मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

खिरेश्वर - टोलारखिंड - हरिश्चंद्र बालेकिल्ला - नेढं - जुन्नर दरवाजा / राजनाळ - खिरेश्वर

 खिरेश्वर - टोलारखिंड - हरिश्चंद्र बालेकिल्ला - नेढं - जुन्नर दरवाजा / राजनाळ - खिरेश्वर ( १३ किमी. )



उन्हं वाढायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड जुन्नर दरवाज्यामार्गे करून यावा असा बेत बरेच दिवस मनात होता. आधी जितक्या वेळेस हरिश्चंद्रगड गेलो तेव्हा टोलारखिंड चढून आल्यावर " तो दिसतोय तो बालेकिल्ला" याखेरीज बालेकिल्ल्याशी ओळख नव्हती. मग यावेळी खास बालेकिल्ला चढाई आणि जुन्नर दरवाज्याने उतराई या बेतानेच खिरेश्वरला पोहोचलो. नेढ्यात उतरता आले तर ते बघणे आणि वाट सापडली तर शेंडी सुळक्याच्या जवळ जाऊन माकडनाळ वरचा भाग पाहून येणे ह्या दोन गोष्टी बोनस ठेवलेल्या. अर्थात बोनस काही मिळाला नाही पण ठरल्याप्रमाणे छान १२ किमीची चाल झाली.


आदल्या रात्री ११ वाजता खिरेश्वर पोहोचलो. थंडी जोमात होती. थंडीची आभूषणे चढवून एका ओसरीवर पाठ टेकली. बरोबर पहाटे ५ वाजता टोलारखिंड मार्गे चढाई सुरु झाली. पाऊण तासात टोलारखिंड गाठली तोच एक माणूस पहाटे पावणेसहा वाजता जन्माच्या थंडीत कुडकुडत ,डोळे चोळत पावतीपुस्तक घेऊन उभा. तीस रुपड्यानी खिसा हलका करून किल्ल्याकडे पोहोचलो तेव्हा तांबडफुटीला सुरुवात झालेली. काळ्याकुट्ट अंधारात चंद्राची मोहक कोर उमटलेली आणि शुक्राची चांदणी त्याच्याशी सलगी करत संपूर्ण परिसर उजवळत होती. झुंजूमुंजू झाले तसे चंद्र-शुक्राला केशरी झालर लाभली. एक नजर तेथे ठेऊन बालेकिल्ला आणि मंदिर यांना दुभागणाऱ्या वाटेपाशी पोहोचलो.




आता बालेकिल्ला आणि तारामती यामधील खिंडीत आलो. दोघांनाही सोनसळी मुकुट चढलेला. तारामतीवर लाईन लावून जाणारी लोक लांबूनही दिसत होती. समोर सह्याद्रीचा अथांग असा पसारा उलगडत होता. सिंदोळा, निमगिरी, माळशेजची उत्तुंग शिखरे, वऱ्हाडी डोंगर ते अगदी नानाचा अंगठा, जीवधन पर्यंतची शिखरे हि अशी समोर उभी ठाकलेली. बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा झाली पण वरती जायची वाट काही सापडेना मग शेवटी एका ठिकाणची फुटलेली तटबंदी पाहिली आणि त्यादिशेने सरळसोट चढाई चालू केली. तटबंदीच्या खाली दहाएक फुटाचा रॉकपॅच आला. तो खालून दिसला नव्हता. मग त्याकडेला असलेले एक वाळलेले झाड मदतीला धावून आले. "जगात काही निरूपयोगी नाही योग्य वेळेस सगळ्याची मदत होते" हे ज्ञान त्यावेळी आठवून गेले. झाडावरून चढून तटबंदीत शिरलो आणि समोर भगवा फडकताना दिसला.





बालेकिल्ल्यावर अलीकडेच गावातल्या लोकांनी महाराजांची एक मूर्ती स्थापित केलेली आहे त्यापुढे नतमस्तक झालो. चौफेर सहयाद्रीच्या बेलाग डोंगररांगा पसरलेल्या. पश्चिमेकडे आता कोकणकडा त्यापुढे नाप्ता शिखर तर उत्तरेकडे कळसुबाई पर्वत रांगा. किल्ल्यावर चार पाण्याची टाकी आहेत त्यापैकी महाराजांच्या पुतळ्यासमोरील टाकीतले पाणी पिण्यायोग्य वाटले. बाटल्या भरल्या आणि थोडीशी पेटपूजा करून घेतली.आता आल्या वाटेने उतराई शक्य नव्हती म्हणून मूळ वाटेचा शोध घेतला तर ती फारच सोपी निघाली. त्याने आम्ही परत बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडे आलो. सकाळी येथूनच जाताना हि वाट कशी दिसली नाही असा प्रश्न एकमेकांना विचारत बालेकिल्ल्याला अजून एक प्रदक्षिणा मारून नेढ्याची वाट धरली.





नेढ्यावरच्या टेपाडापर्यंत आलो पण हे प्रकरण अवघड होते. आमच्याजवळ रोप होता पण उगाच साहस नको म्हणून नेढ्याला निरोप देऊन जुन्नर दरवाजाच्या नाळ सुरु होते तेथे पोहोचलो.नाळेत खोदलेल्या पायऱ्या, ठराविक अंतरावर हाताने पकडण्यासाठी केलेल्या खोबण्या, अर्ध्यात कोरलेले शिवलिंग आणि पूजक शिल्प बघता हीच वाट पूर्वीच्या काळी प्रचलित असावी असे वाटले. मोठाल्या धोंड्यावरून उड्या मारत आता नेढ्याच्या खाली आलो. उतरायच्या पूर्ण वेळ पश्चिमेकडे रौद्र, राकट सह्याद्रीचे कडे सोबतीला होते. रोहिदास शिखराच्या खाली आता शेंडी सुळका दिसू लागला. बरंच खाली आल्यावर वाट कारवीच्या जंगलात घुसली आणि वळण घेऊन खिरेश्वरच्या दिशेने उतरली. खिरेश्वर पोहोचलो तर दुपारचे दोन वाजलेले. एका झाडाच्या सावलीत उदरम भरणंम झाले आणि पिंपळगाव-जोगा जलाशयात दोन डुबक्या मारून सातच्या आत घरात!





एकुणात खूप छान ट्रेक झाला. फोटोंचा आनंद घ्या!
😁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: