शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

परमार्थात स्वार्थ - किल्ले हडसर

परमार्थात स्वार्थ - किल्ले हडसर 





ललितापंचमीचे औचित्य साधून रविवारी मंचर जवळील अवसरी खुर्द येथे देवीच्या दर्शनासाठी जाणे झाले. सकाळी लवकर पुण्यनगरीतून निघाल्याने यथासांग देव दर्शन आणि गावात फेरफेटका मारून झाला. बारा पासून पुढे उपलब्ध असलेला वेळ सत्कारणी लावावा म्हणून,  परमार्थात स्वार्थ साधून जुन्नरकडे प्रयाण केले. आता येथून पुढे दाऱ्या घाट आणि दुर्ग-ढाकोबा यातले काहीतरी करू असे ठरवले होते पण बरोबर छोटा मावळा असल्याने मग मोर्चा वळवला तो स्थापत्यकलेतला अद्वितीय असा नमुना असलेल्या हडसर किल्ल्याकडे. 

हडसर गावात येताच, पूर्वी किल्ल्याची पूर्वेकडील खुंटीची वाट एकट्याने चढून आलो होतो आणि तो किती मोठा वेडेपणा होता यांची आठवण झाली. यावेळेस मंडळी बरोबर असल्याने पेठेची वाडी येथून सोप्या वाटेने चढायला सुरुवात केली. थोड्याफार चढाई नंतर आपण किल्ल्यांच्या खिंडीत पोहोचतो आणि मग प्रशस्त अश्या पायऱ्या चालू होतात. 

पाऊण एक तासात खिंडीतून पायऱ्या चढून तटबंदी जवळ पोहोचलो. किल्ल्यापासून वेगळ्या झालेल्या छोट्या टेकडीला किल्ल्यात सामावून घेण्यासाठी बांधलेली अभेद्य अशी तटबंदी बघता , आपल्याला पुढे काय नवल बघायला मिळणार आहे याची प्रचिती देते. या खिंडीतून फक्त पाण्याला खाली जाण्याची आणि वाऱ्याला वर येण्याची मुभा. येथून डावीकडे वळताच नजरेस पडतो गोमुखी रचनेचा कातळात खोदून तयार केलेला अद्वितीय असा कलाविष्कार. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बघता क्षणी टाच आपटून सॅल्यूट !

प्रवेशद्वाराचे कातळ सौंदर्य बघून थक्क व्हायला होते. मूळच्या कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, त्याला अंगच्या कातळाचेच पुन्हा कठडे, पुढे या कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, आतमधील चौकीदारांच्या खोल्या देवड्या, त्यावर कड्यावरचे वहाते पाणी येऊ नयेत म्हणून खोदलेली पन्हाळी आणि त्यामुळे भरपावसात ही कोरड्या असलेल्या पायऱ्या... सगळे शब्दातीत. 

मुख्य दरवाज्याने थोडे वरती चढून आल्यावर खिंडीपलीकडच्या टेकडीवर एक वाट जाते. तेथे गणपतीची एक मूर्ती कोरलेली दिसते. डावीकडे "U" आकाराचे वळण घेऊन दिसतात कातळात बेमालूमपणे लपलेल्या खड्या चढाईच्या पायऱ्या. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गाचा अंदाज येत नाही. येथून पुढे अजून एक गोमुखी रचनेचे दुसरे प्रवेशद्वार लागते. द्वारांच्या कमानी एकाच लयीच्या आणि मितीच्या. येथून अंतिम पायऱ्या चढून किल्ल्यावर पोहोचलो. 

किल्ल्यावर महादेव मंदिर, तलाव, धान्य कोठार/गुहा, वाड्याचे अवशेष अश्या बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. समोर उभा ठाकलेला निमगिरी हनुमंतगड ही जोडगोळी ,लांबवर दिसणारे माणिकडोह आणि किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य.

छोट्या मावळ्याचा उत्साह बघून शिवमंदिराच्या दिशेने प्रस्थान केले. घंटेचा नाद आसमंतात घुमला. मंदिरातील कोनाड्यात स्थानापन्न असलेले गणेश, मारुती आणि विष्णुभक्त गरुड मूर्ती बघून आपोआप हात जोडले गेले. मंदिराच्या शेजारी असलेले कमानी टाकं तुडुंब भरलेले होते. येथून उजवीकडे थोड्या अंतरावर गुहा दिसते. टाकं पूर्ण भरलेले पाहून त्याच्या जवळ भूभागाला समांतर खोल खोदलेल्या गुहेत कसे काय पाणी साठत नसेल या विचारातच गुहेत शिरलो. गडाच्या माथ्यावर एकटाच असल्याने मनसोक्त फोटोग्राफी झाली. पुढे थोडेफार अवशेष बघून परतीचा मार्ग धरला.  

किल्ला उतरून वाडीत येऊपर्यंत उन्हे कलू लागली होती. पश्चिमेला आभाळात केशरी झालर पसरली होती. आता पावले लगबगीने घराच्या दिशेने पळू लागली. 

आपल्या कालातीत अश्या इतिहासाचा ठेवा आपणच आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला पाहिजे. गोष्टीतले महाराज आणि त्यांचे गडकिल्ले जेव्हा ते स्वतः अनुभवतील तेव्हाच त्यांची रुची वाढेल. 


या चढाईचा युट्युब व्हिडीओ - 

2015 मध्ये खुंटीच्या वाटेने केलेल्या चढाईचा वृत्तांत येथे वाचू शकता. 

जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
थरारक !!








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: