गुरुवार, २३ मे, २०२४

ट्रेक : लायन्स पॉईंट - पायमोडी घाट - मृगगड - करवंदी नाळ - शिवलिंग पॉईंट

घामाच्या बादल्या  भरणारा ट्रेक - 

लायन्स पॉईंट - पायमोडी घाट - मृगगड - करवंदी नाळ - शिवलिंग पॉईंट 



    वळवाच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात सुसह्य केलेल्या उन्हातून भटकंतीसाठी लोणावळ्याजवळील दोन घाटवाटांचे नियोजन ठरले. मागच्याच आठवड्यात घोडेजिन- वाघुरघळ ट्रेकवरून परत येताना पश्चिमेच्या केशरी आभाळी उंचावलेला शिवलिंग पॉईंट खुणावत होता. टूरिस्टी पब्लिकच्या गर्दीमुळे कधी या पॉईंट्स वर थांबायलाच जमले नाही. शिवलिंग पॉईंटवर उभे राहिले असता आसमंतात उंचच उंच जाणारा महादेवाच्या पिंडीप्रमाणे भासणारा डोंगर म्हणजे शिवलिंग. त्याचा डावा हात धरून उभा, कोकणातून देशावर येणाऱ्या दोन घाटवाटांचा रक्षक तो मृगगड. 


आजचा दोन घाटवाटा आणि एक किल्ला करायचा प्लॅन झाला आणि लगोलग पंधरा वीस मंडळी आपापले रापलेले चेहेरे अजून काळेकुट्ट करण्यासाठी तयार झाली. भल्या पहाटे पुण्यनगरीतून प्रस्थान करून लोणावळा वरून लायन्स पॉइंटला पोहोचलो तेव्हा उन्हाळी ट्रेक आहे का पावसाळी असा प्रश पडावा असे वातावरण होते. मृगगडाच्या दरीतून निश्चल पहुडलेले ढग आता लगबगीने घाटमाथ्यावर येऊ लागेलेले. या सृष्टी सोहोळ्यात सूर्यदेवांचे आगमन जरा लांबलेच. शिवलिंग डोंगर या ढगांच्या जंजाळात ताठ मानेने उभा होता. मागे लांबवर नागफणीच्या डोंगर अधून मधून दर्शन देत होता. मृगगडाचे मात्र इतक्या लवकर दर्शन होणे नव्हते. थोडक्यात काय तर असे सुंदर वातावरण दिवसभर राहील या अपेक्षेने आनंदित झालेली ट्रेकर मंडळी पायमोडी घाटाच्या दिशेने निघाली. 


ढगात हरवलेला शिवलिंग डोंगर 

काही वर्ष्यापुर्वी जेव्हा एसटीने ट्रेक करायचो तेव्हा मृगगड करणे म्हणजे बारा तासांचा प्रवास आणि बारा मिनिटांचा किल्ला असा सिन होता. कोथरूड ते शिवाजीनगर भल्या पहाटे गाडी हाणत जाऊन तेथून खोपोली. खोपोली ते पाली बसने, भेलीव फाट्यावर उतरून वडाप ने भेलीवच्या अलीकडचे गाव, त्याहून चालत भेलीव मग किल्ला आणि रिटर्न हेच सगळे असला दमवणारा कार्यक्रम असायचा. आजही तसाच दमवणारा कार्यक्रम होता पण आजची पायपीट घाटमाथ्यावरून होती. असो! हौसेला मोल नाही हेच खरे! 

पायमोडी घाट  उतराई 

पायमोडी घाटाच्या वाटेने आम्ही कोकणात उतरण्यास सुरुवात केली. ढगाळ वातावरण आता कमी होऊन त्याची जागा उष्म्याने घेतली. घामाच्या धारा पुसत पुसत मंडळी शिवलिंग डोंगराच्या दिशेने निघाली. दोन तीन ट्रॅव्हर्स मारल्यावर वाट संथपणे पायथ्याशी उतरते. वाटेने गुलमोहराची लालबुंद झाडोरा आणि बहाव्याची पिवळीधमक फुले निसर्गातल्या रंगपंचमीची भूल घालत होते. मध्ये एखादा हुप्प्याचा आवाज सोडला तर अत्यंत निरव शांतता.   सुमारे दीड तासाच्या चालीत आम्ही दरीमध्ये उतरलो आणि मृगगडाच्या दिशेने चालू लागलो. पायमोडी घाट तसा सोप्या श्रेणीतील म्हणता येईल. सुरवातीला असलेल्या कातळकोरीव पायऱ्या हि वाट फार पूर्वीपासून प्रचलित असावी याची साक्ष देतात. 


पायमोडी वाटेने उतरून आल्याचा फायदा हा झाला कि भेलीव गावात न जाता मधूनच मृगगडाची चढाई करता आली. आव्हान सूर्यदेव घाटावरच्या कड्यावरून वरती आल्यामुळे घामाच्या धारा दुप्पट झाल्या होत्या. घाम पुसत मंडळी मृगगडाची चढाई करू लागली. दहा मिनिटांच्या चढाईतच आम्ही गुहेपाशी पोहोचलो. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा गुहा मिस झाली होती. तेव्हा गुहेत आत जाऊन किती मोठी आहे बघून तरी  येऊ म्हणून गुहेत शिरलो. 

गुहेत शिरतानाच समोरून काही येईल का या विचारानेच पाकपुक झाली. तरी डेरिंग करून आतपर्यंत जाऊन आलो त्याचा हा विडिओ बघा :




गुहेत शिरलो तसे संपूर्ण धुळीचे साम्राज्य. वाघुळांचा घाण वास आणि जाळी  जळमटे तोडत आत पोहोचलो. चांगली ३०-४० फूट आत खोदलेली हुह पुढे जाऊन डावीकडे वळते. तेथे एक माणूस उभे राहू शकतो अवधी जागा आणि त्यापुढेही थोडीशी १० फूट खोदलेली. एकंदर थ्रिलिंग अनुभव होता. 



गुहेतून बाहेर येऊन गडाच्या दिशेने मोर्चा वळवला. कातळकोरीव पायऱ्यांवर फोटोबाजी करत वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो.  येथे पेटपूजा करून गडफेरी उरकली. खाली उतरून गुहेतून थोडीफार फोटोग्राफी करून फल्यांण गावाच्या बाजूला उतरायला चालू केले. गडावरूनच उतरल्याने भेलीव आणि फल्यांण दोन्ही गावात जायची गरज लागली नाही. गडावरून उतरून फल्यांण नाळेत आलो.  येथे परत एक ब्रेक घेऊन मग चालू झाली करवंदी घाटाची खतरनाक चढाई. 

मृगगडाच्या कातळकोरीव पायऱ्या 

वाटेच्या नावाप्रमाणेच सुरुवातील करवंदीची जाळी लागली. करवंद अजून पिकली नसल्याने मंडळींचा हिरमोड झाला पण त्यातही कच्ची करवंदे खाऊन स्वारी करवंदीच्या नाळेने निघाली. या वाटेत अजूनही म्हणजे भर उनहाळ्यातही पाणी असते. INS शिवाजी येथे जे छोटे धरण बांधले आहे त्याचे पाणी वर्षभर पाझरत असते. आताशा सूर्यदेव डोईवर येऊन ठेपले होते. रामराया जन्माला ती भर दुपारी बाराची वेळ. टोप्या हातपाय पाण्यात ओले करून मंडळी खिंड लढवण्यास सज्ज जाहली. 


जोरदार झालेले जेवण आणि डोईवर वाढते उन्हाने काही ट्रेकर मंडळींच्या गाड्या मंदावल्या. संपूर्ण शरीर घामाने डबडबले होते आणि अंगावरचा चढ संपायचे नाव घेत नव्हता. सुदैवाने बरीचशी वाट जंगलातून असल्याने चढाई सुसह्य होत होती. पाच लिटर पाणी संपून वाहत्या प्रवाहातून भरल्या पाण्याची अनेक आवर्तने जाहली. जसा जसा माथा जवळ येऊ लागला तशी वाट बिकट होऊ लागली. डोक्यावर राक्षसी उन्हे आणि तापलेले रॉक पॅच यांनी घामाच्या बदल्या भरू लागल्या. काकडी, कोकम , चिक्की, इलेक्ट्रॉल इत्यादी मंडळींनी काही काळ खिंड लढवली पण खड्या चढाईमुळे सगळ्यांचीच चाल मंदावली. 



सुमारे सत्तर टक्के चढाई झाल्यावर एका ठिकाणी घनदाट जंगल लागते. तेथे वर्षानुवर्षे उभी असलेली महाकाय अशी झाडे पाहून सर्व मंडळी उत्साहित झाली. करवंदी नाळेच्या चढाई सुरु झाल्यापासून कोणीही फोटो काढले नव्हते. तब्बल हजार दोन हजार वर्षे वयाची हि झाडे असावीत. पाहताच अचंबा झाला. येथे यथेच्छ फोटोग्राफी करून शेवटच्या टप्पा चढाई चालू झाली. 


घाटमाथा जवळ येऊ लागला तसा वाटेवर सर्वत्र कचरा सुरु झाला. स्वर्गसुख देणाऱ्या सह्याद्रीत असा कचरा करणारे आपणच किती करंटे आहोत या विचारातच माथा गाठला. भर उन्हातही गार वारा आता आल्हाददायक वाटत होता. बाकीचे भिडू येईपर्यंत दोन तास लागले तोपर्यंत एक झोप पदरात पडून घेतली. दोन घाटवाटा आणि किल्ला असूनही ट्रेक संपला तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. परतीच्या प्रवासात मोरगिरी, जवण मार्गे  जाताना पवना धरणातल्या वाघेश्वर मंदिराला गेलो. येथेही रिल्स पाहून आलेल्या लोकांची गर्दी पाहून जे सटकलो ते सातच्या आत घरात. 


वाघेश्वर 


 असो!,  तर एकंदर २२ किलोमीटर्सची, घामाच्या बदल्या भरणारी, दोन घाटवाटांची भटकंती सुफळ संपूर्ण जाहली !


महत्वाचे असे काही : 

  • दोन्ही वाटा मळलेल्या आणि सुस्थितीत आहेत त्यामुळे गाईडची गरज नाही. 
  • घाटमाथ्यावरून समोर भेलीव आणि फल्यांण गाव दिसते त्यामुळे वाट चुकली तर भरकटण्याची शक्यता नाही. 
  • gpx फाइल्स ramble.com वर उपलब्ध आहेत. 
  • करवंद नाळ चढताना जो पाण्याचा प्रवाह आहे त्यावरच वरती एक सुंदर कुंड आहे. भर उन्हाळ्यातली तेथे वहाते पाणी असते. हे कुंड पाहून परत करवंदी नाळेला दोन तासात येता येते. 
भटकंतीचा नकाशा : 










तळटीप : 
या लेखातील काही फोटो सौजन्य : ऑफबीट ट्रेकर्स 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: