तैलबैला, सवाष्णीचा घाट, मुहूर्ताचे आर्जव, कोरा चहा व न सापडलेल्या ठाणाळे लेण्यांच्या शोधात ...
२६ जानेवारीच्या सुट्टीचे औचित्य साधून इ.स.पू. पहिल्या शतकातील ठाणाळे लेण्या शोधण्यास निघालो. गेला महिनाभर सातवाहनकालीन इतिहास, त्यावेळचे व्यापार, त्यासाठीच्या घाटवाटा आणी त्या घाटवाटांवर असलेल्या प्राचीन लेण्यांचे मूळ शोधण्याचे भूत चढले होते. महिनाभर हापिसात आलो की थोडीफार खर्डेघाशी झाल्यावर टाईम मशीन घेऊन पूर्वकालात जाऊन पोहोचायचो. इतिहासाने भारून वर्तमानात आलो की सामान्य माणसाची लक्षणे धारण करून पोटासाठीचा नेहमीचा दिनक्रम.
असो. तर आज शोधायच्या होत्या ठाणाळे लेणी. सुधागड करून आलो होतो मागच्या वर्षी तेव्हा ठाकूरवाडीतून चढून धोंडसे गावात उतरून सवाष्णीच्या घाटाने तैलबैला मग ठाणाळे लेणी करायच्या होत्या. तेव्हा काय ते जमले नाही पण तैलबैलाच्या एकलकोंड्या, अखंड उभ्या कातळभिंती कायम आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत असाच वाटायचं. सुधागडावर फेरफटका मारताना काय आणी भांबर्डेवरून घनगड सर करून लोणावळा गाठताना काय, आपल्या दोन अखंड कातळभिंतींचे डोळे करून घाटवाटांची टेहळणी करत बसलेला तैलबैला नेहमीच मनात घर करून बसलेला.
असो, तर आजचा मार्ग होता तो कोथरूड-> पौड->जवण->तुंग->लोणावळा रोड->तैलबैला->वाघजाई घाटाने ठाणाळे लेणी दर्शन->भांबर्डे->ताम्हिणी->घरी.
सकाळी ७ वाजता स्वारी निघाली आणि पहिला नेहमीचा ब्रेक म्हणजे तिकोना किल्ल्याच्या म्हणजे जवण गावाच्या खिंडीच्या अलीकडे हाडशी तलाव. माझ्याबरोबरच आळस झटकायला आलेले पक्षी आणी लागलीच ड्युटीवर आलेले सूर्यनारायण महाराज.
याच स्पॉटला मागच्या महिन्यात आलो होतो तेव्हाही सगळं परिसर केशरी रंगात न्हाऊन निघालेला होता. मस्त !
आज पाणी जरा कमी झालेले वाटले पण तीच निरव शांतता आणी तीच मजा.
आताशा साडे नऊ वाजत आले होते. "जवण" गावातून तिकोनापेठ चा रस्ता सोडला आणि डावीकडे वळून तुंगीचा रस्ता धरला. तुंग किल्ल्याच्या बाजूने जाताना तुंगीचे वेगळे दृश्य.
आता येथून जे निघालो ते "तैलबैला" गावातच जाऊन थांबू या विचाराने. लोणावळा->तुंग जोडणाऱ्या या ठिकाणी आल्यावर थांबलो नसतो तरच नवल होते. ऊन चढायला लागलेले होते पण इथे मात्र त्याचा मागमूसही नव्हता.
थोडा क्लिकक्लिकाट झाल्यावर निघालो आणी लोणावळा रोड ला लागलो. सुमारे १५ मिनिटात कोरीगडचा फाटा आला. आज फुल पिकनिक पब्लिक आलेले दिसत होते कोरीगडावर म्हणून मग नाश्ता ब्रेक फाट्यावर मारून भांबर्डे खिंडीत आलो. एक चिंचोळा रस्ता तैलबैला गावात जात होता. वळणावरच फलक लिहिलेला आहे. या रस्त्यावरून एसटी कशी काय जात असेल असा प्रश्न पडला. तो पडलेला प्रश्न तसाच उचलून डबलसीट घेऊन पुढे गेलो आणि समोर बघतो तर काय कमाल. अहाहा !
येथून ५ मिनिटात गावात पोहोचलो. सुरवातीलाच रोकडे यांची खानावळ आहे. तेथे गाडी लावून मळलेली पायवाट धरली.
"ठाणाळे लेणी कसे जायचे? "
"तुम्हाला सापडणार नाहीत. माणूस पाठवावा लागेल दाखवायला"
"ठीक आहे बघतो मी. "
निघताना पूर्ण माहिती काढून आलो होतो पण कोणत्या घाटाने खाली गेल्यावर लेणी लागतील याबद्दल संभ्रम होता. लेण्यांचे मॅप लोकेशन माहित होते त्याप्रमाणे चालायला चालू केले. पायवाट मध्येच मोडत होती. थोडे पुढे गेल्यावर तर वणव्यामुळे सगळे गवत जळालेले होते व त्यातून अनेक गुरांच्या वाट्या फुटलेल्या. अंदाजे पठाराच्या मध्यभागी पोहोचू असे चालत कातळभिंतींच्या पश्चिमेकडे आलो. आता एरवी कातळाचे डोळे करून वर्षानुवर्षे टेहळणी करणाऱ्या या भिंती रौद्ररूप धारण करू लागल्या.
बरेच चालून पठाराच्या शेवटी पोहोचलो. समोर मोठी दरी, खाली उजवीकडे ठाणाळे , डावीकडे धोंडसे आणी बलदंड पहारेकरी सुधागड आणी मागे बघतो तर डाईक रचनेचा काळाने बनवलेला अद्भुत चमत्कार.
पठाराच्या शेवटी, एक दगडाच्या टोकावरून, घाटवाटा अंदाजे ओळखू येत होत्या. धोंडसे गावात उतरणारी "सवाष्णीची घाटवाट" आणी ठाणाळे गावात उतरणारी "वाघजाई घाटवाट".
वरून पाहता वाटेचा काही माग लागत नव्हता. म्हणून मग थोडे डावीकडे जाऊन खाली उतरणारी वाट असेल या आशेपायी पायपीट चालू झाली. अर्धा पाऊण तास फिरून खाली जाणारी वाट सापडेना, त्यात भरीस भर म्हणून असंख्य फुटलेल्या गुरांच्या वाटा, जळालेल्या गवतामुळे अजून ठळक झाल्या होत्या. पुढे जाऊन कळायचे की वाट नाही मग मागे फिरा असे करत करत शेवटी एका वाटेला लागलो.
हि वाट सुधागडाच्या बाजूने खाली उतरत होती हे कळत होते पण थोडे जाऊन बघू पुढे दिसेल या आशेने पुढे जात राहिलो. एक क्षणी कळून चुकले की हि वाट वाघजाई घाट नसून सवाष्णीचा घाट आहे आणी हि पुढे धोंडसे गावात उतरणार. पण आता परत ऑल द वे मागे जाऊन परत वाघजाई घाट शोधावा लागणार होता. धोंडसे गावाच्या वाटेतून, ठाणाळे गावात जाऊन, तेथून उलट वाघजाई घाट चढून जाऊ अश्या मनसुब्याने धोंडसे गावाचा रस्ता धरला.
सुमारे दिड तास चालून जीव मेटाकुटीला आला होता. तैलबैलाच्या कातळरूप बघण्याच्या नादात नाश्ताही केला नसल्याने भूक लागली होती. जवळपास वाट उतरल्यानंतरही ठाणाळे गावाकडे जाणारी कुठली वाट दिसेना. आता धोंडसे गावात जाऊनही काही उपयोग नव्हता. घड्याळात बघितले तर २ वाजत आले होते. शेवटी आल्यापावली परतायचा निर्णय घेतला आणि परत सवाष्णीचा घाट चढून पठारावर आलो.
थोडेसे पोटात गेल्यावर तरतरी आली तसे परत कातळभिंतींकडे कूच केले. येथून परत वाघजाई घाट शोधून मग त्याने उतरून पुढे ठाणाळे लेणी शोधण्यात संध्याकाळ होईल असा विचार करून परत गावाची वाट पकडली आणी गावाच्या थोडे अलीकडून किल्ल्यावर जायची वाट घेऊन अर्ध्या तासात वरती कातळभिंतींच्या मध्यभागी पोहोचलो.
आता गार वारा उन्हाची जाणीव होऊ देत नव्हता. समोर कोणत्याही आधाराशिवाय सरळसोट उभ्या ठाकलेल्या या अजस्त्र कातळभिंती.
बरेच फोटोसेशन झाल्यावर दोन भिंतींच्या मध्ये असलेल्या मंदिरात पोहोचलो. आपले पूर्वज तेथे स्वागताला उपस्थित होतेच. मंदिराचा जिर्णोद्धार होऊन चकाचक फरश्या घातल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये, कड्याच्या पोटामध्ये टाके खोदलेले आहे आणी त्यात बारमाही गार पाणी.
देवाला हात जोडून तेथेच पाठ टेकवली. पंधरा वीस मिनिटे झोप काढल्यावर काही माणसांच्या आवाजाने जाग आली. एक मुलगा आणि त्याचे वडील, त्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेचे आर्जव घेऊन आले होते. पहिली पत्रिका ग्रामदेवाला म्हणजेच तैलबैला (खंडोबा) देवाला, दुसरी वाघजाई घाटात वाघजाई देवीला आणि मग बाकीचे पत्रिका वाटप.
त्याच्या लग्नाच्या मुहूर्ताला आम्हीही उपस्थित असणे म्हणजे निव्वळ योगायोग का सर्वकाही "त्याने" ठरवलेले या विचारात काही मिनिटे गेली. देवाची पूजा झाल्यावर नारळ फोडला आणि मर्कटलिलांना उधाण आले. पटकन बॅग पाठीला अडकवली आणी सुटलो वाघजाई घाटाच्या दिशेने.
गावात आता सूर्यफुलाची शेती चालू झाली आहे. भर उन्हात पिवळीधमक फुले अजूनच उठून दिसत होती.
चैत्राची पालवी फुटावी आणि चाफ्याच्या सुगंधाने हवा भरून जावी असे वातावरण झाले होते.
बाकी सगळेजण आपापल्या कामात गुंग होते. त्यांनाहि माझ्या उपस्थितीची जाणीव न होऊ देता पुढे निघालो.
आता चालत वाघजाई घाट जाण्याइतका वेळ नव्हता. साडे तीन वाजत आले होते पण अजून एक तास हातात होता. चार-साडेचार पर्यंत निघणे भाग होते कारण भांबर्डेकडून पौड->पुणे रस्ता अतिशय खराब आहे. वरती मंदिरात भेटलेला वडील-मुलगा येताना माझ्याच रस्त्याने आले होते त्यांनी भांबर्डेकडून पौड न जाण्याचा सल्ला दिला. स्थानिकांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.
एक तासात गाडीने वाघजाई घाटात जाऊन लेण्या शोधता येईल असे त्यांच्याकडूनच कळले. कमीतकमी वाघजाई मंदिरापर्यंत तर जाता येईल म्हणून गाडी लावली होती तेथे आलो. गाडी काढून लाल मातीत टायरची नक्षी काढत निघालो. मागून ते दोघे वाघजाई देवीला पत्रिका ठेवायला दुचाकीनेच येणार होते. पुढे गेल्यावर इतका खराब रस्ता होता कि गाडी जाईल का नाही शंका वाटली. तशीच थोडी पुढे दामटली. आता मात्र "इथे गाडी पंक्चर झाली तर काय? एकटाच असल्याने काहीच मदत मिळणार नाही " या विचाराने मी मागे फिरलो आणि बघतो तर माझ्या मागून तो मुलगा, त्याचे वडील आणी त्याची आई असे तिघे एका पॅशन गाडीवर चालले होते. त्यांना तेथेच हात जोडून पुण्यनगरीच्या रस्ता पकडला.
जाताना जेथे गाडी लावली होती तेथे त्यांना मदत म्हणून चहा सांगितला. ५ मिनिटात चहा हजर. बघतो तर कोरा चहा. विचारले तर कळले कि गावात दूधच येत नाही. ज्यांच्याकडे गाई-म्हशी आहेत त्यांच्याकडेच दूध. मग त्याच्या बदल्यात इतर साहित्याची देवाण-घेवाण . सह्याद्रीच्या कडे-कपारीत लपलेल्या कित्येक गावे व पाडे यांची आजही हि स्थिती आहे. लोणावळापासून काही अंतरावर असलेल्या या गावात अशी वेळ असेल यावर विचार करावासा वाटला. असो, चहा तर गेलाच नाही मग तसाच ठेऊन त्यांचे मूल्य देऊन निघालो.
रमतगमत लोणावळा पोहोचलो आणी तेथून कोथरूड.
ठाणाळे लेणी तर काही सापडली नाहीत पण एका ऐतिहासिक घाटवाटेचा प्रवास अनुभवला. धोंडसे गावात उतरून परत चढून झालेल्या दिवसभराच्या पायपिटीने ठाणाळेसाठी कोणत्या रस्त्याने जायचे नाही हे कळाले. पुढच्या वेळी पावसाळ्यात आलो तरी ठाणाळे लेणी सापडतील असं वाटतंय. असो. जे आज उमगलंय तेही नसे थोडके.
इ.स.पू.पहिल्या शतकातील ठाणाळे लेणी म्हणजे बौद्ध स्थापत्याचा अप्रतिम नमुना. लेण्यांविषयी खूप काही लिहिण्यासारखे आहे पण ते पुढच्या लेखात.
काही क्षणचित्रे :
किल्ल्यावर पोहोचल्यावर गारेगार वारा, थंडगार पाणी, दुपारच्या जेवणात कुरडईचा चिक, स्ट्रॉबेरी. मस्त मजा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा