रविवार, २७ मार्च, २०२२

ढवळे गाव - चंद्रगड - मढीमहल / आर्थरसीट पॉईंट - क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक

 

ढवळे गाव - चंद्रगड - मढीमहल - क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक 




शाळेच्या इतिहासात वाचलेले जावळीच खोरं, क्षितिजाशी स्पर्धा करणाऱ्या सह्याद्रीच्या बेलाग डोंगररांगा ,दरीत कोसळणारे अभेद्य, अतिदुर्गम डोंगरकडे, खडा चढ छातीवर घेऊन घनदाट जंगलातून वाट काढताना चंद्रराव मोरेंच्या "येता जावली, जाताल गोवली" ह्या धमकीची आजही येणारी अनुभूती, ढवळ्याच्या घाटवाटेचे शेकडो वर्षे रक्षण करणारे चंद्रगड, मंगळगड किल्ले , चंद्रगडाच्या माथ्यावरील महादेवाचा आणि घुमटीतील डोंगरदेवतांचा लाभलेला आशिर्वाद, रात्रीच्या पावसामुळे आसमंतात उमटलेला निळाशार असा साज, "कापूस पिंजून ठेवलाय जसा!" कवितेची आठवण व्हावी असे डोंगरमाथ्याशी सलगी करू पाहणारे ढगांचे पुंजके,सूर्योदयाला  सह्याद्रीच्या डोंगरधारेवर चढलेला सोनसळी मुकुट, मढीमहालावरून दिसणारे डोळ्यातही न मावणारे  सह्याद्रीचे अफाट, राकट रूप. असे आयुष्याचे मोती डोळ्यात गोळा करायचे आणि पाहून नतमस्तक व्हायचे. 


असा सगळं यथासांग साजश्रुंगार चढला की एकच वाक्य मनात येते ...

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा


२०२२ वर्षाच्या सुरवातीलाच "मोरधन, कावनई, गडगडा, रांजणगिरी, ब्रह्मगिरी, भंडारदुर्ग आणि मेटघर किल्ल्याची हत्तीच्या मेटाची वाट" असा सेवन स्टार बार उडवल्यानंतर आजचा बेत होता मुलुख जावळी. 
ढवळे घाट , चंद्रगड , बहिरीची घुमटी , जोरचे पाणी , मढीमाळ/ गाढवाचा माळ, मढीमहाल अश्या अदभूत वाटणाऱ्या ऐतिहासिक जागांचा आज अनुभव घेता आला. सकाळी साडे सहाला ढवळे गावातून चालू केलेला ट्रेक दुपारी दोनला मढीमहाल / आर्थर सीटपाशी समाप्त झाला. सात तासांची ही पायपीट खऱ्या अर्थाने शरीराचा आणि मनाचा कस पाहणारी आहे. कोकणातुन सुमारे ३०० मीटर उंचीवर ढवळे गावातून आपण आर्थरसीटला १२४५ मीटर उंच चढून येतो.  

मागील वर्षी जानेवारीतच हा ट्रेक केला होता तेव्हाच दरवर्षी येथे यायचंच असं ठरवलेलं. मागच्या वेळेला चंद्रगड झाला नव्हता मग यावेळेस डोंगरदेवांच्या आशीर्वादाने चंद्रगड माथ्यावरच्या महादेवाच्या दर्शनाचे पुण्य लाभले. सकाळी पाच वाजता ढवळे गावात पोहोचलो. वाटाड्या ठरवून निघूपर्यंत सूर्यनारायण ड्युटी वर रूजू झाले होते. सुमारे पाऊण तासात चंद्रगडाच्या माची पर्यंत पोहोचलो तेव्हा सर्वांगाला घामाचा अभिषेक झाला होता. आदल्या रात्री पाऊस पडल्याने वातावरण एकदम स्वच्छ झालेलं. सूर्याच्या किरणांनी डोंगररांगांना सोनसळी ढगांचा मुकुट चढवलेला. ऊर धपापत तासाभरात चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचलो. "हर हर महादेव" चा जयघोष सह्याद्रीच्या कडे-कपारीत दुमदुमला. 

चंद्रगडावरील महादेव आणि नंदी 

                                                चंद्रगड माथा 


पूर्वेकडे उंचीवर बहिरीची घुमटी आणि लांबच लांब आर्थर सीट दिसू लागले. सूर्य अजूनही मेघांच्या गर्दीतून आपली  किरणे सोडवण्यात मग्न होता. माथ्यावरच्या थंडगार वाऱ्याने घामाघूम झालेल्या शरीरात तजेला आला. महादेवाला नमन करून दक्षिण टोकाला निघालो. दोन्ही बाजूला तटबंदी आपले थोडेफार अस्तित्व टिकवून होती. दक्षिण टोकाच्या बुरुजावरून काही पायऱ्यांनी खाली उतरून पाण्याच्या टाकीजवळ पोहोचलो तर येथून जावळीच खोरं अजून अजिंक्य वाटू लागलेलं. 

रायरेश्वर, कोळेश्वर, महाबळेश्वर या भावंडांचे चौफेर दर्शन घेऊन परतीची वाट पकडली. किल्ल्यावर एकूण १४ टाकी आहेत पण त्यातली काहीच आज बघता येतात. शक्य तेवढे सगळे पाहून आता सुरु झाली घसाऱ्याची उतराई. बरोबरच्या ग्रुपला आम्हाला बहिरीची घुमटी येथे गाठायचे होते म्हणून गतीने चालणेही महत्वाचे होते. त्यात पाऊसामुळे नाळेतले दगड ओले झाल्याने घसरा-घसरी सुरु झाली. चंद्रगड उतराई आणि बहिरीच्या घुमटीपर्यंतची खडी चढाई हा ट्रेक मधला सर्वात अवघड टप्पा होता

                                                                        बहिरीची घुमटी 

                                                    धुक्यात रायरेश्वर, कोळेश्वर


जोरदार घसाऱ्याची वाट उतरून आता आम्ही चंद्रगडाला वळसा घालून येणाऱ्या वाटेला मिळालो. येथून ढवळे घाटाने मोठ्या चढाईची वाट चालू झाली. गोळ्या, चिक्की, काकड्यांची आवर्तने सुरु झाली. सुमारे दोन तासांच्या अंगावरच्या चढाईने श्वास फुलाला होता. "आता येईल" "मग येईल" "आलीच बघ खिंड" म्हणता म्हणता  येत नव्हती. एकदाची खिंड आली आणि "C" शेप ट्रॅव्हर्स चालू झाला. शेवटच्या टप्प्यात कातळात खोदलेल्या पावट्यांवरून चढताना कोणी अनामिक शक्ती आपल्यावर वरदहस्त ठेऊन आहे असे वाटत होते. घुमटी पोहोचलो आणि डोंगरदेवाना नमस्कार करून तिथेच झाडाच्या सावलीत पथारी पसरली. 




गुळाची पोळी त्यावर साजूक तूप, खवायुक्त गाजराचा हलवा या घरून इथवर आणलेल्या पदार्थाना योग्य न्याय दिला. जोरला जाणाऱ्या वाटेवरील टाक्यातले थंडगार पाणी पिऊन वाटचाल चालू झाली "मढी माळ". येथून आर्थरसीट आणि प्रतापगड दिसतो पण आज ढगांनी ती संधी दिली नाही. वाटेतला छोटासा रॉक-पॅच चढून मढीमहाल सज्ज्यावर पोहचलो तेव्हा अडीच वाजत आलेले. साडे सात तासांच्या कष्टाचे चीज झालेसे वाटत होत. आज एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली ती अशी की , रविवारचा दिवस असूनही आर्थर-सीट पॉईंटला फक्त आम्ही आणि माकडे होतो. भविष्यात हे होणे नाही म्हणत त्या सज्ज्यावर एकट्याचे फोटो काढून घेतले. गर्दी नसल्याचे कारण नंतर कळले कि गेले ७ दिवस क्षेत्र महाबळेश्वर येथून रस्ता बंद केला आहे आणि आम्हाला आता पुढे ५ किलोमीटर्स अजून पायपीट करायची आहे. सुमारे तीन किमी ढकलगाडी केल्यावर एक वनविभागाचा अधिकारी भेटला त्याच्याशी गप्पा टप्पा आल्यावर त्याने खडी टाकायला आलेल्या डंपर मधून आमची श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरापर्यंत जायची सोय केली. 



घुमटी येथून दिसणारा चंद्रगड 


जाताना महाबळेश्वर मध्ये कुठेही बस थांबणार नव्हती म्हणून मग पंचगंगेच्या मंदिरामागे पळत जाऊन एक स्ट्रॉबेरीचे शेत गाठले. कालच्या रात्रीच्या पावसाने नुकसान नको म्हणून आज सकाळीच शेतातून स्ट्रॉबेरी काढल्या होत्या. लालचुटुक स्ट्रॉबेरी घेऊन रात्री १० ला पुण्यनगरी गाठली. आज दिवसभरात १६ किलोमीटर्स ची चाल झालेली पण नशिबाला तो आकडा आवडला नसावा. स्टॉपवर उतरल्यावर बघतो तर गाडी पंक्चर! मग दोन किमीची अजून पायपीट आणि अकराला घरी!


सहयाद्रीच्या उत्तुंग आणि देखण्या घाटवाटांपैकी हि एक वाट आहे. चंद्रगड, घुमटी येथून दिसणारे सहयाद्रीचे रौद्रभीषण नजारे म्हणजे निव्वळ अप्रतिम! निसर्गाचं कसं देवासारखं असतं, तो देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार आयुष्याच्या माळेत माळत राहायचं !


याची देही याची डोळा अनुभव अनुभव घ्या!



वाचत राहा !
सागर 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: