माहुली , भंडारगड, पळसगड
शहापूर तालुक्यातील या दुर्ग त्रिकुटाला दिलेली चौथी भेट. ट्रेक प्लॅन ठरला तेव्हा आधी तीन वेळा झाला असल्याने जायचा विचार नव्हता पण घरी पडून रहाण्यापेक्षा कुठेतरी भटकून येऊ आणि तिन्ही वेळेस पळसगड झाला नसल्याने यावेळी तो पाहून येऊ या विचाराने मंडळी निघाली. इथे पुण्यनगरीत रानावनात गच्च भरलेल्या थंडीने इथे कोकणपट्ट्यात आपला मागमूसही लागू दिला नाही. झुंजूमुंजू झाल्यावर पूर्वेच्या केशरी कागदावर क्षणात बदलणाऱ्या रंगछटा पाहून मात्र आल्याचे सार्थक झाले. कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वेळी जा, सह्याद्री आपल्या रूपाने कायमच मंत्रमुग्ध करतो.
असो, तर सकाळी सहा वाजता चढाई सुरुवात करून अर्ध्यापेक्षा जास्त चढून आलो तेव्हा आसमंतात उमटलेल्या विस्मयकारी रंगछटांनी डोळ्याचे पारणे फेडले. यथेच्च फोटो काढून महादरवाज्यापाशी पोहोचलो. महादेवाचे दर्शन घेऊन गडफेरीस सुरुवात केली. महादरवाज्यापुढे भालदार चोपदार टाईप पोजचे फोटो आधी तिन्ही वेळा काढले असल्याने याही वेळी तो कार्यक्रम झाला. भंडारगड भ्रमंती करून कल्याण दरवाज्याच्या माथ्यावर पोहोचलो. तेथे बांधलेल्या रोपने खाली उतरून जीवधन किल्ल्यासारखी नाळेत खोदलेली पायऱ्यांची वाट पाहून थक्क झालो. पुढे वजीर सुळका आणि कोकणकड्याची डोळ्यात न मावणारी अद्भुत निसर्गचित्रे डोळ्यात साठवून आल्या पावली महादरवाज्यापाशी पोहोचलो.
येथून आता काही मंडळी खाली निघून गेल्याने धावतच पळसगडाचा रस्ता धरला. खास पळसगडासाठी वाटाड्या घेतला होता पण त्याने भंडारगडालाच पळसगड आहे असे म्हणत गंडवायचा थोडा प्रयत्न केला. त्याला फाट्यावर मारून शिवपिंडीपासून पळतच पळसगड मार्गे निघालो. एका पॉईंट नंतर जिथे एक भलामोठा दगड आहे तेथून तीन वाट फुटतात. सगळ्यात उजवीकडची पळसगड माथ्यावर जाते तर डावी 'खोर' गावात उतरते. मधली वाट नव्याने उजेडात आलेल्या गणेश दरवाज्यापाशी जाते. थोडेसे भरकटून गणेश दरवाजा शोधला आणि दरवाज्याच्या बरोब्बर वर कातळावर कोरलेल्या गजाननाचा आशीर्वाद घेऊन परतीचा मार्ग धरला.
असो फोटोंचा आनंद घ्या!
फोटो सौजन्य : ट्रेकभिडु ऑफबीट ट्रेकर्स