बुधवार, ३ जानेवारी, २०२४

रविवारची छोटेखानी भटकंती : श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड

 

रविवारची छोटेखानी भटकंती : 

श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड  


पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. सोनकी, हळदी, कारवी आणि विविध फुलाच्या बहराचा सुवर्ण अलंकार अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!


 

असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला तो वेळवंडी नदीच्या खोऱ्याशी सलगी करत वर्षानुवर्षे उभ्या मेहूड खोऱ्यातील सर्वोच्च महादेव तिर्थाला. श्री क्षेत्र घेवडेश्वर! सप्टेंबर महिन्यात गणरायाचे आगमन झाल्यामुळे महिन्याची विश्रांती झाली. पहाटे पाचला मंडळी निघाली आणि  भोरच्या दिशेने रवाना झाली. पायथ्याच्या गावामध्ये प्रशस्त असे भैरवनाथ मंदिराच्या आवारात गाडी लावल्या, पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. 


संपूर्ण डोंगर रंगेबेरंगी फुलांचा महोत्सव साजरा करीत होता. हिरवेकंच गालीचे आणि त्यावर नवथर जलबिंदू गात्राला तृप्तीची अनुभूती देत होते. पाऊण- एक तासाच्या चढाईने पोहोचलो धनगरवाडीमध्ये. तेथे पोहोचताच एकमेव अश्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात उदरम- भरणम करून पुढे निघालो. शाळेत आत डोकावून पाहताच आज विस्मृतीत गेलेले काही सुविचार दिसले. येथून पुढे जाताच कातळात कोरलेल्या सुंदर अश्या पायऱ्या लागल्या. अश्या दुर्गम ठिकाणी सहज कातळ कोरून वाटबनवणाऱ्या  मंडळींकडे  नक्कीच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारातच डोंगरमाथ्यावर पोहोचलो. 


समोर विचित्रगड आता खुजा वाटू लागलेला. मधूनच एखादी पावसाची सर यायची आणि ढगांच्या पसाऱ्याला बाजूला सारून सह्याद्रीचे अथांग दर्शन घडवायची. कारवीची जांभळी फुले आणि सोनकी, हळदीने ट्रेक भिडूंचे भान हरवलेले. सगळ्यांची जोरदार फोटोग्राफी सुरु झाली. दिड-दोन तासांच्या चढाईने पठारावर पोहोचलो तोच वर्षानुवर्षे भक्तांची पाठराखण करत असलेला मेहूड खोऱ्याचा अधिपती घेवडेश्वरचे दर्शन झाले. सुंदर रेखीव दगडी बांधकाम, शिखरावर फडकणारा भगवा, दगडी कोरीव पण काळाच्या ओघात जीर्ण झालेले दोन नंदी, थोडी मागे गतवैभव आठवत, शेवटचा घटका मोजत असलेली दिपमाळ बघून धन्य वाटले. अश्या उंच डोंगरांवर इतकी सुंदर शिल्पकृती साकारणाऱ्या त्या अनामिक हातांना मनोमन वंदन करून गाभाऱ्यात प्रवेशते झालो. 


"ओम नमः शिवाय" चा नाद मंदिरात दुमदुमला. गर्भगृहाच्या बाहेर दोन बाजूला दगडात कोरलेले गणपती बाप्पा बघून पेशवेकालीन रचना असावी असे वाटून गेले.  समोरच निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली फुलांची आरास बघून त्यातील एक गुच्छ देवाच्या चरणी अर्पण करून परतीची वाट धरली. 


लवकर ट्रेक संपल्याने स्वारी रोहिडा किल्ल्याला निघाली. बाजारवाडी गावातून चढाई चालू केली तेव्हा २००८ साली भोर एस्टी स्थानक ते बाजारवाडी पायपीट वाचावी म्हणून मधूनच डोंगरधारेने चढून चोर दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्याचे आठवले. आज ती वाट चालू नाही असे कळले. गडफेरी करून निघालो तसे पावसाने गाठले आणि पावसाळी ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.   


असो! फोटोंची मजा घ्या!












घेवडेश्वर डोंगराच्या माथ्यावर विराजमान महादेव 

घेवडेश्वर महादेवास पुष्पांजली 




अश्या कातळकोरीव पायऱ्या पाहिल्या कि जो कोणी अनामिक कलाकार आहे त्यास नमन करावेसे वाटते. 

निसर्गाची मुक्तहस्त उधळण!

किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड 


रिफ्रेशिंग रिल्स : 





वाचत राहा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: