रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ६ : लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी

 


अपरिचीत बागलाण मोहीम ६ 


 

नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 

दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

गेल्या काही वर्षात बागलाण प्रदेश बऱ्यापैकी भटकून झाल्याने बागलाण रांगेतील न झालेला शेंदवड गड करूया आणि कोजागिरी च्या मुहूर्तावर शेंदवड गडावर शतकोशतके विराजमान  भवानी देवीचे दर्शन घेऊया, त्यापुढे खानदेशात प्रवेश करून धुळे जिल्हा पालथा घालावा या विचाराने मंडळी शुक्रवारी रात्री निघाली. 

शुक्रवारी रात्री पुण्यनगरीतून पिंपळनेर प्रस्थान केले. खूप दिवसांनी एसटीचा प्रवास घडणार होता. मधल्या दिड -दोन वर्षात ग्रुपचे आणि गाडीने ट्रेक व्हायला लागल्यापासून एसटी /टमटम/जीपड्याने  प्रवास करून किल्ल्याचा पायथा गाठावा, काटेकोर नियोजनात किल्ला करून , परतीची सोय बघत - कधी जीपला लटकत, टपावर बसून दुसऱ्या किल्ल्याला जाणे, तासनतास एसटीची वाट बघत, डोळ्यासमोर फसत चाललेले नियोजन सावरत भटकंती करणे यातली मजा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. यामध्ये वेळ जातो पण तेथील लोकांचे बोलणे-जगणे अनुभवता येते याविचारातच नाशिक आले. फोनाफोनी करून भूषणने नाशिक रोड स्टेशन वरून पण सेम बस पकडली आणि दोघे निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. 

इतकी वर्षे झाली पण खिडकीतून पिशव्या / बाटल्या टाकून जागा पकडण्याची प्रथा आणि सतत सर्वत्र पचापच थुकणारे गुटकावीर हे चित्र आजही तसेच असल्याचे बघून माझे साडे पाचशे रुपड्यांचे तिकीट धन्य जाहले. "पिंपळनेर! उतरून घ्या"  या कंडक्टरच्या हाळीने झोपेतून जाग आली. सामान उचलले आणि भर अंधारात घराच्या दिशेने चालू लागलो.थंडी आपले अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होती. अर्ध्या तासात भुषणच्या घरी फ्रेश होऊन गाडी घेऊन निघालो ते लाठीपाडा धरणाच्या दिशेने. 

बऱ्याच ठिकाणी विचारत विचारात एकदाचे ते पोहोचलो एका छोट्याश्या डोंगरावर अभेद्य अश्या उभ्या छोटेखानी गढीच्या जवळ. गढीच्या खाली असलेल्या एकमेव घराच्या समोर गाडी लावून गढी बघायला प्रस्थान केले. हि गढी खाली राहणाऱ्या काकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चार भक्कम बुरुज आणि मधोमध केलेले कोरीव दरवाजांचे बांधकाम लक्ष वेधून घेते.गढीच्या माथ्यावर उभे राहिल्यास लांबवर मांगी-तुंगी, न्हावीगड ते शेंदवड गड दर्शन देतात. बागलाण च्या दक्षिण दिशेचा भूभाग तेथून न्याहाळता येतो. गढी बांधली त्या छोटेखानी डोंगरावर महाराजांनी काही दिवस वास्तव्य केले होते आणि म्हणूनच महाराज जेव्हा सुरत लुटून आले तेव्हा जे धन साल्हेर आणि परिसरात लपवले गेले त्यातील काही धन येथे या गढीत लपवले होते. गावातली काही बहाद्दरांनी त्या धनाच्या लोभापायी गढीच्या बुरुजांमध्ये खोदकाम करून बुरुज फोडून टाकलेत. गढीच्या मालकांशी गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी त्याबद्दल निगडित काही पूर्व कथा सांगितल्या. एक एक कथा ऐकत घड्याळात अकरा वाजत आल्याचे लक्षात आले आज मोठा पल्ला तर होताच पण शेंदवड गडाची दोन अडीच तासाची चढाई भर उन्हात करायची होती. नमस्कार करून गाडीला टांग मारली आणि शेंदवडचा रस्ता धरला. 


लाठीपाडा गढी 



गढीच्या बुरुजावरून लांबवर मांगी-तुंगी , न्हावीगड , तांबोळ्या 


धनाच्या लोभापाई गढीमध्ये  खोदलेले खड्डे 


शेंदवडगडाचे भौगोलिक स्थान बघितले असता एकदम इंटरेस्टिंग आहे. गड महाराष्ट्र(धुळे) व गुजरात ( डांग सौन्दणे) यांच्या सीमेवर आहे. गडाच्या मागची बाजू गुजरात, समोरच्या डोंगरसोंडे च्या डावीकडची बाजू धुळे तर उजवीकडची बाजू नाशिक जिल्ह्यात येते. असा तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला असल्याने गडाचे स्थान मोक्याचे आहे. शेंदवडगडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा डोक्यावर तळपता सूर्य येथून ठेपला होता. 

शेंदवाड गड प्रवेशद्वार 

वेळ रामराया जन्मला ती भर बाराची. सामान खाली एक घरात ठेऊन किल्ल्याची चढाई चालू केली. घाम पुसत देवीचा जयघोष करत सुमारे दिड तासात गडमाथा गाठला. गार वारा स्वागताला तयार होताच पण डोळ्यांची पारणे फिटतील असे निसर्गदृश्य समोर रेखाटलेले दिसले. बागलाणचे मुख्य शिलेदार येथून दर्शन देतात. समोर मांगी-तुंगी, न्हावीगड, रतनगड , तांबोळ्या तर उजवीकडे मोरागड -मुल्हेर-हरगड-कपार भवानी - म्हातारीचे दात, साल्हेर-सालोटा , हरीणबारी धरण हे ज्ञात आणि कित्येक अज्ञात अशी शिखरे असे सगळे एकाच फ्रेम मध्ये पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुखद, निव्वळ नेत्रसुख!

बागलाणचे दुर्गवैभव 


घाम काढणारी चढाई आहे 


डोळे भरून हा निसर्ग सोहोळा पाहून देवीच्या दर्शनासाठी निघालो. गडावर देवीचे हे मंदिर आहे आणि पाण्याचे एक टाके दिसले. वरती सुळक्यावर अर्ध्यापर्यंत जाता येते पण ती रिस्क न घेता मंदिरात प्रवेशते झालो. पूर्ण दिड तासांच्या चढाईत आम्हाला कोणीही भेटले नव्हते पण वरती मंदिरात चांगली तीस चाळीस लोक उपस्थित होती. सगळी लोक खालच्या गावातील होती आणि त्यांच्या कुलदैवत असल्याने देवीला आलेली होती. प्रत्येकाने उदबत्ती आणि प्रसाद आणलेला होता. आम्ही आलो आणि त्यांची आरती सुरु झाली. शेंदवड गड हा गुजरात , महाराष्ट्र बॉर्डर वर असल्याने तेथील आदिवासी गुजराती मिश्रित अहिराणी भाषा बोलतात. त्यांनी देवीची आरती पण गुजरातीत केली. 


अर्ध्या चढाईनंतर दिसणारे देवीचे मंदिर 


कमाल लोकेशन आहे मंदिराचे 



मंदिरातून दिसणारा मुर्डी सुळका 




दर्शन घेऊन गडाची उतराई चालू केली. खाली गावात महाप्रसादाची सोय आहे कळल्यावर पोटातील कावळ्यांची शांती झाली. तीन दिवसांची मोहीम असल्याने खाऊ बरोबर होताच पण गावात भंडारा पाहून रस्त्यावर ठाण मांडून बसून उदरम भरणम करून घेतले. 

आताशा चार वाजत आले होते. मुल्हेर येथील रासनहणाच्या कार्यक्रमाला सहा च्या आत पोहोचणे गरजेचे होते. नशिबाने शॉर्टकट सापडला आणि शेंदवड वरून थोडे मागे येऊन चिवटी बारीने आम्ही धुळ्याहुन नाशिकमध्ये प्रवेश केला. मुल्हेर कडे जातानाच रस्त्यात जैतापूर नावाचे गाव लागते. येथील एकविरा देवीला आम्ही दोन वर्ष्यांपुर्वी येऊन गेलो होतो. येथूनही मुल्हेर ते साल्हेर सगळी रेंज दिसते म्हणून आज परत जाणे झाले. येथेही कोजागिरी निमित्त काही भक्तांनी चक्र पूजा बांधली होती. फर्मास पुरणपोळी कुरडई सकट साग्र संगीत जेवण होते मग काय, येथेही जेवायला बसलो!. 

देवीचे दर्शन आणि पुरणपोळीचे जेवण पदरात पडून घेऊन मुल्हेरला पोहोचलो. आज लवकर आल्याने मोक्याची जागा पकडता आली. आठशे वर्ष्यांची परंपरा लाभलेला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे.  यावेळची हि आमची चौथी वेळ होती यावरूनच वाचकांना समजले असेल. 




एकविरा देवीच्या मंदिरावरून दिसणारे बागलाणचे शिलेदार 

असो या उत्सवा विषयी वाचूया पुढच्या भागात ... तूर्तास फोटोंची मजा घ्या!


वाचत राहा.. 

पुढच्या भागात - 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 



महत्वाचे असे काही : 
  • पिंपळनेर पासून मॅप लावून जाणे. रस्ते थोडे छोटे आणि फसवे आहेत. स्थानिकांना विचारात जाणे केव्हाही उत्तम. 
  • नवरात्रीच्या सुमारास भक्तांची खूप गर्दी असते तेव्हा गेलात तर वाट चुकण्याचा प्रश्न नाही. 
  • चढाईस अंदाजे चार तास लागतात. पायथ्याशी एक मंदिर आहे तेथे गाडी लावू शकतो. 
  • येथून दिसणारे बागलाण रेंजचे दृश्य म्हणजे स्वर्गसुखच.