सोमवार, ११ मार्च, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २  - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
---------------------------------------------------------------------

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा  
---------------------------------------------------------------------
गाडी मात्र मुल्हेर च्या दिशेने धावतच होती…
रस्त्यात माणसे हात दाखवून गाडी थांबवत होते आणि गाडीत घुसत होते, आणि चालक हि मस्त सगळ्यांशी गप्पा टप्पा मारून, चौकशी करून मग पुढे जात होता. काही वेळा लोक नुसतेच गाडी थांबवून गप्पा टाकून झाल्यावर आल्या पावली परत जात होती. अखेरीस ६ जणांच्या गाडीत तब्बल १९ लोक कोंबल्यावर चालक एकदम फॉर्म मध्ये आला. आता उदास गाणी बंद होऊन त्यांची जागा लोकांच्या गजबजाटाने घेतली. कोणाच्या घरी लग्न आहे…. कोणाच्या उसाला यावेळी जास्त भाव मिळाला… "पोर लई आईकेनाशे झाल्यात, हाणला पाहिजे एकेकाला धरून"…. "आर चाल की नाक्यापर्यंत "चा" पाजतो"… "ओ गाडीवालं लवकर परत या हो… फूड़ गाडी नाय आम्हाला जायला…"

 गाडीतूनच "हरणबारी" धरणाचे मनोरम्य दृश्य दिसले.
गाडीतूनच मागे वळून पाहता आमचे एक पूर्ण झालेले स्वप्नच आम्हांस खुणावत होते. साल्हेर- सालोटा आणि त्या शेजारील दातेरी डोंगर रांग.
 थोडे अजून पुढे गेल्यावर आमचे या ट्रेक चे शेवटचे डेस्टिनेशन "मांगी तुंगी' चे हि दर्शन झाले. 

अश्या कितीतरी घटनांचा साक्षीदार होऊन आम्ही मुल्हेर गावात पोहोचलो.

गावातील प्रवास व्यवस्था अशीच आहे. ST ची वारंवारता ठीक असली तरी वेळेला गावकरी असा जोखमीच मार्ग हि पत्करतात. पण हेच त्यांचे जगणे आहे.

मुल्हेर गावामध्ये आल्या आल्या काहीतरी वेगळेच जाणवत होते. एकदम निवांत दिनचर्या. गावाच्या सुरवातीसच मोठी शाळा, तिथे शिक्षक असलेल्या मित्राच्या भावाचा पत्ता शोधाने आम्हाला जास्त कष्ट पडले नाहीत. या गावाशी माझे काय भावनिक नाते जोडले होते काय माहीत? माझी आजी आणि तिची आई म्हणजे माझी पणजी दोघीही मुल्हेर गावातील याच शाळेत शिक्षिका होत्या. आल्याक्षणीच आम्ही शाळेत पोहोचलो. शाळेत शिक्षक म्हणून असलेल्या आणि मित्राचे नातेवाईक "मालपुरे" सरांच्या घरी आम्ही त्या दिवशी मुक्कामास होतो. त्यांनी आम्हाला पूर्ण शाळा फिरवली.
शाळेचे बांधकाम हे बरेच जुने आणि कलाकुसरीचा उत्कृष्ट असा नमुना होते. पूर्णतः सागवानी लाकडामध्ये केलेले कोरीवकाम आणि कला मन वेधून  घेत होते.
हीच ती शाळेची मध्यवर्ती इमारत. पूर्वी इथे शाळा भरायची. आता हे कार्यालय आणि महत्त्वाचे नोंदी ठेवण्याचे ठिकाण आहे. याच्या सभोवताली शाळा असून जवळ जवळ ३० ते ३५ शिक्षक आणि ४०० पर्यंत विद्यार्थी आहेत.
शाळेतर्फे सर्व मुलांना जेवण मिळते. त्याची सोय करणारे "शुक्ल" हे कुटुंब गावामध्ये जेवणासाठी प्रसिद्ध आहेत. साल्हेर उतरून आल्यामुळे बेक्कार भूक लागलीच होती.  त्यांच्याकडे जेवण सांगून आम्ही आमच्या घराकडे कूच केले.
पाय आणि पाठ खूपच ठणकायला लागली होती. तरीही फ्रेश होऊन जेवणासाठी निघालो. घरातूनच गावाचे आणि आमच्या उद्याच्या लक्ष्याचे म्हणजे मुल्हेर- मोरागडाचे दर्शन झाले.

समोरच एक पडका वाडा होता.
  याच मुलाने आम्हांस गावदर्शन घडवले. त्याच्या चेहऱ्यावरची निरागसताच सर्व काही सांगून जाते.
हे छायाचित्र बघून कोणा- कोणाला लहानपणीचे दिवस आठवले ?
जरा गावात फेरफटका मारून आलो. त्यात ह्या दुकानदाराने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे त्याच्या टोपली भरून ठेवलेल्या शेवेने. आज पर्यत कधी न खाल्ल्यामुळे जरासा मोह झाला पण भूषण ने खाऊ दिले नाही. ( त्याला ते कसे बनवतात हे ठाऊक असावे बहुतेक). पण दुकानदार मात्र फोटू काढताना भलताच खुश झाला." नुसता शेवेचा का फोटो काढता? आमच्या शेठ चा पण फोटो घ्या की" असे म्हणत त्याने पोझ पण दिली. 

दिवसभर विश्रांती घेऊन मग आम्ही रात्री उद्धव महाराज समाधी बघण्यासाठी निघालो. अतिशय शांत असा हा परिसर असून पूर्वी येथे प्राथमिक शाळा भरायची. आता येथे ट्रेकर्स ची राहण्याची व्यवस्था होते. जवळ जवळ ५० ते ८० लोकांची राहण्याची व्यवस्था येथे होऊ शकते.

उद्धव महाराज समाधीचे रात्रीच्या वेळचे हे छायाचित्र. 

उद्धव महाराज समाधी
उद्धव महाराज समाधी ऐतिहासिक पार्श्वभूमी :
 "उद्धव महाराजांचे मूळ नाव शिवबा. त्याचे वडील मुल्हेर किल्ल्यावर लेखनिक होते. यात्रेच्या निमित्ताने त्यांचे आई वडील बद्रीनारायणास गेले असता "तुझ्या पोटी माझा भक्त जन्माला  येणार आहे" असा त्यांना दृष्टांत झाला. तिथेच भाद्रपद शू. ९,  १६४६ साली शिवबाचा जन्म झाला. अल्प काळात मत पित्याचे छत्र नाहीसे झाल्याने त्याचा सांभाळ मामांनी केला. शिवबा नेहमी मुल्हेर येथे काशिराजांकडे येत असत हे त्यांच्या मामांना रुचत नसे म्हणून त्यांनी रास क्रीडेच्या दिवशी त्यांना कोंडून ठेवले. मनातील आर्त भक्तीमुळे श्रीकृष्णाने त्यांना रास क्रीडा दाखवली.यामुळे शिवबाचे महत्त्व लोकांना लक्षात आले. १६६० साली रामदास स्वामी मुल्हेर येथे आले असता त्यांनी शिवबाचे खरे स्वरूप ओळखून हा श्री कृष्णाचा सखा / भक्त म्हणून त्याचे नाव उद्धव ठेवले. काशिराजांच्या अनुग्रहानंतर त्यांनी मोठे समाजकार्य केले. साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्यांना भागीरथी ने स्नान घातले. आजही दर बारा वर्षाने भागीरथी येथे प्रकट होते. २७-९-२००४ ला भागीरथी येथे प्रकट झाली होती. एकनाथ महाराजांच्या उपदेशानुसार "भक्ती प्रकाश" या ग्रंथ त्यांनी लिहिला. अखेरीस कार्तिक शुद्ध १, इ. स. १७२१ ला महाराजांचे  निर्वाण झाले."
( मंदिरातील फलकावरून आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीवरून)

 उद्धव महाराज पादुका 

संध्याकाळी येथे बाल विकास केंद्र भरते. तर त्यानंतर तरुण वर्गाच्या प्रबोधनासाठी "युवक विकास" केंद्र भरते. पूर्ण गावात २ दिवस फिरताना एकाही तरुण दारू, सिगरेट अथवा कोणताही थिल्लरपणा करताना आढळला नाही. येथे जमलेल्या तरुणांपैकी एकाने येथे कोजागिरी पौर्णिमेला होणाऱ्या "रास नहाणाची" इथम्भूत माहिती पुरवली. माझे दूरचे नातेवाईकच या "रास नहाणाची" सर्व प्रायोजकत्व घेतात हे ऐकून मी अजून माहिती मिळवली . 
माझी आजी आणि पणजी या गावात शिक्षिका असल्याने वयाचे ४० वर्षे पुढची गावातील सगळी मंडळी त्यांना ओळखत होती. "शरुबाई दीक्षित" हे त्यांचे नाव. मी त्यांचा नातू आहे हे कळल्यावर जवळ जवळ ६ तासात आम्ही पूर्ण गावात माहिती झालो. "शरुबाई चा नातू आलाय" हि खबर गावात वाऱ्यासारखी पसरताच त्याच्या कामाची खोली माझ्या लक्षात आली.शिक्षक हा गावात किती प्रतिष्ठित असतो हे जाणवले.गावातल्या मुलामुलींची प्रगती व्हावी अश्या  उदात्त हेतूने काम करणारे शिक्षक अजूनही जगात आहेत.  काही वडिलधाऱ्या मंडळींनी घरातील सर्वांची विचारपूस करून 'कुठे मुक्काम आहे? जेवायचे काय?' असे विचारात संध्याकाळी जेवावयास येण्याचे निमंत्रणही दिले. गावातील माणुसकी अजून टिकून आहे याचेच हे मूर्तिमंत उदाहरण.

समाधी वरून आम्ही देव्हारा पाहण्यासाठी निघालो. उद्धव महाराज समाधी च्या ट्रस्ट चे सर्वेसर्वा "किशोर महाराज" त्यांच्या घरातील देव्हारा हा आवर्जून पाहावा असाच आहे. कोणासाठी हा खुला असून त्यात जवळ जवळ ५०० पेक्षा जास्त मुर्त्या आहेत. रोज त्यांची पूजा केली जाते. 


उद्धव महारांची प्रसन्न मुद्रा.  यांच्या घरी साक्षात प्रभू रामचंद्र जेवावयास आले होते असे म्हणतात. ते जेवणावळीचे ताट हि येथे संग्रह करून ठेवलेले आहे.

 घरी फोनाफोनी करून खुशाली कळवली आणि शांत अश्या वातावरणात थंडीची साथ घेत आम्ही निघालो.

आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले होते. परतीची वाट धरली आणि थेट पोहोचते झालो "शुक्ल" काकांकडे. येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या ट्रेकिंग ग्रुपची जेवणाची व्यवस्था यांच्याकडेच असते. अर्थात ते आणि त्यांच्या आईचा माझ्या आजीशी घरोबा असल्याने जणू घराचे सदस्य असल्यासारखे आमच्या गप्पा टप्पा चालू होत्या. त्यानंतर गावात अनेक ठिकाणी ओळखी काढत जवळपास १० ते १५ लोकांची आम्ही दार ठोठावली.
आता परत घरी येऊन आम्ही उद्याची तयारी चालू केली. सकाळी ७ वाजताच आमची स्वारी मुल्हेर- मोरागडाकडे प्रयाण करणार होती. फोन, कॅमेरा चार्जिंग ला लावून आम्हीही चार्ज होण्यासाठी झोपी गेलो.

क्रमशः

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३   - मुल्हेर, मोरागड

२ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

जबरी... मीमराठीवर फटू दिसले नाहीत...

sagarshivade07 म्हणाले...

धन्यवाद सुहास,
तेथे लिंक टाकून प्रयत्न केला पण बहुतेक फोटोची साईज जास्त असल्याने ते दिसत नाहीयेत :(