रविवार, ३१ मार्च, २०२४

मधू-मकरंदगड - रौद्रभीषण कोंडनाळ - हातलोट घाट


भर उन्हातली भटकंती - 

हातलोट - मधू-मकरंदगड - रौद्रभीषण अश्या कोंडनाळने कोकणात उतराई - बिरमणी मुक्काम - हातलोट घाटाने देशावर चढाई - हातलोट ( २४ किलोमीटर्स )


    रानावनात वसंताची चाहूल लागलीये. दिवस हळूहळू मोठे होऊ लागलेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. हातलोट गावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय त्यामुळे अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. मकरंदगडाच्या माथ्यावरून समोर दिसणारा चकदेव पर्वत, कांदट खोरे, डावीकडे गगनचुंबी सुमारगड , महिपतगड मागे महाबळेश्वर. या पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


उन्हाच्या झळा वाढू लागल्या तसे भटकंतीच्या नव्या जंगलवाटा शोधायला चालू केले. उन्हाळ्यात पायपीट करायची तर महाबळेश्वरचे जावळीचे खोरे म्हणजे बेश्ट! मागच्या ट्रेकला एका भिडूने कोंडनाळचा विषय काढला. आजपर्यंतची सर्वात आवडलेली आणि रौद्रभीषण अशी कोंडनाळ वर्णन ऐकूनच दोन दिवसांचा प्लॅन बनला. बरेच वाचन केल्यावर सगळ्या लेखात एक कॉमन उल्लेख होता तो म्हणजे कोकणातल्या आमचा जेथे मुक्काम असणार होता त्या गावातील आदरातिथ्याचा. ट्रेक भिडूंना तेथे आलेल्या माणुसकीच्या अनुभवांचा. हे सगळे वाचून उत्सुकता अजूनच वाढली. जोडीला वेळ मिळाला तर मधू-मकरंदगड पण होणार होते. मकरंद गडाच्या माथ्यावरून दिसणारे जावळीचे घनदाट जंगल म्हणजे काय वर्णावे ? निव्वळ कमाल ! 


सात मंडळी जमवून रात्री दहाच्या सुमारास गाडी महाबळेश्वरच्या दिशेने निघाली. महाबळेश्वरपर्यंत रात्री जायचे काही टेन्शन नव्हते. रात्री एक वाजता सुद्धा रस्ते अडवून तिकीट घेणाऱ्याला फाट्यावर मारून आंबेनळी घाटाने उतरायला सुरवात केली. अर्धा घाट उतरून पार गावाच्या कमानीतून डावीकडे वळलो तेव्हा जावळीचे जंगल निद्रिस्त झाले होते. पार ते हातलोट रस्त्याने रात्री दोन वाजता जाताना कुठे तरी जंगलात डोळे चमकतील या आशेने मंडळी चालली होती. अडीच वाजता हातलोट गावात पोहोचून गावातील प्रशस्त अश्या कुंबलंजाई मंदिरात झोपून गेलो. 


तीन तासाची झोप पदरात पडून सकाळी सात ला मकरंदगडाच्या दिशेने निघालो. मकरंदवाडीत एक घरात इंद्रायणी तांदळाची ऑर्डर देऊन घोणसपूर दिशेने निघालो. तासात माचीवरील मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचलो. घामाने अंघोळ तर झालीच होती.  तसेच महादेवाच्या चरणी माथा टेकवून पाठीवरची वजने पोटात ढकलली. 


मल्लिकार्जुन मंदिर, घोणसपूर 


"कोंडनाळ तुम्हाला सापडणार नाही आणि खूप अवघड आहे गावातलं पण कोण येणार नाही. त्यापेक्षा परत गावात जाऊन हातलोट घाटाने जा" असे तीन सल्ले मिळाले. आता गावकरी अवघड आहे जाऊ नका म्हणतायत तर आमची काय अवस्था होईल याची पुसटशी कल्पना येऊ लागलेली. "कोंडनाळ अवघड तर आहेच पण नाळेचे तोंड कसे शोधणार हो तुम्ही? असे करा मंदिराच्या जवळ एक धनगराचा झाप आहे त्याला घेऊन जा बरोबर तो नाळेचे तोंड दाखवेल" या एकाच्या आशादायी बोलण्यावर मंडळी निघाली. जो लक्ष्मण नामक धनगर आमच्या कोंडनाळ उतरायच्या आशेचा किरण होता तोच आम्हाला मंदिरात भेटला आणि आमच्या समोर रानात निघून गेला. "आत्ता  तुम्ही नाळेच्या तोंडाशी पाहिजे होतात आता उन्हामुळे पुरते बेजार व्हाल" इति लक्ष्मण !  त्याला विनवणी केल्यावर तुम्ही किल्ल्यावर जाऊन या मी दिड तासात इथे मंदिरात येतो म्हणून निघून गेला. 


मकरंदगडावरून दिसणारा नजारा 


ग्रुपमधल्या बरेच लोकांचा मकरंदगड राहिला होताच मग हि संधी साधून किल्ल्यावर जाऊन कोंडनाळेचं जरा अंदाज घेतला.  तासाभरात खाली मंदिरात आलो तरी लक्ष्मण आलेला नव्हता. आमचा शेवटचा आशेचा किरण सुद्धा भर उन्हात मावळला. आता gpx आणि वाचलेल्या माहितीच्या आधारे नाळेचे तोंड शोधणे होते. अजून वेळ न घालवता मंडळी झपाझप निघाली.अर्ध्या तासात मकरंदगडाच्या मागील बाजूस पोहोचलो. येथून घसाऱ्याच्या वाटेने पश्चिम टोकाला पोहोचलो. येथून खाली धारदार, दरीत कोसळणारे सह्याद्रीचे कडे लक्ष् वेधून घेत होते. येथून पुढे वाट संपली आणि कोंडनाळच्या तोंडाशी पोहोचलो. सर्वात पहिल्यांदा येथून माणूस उतरू शकेल यावर विश्वासच बसत नव्हता. ग्रुपमधील काही मंडळी तर येथू जाऊच शकत नाही परत जाऊन वाटाड्याला आणू म्हणाली. gpx वर हाच उतरायचा बिंदू दाखवत होता मग काय ? रामरायाचे नाव घेऊन नाळेत उतराई सुरु केली. कोंडनाळ म्हणजे मराठीत एकाच शब्द ! रौद्रभीषण!


रौद्रभीषण 


एकमेकांना हाकाऱ्या देत,  अंतर ठेवत, gpx बघत उतराई चालू झाली. प्रचंड घसाऱ्याची उतराई बघून डोळे आणि डोके दोन्हीही फिरले. एक पाय ठेवल्यावर डझन दगड गडगडाट खाली जायचे. मग खालच्याला वॉच आऊट,वॉच आऊट च्या आरोळ्या चालू झाल्या. मोठे मोठे खात्रीचे दगड पाय ठेवताच आपली जागा सोडून विस्थापित होऊ लागले. प्रत्येक जण नियमित प्रसाद घेत काळजीपूर्वक उतरू लागला. बरे खाली दगड बघून उतराई करायची तर कारवीचे जंगल टोपी उडवायचे. या दोन्ही आघाडीवर लढाई करत उतरताना चाल मंदावली. सुमारे तासभर हा खेळ चालला आणि मग नाळेचा कातळमार्ग लागला. येथे मंडळींनी सगळे अवयव जागेवर आहेत याची खात्री करून मनाचा ठिय्या करून पुढची वाटचाल चालू केली. गावातील तीन चार लोकांनी अवघड आहे म्हणून सांगितलेली वाट खरंच खतरनाक निघाली. अगदीच हैराण वा वाईट अवस्था झाली नाही हि दैवी कृपा! 


वाटेतील एकमेव पाण्याचा स्रोत 


सुमारे पाच तास उतराई करून आम्ही सपाटीला पोहोचलो. चार लिटर पाणी संपत आले होते. आता हातलोट घाटाची नाळ पण येऊन मिळाली होती. येथूनच डावीकडे बिरमणी गावात जाणारा रस्ता होता पण तो न दिसून आम्ही नाळेने बिरमणी गावाच्या पुढे कळमणी गावापर्यंत पोहोचलो. gpx बेंबीच्या देठापासून तुम्ही चुकले आहात सांगत होते पण नाळ गावात जाईल या विचाराने आम्ही चाललो होतो. शेवटी नाळेतून क्रॉस मारून एक डोंगर चढून कसेबसे बिरमणी गावात पोहोचलो. गाव सुंदर आणि प्रसन्न होते. गावातील मुले क्रिकेट खेळात होती त्यांनी गावातील मारुती मंदिराची वाट दाखवली. आज आमचा मुक्काम याच मंदिरात होणार होता. पाच वाजता आम्ही वेळेत गावात पोहोचलो. सकाळी सात ते संध्याकाळी पाच अशी दहा तासांची चाल आज झाली. मंदिरासमोरच एक छोटेसे घर आणि दुकान आहे तेथे चहा आणि  जेवणाचे सांगून भटकायला निघालो. दोन क्रिकेटच्या मॅच खेळून परत आलो तेव्हा सायंकाळ झाली होती. बरोब्बर सातच्या ठोक्याला मंदिरात आरती करून रामरक्षेचा पाठ म्हंटला. गरम गरम रस्सा भात खाऊन मंडळी गुडूप होतील असे वाटले होते पण गावातील काही थोर मंडळी गप्पा मारायला आली आणि रात्री अकरा पर्यंत गप्पांचा फड जमला. 


आज अवघड अश्या कोंडनाळेची भटकंती कोणत्याही वाटाड्याशिवाय करता आली याबद्दल समाधान वाटले. खाली गावातून वरती कोंडनाळ बघता अजूनही येथू आपण उतरून आलो यावर विश्वास बसत नव्हता. चार पाच महिन्यांपूर्वी एकाला कोंडनाळेतून बेशुद्ध पडल्यामुळे रिस्क्यू केले होते त्या कहाण्या उतरताना सारख्या आठवत होत्या. लेखात वाचलेल्या गावातील आदरातिथ्याचा आम्हालाही अनुभव आला. चहाला दूध नव्हते तर एक घरातील काकांनी त्यांचे भांडभर दूध आणून दिले असे अनेक सुंदर अनुभव गाठीशी घेत आजचा दिवस संपवला. 


आजचा मुक्काम बिरमणी गावातील मारुती मंदिरात 


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर हातलोट घाट चढून निघायचे ठरले जेणेकरून महाबळेश्वरचे पब्लिक टाळता येईल. सात वाजता निघालो तसे गावातील काळ क्रिकेट खेळणारी मुले आम्हाला हातलोट घाटाच्या सुरुवातीला सोडवण्यास आली. त्यांचे आभार मानून हातलोट घाटाची चढाई चालू केली. 


"कोंडनाळ" हा जर दहावीच्या बोर्डाच्या पेपरमधील "ड" गटाचे गणित असेल तर हातलोट घाट एकदम "अ" गटाचं गणित निघाले. मस्त गर्द झाडीमधून हळू हळू चढणारी वाट सुमारे अडीच तासात माथ्यावर घेऊन आली. माथ्यावर कातळकोरीव पायऱ्या आणि पाण्याचे टाके बघून ही वाट वहिवाटीची प्राचीन वाट असेल याची खात्री झाली. येथून रमतगमत हातलोट घाटात पोहोचलो तेव्हा अकरा वाजत आले होते. गावात एक घरात जेवण सांगितले होते. चवदार मुळ्याची भाजी, कोरडी मिरची असे पदार्थ खाऊन हातलोट गावातून निघालो. वाटेत महाराजांनी कोयना नदीवर बांधलेला शिवकालीन पूल बघून पार गावातील "रामवरदायिनी" देवीच्या दर्शनाला गेलो. 

हातलोट घाट चढाई 


आता महाबळेश्वर जायचे तर स्ट्रॉबेरी तर आणलाच पाहिजे नाही का? मग हातलोट गावाच्या जवळच एक शेतात जाऊन उरलेल्या स्ट्रॉबेरी तोडल्या आणि मग विनाथांबा पुण्यनगरीचा रस्ता धरला. अश्या प्रकारे एक कायम लक्षात राहील असा रौद्रभीषण अश्या कोंडनाळेचा ट्रेक सुफळ संपन्न जाहला. 


महत्वाचे असे काही :

  1. कोंडनाळ शक्यतो उतरावी आणि हातलोट घाटाने चढाई करावी. कोंडनाळ उतरताना पहिल्यांदा खूप घसारा आहे योग्य ते अंतर ठेऊन उतराई करावी. 
  2. उन्हाळ्यात नाळ सगळ्या बाजूने तापून दगड तापतो आणि जीव हैराण होतो असे दोन तीन अनुभव ऐकले होते. तयारीचे भिडू असल्याने आम्हाला तस्से काही वाटले नाही. 
  3. गाईड घेतला नसेल तर मल्लिकार्जुन मंदिराकडून पुढे आल्यावर एकधनगराचा झाप आहे तो ५०० रु घेऊन नाळेच्या तोंडाशी सोडू शकतो. 
  4. बिरमणी गावात राहायची आणि जेवायची उत्तम सोय आहे. खायचे काही नेले नाही तरी चालेल. आम्हाला हे माहित नसल्याने आम्ही दोन दिवसांचे जेवण नेले होते. 
  5. बिरमणी गावात जायला हातलोट घाट आणि कोंडनाळ जेथे संगम होतो तेथून लगेच डाव्या हाताला वळावे. सरळ गेल्यास कलामणी गावात पोहोचतो. 
  6. कोंडनाळ उतरायला अंदाजे पाच ते सहा तास लागतात तर हातलोट चढाई ३ तासांची आहे. 
  7. https://www.ramblr.com/web/explore येथे gpx फाईल मिळेल. 


असो! फोटोंची मजा घ्या!

सागर शिवदे 









भिडू लोक्स 

श्रमपरिहार 

रानमेवा 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: