रविवार, ८ जानेवारी, २०२३

घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार

रविवारची भटकंती : 

भटकंती सह्याद्रीच्या कुशीतील अवघड पण अत्यंत्य देखण्या अश्या घाटवाटांची - घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार. 




सहयाद्रीतील काही जागाच अश्या आहेत ना कि बघताक्षणी प्रेम! त्या यादीतील बहुप्रतीक्षित अशी हि भटकंती होती. मागच्या वर्षी काही ट्रेकभिडु जाऊन आलेले तेव्हा फोटो बघूनच जायचे नक्की केलेले तर तो योग आज जुळून आला. 

आता घोडेपाण्याची नाळ चढताना दिसणारे सहयाद्रीचे अद्वितीय रूप पाहायचे असेल तर पहिले "सिंगापूर" ला जाणे आले. मग काय सकाळी ब्राम्हमुहूर्तावर पुण्यनगरी सोडून सिंगापूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. रथाचे सारथी अत्यंत कुशल असल्याने तेवढ्या वेळात निद्रादेवीला प्रसन्न करून घेतले. ग्रुपमधले ट्रेकभिडु शरदभाऊंनी हा ट्रेक आधी दोन वेळेस केला असल्याने जायचा रस्ता, चढाईची वाट, वाटाड्या, gpx फाईल या कशाच्याही फंदात न पडता त्यांच्या पाठीमागे चालत सुटणे आणि निसर्गाच्या अदभूत सौन्दर्याने मंत्रमुग्ध होत जाणे एवढेच काय ते ध्येय होते. 

नाणेघाट आणि दाऱ्या घाट या कोकण प्रदेश आणि देश यांना जोडणाऱ्या फार पूर्वीपासून प्रचलित अश्या वाटा होत्या. आजही स्थानिक लोक याच वाटांचा वापर करतात. या वाटांवर असलेल्या राबत्यामुळे त्या जिवंत राहिल्या तश्या या दोन वाटांच्या उदरात वसलेल्या घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार या वाटा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपणच या वाटा जागत्या ठेवल्या तरच  इथली दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील. 

असो! तर सकाळी आठ वाजता घोडेपाण्याची नाळेची चढाई चालू झाली. पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा पत्ताच नव्हता. समोर जीवधन किल्ल्यावर आणि वनरलिंगीवर चढलेला सोनेरी रंग बघून नाळेच्या माथ्यावरून झकासपैकी दृश्य दिसणार याची खात्री झाली. वाटेने वाहणारे बारीकसे पाण्याचे प्रवाह ओलांडत पाण्याच्या वाटेने म्हणजे नळीतून मंडळी मार्गक्रमण करीत होती. रमतगमत आणि नियमित फोटो ब्रेक घेत चार तासात माथ्यावर पोहोचलो. येथून दिसणारा सह्याद्रीचा रौद्र राकट नजारा म्हणजे काय वर्णावा? शब्द आणि प्रतिभा दोन्ही तोकडं पडेल निव्वळ असा!

चढाई करताना अजस्त्र वाटणारे बाहुला-बाहुली सुळके आता थिटे वाटू लागले होते. या दोन सुळक्यांच्या मागून जीवधन किल्ला आणि वानरलिंगी उंच आभाळात झेपावलेले ! त्याच्या डावीकडून नानाचा अंगठा हळूच डोकं वर काढत होता. माथ्यावर संपूर्ण कारवीचेच साम्राज्य! एवढ्या दुर्गम जागेवर बिबट्याचची विष्ठा पाहून साहेब या प्रदेशात कुठेतरी असणार याची खात्री पटली. माथ्यावरून  दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅव्हर्स मारून रिठ्याच्या दाराच्या तोंडाशी पोहोचलो. गर्द कारवीचे रान बघून हातापायांना "लालेलाल" साज चढणार या तयारीनेच नाळ उतरायला घेतले. कोणत्याही सजीवांचा मागमूस नसलेल्या वाटेने दोन-तीन मोठ्ठाले रॉकपॅच वळसा घालून उतरलो तेवढा संध्याकाळ होऊ लागली होती. अश्या प्रकारे एका अनवट, देखण्या आणि तितक्याच लोभस अश्या घाटवाटांची आठ तासांची, बारा किलोमीटर्सची भटकंती पार पडली. 

असो! माथ्यावरून दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतील असे नजारे होते. त्यामुळे तूर्तास फोटोंची मजा घ्या .
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: