रविवार, १४ एप्रिल, २०२४

तैलबैल - घोडेजिन घाट - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल


तैलबैल - घोडेजिन घाटाने उतराई - सुधागड दिंडी दरवाजा - सुधागड - ठाकूरवाडी - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल  [ २४ किलोमीटर ] 

 तळपत्या उन्हातील दोन घाटवाटा आणि दोन किल्ल्यांची अनवट भटकंती - तैलबैल - सुधागड - तैलबैल रेंज ट्रेक . 

=================================================================

"रुपेश , ए रुपेश ऊठ रे जरा ! त्यो बघ तिथे एक साप आहे ती माणसे झोपलीयेत तिथे. मार जा तो ! ती माणसं घाबरतील " 

या काकूंच्या एका वाक्याने तैलबैल गावातील मारुती मंदिरात घोरणाऱ्या ट्रेकर्सची झोप तीन ताड उडाली. पहाटे साडे चारची किर्रर्र वेळ. रुपेशने शांतपणे  "काय शिंची कटकट ए! " अश्या अविर्भावात उठून हातात दंडुका घेऊन सापाला पुढच्या दिड मिनिटात यमसदनी धाडले आणि पुन्हा निद्रादेवीची आराधना करण्यास सुरुवात केली. झोप उडालेली ट्रेकर मंडळी कधी नव्हे तो "आज लवकर ट्रेक चालू करू" म्हणत आवरायला लागली.

=================================================================


    मागच्या आठवड्यात कोंडनाळ-हातलोट घाट असा फक्कड बेत झाल्याने भर उन्हात अजून काळे पडायला आपण सिद्ध आहोत याचा साक्षात्कार झाला. तैलबैला वरून कोकणात उतरणाऱ्या चार-पाच घाटवाटा सतत खुणावत होत्या. या आधी दोन वेळा ठाणाळे लेणी शोधण्याचे निष्फळ प्रयत्न केले होते.  घोडेजिन - भोरप्याची नाळ किंवा वारसदार - वाघजाई घाट या दोनपैकी,  घोडेजिनने उतरून वाघूर घळ ने चढायचा प्लॅन फिक्स केला. यामध्ये सुधागड दिंडी दरवाजा पण करता येईल या हिशेबाने भल्या पहाटे ट्रेक सुरु झाला. सुरुवातीला फक्त दोन घाटवाटा करू असे ठरले मग नंतर महादरवाजा बघून परत मागे फिरू आणि मग पूर्ण सुधागड करून  दोन्ही वाटा करू असा मारुतीच्या शेपटीसारखा वाढत गेलेला ट्रेकने भटक्या मंडळींची चांगली पाकपुक केली. 


चैत्र पालवीचे दिवस, सकाळी सहा वाजताच तैलबैलाच्या कातळभिंती आसमंतात सूर्याची पहिली कोवळी किरणे लेवून सोनेरी जिरेटोप परीधान करून होत्या. वर्षानुवर्षे अभेद्य अश्या कातळभिंती आणि त्यामधोमध स्थानाप्पन्न असे भैरव यांना मनोमन नमस्कार करून घोडेजिन घाटाची वाट पकडली. तैलबैला गावातून कोकणात उतरायला वाघजाई. सवाष्णी, घोडेजिन , वारसदार अश्या चार वाटा आहेत. घोडेजिनही सुधागड ला जाणारी सगळ्यात जवळची वाट.  हि वाट तैलबैला पठार आणि सुधागड यातील गणेश खिंडीत उतरते, येथून पुढे नाळेने सुधागडच्या दिंडी दरवाज्याला जाऊन किल्ल्यावरून दुसरे टोक ठाकूरवाडी गाठायचे ठरले. भोरप्याची नाळ उर्फ वाघुरघळ स्थानिक कातकरी सोडून कोणीही वापरत नसल्याने वाट अशी नाहीच. जंगलातून काटेरी झाडांचा प्रसाद घेत अंदाजाने चढाई करणे क्रमप्राप्त. 


गावातून अर्ध्या तासात घोडेजिन घाटाच्या तोंडाशी आलो. वाटाड्या घेणे गरजेचे आहे पण या वाटांचा अभ्यास केल्याने gpx फाईलच्या जीवावर जायचे ठरले. तैलबैला कातळभिंती मागच्या बाजूने आता अजून रौद्र भासत होत्या. सकाळचे शुचिर्भूत वातावरण, आंब्याला आलेला मोहोर, कातळामागून उगवणारे सूर्यदेव. वाळलेल्या गवताच्या पात्यांवर कोवळे किरण पडल्यावर चमकणारे गवताचे भाले. पळसाच्या झाडावर चढलली पिवळेधमक तोरणं. समोर स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला भोरप्याचा डोंगर, त्यामागे तळगड, उजवीकडे सरसगड तर मागे बघता घनगड, केवणीचे पठार, नाणदांड घाट असे दुर्गवैभव. डोळे भरून हा निसर्गाचा सोहोळा बघून रामरायाचे नाव घेऊन घोडेजिनच्या घसाऱ्याने उतरायला सुरुवात केली. 

                                       घोडेजिन घाटमाथ्यावरून समोर दिसणारा सुधागड 

"आमचे रेल्वेच्या इंजिनात रिसर्वेशन झाले असले तरी आम्ही चुकीने गार्डाच्या डब्यातच शिरणार" या उक्तीप्रमाणे नाळ उतरताना  पहिल्यांदाच रस्ता चुकला. पूर्ण नाळ उतरून गणेश खिंडीत आलो तर रस्ता गायब. gpx ओरडून ओरडून थकलं कि "बाबांनो रस्ता चुकलाय".  मग काय धोंडसे गावातून सुधागड येणाऱ्या वाटेच्या समोर आल्यावर करवंदाच्या जाळीशी दोन हात करत गचपणातून मार्ग काढत कसेबसे योग्य त्या नाळेत आलो. रस्ता चुकल्यामुळे का होईना पण जंगलात घुसून उतरल्याने कमी वेळात धोंडसे गावातून येणाऱ्या वाटेला लागलो. सुरुवातीला वाटले होते कि दिंडी दरवाजा जवळ असेल. तो बघून याच रस्त्याने उतरून गणेश खिंड ओलांडू आणि भोरप्याच्या नाळेला जाऊ. घड्याळात बघता अकरा वाजत आलेले. या प्लॅनने दोन-तीन पर्यंत तैलबैला गावात पोहोचलो असतो पण भर उन्हाचा तडाखा अजून बसला नव्हता म्हणून दिंडी दरवाज्याने चढून सुधागड करून ठाकूरवाडी म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला उतरायचा निर्णय घेतला. 

                        

सुधागड दिंडी दरवाज्याच्या दिशेने चढून आलो. वाटेत एक मारुतीचे सुंदर मंदिर लागते. त्यापुढे भैरव आणि चॅन पाण्याची टाकी आहेत. महादरवाज्याचे सौन्दर्य ते काय वर्णावे? महाराजांनी रायगडा आधी सुधागडची निवड का केली असावी याची प्रचिती येते. आजही बुलंद असा गौमुखी पद्धतीचा दिंडी दरवाजा डोळ्याचे पारणे फेडतो हे नक्की.  

महादरवाज्याच्या वाटेत असणारे पाण्याची टाकी आणि भैरव 

महादरवाजा उर्फ त्रंबक दरवाजा 

              

यथेच्छ फोटो काढून भोराई देवीच्या मंदिरात पोहोचलो. पाठीवरची वजने पोटात ढकलून सचिव वाडा बघून ठाकूरवाडीच्या दिशेने उतरायला लागलो. आत्तापर्यंत झाडीतून चढाई होती म्हणून मंडळी आनंदात भटकत होती. सुधागडच्या माथ्यावरून समांतर जाताना जळता सूर्य डोक्यावर येऊन ठेपला होता. पाठीवरच्या आठ लिटर पाण्याचा साठा अर्ध्यावर आलेला. त्यात पाच्छापूर दरवाजाची वाट चुकून आम्ही पुन्हा भरकटलो. सुधागडची gpx नसल्याने दोन वेळा वाट चुकून कड्यावर उतरलो. एक ठिकाणी अगदी खालपर्यंत उतरून कडा लागल्याने परत उलटी चढाई करणे आले तेथे मंडळींचा पेशन्स संपला. तेवढ्या एक तासात जी काही एनर्जी , वेळ आणि पाणी  खर्च झाले त्यांची किमंत पुढे चुकवावी लागणार होती. 

सुधागडावरून दिसणारा तैलबैला .. बापरे एवढे अंतर अजून जायचे आहे. 


आत्तापर्यंत रमत गमत चाललेली मंडळीची दिड  तास वाया गेल्याने वेळेशी स्पर्धा चालू झाली. ठाकूरवाडीत उतरलो तेव्हा तीन वाजत आले होते. पूर्ण सुधागड ट्रॅव्हर्स मारून मागे परत तिवईचा वेढा आणि तेथून वाट शोधत भोरप्याची नाळ चढाईची होती. गावात पोहोचायला रात्र होणार हे नक्की झाले होते. आता झपाझप पाय उचलणे गरजेचे होते पण सुधागडच्या पट्ट्याने आणि उन्हाच्या तडाख्याने ट्रेकर मंडळी पुरती गळपटली होती. एकोले दरीतल्या नाळेत लागलो तेव्हा थोडीशी पेटपूजा करून घेतली. रस्त्यात आत्तापर्यंत कुठेही पाणी मिळालेले नव्हते. भोरप्याच्या नाळेत पाणी मिळेल हि एक अपेक्षा होती. भोरप्याच्या नाळेला स्थानिक वाघुरघळ म्हणतात. म्हणजे वाघ पाणी प्यायला येतो ती वाट. सुमारे तासभर चालल्यावर एक मोठा डोह दिसला. मिनिटा-मिनिटाला येणार घाम दिवसभर पुसत चाललेली मंडळी आहे तशी डोहात डुंबू लागली. 

                      


वेळेची आठवण झाल्यावर मंडळी निघाली आणि वाघूळघळ च्या शोधात जंगलात घुसली. असंख्य करवंदाची जाळी व इतर काटेरी झाडे रस्ता थोपवून उभी होती. अंग-खांद्यावर काट्यांची सही घेत मार्गक्रमण चालू झाले. gpx फाईल दाखवत असलेला मार्ग सोडायचा नाही म्ह्णून चालत होतो पण मध्ये मध्ये पडलेली झाडे, लॅन्ड्स्लाईड मार्ग बदलायला भाग पंडित होती. मध्येच एक ठिकाणी भलामोठा रानरेडा आमच्यावर नजर रोखून उभा होता. त्याचे अविर्भाव बघून पुन्हा वाट सोडली आणि नाळेत उतरलो.  दोन अडीच तासांच्या काट्याकुट्यांच्या मार्गाने एकदाचे भोरप्याच्या नाळेत पोहोचलो. 

gpx route 

भोरप्याची नाळ चढाई 


आताशा सगळ्यांचे पाणी संपत आले होते. दिवस पश्चिमेकडे कलू लागलेला. समोर केवणीचे पठार मावळतीचे रंग धारण करू लागलेला. येथून आता नाळेतून उभी चढाई करायची होती. प्रत्येक पाऊलागणिक श्वास फुलत होता. पाण्याने आणि उकाड्याने जीव बैचैन झाला होता. प्रत्येकाची इंच इंच लढाई चालू झाली. जवळपास अर्धी नाळ चढून झाली तेव्हा सूर्यनारायण ड्युटी संपवून निघून गेले होते. शेवटच्या संधी प्रकाशात सोळावा ब्रेक घेऊन बॅटरी काढून मंडळी पुन्हा चढाईला जुंपली. 

कोंडनाळची आठवण करून देणारी वाघुरघळ चढून माथ्यावर आलो तेव्हा तैलबैल खोरे अंधारात गुडूप झालेले. कातळावरील एकच भैरवाच्या मंदिरातला दिवा चमकत होता. सगळी मंडळी त्यांच्या सगळ्या अवयवांसकट सुखरूप असल्याची खात्री करून गावाच्या दिशेने निघालो. रणरणत्या उन्हातील २४ किलोमीटर्सचा ट्रेक संपवून रापलेल्या चेहऱ्याने घरी पोहोचलो तेव्हा घड्याळ दुसऱ्या दिवसाची तयारी करीत होते. 

"लाईफ मैं बहोत कुछ पेहली बार होता है रे " या मुन्नाभाईच्या वाक्याप्रमाणे आठ लिटर पाणी लागलेला हा पहिलाच ट्रेक म्हणावा लागेल. पूर्ण भटकंतीत प्यायला एक घोट पाणी नाही मिळाले पण पोहायला मिळाले अशीही पहिलीच वेळ. सकाळी साप तर संध्याकाळी रानरेड्याशी भेट हेही प्रथमच. असो आयुष्य समृद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या देणग्या आम्हाला वेळोवेळी मिळोत हीच रामराया चरणी प्रार्थना ! 

शेवटी काय तर ... तू रख यकीन बस अपने इरादों पर ........  तेरी हार तेरे होसलों से बडी नही होगी ! 


वाचत राहा . 


महत्वाच्या नोंदी : 
१. एवढा मोठा ट्रेक करायचा नसेल तर घोडेजिन ने उतरून गणेश खिंडीने भोरप्याच्या नाळेत जात येईल. साधारण तीन ते चार तास आणि सुधागड चढाई वाचेल. 
२. भर उन्हाळ्यातली हि माजमोडी भटकंती करताना कमीतकमी ६ ते ८ लिटर पाणी जवळ असणे महत्वाचे. 
३. गाईड शिवाय सुद्धा ट्रेक करता येईल. वेळेचे नियोजन मात्र महत्वाचे. 
४. सुधागड उतरून ठाकूरवाडी न जाता थोडे अलीकडून भोरप्याच्या नाळेत जाऊ शकतो. वाटेत पोहायला मस्त पाणी आहे. 
५. भोरप्याची नाळ म्हणजे वाट नाहीच. समोर नाळ बघून त्यादिशेने काट्याकुट्यातून चालत राहायचे आहे. वाटेत काही मोकळी जनावरे ( म्हशी रेडे ) सोडलेली आहेत. त्यांना सरप्राईज दिले तर जंगलात पळापळी अवघड होईल याची दाखला घेऊन जावे. 



भटकंतीचा नकाशा : 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: