बुधवार, ३ जानेवारी, २०२४

रविवारची छोटेखानी भटकंती : श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड

 

रविवारची छोटेखानी भटकंती : 

श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड  


पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. सोनकी, हळदी, कारवी आणि विविध फुलाच्या बहराचा सुवर्ण अलंकार अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!


 

असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला तो वेळवंडी नदीच्या खोऱ्याशी सलगी करत वर्षानुवर्षे उभ्या मेहूड खोऱ्यातील सर्वोच्च महादेव तिर्थाला. श्री क्षेत्र घेवडेश्वर! सप्टेंबर महिन्यात गणरायाचे आगमन झाल्यामुळे महिन्याची विश्रांती झाली. पहाटे पाचला मंडळी निघाली आणि  भोरच्या दिशेने रवाना झाली. पायथ्याच्या गावामध्ये प्रशस्त असे भैरवनाथ मंदिराच्या आवारात गाडी लावल्या, पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. 


संपूर्ण डोंगर रंगेबेरंगी फुलांचा महोत्सव साजरा करीत होता. हिरवेकंच गालीचे आणि त्यावर नवथर जलबिंदू गात्राला तृप्तीची अनुभूती देत होते. पाऊण- एक तासाच्या चढाईने पोहोचलो धनगरवाडीमध्ये. तेथे पोहोचताच एकमेव अश्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात उदरम- भरणम करून पुढे निघालो. शाळेत आत डोकावून पाहताच आज विस्मृतीत गेलेले काही सुविचार दिसले. येथून पुढे जाताच कातळात कोरलेल्या सुंदर अश्या पायऱ्या लागल्या. अश्या दुर्गम ठिकाणी सहज कातळ कोरून वाटबनवणाऱ्या  मंडळींकडे  नक्कीच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारातच डोंगरमाथ्यावर पोहोचलो. 


समोर विचित्रगड आता खुजा वाटू लागलेला. मधूनच एखादी पावसाची सर यायची आणि ढगांच्या पसाऱ्याला बाजूला सारून सह्याद्रीचे अथांग दर्शन घडवायची. कारवीची जांभळी फुले आणि सोनकी, हळदीने ट्रेक भिडूंचे भान हरवलेले. सगळ्यांची जोरदार फोटोग्राफी सुरु झाली. दिड-दोन तासांच्या चढाईने पठारावर पोहोचलो तोच वर्षानुवर्षे भक्तांची पाठराखण करत असलेला मेहूड खोऱ्याचा अधिपती घेवडेश्वरचे दर्शन झाले. सुंदर रेखीव दगडी बांधकाम, शिखरावर फडकणारा भगवा, दगडी कोरीव पण काळाच्या ओघात जीर्ण झालेले दोन नंदी, थोडी मागे गतवैभव आठवत, शेवटचा घटका मोजत असलेली दिपमाळ बघून धन्य वाटले. अश्या उंच डोंगरांवर इतकी सुंदर शिल्पकृती साकारणाऱ्या त्या अनामिक हातांना मनोमन वंदन करून गाभाऱ्यात प्रवेशते झालो. 


"ओम नमः शिवाय" चा नाद मंदिरात दुमदुमला. गर्भगृहाच्या बाहेर दोन बाजूला दगडात कोरलेले गणपती बाप्पा बघून पेशवेकालीन रचना असावी असे वाटून गेले.  समोरच निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली फुलांची आरास बघून त्यातील एक गुच्छ देवाच्या चरणी अर्पण करून परतीची वाट धरली. 


लवकर ट्रेक संपल्याने स्वारी रोहिडा किल्ल्याला निघाली. बाजारवाडी गावातून चढाई चालू केली तेव्हा २००८ साली भोर एस्टी स्थानक ते बाजारवाडी पायपीट वाचावी म्हणून मधूनच डोंगरधारेने चढून चोर दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्याचे आठवले. आज ती वाट चालू नाही असे कळले. गडफेरी करून निघालो तसे पावसाने गाठले आणि पावसाळी ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.   


असो! फोटोंची मजा घ्या!












घेवडेश्वर डोंगराच्या माथ्यावर विराजमान महादेव 

घेवडेश्वर महादेवास पुष्पांजली 




अश्या कातळकोरीव पायऱ्या पाहिल्या कि जो कोणी अनामिक कलाकार आहे त्यास नमन करावेसे वाटते. 

निसर्गाची मुक्तहस्त उधळण!

किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड 


रिफ्रेशिंग रिल्स : 





वाचत राहा. 

सोमवार, १ जानेवारी, २०२४

बागलाण दुर्गभ्रमंती भाग 7- मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा

  



अपरिचीत बागलाण मोहीम ७


नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 

दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे 

===============================================================

दिवस १ : भाग २ - 

उद्धव महाराज समाधी मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणार नेत्रदीपक असा रासक्रीडा उत्सव:


मुल्हेर किल्ल्याचे मूळ नाव मयूरगड!  महाभारतकालीन राजा मयूरध्वज याची राजधानी! आख्यायिकेनुसार,  मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने रासक्रीडेचा उत्सव सुरू केला. मुल्हेरच्या उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० पासून उत्सवाला अधिक प्रोत्साहन दिले. श्री काशीराज महाराज यांना साक्षात श्रीकृष्णाने दिव्य चक्षूंनी रासक्रीडा दर्शन दिले. असे ऐकिवात आहे. रासक्रीडे दरम्यान रासचक्र म्हणजेच 'मंडळ' हे रासस्तंभावर चढवले जाते. सात फुटी लाकडी रासचक्राला बांबू जोडून त्याचा व्यास चौपट म्हणजे २८ फुटी केला जातो. चक्राच्या बाजूला गोलाकार जे खांब लावले जातात ते सात फूट जमिनीत आणि १४ फूट वरती असे सात फुटांच्या हिशेबात असते. रासचक्रावर केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजावट होते. श्रीकृष्ण आणि गोपिका वृंदावनात अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असे मानले जाते. आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना म्हणजेच सायंकाळच्या संपत वेळेप्रसंगी हे रासचक्र भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते. रात्रभर हे रासचक्र हाताने फिरवले जाते. त्याचाही खास मान विशिष्ट समाजाकडे असतो. 


या रासक्रीडादरम्यान अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ पदांचे गायन केले जाते. कोजागिरीच्या रात्री रासचक्र चढविल्यानंतर रात्री दहा पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत न थांबता हे भजन गायन केले जाते. मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, वाद्यांच्या गजरात देवघरापासून ते समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. 


या रासक्रीडेच्या कामांमध्ये प्रत्येक समाजाला सामावून घेतले जाते. पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा न्हावी,तेली कुंभार यांकडे कापसाच्या वाटी बनवणे, दिव्यांना तेल पुरवणे आणि मातीचे दिवे बनवणे अशी अनुक्रमे कामे दिलेली होती. आदिवासी बांधवांकडे जंगलातून केळीची पाने आणि फुले आणायचे काम. शिंपी लोकांकडे रासचक्र बांधण्याचे काम, मराठा समाजातील लोकांना रासचक्र सजावट,मंदिरावर झेंडा लावणे आणि परिसर देखरेखीचे काम, अशी सर्व समाज समावेशक उत्सव काशीराज महाराजांनी सुरु केला. जर कोणाला नवसाने मुलगा झाला असेल तर त्याला गोपिका बनवून त्यांना देव मानून त्यांची मुरवणूक काढली जाते. असा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे. 


हे सगळे डोळ्यात साठवून आजचा दुसरा दिवस संपवला. रात्रभर चालणारी भजने ऐकत केव्हा डोळा लागला आठवत नाही. सकाळी सहाला उठलो तेव्हाही त्याच उत्साहाने भजन गायन चालू होते. मंदिरातील गर्दी आता सरली होती. शांत चित्ताने उद्धव महाराज समाधीचे दर्शन घेऊन मुल्हेरचा निरोप घेतला. आज दुसरा दिवस आणि आजचे लक्ष होते बागलाणमधून खानदेशी भाटकायचा. धुळे जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला - किल्ले भामेर आणि स्थानिक लोकांनाही माहितीत नसलेला किल्ले रायकोट. मुल्हेर येथे कार्यक्रमासाठी जवळच्याच धनेर आमळी नावाच्या गावातून एक ग्रुप आला होता त्यांनी आमचा अवतार बघून विचारपूस केली आणि त्यांच्या गावातील लक्ष्मी नारायणाचे अप्रतिम मंदिर आहे आहे सांगितले. शेषशायी विष्णूच्या एका अखंड दगडातील कोरलेल्या मूर्तीच्या बेंबी मधून सदैव पाणी येते म्हणून लोक त्याला जिवंत विष्णू म्हणतात. अनायसे आज गाडी होतीच तर हे मंदिर बघायचे नक्की करून मंडळी भामेर किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 





रासनाहणाचे चक्र बांधताना 



केळीच्या पानांनी आणि फुलांनी सजावट करताना 


उद्धव महाराज समाधी 

 संपतकाली रस चक्र उचलण्यासाठी जमलेली भाविक मंडळी.  


वाचत राहा.. 

पुढच्या भागात - 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर.