रविवार, ५ डिसेंबर, २०२१

भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी


भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी


सकाळी सात ते सात - बारा तासांची, तीन घाटवाटांची ३५ किलोमीटर्सची तुफान तंगडतोड!



२०१३ साली काहीही तयारी न करता, भर एप्रिल मध्ये "खांडस मार्गे भीमाशंकर" ट्रेक केला होता तेव्हा झालेले हाल बघून आयुष्यात परत इथे येणार नाही असे ठरवले होते. आज सात वर्षांनी त्यापेक्षा तिप्पट तंगडतोड करण्याचा योग आला. तेव्हाही जीवाचे बारा वाजलेले आणि आजही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. 😁😁

असो तर आजचा बेत होता आपल्या शरीराची क्षमता तपासण्याचा. कितीही फिटनेस असला तरी सह्याद्री माथ्या पुढे नतमस्तक होण्याचा, भीमाशंकरच्या निर्मनुष्य जंगलात अनवट वाटा भटकत अखंड १२ तास पायपीट करण्याचा.

हिवाळ्यात लोक भोरगिरी ते भीमाशंकर, खांडस -शिडीची वाट - भीमाशंकर, खांडस गणपती घाट -भीमाशंकर, पदरगड असे वेगवेगळे ट्रेक करतात. आम्ही यावेळी भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी अशी सुमारे ३५ ते ४० किलोमीटर्सची लांब पल्ल्याची वाट ठरवून तीन घाटवाटा आणि किल्ला पदरात पाडून घेतला. अर्थात ते करताना पाय हातात यायचे बाकी होते हा भाग अलहिदा.

पहाटे चार वाजता पुण्याहून निघून सात वाजता मंडळी भोरगिरीला पोहोचली. ६३ वर्षाचे आणि वनविभागातील नोकरीतील सुमारे २५ वर्षे भीमाशंकरच्या जंगलात वनरक्षक म्हणून काम केलेले सुपे काका आज आम्हाला वाट दाखवायला येणार होते. सुरवातीलाच त्यांनी "अंदाजे ३५ ते ४० किमी होईल, तयारी असेल तर चला" असे "समजावून" सांगितल्यावर सकाळी सकाळी न चालताच घाम फुटला. गणपती बाप्पाचे नाव घेऊन चालायला चालू केले. दिड तासात भीमाशंकर गाठून पुढे शिडीची वाट उतरायला घेतली.

भोरगिरी गावामधील सकाळ

काकांनी ३५ किलोमीटर्सची "समज" दिल्यावर ट्रेक चालू झाला.

कोकण पट्टा आता दृष्टीक्षेपात येत होता. सुरवातीलाच सिद्धगडाने स्वागत केले. पुढे थोडीशी पेटपूजा करून वाटेतल्या शिड्यांपर्यंत पोहोचलो. समोरच ढगांशी स्पर्धा करत पदरगड दिसू लागला. त्यामागे कोथळीगडाने दर्शन दिले. कोथळीगडाच्या डाव्या हाताला कौल्याची धार आणि वांद्रे माथ्यावरच्या एका लयीत डुलणाऱ्या पवनचक्क्या पुसटश्या दिसू लागल्या. त्याही मागचा बैलघाट डोळ्यांना तर दिसत होता पण कॅमेराची काही पोहोच नव्हती. खाली माचीवर पदरवाडीतील पाच-पंधरा घरे आणि त्यापुढे काठेवाडी, बैलपाडा , खांडस गावे ओळखू येऊ लागली.

पदरगड आणि त्यामागे कोथळीगड

अवघड ठिकाणी बसवलेल्या दोन शिड्या उतरलो. शिडी उतरायचा थरार संपला तसे पाय जड होऊ लागले. एव्हाना सूर्यनारायण डोईवर येऊन ठेपलेले. लिंबू पाणी, ताक, इलेक्ट्रॉल, चिक्की इत्यादी पदार्थानी पाठपिशवीतुन पोटात बदली करून घेतली. उसन्या तरतरीने कशीबशी काठेवाडी गाठली. वेळ रामराया जन्मला ती भर बाराची.
शिडी घाटाने कोकणात उतरताना


वाटेतील तीन शिड्या

आत्तापर्यंत सगळी उतरणचं होती त्यातच जीव अर्धा झालेला. आता आलो तेवढे सगळे अंतर चढाई करायची होती. तीन टप्प्यातील चढाई. कर्जत मार्गे जावे का असा एक विचार मनात आला पण होईल ते बघू म्हणत गणपती घाटाची वाट धरली. आता तीव्र चढाई चालू झाली. छातीचा भाता फुलला होता. सर्वांगाला घामाच्या धारांनी अभिषेक होत होता. ऊर धपापत कसेबसे गणपती मंदिरात येऊन पोहोचलो. घामाघूम झालेली मंडळीनी गणरायाच्या समोरचं लोटांगणे घातली. अर्धा तास शवासन केल्यानंतर पोटात काहीतरी भरून बॅग हलक्या केल्या पाहिजेत हा साक्षात्कार जाहला. जेवणे आणि थोडीशी विश्रांती झाली. एवढ्या दुर्गम ठिकाणी विराजमान बाप्पाला वंदन करून पदरगडाची वाट धरली.

पहिला चढ चालून पदरगडाच्या पठारावर पोहोचलो. किल्ल्याला वळसा घालून विहिरीपाशी पोहोचलो. येथून शिडी घाट स्पष्ट दिसत होता. आपण कुठून कुठे आलो याचा विचार करत बाटलीभर पाणी डोक्यावर ओतून जीवाची शांती करून घेतली. विहिरीपासून आता गणेश घाट सोडून पेढ्याची वाट पकडली. समोरच दिसणाऱ्या खिंडीतून, कारवीच्या गचपणातून दुसऱ्या टप्प्याची चढाई चालू झाली.

गणेश घाटाने पदरगडाच्या माचीवर पोहोचलो.

फोटोच्या डावीकडेची खाच दिसतीये ती आहे पदरगडावरून भोरगिरी जाणारी "पेढ्याची वाट "

इथे ७० अंशातल्या चढाईने प्रत्येक पावलागणिक भगवंताचे स्मरण होत होते. उन्हे मावळतीकडे कलू लागलेली. तीन वाजत आले तरी पेढ्याच्या वाटेला लागलो नव्हतो. आता जर पावले झपाझप उचलली नाहीत तर पेढ्याच्या वाटेने भोरगिरीत उतरायला अंधार होईल असे काकांनी वारंवार सांगूनही शरीर ढकलणे शक्य नव्हते. एकमेकांना आधार देत पेढ्याच्या वाटेच्या माथ्यावर एकदाचे पोहोचलो तेव्हा साडे चार वाजलेले. आसमंतात आता केशरी झालर उमटू लागलेली. समोर सोनेरी मुकुट धारण केलेल्या सह्याद्रीच्या रौद्रभीषण कड्यांचा शब्दातीत असा नजारा. पदरगडाचे कधीही न पाहिलेले रूप डोळे भरून पाहून घेतले. आंबेनळी घाट आणी त्याखाली राजपे गाव पाहून ही घाटवाट राहिलीये याची आठवण झाली.

पेढ्याच्या घाटमाथ्यावरून पदरगडाचे दिसणारे आगळे वेगळे रूप.

सूर्यास्त होत आला तरी हि मंडळी हालत-डुलत चाललीयेत म्हणून त्रासलेला एक भू-भू

सुपे काका नोकरीत असताना सकाळी सात वाजता निघून भोरगिरी - आंबेनळी उतरून - जांबरुंग गावातील कार्यालयातून रिपोर्ट घेऊन, राजपे गावातून गणेश घाटाने दुपारी तीनला जेवायला भीमाशंकर जायचे हे ऐकल्यावर त्या महात्म्याला मनोमन दंडवत घातला. मागे राहिलेले गडी माथ्यावर पोहोचले आणि तीन टप्य्याचा खडतर चढ संपल्याच्या आनंदात भोरगिरीची वाट धरली.आता वाटा जाणून घेणे, फोटो काढणे, गप्पाटप्पा सगळे बंद झाले आणि जड झालेली पावले उचलत काकांच्या पावलावर आपले शरीर ढकलणे एवढेच उरलेले. सूर्यास्त झाला तरी आपली डोंगरयात्रा अजून संपली नव्हती. विजेरीच्या प्रकाशात शेवटची दिड तासांची चाल झाली.

पेढ्याच्या घाटाने भोरगिरीच्या वाटेवर असतानाच सूर्यास्त झाला.


जसे अजून पुढे आलो तसे सुर्यबाप्पा थोडे वरती गेले कि काय?



भीमाशंकरच्या माणसांच्या मागमूस नसलेल्या जंगलातून चालताना भिती वाटत होती पण किर्रर्र अंधारात इथली जंगले पालथी घातलेले वाटाड्या बरोबर असल्याने मंडळी निर्धास्त होती. आसमंतात ताऱ्यांची आरास चढू लागलेली. त्यावर निरव शांततेचा साज. जंगल अनुभवणे म्हणतात ते हेच असावे!

महत्प्रयासाने भोरगिरी गाठली. काकांना त्यांचे मानधन देऊन परत एकदा मनोमन दंडवत घातला. त्यांचे जंगलातील एक पेक्षा एक अनुभव ऐकत एवढी लांब पल्ल्याची डोंगरयात्रा सुफळ संपूर्ण झाली. १२ तास अखंड चालत सुमारे ३५ किमीची कसदार भटकंती झाली.
सह्याद्रीचं कसं देवासारखा असतं, तो देत राहतो ..आपण आपल्या कुवतीनुसार आपल्या आयुष्याच्या माळेत माळत राहायच!
वाचत रहा ! भटकत रहा!
सागर शिवदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: