सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर आणी रंगमहाल
Rajdher Fort
साडेचारच्या सुमारास एक बँडची गाडी चांदवडमधील सुपारी "वाजवून" राजधेरवाडीच्या अलीकडील वस्ती पर्यंत चालली होती. घरातले आजोबा गुरांनां चार टाकत होते ते हातातला चारा टाकून रस्त्याकडे धावले आणी त्यांनी सेटिंग करून दिली. वस्तीपासून पुढे चालत जाण्याची मनाची तयारी करत आम्ही गाडीत आसनस्थ झालो.
सुमारे ४-५ किमी गेल्यावर परत सामान खांद्यावर टाकून आमची वरात निघाली. जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात तसे झाले. पुढचे ५ किमी अंतर चालताना आम्ही जे जे काही अनुभवले ते गाडीच्या सरळसोट प्रवासात नक्कीच उमगले नसते.
गाडीवाल्याचे आभार मानून मंडळी आपल्या पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता उन्हे कलू लागलेलीच होती तशी रस्त्याच्या आजूबाजूच्या वस्तीवरही सायंकाळच्या कामाची लगबग सुरु झाली होती.
कुठे ज्वारीची कणसे पाखडणे चालू होते तर कुठे पातेचा कांद्याची खुडपणी. घराच्या अंगणात पडलेल्या अंगणातील डेरेदार झाडाच्या सावलीत काहींची वामकुक्षी लांबली होती तर काही लोक द्राक्षाच्या बागेत जुंपले होते.
सरळसोट रस्ता आम्हाला राजधेरवाडी पर्यंत साथ देणार होता. त्यातही घराघरात 'मावशी, किल्ल्यावर सरळच ना?" विचारत जातानाच हे दोघे भेटले आणी अजून भंकस करण्यात आली.
याची सायकल म्हणजे दिव्य अनुभव होता. 'ब्रेक नाय बर का सायकलीला !"
तस माझं अर्धा आयुष्य ब्रेक नसलेल्या आणी चेन पडणाऱ्या सायकल चालवण्यात गेले असले तरी आता इतक्या वर्ष्यांच्या खंडानंतर अशी सायकल चालवणे आणी पाय घासत थांबवणे म्हणजे दिव्यच की हो!
त्याला विचारले किल्ल्याला कसे ? तर
इथून सरळ जा अगदी शाळेपर्यंत !
ओके, मग काय लागेल?
शाळा !
चला ! मग पुढच्या पायपिटीत ज्वारीच्या कणसांची पाखडणी झाली, कोवळा हरभरा खुडपून चव बघून झाला. लगेच घरात जाऊन काकांनी ओंजळभर लालभडक मिरच्या आणून दिल्या.
"आपल्या शेतातल्या हायेत जा घेऊन. किल्ल्यावर खा जेवताना!" इति काका.
पण हे दिव्य काही आमच्याकडून केले जाणार नव्हते म्हणून राहूदे म्हणत सगळ्या मिरच्या ठेऊन दिल्या.
२-३ ज्वारीची कणसे खिशात टाकली आणि कांद्याच्या पातीच्या शेतात मोर्चा वळवला.
येथे एक आज्जीबाई सगळ्या खुडलेल्या पाता एकत्र करत होत्या त्यांची विचारपुस झाली आणि अजून ३-४ कांदे खिशात जमा झाले. आता जे दिसेल ते मी खिशात भरत चाललो होतो. का? ते शेवटी कळेल तुम्हाला. :)
आता सूर्यनारायण आपली ड्युटी संपवून निघाले होते. जाता जाता सगळीकडे किरणांचा कटाक्ष टाकून "काही राहिले तर नाही ना?" बघत असावेत. आता पश्चिमेला सुवर्ण झळाळी आली होती. सोनसळी किरणांनी अवघा परीसर व्यापला होता. आमचीही पाऊले आता राजधेरवाडीत येऊन पोहोचली होती. मुक्कामाची सोय माहित असल्याने त्याची चिंता नव्हती.
राजधेरवाडीत शाळेच्या समोर एक समाजमंदीर बांधले आहे. ते लिलावात एका ग्रामस्थाने घेऊन त्यात पर्यटकांची राहायची सोय केली जाते. ३०० रु कमीतकमी असून माणसांप्रमाणे भाडे आकारले जाते. सोय चांगली होती पण आम्ही "फुकट ते पौष्टिक" या न्यायाने मारुती मंदिराचा रस्ता धरला. येथून मोजून ५ मिनिटांवर राजधेर किल्ल्याच्या पायथ्याशी मारुतीचे प्रशस्त मंदिर आहे. अंथरूण पांघरूण आम्ही घेऊनच आल्याने येथे मस्त सोय झाली.
नळावरून पाणी भरले, सामान मंदिरात एक कडेला नीट लावून मंदिर झाडून घेतले, अवघा शेंदूरमय झालेल्या बाप्पाला मनोमन हात टेकले आणी सूर्यदेवाला आजचा अखेरचा दंडवत देण्यासाठी येथूनच २ मिनिटे असलेल्या छोट्या धरणावर गेलो.
नाऊ इट्स टाईम फॉर श्रमपरीहार ! पाणी, थोडेफार अबरचबर खायला घेऊन धरणाच्या भींतीवर दोघे बसून होतो. जसा जसा पश्चिमेचा केशरी कागद डोंगराआड सरायला लागला तसे तसे डोक्यावरच्या काळाभोर होत चाललेल्या कागदावर चंदेरी चांदण्यांची नक्षी उमटू लागली. थंडगार वारा प्रत्येक झोतांनिशी आपले अस्तित्व दाखवू लागलाच होता. अश्या वेळी शांत बसून छातीत जास्तीत जास्त वारा भरून घ्यावासा वाटतो. निसर्गाचे कोडे अजून गूढ होत जातेय असे वाटायला लागते. रोजच्या जगण्यातला फोलपणा लक्षात येतानाच त्यापासून आपली सुटका नाही हे हि ध्यानात येते. वाऱ्याने पाण्यावर एखादा तरंग उठला कि आपसुक त्याकडे लक्ष वेधले जाते. मग तो तरंग हळू हळू आपल्या पर्यंत येऊन पोहोचतो आणी आपल्या पायांना एक हळुवार आठवण देऊन जातो. गप्पांची जागा आता शांततेने घेतली असली तरी मनात असे असंख्य तरंग उमटतच असतात. मग मध्येच भानावर येऊन मागे मन वळते आणी मागे भरभक्कम अश्या राजधेर किल्ल्यावरही चांदण्यांचा मुकुट चढलेला असतो. मन अजून हरवत हरवत जात राहते.
"जुन्नरमधील वनक्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांचे चांदवड येथे स्थलांतर" या कुठेतरी वाचलेल्या बातमी बळच आठवते आणी हरवलेले मन ताडकन वर्तमानात येते. चांदवड,इंद्राई, राजधेर, कोळधेर किल्ल्यांनी वेढलेल्या या डोंगर दऱ्यांमध्ये आणी तेही मानवी वस्तीपासून दूर आपण बसलोय हे एकदम आठवून जाते. त्यात अजून भर म्हणजे "संध्याकाळी जनावरे पाणवठ्यावर येतात" असा ऐकलेले. लॉन्ग एक्सपोजर फोटो साठी लावलेला कॅमेरा उचलला आणी परत मंदिरात येऊन पथारी पसरली.
मागच्यावेळी सुधागड ला खायचे सामान जास्त नेले नसल्याने खायचे वांदे झाले होते ते नको म्हणून यावेळेला बक्कळ खायचे सामान आणले होते. मंदिरात जेवण करून कट्ट्यावर टेहळणी करत बसलो होतो तोच ४-५ मुले आली आणी मंदिराच्या शेजारी, ग्रामपंचायतीने नव्याने केलेल्या जिम मध्ये गेली. मग आम्हीही आल्या पावली थोडे डंबेल्स मारून हात दुखावून घेतले. सुमारे ९ वाजता मंदिराचे ग्रील लावून, थकलेल्या पायांनी निद्रादेवीच्या अधीन होऊन गेलो.
रात्री ११च्या सुमारास काळाकुट्ट अंधार पडलेला आणी एक माणूस सदृश्य आकृती मंदिराबाहेर उभी असलेली दिसली. मंदिराच्या पश्चिमेकडे राजधेर अन कोळधेर किल्ल्यांची घळ असल्याने पश्चिमेचा वारा रात्रभर घोंघावत होता. एकुलते एक बेडशीट टिकाव धरू न शकल्याने अंगांची दुमडून पांगोळी करून झोपायचा यत्न चालू असतानाच ताडकन ग्रील उघडले गेले. पांढरा पायजमा, पांढरा सदरा अन डोक्यावर दक्षिणोत्तर टोपी. वाऱ्याने तो पायजमा आणी सदरा फाडफाड उडत होता इतका कि त्याच्या आवाज येथपर्यंत ऐकू येत होता. मंदिरात कसले टेन्शन म्हणत झोपलेलो आम्ही टक्क जागे झालो. टाचणी पडेल तरी आवाज येईल अश्या शांततेत मंदिराची घंटा घणाणून गेली. आम्ही उठून बसलो तोच बॅटरीचा प्रखर झोत आमच्यावर पडला अन आवाज आला. "कोण हाये? झोपा झोपा".... आता कसले झोपा?... झोपा तर उडाल्याच होत्या. मग कळले की, गावात सिंगल फेज आहे त्यामुळे शेतात पाणी सॊडण्यासाठी मोटर चालू करायला हे महाशय रात्री ११ वाजता आले होते. ११ वाजता शेतीची फेज येणार म्हणजे गावातली लाईट १५ मिनिटे जाणार असे काका म्हणताच समोरचा एकमेव बल्ब गतप्राण झाला.
असो. सगळे सव्यापसव्ये झाल्यावर उजाडले एकदाचे आणी मंडळी सकाळच्या कार्यक्रमासाठी रवाना झाली. ग्रामपंचायतीने घरटी शौचालायाची सोय केल्याने अडचण झाली नाही. गावाने २ वेळा चांदवड मधील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार जिंकला आहे असे कळले. खरंच आवडले हे गाव .. शेतकऱ्यांनी मिळून तळी बनवली आहेत. उतारावर बांध घालून पाणी अडवले आणी साठवले आहे. शाळा, समाजमंदिर, मंदिरे घरे सगळे काही टापटीप न स्वच्छ आहे.
पाणी भरून चहा साठी चौकशी केली तर एक कुटुंबांनी अगत्याने घरी बोलावून दोघांना चहा दिला. जाताना त्यांचे आभार मानून निघालो तर वाटेत खायला पिशवीभरून भुईमूग शेंगा पण दिल्या. आता शाळेपासुन फुटणाऱ्या वाटेने चढाई चालू झाली. सकाळच्या वेळेत उन्हे यायच्या आतवरती पोहोचायचे होते.
वाट तशी रुळलेली आहे आणी रस्त्यावर दगडांना पांढरा रंग मारलेला असल्याने वाट चुकत नाही. जरा उंची गाठली तर चांदवडचा किल्ला, साडे-तीन रोडग्याचा डोंगर आणी कालचा इंद्राई किल्ल्या असे तिघांनी मिळून आमचे स्वागत केले. आकाशातून आमच्यावर लक्ष ठेवायला सूर्यदेवही हजर झाले होते.
आता उत्सुकता होती ती राजधेर किल्ल्याच्या ३० फुटी शिडीची. त्यामुळे पावले झपाझप उभ्या खड्या कातळापाशी पोहोचली पण.
हीच ती ३० फुटी शिडी. याच्या मध्यभागी ९० अंशातली छोटी शिडी जोडलेली आहे. ती चढताना काही वाटत नाही पण उतरताना वाट लागते. उतरताना तुम्हाला एकदातरी देवाची अन कुटुंबाची आठवण येईल अशी सोय केली गेली आहे.
किल्ल्यात प्रवेश करायचा म्हणजे शिडी चढून येणे हा एकमेव मार्ग आहे. येथून चढून आल्यावर २ देवड्या लागतात. कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला किल्ल्यावरील विस्तीर्ण पठारावर नेतात. वरती आल्यावर लगेचच तिरप्या कातळात खोदलेली गुहा दृष्टीस पडते. खरेतर या गुहेचा जवळ जाऊ पर्यंत याचा शोध लागत नाही. आत जायला २ फुटांची जागा असली तरी आतमध्ये १ RK फ्लॅट एवढी आहे.
गुहा पाहून त्यासमोरच एक दर्गा टाईप काहीतरी आहे. आधी ते मंदिर असावे असे वाटते. त्या समोरच एक छोटेखानी पण दगडी शिवायल. तेथून उजवीकडे पाण्याचे तळे असावे असे तेवढाच भाग हिरवागार दिसतो. येथून पुढे गेलो तर विस्तीर्ण असे तळे आणी त्याच्या आजूबाजूला कढीपत्त्याची असंख झाडे. संपूर्ण परीसर कढीपत्त्याच्या वासाने सुवासिक झालेला असतो.
पाणी स्वच्छ व नितळ वाटले. येथे जास्त कुणी फिरकत नाही आणी यायची एकमेव शिडीची वाट त्यामुळे जनावरेही चरायला नाहीत त्यामुळे निसर्गाने आपले काम चोख केले आहे.
जसा सूर्य आकाशात चमकू लागला तसे पाण्यात त्याच्या किरणांची असंख्य प्रतिबिंबे उमटू लागली. त्याचाच हा एक निष्फळ प्रयत्न.
बॅग भरून कडीपत्ता भरून घेऊन स्वारी कोळधेरच्या दर्शनासाठी निघाली. डावीकडे पाहता काल संध्याकाळी इंद्राई वरून आलेला पश्चिम कडा आठवला. सुमारे अर्ध्या तासात अजून पुढे अजून ३-४ पाण्याचे टाके दिसले. झाडांच्या पसाऱ्यात लपलेल्या गुहा शोधल्या आणि तासाभरात किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोहोचलो.
आता किल्ल्याला चढायला एकच शिडीची वाट असल्याने जनावरे नाहीत असे आम्हाला वाटले होते. येथे पहिले तर शेळ्यांची शाळाच भरली होती. या कश्या वर आल्या असाव्यात?
उतरताना एक गुराखी भेटला त्याच्याकडून कळले की, ते डोक्यावर एक एक शेळी घेऊन शिडीने वरती चरायला आणतात आणी इथेच सोडून देतात. पिल्लू झाले की विकायला खाली घेऊन जातात.
आता किल्ला उतरून परतीच्या मार्गाला लागलो. २ वाजता काळी-पिवळी होती म्हणून पळत वेळेवर पोहोचलो तर गाडी आलीच नव्हती. ती येईल आणि मिळेल या आशेने परत बागेचा माथा म्हणजे इंद्राई किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पायपीट झाली. तरीही गाडी येईना म्हणून थकलेल्या पायाने चांदवड रस्ता धरला.
काल बँड च्या गाडीने जेथे सोडले होते तिथपर्यंत चालत आलो आणी सुदैवाने एक रिक्षा आली. ती पुढे जाऊन परत येऊपर्यंत झाडाचा झाडाचा आश्रय शोधला आणी चांदवड गाठले. ३ दिवसांची सुट्टी सार्थकी लावून अखेरीस घरचा मार्ग धरला.
आता टार्गेट होते ते म्हणजे रंगमहाल. रंगमहाल म्हणजे सरदार होळकर यांचा वाडा. शनिवार वाड्याच्या तोडीचे नक्षीकाम केलेला हा वाडा भरवस्तीत उपेक्षा भोगतोय. असो त्याबद्दल पुढच्या भागात.
आमचे मित्र व ट्रेकिंग सुरु केल्यापासूनचे साथीदार श्री.भूषण कोतकर उद्या वाढदिवस होता म्हणून बागेचा माथा, मु.पोस्ट राजदेहेरवाड़ी, चांदवड, नाशिक येथे सफरचंद कापुन साजरा करण्यात आला. सर्व उपस्थित म्हणजे इंद्राई किल्ला,राजदेहेर किल्ला, कोळधेर किल्ला आणि अस्मादिक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसानिम्मीत्त त्यांना दोन ज्वारीची कणसे,भुईमूग शेंगा,कढ़ीपत्ता,पातेचे कांदे, कोवळे हरभरा दाणे अश्या भेटवस्तु देण्यात आल्या. त्यांना हा वाढदिवस कायम लक्षात राहील अशी आशा करतो.
वाचत राहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा