रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

घोल - रडतोंडीची वाट - वाघजाई घाट - बडदे माची - बोरमाची - तेल्याची नाळ - घोल

 घोल - रडतोंडीची वाट - वाघजाई घाट - बडदे माची - बोरमाची - तेल्याची नाळ - घोल १८ किमी.



पहाटे पहाटे भर थंडीत मंडळी घोल गावाच्या दिशेने रवाना झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच सात वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक वर आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथला आजही निसर्ग तसाच आहे. गावातून वाट्याड्या घेऊन सुरु झाली वाघजाई घाटाची भटकंती.



घोल गाव चहुबाजूनी उंचच उंच डोंगरांनी वेढले आहे. पश्चिमेचा डोंगर ओलांडून एका छोटेखानी खिंडीतून वाघजाई जाणाऱ्या मोठ्या पठारावर आलो. येथून डोळ्यासमोर अथांग असा सह्याद्रीचा पसारा. कोकणदिवा, कावळ्याची खिंड, कावळ्याचे सुळके, पोमाड्याचा डोंगर आणि पुसटसा दिसणारा रायगड. अफलातून असे दृश्य. या वाटेला स्थानिक रडतोंडीची वाट म्हणतात.

अडीच तीन तासात वाघजाई घाटाला लागलो. बांधीव पायऱ्या आणि सोपी वाट म्हणून स्थानिक याच वाटेचा वापर करतात. आता सूर्यनारायण डोईवर आले होते आणि आम्ही जंगल ओलांडून बडदे माचीवर. आजच्या जमान्यातही वीज रस्ते पाणी नसलेले आणि बाहेरच्या जगाचा गंध नसलेले छोटीशी वाडी. इथे पाठीवरची वजने पोटात ढकलून बोरमाचीला प्रयाण केले. गावातली सगळी मंडळी कामानिमित्त बाहेर असल्याने आजचा सुट्टीचा रविवार त्यांचा पाणवठयाजवळील माती उकरून खेकडे पकडण्याचा होता. त्यांना राम राम करून बोरमाचीत पोहोचलो एका घरात. वाटाड्या काकांची बहीण त्या घरात दिली होती. स्वतः लांबून आणूनही त्या माउलीने पाणी आणून दिले. तेथून पाणी भरून तेल्याच्या नाळेच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले.

पूर्वी घोल गावाला पुणे जिल्ह्यातून रस्ता नव्हता तेव्हा गाव आणि माचीवरच्या लोकांचा रायगड वा जिते गावाशी बाजार असायचा. जिते गावात येणारे तेलाचे डबे बोरमाचीतून समोरच्या नाळेतून घाटमाथ्यावर यायचे म्हणून तेल्याची नाळ. (इति वाटाड्या.) हे ऐकून वाट सोपी असेल या कायासाने चढाई चालू केली पण बघता बघता नाळेने घाम काढला. नाळेतून मागे बघताना कुर्डूगड "मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणत होताच. कुर्डुगडाशी या वर्षात झालेली चौथी भेट! यंदाच्या पावसाळ्यातील पाऊस भरीला असताना पाहिलेले लिंग्या घाटाचे आणि कुर्डुगडाचे रूप कायम मनात राहील. हवेत छान गारवा असल्याने आणि पूर्ण वाट झाडोऱ्यातून असल्याने चढाईला उन्हाचा त्रास झाला नाही. दोन तासाच्या खड्या चढाईने माथ्यावर पोहोचलो तेव्हा पश्चिमेकडे कोकणदिव्याला सोनेरी मुकुट चढला होता. वाटेत साळींदराचे काटे दिसले म्हणून काही उचलून आणले. गावात येऊन मारुतीच्या मंदिरात वामकुक्षीसाठी पथारी पसरली तेव्हा पाच वाजत आले होते.

चहा पिऊन सात तासांची १८ किमीची भटकंती संपवली आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

घोळ खिंडीत पासून पश्चिमेकडे पडणारा पाऊस कोकणातून सुमारे हजारभर किलोमीटर चा प्रवास करून अरबी समुद्रात विलीन होतो तर खिंडीच्या पूर्वेकडील पाऊस पानशेत वरून देशावरील जवळपास पंधराशे किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात जातो. हाये की नाय आपल्या सह्याद्रीची गम्मत !






😅

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: