रविवार, ९ जानेवारी, २०२२

शिवथरघळ - गोप्या घाट - सांगवी

 रविवारची भटकंती - शिवथरघळ - गोप्या घाट - सांगवी

सोळाशे शतकातला काळ असावा. महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची सुवर्ण घडी जवळ आलेली. मुरुंबदेवाच्या डोंगरावर आनंदी आनंद पसरलेला. तांबडफुटीच्या "सुवेळी" महाराजांनी "सुवेळा" माचीवरून नारायणाच्या उदयाचा सोहोळा बघून संजीवनी माचीकडे प्रस्थान ठेवले असेल.मोहिमेस निघण्यापूर्वी आपल्या आद्य गुरूंचे दर्शन घ्यायचे म्हणजे सुंदर मठासी जाणे प्राप्त. श्री समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनार्थ अळू दरवाज्यातून भुतोंड्याकडे उतरून शिवथर घळीकडे प्रयाण केले असेल. वाटेत येणारी बेळवंडी नदी आणि कुंबळ्याचा डोंगर पार करून गोप्या घाटाच्या खिंडीतून उतरून शिवथरघळी जलप्रपातातील पवित्र पाणी घेऊन समर्थांच्या चरणी अर्पण केले असेल. "जय जय रघुवीर समर्थ" चा निनाद अवघ्या जावळीत दणाणला असेल.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

गोप्या घाटाची चढाई करताना घामाच्या धारांबरोबर हा असा कल्पनाविलास मनातल्या मनात रंगत होता. आज आपण चाललो आहोत त्या मार्गाने कधीकाळी महाराजांनी, समर्थांनी आणि स्वराज्याच्या अनेक लढवय्यांनी अनेक वेळा येणे जाणे केले असेल या विचारानेच स्फूर्ती येत होती. इथल्या दऱ्याखोऱ्यात "जय जय रघुवीर समर्थ" चा नाद अनेक वेळा घुमला असेल. बहिर्जी नाईकांचे गुप्तहेर खाते रात्रंदिनी या घाटवाटांनी स्वराज्याच्या गडकिल्ल्यावर लक्ष ठेऊन असतील. अश्या या ऐतिहासिक वाटा आपणच जागत्या ठेवल्या पाहिजेत. दगडाशी ईमान राखले तरच दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील.

असो, तर मागच्या रविवारी भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी अशी बारा तासांची, तीन घाटवाटांची ३५ किलोमीटर्सची तुफान तंगडतोड झाल्यामुळे आज जरा बेताचा ट्रेक पाहून मंडळी आनंदाने पहाटे उठून जमलेली. पुण्यनगरीतून साडेचारला पहाटे प्रस्थान ठेऊन वरंधा घाटात कावळ्या किल्ल्याच्या जोडीने थोडीशी पेटपूजा झाली. शिवथरघळीत पोहोचलो तेव्हा गुहेत कोणीही नव्हते. चारशे पाचशे वर्षांपूर्वी समर्थानी हि जागा कशी काय शोधली असेल याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. "धबाबा तोय आदळे" या वाक्याची प्रचिती आजही येते.

आंबे शिवथर गावातून ट्रेक चालू झाला. अग्निशिखा प्रजातीच्या फुलांनी सुरवातीलाच स्वागत केले. या फुलांना बाहेर आला कि अख्खे रान पेटल्यासारखे वाटते. जमिनीवर सुरु झालेली मुंगळ्यांची लगबग पाहून पाऊस पडणार असे वाटून गेले. सह्याद्रीतल्या या गमतीजमती कोणी अनुभवी माणूस बरोबर असल्याशिवाय कळणे अवघड. रमतगमत सुमारे तासाभरात माचीवर येऊन पोहोचलो. येथून समोर डोंगरच्या कपारीत घाटाची खिंड दिसत होती. उजवीकडे सुपेनाळ तर डावीकडे आंबेनळी, उपांड्या घाट डोंगररांगेत लपून बसलेले. भूस्खलन झाल्याने बरीचशी वाट मोडलेली. आज माचीवरची विहीर त्यामुळे गायब झालीये. वाटेच्या शोधार्थ थोडफार भरकटलो तोच रानात जनावरांना घेऊन आलेल्या एका आज्जीनी पुढची वाट दाखवली. खड्या चढाईला येथून सुरवात झाली. सर्वांगाला घामाचा अभिषेक जाहला. याचे निमित्त साधून लिंबू पाणी, ताक, इलेक्ट्रॉल, चिक्की इत्यादी पदार्थानी पाठपिशवीतुन पोटात बदली करून घेतली. सुमारे अडीच तासांच्या चढाईनंतर गोप्या घाटाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर एक कोरीव पाण्याचे टाकं आणि वीरगळ आहे. त्या अज्ञात शूराला वंदन करून त्यासमोरच आमच्या पथाऱ्या पसरल्या.

नुकतीच दिवाळी झाल्यामुळे मंडळींनी चकली चिवडा लाडू फराळाच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. भरल्या पोटाने आता पुढची वाटचाल सुरु झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव बोपे डावीकडे ठेऊन आम्ही उजवीकडे भोर तालुक्यातील सांगवी गावाची वाट धरली. मागे लांबवर तोरणा दिसत होता. छोट्या छोट्या टेकड्या पार करत सांगवी पर्यंत दीड एक तासाचे पायपीट झाली. जोडीला काठोकाठ भरलेले भाटघर धरणाचे पाणी. पाण्यात चार पाच डुबक्या मारल्यावर जीवाची शांती झाली.

संपूर्ण ट्रेक मध्ये निर्मनुष्य अश्या जंगलातून भटकताना खासकरून गोप्याघाट ते सांगवी या कसल्याही आधुनिकतेचा मागमूस नसलेल्या प्रदेशातून जाताना समर्थांच्या खालील पंक्ती आजही खऱ्या ठरतात!

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥

वरंधा घाटातली सकाळची पेटपूजा


समर्थांच्या गुहेत डोंगरदेव

अग्निशिखा फुलांना आलेला बहर

सुपे नाळ

दुपारचं झोपूनही देत नाहीत हि लोक! पूर्वीच पुणे राहिलं नाही छ्या !

थम्सअप डोंगर

गोप्या घाटाची चढाई चालू

गोप्या घाटाच्या माथ्याशी लागलेली घनदाट झाडी.

घाटमाथा

घाटमाथ्यवरील पाण्याचे टाके. हे पाणी निःश्चिन्त होऊन प्या. आजारी पडलात तर मी स्वतः डॉक्टरकडे घेऊन जाईन असे समूहाच्या नेत्याने सांगितले. २००% ऑक्सिजन.

माथ्यवरून सावळ गावाकडे वाटचाल.

भाटघर धरणाचे पाणी. येथे मस्त अंघोळ झाली.

वाचत रहा!

सागर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: