढविल्यानंतर रात्री दहा पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत न थांबता हे भजन गायन केले जाते. मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, वाद्यांच्या गजरात देवघरापासून ते समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. 

या रासक्रीडेच्या कामांमध्ये प्रत्येक समाजाला सामावून घेतले जाते. पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा न्हावी,तेली कुंभार यांकडे कापसाच्या वाटी बनवणे, दिव्यांना तेल पुरवणे आणि मातीचे दिवे बनवणे अशी अनुक्रमे कामे दिलेली होती. आदिवासी बांधवांकडे जंगलातून केळीची पाने आणि फुले आणायचे काम. शिंपी लोकांकडे रासचक्र बांधण्याचे काम, मराठा समाजातील लोकांना रासचक्र सजावट,मंदिरावर झेंडा लावणे आणि परिसर देखरेखीचे काम, अशी सर्व समाज समावेशक उत्सव काशीराज महाराजांनी सुरु केला. जर कोणाला नवसाने मुलगा झाला असेल तर त्याला गोपिका बनवून त्यांना देव मानून त्यांची मुरवणूक काढली जाते. असा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे. 







हे सगळे डोळ्यात साठवून आजचा दुसरा दिवस संपवला. रात्रभर चालणारी भजने ऐकत केव्हा डोळा लागला आठवत नाही. सकाळी सहाला उठलो तेव्हाही त्याच उत्साहाने भजन गायन चालू होते. मंदिरातील गर्दी आता सरली होती. शांत चित्ताने उद्धव महाराज समाधीचे दर्शन घेऊन मुल्हेरचा निरोप घेतला. आता तिसऱ्या दिवसाचे लक्ष होते - किल्ले न्हावीगड उर्फ रतनगड आणि पाचव्यांदा मांगी-तुंगी. 

पुढचा भाग - दिवस तिसरा : मुल्हेर - मांगीतुंगी - पाताळवाडी - किल्ले न्हावीगड /रतनगड - मुल्हेर -  कपारभवानी देवी, जामोटी - वायगाव - सटाणा