बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

निसणीची वाट उतराई आणि बोचेघोळ चढाई

दिवस १ : माणगाव - जननीदेवी देवराई - चांदर - निसणीची वाट - पाने ( मुक्काम ) १६ km
दिवस २ : पाने - हेडमाची - बोचेघोळ - खानू डिगेवस्ती - माणगाव - १६ kmमाघी पोर्णिमेकडे दिवस हळूहळू कलू लागलेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. माणगावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय त्यामुळे अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. घाटमाथ्यावरून समोर दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड, आजूबाजूला घाटमाथ्यावरून रायगड प्रभावळीत उतरणाऱ्या ऐतिहासिक घाटवाटा, डावीकडे लिंगाणा तर उजवीकडे कोकणदिवा या पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


तर आजचा बेत होता तो रायगड प्रभावळीतील घाटवाटा भटकण्याचा. निसणीच्या वाटेने कोकणात पाने गावात उतरून बोचेघोळ वाटेने पुन्हा माथ्यावर चढाई. पहाटे चार वाजता पुण्यनगरीतून पानशेतच्या पुढ माणगावला प्रयाण केले. येथून पहिला टप्पा होता तो जननीदेवीच्या देवराईतून चांदर गावापर्यंतचा. गर्द देवराईतून चढून डोंगरावर आलो तेव्हा समोर खानू डिगेवस्ती आणि चांदर गाव दिसू लागले. लांबवर रायगड दिसू लागला तर उजवीकडे कोकणदिवा. येथून बारकू नामक वाटाड्या घेऊन सुरु झाली निसणीच्या वाटेची झाडोऱ्यातील उतराई. पाऊण-एक तासाच्या भर उन्हातल्या पायपिटीनंतर आता नाळेच्या तोंडाशी पोहोचलो. गच्च कारवीतून घसाऱ्याशी दोन हात करत कसेबसे माचीवर पोहचलो आणि तेथून पुढे दोन तासात रायगड जिल्ह्यातील पाने गावात. साडे चारला गावात पोहोचलो तेव्हा उन्हामुळे आणि पाठीवरच्या भल्या मोठ्या बॅगमुळे अंगातले त्राण निघून गेले होते. गावातले प्रशस्त राम मंदिर दिसताच रामरायाला वंदन करून त्याच्याच चरणाशी पथारी पसरली.
संध्याकाळी पाने गावातून दिसणारा भोवतालचा परिसर म्हणजे स्वर्गसुख. पश्चिमेकडे रायगडाच्या टकमक टोकावर केशरी झालर उमटू लागलेली. पूर्वेकडे आकाशाला भिडलेला लिंगाणा आणि रायलिंग पठार, शेजारी टोकेरी दातांसारखे दिसणारे सुळके आणि त्यातून उतरणाऱ्या बोराट्याची नाळ, निसणी, गायदरा, बोचेघोळ त्यापुढे कावळ्या आणि कोकणदिवा अश्या घाटवाटा. सूर्यास्त झाला तसे आजूबाजूच्या वस्त्या शांत होऊ लागल्या. एका घरात पिठलं -भाकरी -ठेच्याचे जेवण करून मंडळी निद्रादेवीची आराधना करण्यास सज्ज झाली.


दुसऱ्या दिवशी बोचेघोळ वाटेने ९५० मीटर्सची चढाई करून खानूचा डिगा आणि पुढे माणगाव असा सात-आठ तासांचा प्रवास असल्याने पहाटे पाचला मंडळी तयार झाली. सगळे जमले पण वाटाड्याचा पत्ता नव्हता तो त्याच्या बहिणीच्या घरी झोपणार होता मग त्याची शोधाशोध सुरु झाली. आपले जगणे घड्याळाशी बांधले असल्याने आपल्याला ते पाच काय, सहा काय, वेळेचे ते कौतुक. काळ्या मातीत आयुष्यभर राबलेल्या, आकाश पांघरून, दगडाची उशी घेऊन झोपणाऱ्याला आणि निसर्गाला दैवत मानून त्यावर दिनचक्र असलेल्याना कसली आलीये घाई? बाबांना उठवून चला म्हंटल्यावर हातात काठी घेऊन बाबा तयार!


सहा वाजता बोचेघोळ वाटेची खडी चढाई चालू झाली. एक तासात हेडमाची पोहोचलो तेव्हा सर्वांगाला घामाने अंघोळ झालेली. त्याशेजारील गायनाळ आता पडझड झाल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहे असे समजले. डावीकडे कोकणदिवा अखंड सोबतीला होता. रायगडावरील जगदीश्वर मंदिर आता नुसत्या डोळ्याने दिसू लागले. खाली पायथाशी वाघेरी, वारंगी गावं हळूहळू जागी होत होती. एक मोठा ट्रॅव्हर्स मारून खिंडीतून खडी चढाई करून घाटमाथ्यावर पोहोचलो. पाच तास छोटे ब्रेक घेत चढाई करून मध्यान्ह झाली तेव्हा खानूच्या डिग्यावर पोहोचलो. इतक्या सुंदर जागेला नजर नको लागूदे असं गाव म्हणावं तर नजर लागलीच होती. JCB डोंगरफोडीची कामे अविश्रांत करत होता. आता डोक्यावर जळता सूर्य घेऊन वाटचाल चालू झाली. लवकरात लवकर देवराई गाठली आणि थोडा वेळ मस्त ताणून दिली. शेवटची कंटाळवाणी चाल करून एकदा काय ते माणगाव पोहोचलो. ग्रुपच्या सदस्यांनी भाकरी -रस्सा - भात - मठ्ठा - बाकरवडी असे साग्रसंगीत जेवण बनवलेले. त्यांचे मनोमन आभार मानून पोटोबा झाला आणि मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दोन दिवस सह्याद्रीतील दोन नवीन दुर्गम वाटा भटकत्या आल्या. या वाटा आपणच जागत्या ठेवल्या पाहिजेत.
असो. फोटोचा आनंद घ्या!कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: