बुधवार, १३ एप्रिल, २०२२

कुडपण - पारसोंड - रामवरदायिनी मंदिर - प्रतापगड - पार

रामनवमी स्पेशल  -  टळटळीत उन्हातली १९ किलिमीटर्सची भटकंती 

कुडपण - पारसोंड - रामवरदायिनी मंदिर - प्रतापगड - पार 




चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी राम जन्मला

चैत्र नवमीच्या पूर्वसंध्येला आयोजित गीतरामायण गायन आणि निरूपण कार्यक्रमात असे हे मधुर शब्द गात्राला तृप्त करत होते. सुमारे नऊ वाजता कार्यक्रम संपला आणि घरी जाऊन साडे दहा वाजता "कुडपण" जायची तयारी करून बस पकडली. बसमध्ये बसलो जरी, मन अजूनही त्या सुरांमध्येच तरंगत होते. रात्रभर प्रवास करून सकाळी सहा वाजता रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांचा ल.सा.वी. असलेल्या कुडपण गावात पोहोचलो. 



आज चैत्र नवमी, रामनवमीचा शुभ दिवस. कोकणात उतरल्याने "गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती" या वाक्याचा पुरेपूर अनुभव आला. सकाळचे शुचिर्भूत असे वातावरण, चारही बाजूनी डोंगरकुशीत वसलेले कुडपण गाव, रस्त्याच्या कडेने बहाव्यावर चढलेली पिवळीधमक तोरणे, पेरूने लगडलेली झाडे, टोकदार पानांच्या पसाऱ्यात लपून बसलेले अननस, वसंत ऋतूची चाहूल देणारा सुमधुर कोकिलरव, तोरणे, आंबेळीच्या झाडांवर पिकलेला रानमेवा. करवंदांच्या जाळ्या आणि त्यावर उमललेली पांढरीशुभ्र फुले,  गर्द जंगलातून चालू झालेली पण खडी चढाई, डोंगरमाथ्यावर पोहोचताच समोर दिसणारे दुर्गवैभव आणि सह्याद्रीचा अथांग असा पसारा. अहाहा ! सुख म्हणजे नक्की काय असते रे भाऊ ? 

कुडपण गावातून सकाळी सात वाजता ट्रेक चालू झाला. येथून जवळच असलेल्या "भीमाची काठी" नावाच्या मूळ डोंगरापासून वेगळ्या झालेल्या सुळक्याला पोहोचलो.सुळक्याला लांबूनच नमस्कार ठोकून परत गावात येऊन मागची डोंगररांग पकडून चढाई चालू झाली. दहा मिनिटाच्या चढाईत टीशर्ट ओला झाला एवढा घाम! अर्ध्या पाऊण तासात डोंगरमाथ्यावर येऊन मग पुढे समांतर पायपीट चालू झाली. पूर्वेस मधू मकरंदगडाने दर्शन दिले तर दक्षिणेस रसाळ-सुमार -महिपतगड निश्चल ऊन खात पहुडलेले. वाटाड्या बरोबर होताच पण तोही चुकू शकेल या आशेने दोन भू-भू आमच्या सोबतीला आलेले. पारसोंड डोंगरधारेवरून आमची प्रतापगडाच्या दिशेने वाटचाल चालू होती. 

भीमाची काठी 

टळटळीत उन्हातून, अंगावर उन्हाळी आयुधे चढवून, पाण्याच्या बाटल्या संपवत, पाठपिशवीतील काकड्या व फळांना योग्य तो न्याय देत एकदाचे कामतवाडीच्या पुढे येऊन ठेपलो. येथून प्रतापगडाचे प्रथम दर्शन झाले. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. येथे थोडीशी सावली बघून उदरम-भरणम झाले. बारा- सव्वा बाराच्या सुमारास परत चालायला चालू केले तसे थोडेसे ढग डोईवर दाटलेले दिसले.  "दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?" हाच तो क्षण असावा नाही का?

रामनामाचा मनोमन जयजयकार करून प्रतापगडाची वाट तुडवायला सुरुवात केली. पारसोंड उतरून आल्यावर येथे रामवरदायिनी देवीचे मूळ मंदिर दिसले. आता हेच मोठे मंदिर खाली 'पार" गावात आहे. देवीला मनोमन हात जोडून प्रतापगडाला जोडणाऱ्या सोंडेवरून चढाई चालू केली. 

गर्द जंगलातून आता भटकंती चालू होती. मध्येच येणारी वाऱ्याची झुळूक गात्रात थोडा तजेला आणत होती. सुमारे तासाभराच्या चालीने प्रतापगडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. एव्हाना १५-१६ किलोमीटर चालणे झाले होते पण कुठेही माणसांची चाहूल नव्हती. होती ती फक्त निसर्गाची मुक्तहस्त उधळण. आता प्रतापगड प्रवेशापासून जोरदार गर्दी चालू झाली. मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून टेहळणी बुरुजावर गेलो तर सेल्फी बहाद्दरांची हि गर्दी उसळलेली. थोडी वाट बघून निर्मनुष्य वस्तूचा फोटो मिळाल्यानंतर पुढे बालेकिल्ला न जाता किल्ल्यांच्या तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारायचे ठरवले. वेळ हातात होताच मग तो सत्कारणी लावून सूर्य बुरुज, रहाट तलाव, चोरवाट, यशवंत बुरुज, पाण्याचे तळे, रेडका बुरुज पाहून कडेलोट बाजूने महाराजांचा पुतळा, केदारेश्वर मंदिर , मारुती मंदिर, भवानी मंदिर करत दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी गडफेरी पूर्ण केली. यशवंत बुरुजावरून दिसणारे महाबळेश्वरचे पठार आणि रेडका बुरुजावरून दिसणारे आंबेनळीचे दृश्य. केवळ लाजवाब!

प्रतापगड , सूर्य बुरुज 

तटबंदी 

किल्ला दर्शन झाल्यावर आल्या वाटेनेच जंगलात जाऊन एका पायवाटेने "पार"  गावाची वाट घेतली. घनदाट जंगलातून सुखाची अनुभूती देणाऱ्या या निसर्गरम्य वाटेतून जाताना "येथे नक्कीच जनावरे असतील" असे म्हणू पर्यंत समोर रानगव्याने दर्शन दिले. सात-आठ लोक हातात काठ्या घेऊन चालली असली तरी ते साहेब आपले चारा खाण्यात मश्गुल झाले होते. येथे अजून हुशारी न करता पार गावातील रामवरदायिनी मंदिराच्या दिशेने निघालो. 

येथे आता दुतर्फा आंब्याची झाडे आणि त्याला लगडलेल्या कैऱ्या! हा प्रसाद ग्रहण करून मंदिरात गेलो तर तेथे रामनमवी निमित्त पुरणपोळीचे जेवण होते. २० किलोमीटर्स पायपीट करून आल्यावर "पुरणपोळी" म्हणजे निव्वळ सुख ! येथे ग्रुपच्या सदस्यांनी जेवण बनवले.परतीची वाट धरली तेव्हा संध्याकाळचे ५ वाजत आलेले. येताना महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी बांधलेला कोयनेवरचा शिवकालीन दगडी पूल बघितला. आंबेनळी घाटाने गाडी जशी महाबळेश्वरच्या दिशेने प्रवास करू लागली तसे प्रतापगडाच्या आसमंतात ढगांनी हि गर्दी केलेली! दहा वाजता पुण्यनगरी गाठली आणि आजच्या सुंदर दिवसाची सांगता झाली. 

असो! फोटोंचा आनंद घ्या!

कुडपण गावातून वर चढल्यावर दिसणारे मधू मकरंदगड 

अहाहा !

प्रतापगडाच्या दिशेने पायपीट चालू . 

भर उन्हातली पायपीट 

असा स्पॉट सापडला म्हणजे डोंगरदेव प्रकट होणारच!

प्रतापगडाचे प्रथम दर्शन. 

प्रतापगडाच्या पहिले प्रवेशद्वार 

सूर्य बुरुज 

सूर्य बुरुज आणि मागे मधू मकरंदगड 


राम वरदायिनी मंदिर , पार गाव  

महाराजांनी ४०० वर्ष्यांपुर्वी बांधलेला कोयनेवरील दगडी पूल. 

नभ मेघांनी आक्रमिले!


वाचत रहा ! भटकत रहा!

सागर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: