शनिवार, २७ डिसेंबर, २०१४

हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.

पूर्व लेख: 

शिवकालीन/ब्रिटीशकालीन इतिहासाचा मागोवा : हरीहर/हर्षेगड  किल्ला
हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी. 


सह्याद्रीमधील बर्याच किल्ल्यांचा इतिहास आपल्याला माहित असतो.  कधी तो शिवकालीन कालखंडाशी निगडीत असतो तर कधी अगदी पौराणिक कालखंडातील परशुराम आणी रामायणापर्यंत जाऊन पोहोचतो.
सोळाशे शतकातील मराठ्यांच्या पदस्पर्शाने तर येथील दगड अन दगड पावन झालेला असावा.
मराठे, मुघल, पोर्तुगीजांपासून ते ब्रिटीश राज्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी सह्याद्रीची उपयुक्तता आधीच हेरलेली होती. मराठ्यांकडून राज्य मिळवायचे म्हणजे पहिले त्यांचे किल्ले एकतर जिंकून ताब्यात घेतले पाहिजेत वा तोफांच्या भडीमाराने किल्ले उद्वस्त करून पर्यायाने मराठ्यांचे मनोबल खच्ची केले पाहिजे. म्हणून मग बरेच किल्ले ब्रिटीश अधिकार्यांनी येण्याजाण्याच्या वाटा तोफगोळ्याने भेदून तोडीफोडीनेच किल्ले मिळवले.

त्याकाळी बांधलेले किल्ले, त्यांची अभेद्यता, त्यावरील स्थापत्यकला , त्यांचा इतिहास, किल्ल्यावरील राजवैभव येथपासून ते अगदी मारुती आणी गणपतीची मंदिरे वा मुर्त्या या सगळ्यावर किती माहिती मिळवू आणि किती लिहू तेवढे कमीच आहे असे वाटत राहते.

असो, शिवकालीन किल्ल्यांचा इतिहास वैगरे या विषयांवर माझ्यासारख्याने लिहिणे हास्यास्पदच होईल म्हणून त्यावर मी इथे लिहिणार नाहीये. फक्त एक अनुभव मांडत आहे आणी त्याची ऐकीव इतिहासाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो आहे.


आंतरजालावर काही माहिती सापडली.ती येणेप्रमाणे :
१८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच.
सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही.


हरीहर किल्ल्यावर जायचा प्लान केला तोच मुळी हरीहर किल्ल्याच्या एका अखंड कातळात ७० अंश कोनामध्ये असलेल्या खोदीव पायऱ्या बघूनच. नुसता फोटो पाहूनच आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. प्रत्येक पायरीला वरच्या कातळात आधारासाठी बोटाने पकडायला खाचा केलेल्या आहेत. या पायऱ्या चढण्याचे आणी मुख्यतः पावसाळ्यात उतरण्याचे थ्रिल काही औरच आहे. 



वरील 'कॅप्टन ब्रिग्ज ' ब्रिटीश अधिकाऱ्याची असे काही ऐकले होते. पण ते काही खरे वाटत नव्हते. आजपर्यंत माथेरान सोडले तर ब्रिटीश राजवटीच्या खुणा कधीच आढळल्या नाहीत. 
तुम्हालाही खरे वाटत नसेल ना, आणी कोणी तुम्हाला "पुराव्याने शाबित" करून दाखवले तर???? 

तर हा घ्या पुरावा: 
१.  किंग जॉर्ज पाचवा आणी सहावा यांच्या प्रतिमा असलेले ब्रिटीश सेंट्स ( मोठी दोन नाणी) आणी त्याहून पुर्वाचीन असे राणी एलिझाबेथ पहिली यांची प्रतिमा कोरलेले तांब्याचे नाणे. ( छोटे तांब्याचे वाटणारे नाणे)


२.ब्रिटीश सेंट्स सारखी डिझाइन असलेले २५ पैसे. साल १९१२

३. विंचू प्रतिकृती कोरलेले शिवकालीन नाणे 'होन' 

४. शिवकालीन होन नाणी. खालचे जर वेगळे दिसणारे नाणे हे पूर्ण तांब्याचे असून त्याचे वजन हि इतरांपेक्षा जास्त आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी, हीच होन नाणी सोन्यात बनवून त्या सुवर्णमुद्रा आनंदाप्रित्यर्थ वाटण्यात आल्या. त्या चलनात नव्हत्या पण आजकाल लिमिटेड एडिशन काढतात तसे काहीतरी असावे.

ब्रिटीश नाणी पाहून एक खात्री पटली की, 'कॅप्टन ब्रिग्ज ' ब्रिटीश अधिकाऱ्याचीजी काही कहाणी ऐकली होती ती खरी असावी. किल्ला जिंकल्यानंतर ब्रिटीश अधिकारी सुट्टीसाठी या किल्ल्यावर राहायला यायचे असेही कळते. 

या अनुभवाने माझ्या मनात ब्रिटीश लोकांबद्दल असलेला आदर द्विगुणीत झाला असे म्हणता येईल. ब्रिटीश नसते आले तर आजही आपण होडीतून आणी बैलगाडीतूनच फिरत असतो.असो. 

एका हुशार नाणी अभ्यासकाच्या मते, एकाची किंमत आजच्या घडीला जवळपास २० लाख रुपये असावी.
मग टोटल किती झाले यासाठी कॅल्क्युलेटर पाहिजे का?

( इतिहास उलगडण्याचा हा प्रयत्न नसून लोकांना जुनी नाणी काही ओझरत्या संदर्भासहित बघावयास मिळावी हा उद्देश्य आहे.)


-----------------------------------------------------------------------------------------------------
पुढचे लेख:
4. हरीहर किल्ला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: