गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

भटकंती दोन दमदार घाटवाटांची - कावळ्या घाटाने कोकणात उतराई - बोचेघोळ घाटाने देशावर चढाई.

ट्रेक रूट : घोळ - गारजाई वाडी - ऐतिहासिक कावळ्या घाटने कोकणात - सांदोशी - बावले - वारांगी - हेदमाची -  बोचेघोळ घाटाने देशावर - बिंडाची वाडी - खानु डिगेवस्ती ( मुक्काम ) - टेकपोळे - हिर्ड्याचा दांड - घोळ. [ ४२ किलोमीटर्स ]



डिगेवस्ती मुक्कामी, 40 किलोमीटरची, देशावरच्या खतरनाक थंडीची तर कोकणातल्या कमालीच्या उकाड्याची अफलातून अशी भटकंती.


दिवस पहिला : घोळ - गारजाई वाडी - ऐतिहासिक कावळ्या घाटने कोकणात - सांदोशी - बावले - वारांगी - हेदमाची -  बोचेघोळ घाटाने देशावर - बिंडाची वाडी - खानु डिगेवस्ती ( मुक्काम )

रात्रीच्या गर्द अंधारात थंडीशी दोन हात करत काही अमानवीय टाळकी घोळ च्या दिशेने मार्गक्रमण करीत होती. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. गाडीच्या टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच श्वान मंडळींनी त्यांना आम्ही एवढ्या रात्री झोपमोड केल्याचे रुचले नसल्याचे जाणवून दिले. आसमंतात लाखो ताऱ्यांची नक्षी उमटलेली अनुभवत गावातील विठ्ठल मंदिरात पथारी पसरली. पाठ टेकली तसे दहा वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक दामटत आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथील निसर्ग आजही तसाच आहे. उद्याच्या रग्गड पायपिटीची मनोमन तयारी करून डोळे मिटले.


पहाटे पाच वाजता आवरून रामभाऊंचे दार ठोठावले. पुढचे दोन दिवस सत्तर वर्षांचे रामभाऊं आम्हाला या निर्बीड जंगलात मार्गदर्शन करणार होते. सुमधुर चहा-पोहे यांचा पोटोबा करून पाठपिशव्या चढवल्या आणि गारजाई वाडीच्या वाटेने मंडळी निघाली. आत्तापर्यंत अनेक वेळा या रस्त्याने येणे झाले होते पण येथे पुरातन महादेवाचे मंदिर आहे हे ज्ञात नव्हते. रामभाऊंनी खास वाट वाकडी करून हे मंदिर दाखवले. तासाभरात गारजाईवाडीत पोहोचून कावळ्या घाटाने कोकणात उतराईस प्रारंभ केला. कोकणदिव्याला वळसा घालून उजवीकडून कावळ्या घाटात पोहोचलो. या घाटातली वाट कारवी पासून मोकळी करायची जबाबदारी घोळ आणि सांदोशी येथील लोकांनी घेऊन मोठी प्रशस्त वाट बनवलीये. वाटेत एक मोठा आंबा लागला तेव्हा रामभाऊंनी खास थांबून ती जागा दाखवली. पंचक्रोशीत जेव्हा लग्न असते आणि लग्नाचे वऱ्हाड घाटातून जाते तेव्हा या आंब्याच्या झाडाशी वऱ्हाडाची पाण्याची सोय करायची जबाबदारी असते नवऱ्या मुलाची! काही जागा खास आपले अस्तित्व टिकवून असतात त्या अश्या!


कावळ्या घाटाने उतरून पोहोचलो कोकणातील सांदोशी गावात. अलीकडे दोन फाटे फुटतात तेथून उजवीकडील वाट कावळे गावात जाते तर डावीकडील सांदोशी गावात. येथे मागे कोकणदिवा तर समोर अभेद्य असा दुर्गदुर्गेश्वर रायगड. रामभाऊंचे सासरचे गाव म्हणून त्यांना आम्हाला गाव दाखवायचे होते पण आदल्या दिवशी गावात निधन झाल्याने गावात जाऊन पाणी भरणे योग्य नाही या विचाराने गावाबाहेरूनच वरात निघाली. गावाबाहेरील मंदिरात हरिनामसप्ताह असल्या कारणाने प्रसाद आयोजित केला होता. तेथील मंडळींनी एवढाली मोठी बोचकी पाठीवर घेऊन चाललात तरी कुठे? म्हणत मंदिरात प्रसादास बसवले. नुकतेच शाळेतील विद्यार्थी आले होते ते छान हात जोडून देवाचे स्तोत्र म्हणत होते. प्रेमाने दिलेल्या त्या प्रसादाने पोटाला आधार आला. उपमा, चहा, पाणी भरून गप्पागोष्टी झाल्या. "पॅन्ट पन्नास रुपयांची असो वा पाच हजाराची, चेन साठी जागा सोडावीच लागते हो" या अश्या भन्नाट वाक्यांनी काकांनी "आयुष्यातली गोळाबेरीज सारखीच" हे चपखल पटवून दिले.




सांदोशी मधून नमस्कार-चमत्कार करून मंडळी निघाली ती वारंगी च्या दिशेने. रायगडाच्या प्रभावळीतील ही गावे. रायगडाला वेढा पडायचा तेव्हा या प्रभावळीतील गावांमध्ये मुक्काम पडायचा. म्हणून येथे अनेक पुरातन अवशेष आणि वीरगळी दिसल्या. नारायण आताशा डोईवर येऊन ठेपलेले. वाढते ऊन आणि कोकणातील दमटपणा यांची ट्रेकर मंडळींची परीक्षा सुरु झाली. सांदोशी गाव सोडताच दोन मोठे मारुती बाप्पा आणि दहा बारा वीरगळी दिसल्या. त्या पाहून "बावळे" गावात गेलो. येथील वारंगी. मागच्या वर्षी "सिंहगड ते रायगड" गेलेलो तेव्हा वारंगी गावातून गेलेलो याची आठवण झाली.






रामभाऊंनी प्रत्येक गावात ओळख असल्याने सांदोशीत उपमा चहा झाला तर वारंगीत परत चहा झाला. आता येथून भर उन्हातली बोचेघोळ वाटेची चढाई म्हणजे खरी सत्त्वपरीक्षा. पाणी भरून, बाप्पाचे नाव घेऊन बोचेघोळ चढाई चालू केली. सर्वांगावर घामाच्या धारा सुरु झाल्या. धपापत्या छातीने श्वास फुलला होता. दुपारी एक वाजता चढाई सुरु केली ती बोचेघोळ माथ्यावर पोहोचायला पाच वाजले. आताशा १८ किलोमीटर्स होत आले होते आणि चढाईने अंगातले त्राण संपत आलेले होते. मागील वर्षी निसणीची वाट - बोचेघोळ केली असल्याने वाट परिचयाची वाटत होती पण माथ्यावर आल्यावर एका अश्या स्पॉट ला आलो जेथून कुठे जायचे समजेना. रामभाऊ जवळपास दहा वर्षाने येथे येत असल्याने त्यांनाही खात्रीशीर माहित नव्हते. आताशा सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पश्चिमेला उमटलेल्या केशर झालरीत कोकणदिवा आणि पोमाड्याच्या डोंगर उठून दिसू लागलेला. इतक्यावेळ ऊन आणि चढाईशी चालू असलेला सामना आता तिरंगी झाला. आता वेळेशी ही सामना सुरु झाला. आत्ता जर वाट चुकलो तर अंधारात डिगेवस्ती शोधावी लागणार होती.

अश्या वेळेस एक युक्ती कामाला आली. दोन-तीन वेळा जोरात शिट्टी वाजवली. तिसऱ्या शिट्टीला उत्तरेकडून कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज आला आणि येथे वस्ती असल्याची खात्री झाली. धावत तेथे पोहोचलो तेव्हा हेच डिगेवस्ती आहे वाटले होते पण तेथे गेलो तेव्हा कळले कि या वस्तीचे नाव आहे "बिंडाची वाडी" आणि डिगेवस्ती अजून तास-दिड तास आहे. हे ऐकल्यावर ट्रेकर मंडळींचे अवसान गळाले पण उपाय नसल्याने जड पावले उचलत मंडळी अंधारात डिगेवस्तीच्या दिशेने निघाली.

बिंडाची वाडी येथून एका तरुणाने वाट दाखवली आणि एक डोंगर चढून आलो तसे लांबवर दिवे दिसू लागले. हीच ती खानू डिगेवस्ती. वस्तीत पोहोचलो तेव्हा आठ वाजलेले. सकाळी सात ते रात्री आठ असा तेरा तासांची आजच्या दिवसाची भटकंती पूर्ण झाली. आजचा मुक्काम नवीन तयार झालेल्या शाळेत होता. आजच शाळेचे उदघाट्न झाले होते. आमदार आले असल्याने गावजेवण होते. आम्ही नशीबवान म्हणत जेवणाची सोय झाली. जेवण करून नवीन शाळेतील पहिला मुक्काम आमचाच म्हणत पथारी पसरली. जोरदार थंडी आणि वारा यामुळे मुक्कामास चार चाँद लागले. आज पंचवीस किलोमीटर्स ची पायपीट झाली होती. एका दिवसात दोन फक्कड घाटवाटा पदरात पाडून घेतल्याने मंडळी खुशीत निद्रादेवीच्या स्वाधीन झाली.






दिवस दुसरा : खानु डिगेवस्ती  - टेकपोळे - हिर्ड्याचा दांड - घोळ. 

सरपंचाच्या घरी चहा आणि नाश्ता करून दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. आज त्यामानाने छोटी चाल होती. वस्तीच्या थोडे मागे गेलो तसे सूर्योदयाच्या सोहोळ्याचे पडघम वाजू लागलेले. समोर रायलिंग पठार-लिंगाणा आणि त्याखाली ढगांची चादर. नारायणाच्या आगमनाने संपूर्ण परीसर सोनसळी किरणांनी नाहून निघाला. डिगेवस्तीतून आता प्रयाण केले ते टेकपोळेच्या दिशेने. सरपंचाचे वडील आम्हाला जंगलात घुसणारी वाट दाखवायला आले. ती वाट अश्या ठिकाणी होती कि आम्हाला कधीच सापडली नसती. येथून आता मातीचा गाडीरस्ता सोडून घोळ गावाच्या दिशेने जाणारी वाट धरली.

येथून आता पहिल्यांदी एक डोंगर चढून-उतरून टेकपोळे गावात उतरायचे होते आणि तेथून दोन वाटा घोळ ला जायला - आंब्यांचा दांड किंवा हिरड्याचा दांड. यातील आंब्याचा दांड वाट मागे झाली असल्याने आणि बरीच लांब असल्याने हिरड्याचा दांड वाटेने जायचे ठरविले. हिरड्याचा दांड वाट सती मंदिरापासून घोळ गावात उतरते तर आंब्याचा दांड वाट सती मंदिरापासून मोठा वळसा घालून गारजाई वाडीत उतरते. वाटेत दोन छोट्या वस्त्या लागल्या तेथे थंडगार ताक मिळाले. येथील लोकांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष पाहून जड अंतकरणाने येथून निरोप घेऊन सती मंदिर दिशेने चालू लागलो.

सती मंदिर पाहून घोळच्या दिशेने शेवटची चाल चालू झाली. पानशेत धरण दिसू लागले तसे आपल्या इलाक्यात आल्याची जाणीव झाली. तासाभरात धारेने चालत घोळ खिंडीतल्या डोंगरावर आलो तेव्हा चहुबाजूनी डोंगराने वेढलेले घोळ गाव दिसले. हाच तो आनंदाचा क्षण. आजची छोटी छोटी म्हणत चाल सोळा किलोमीटरची भरली. खिंडीतून खाली उतरून गावात आलो तेव्हा ४२ किलोमीटर्स भरत आले होते. रामभाऊंच्या घराच्या समोर बादलीभर पाणी डोक्यावर ओतून घेतले आणि ट्रेकची सांगता झाली. शारीरिक कसोटी पाहणारा, ऐतिहासिक लढाईचा साक्षीदार असलेल्या घाटवाटांच्या चढाई-उतराईचा, असंख्य आठवणी आणि दुर्गम वस्तीतल्या निरपेक्ष प्रेमाचा अनुभव देणारा असा सर्वांगसुंदर ट्रेकची समाप्ती जाहली.






YouTube Link :



वाचत राहा.

सागर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: