सोमवार, ८ एप्रिल, २०१३

निमित्त फक्त एका भेटीचे

 निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे  बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.  अश्या साध्या आणि अतिशय निरव अश्या स्थितीतून वेळ काय वेड पांघरते हे त्या विधात्यालाच ठाऊक. नजरेला नजर भिडते अन कुठल्या जन्मांची आणि नात्यांची क्षणात लय जुळते. काहीबाही भूतकाळातील प्रसंग आठवतात.काही थोड्या शब्दांची देवघेव होते. कुठेतरी मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेल्या आठवणी क्षणात दाटतात.  बऱ्याचं वेळ सांभाळलेला संयम सुटून मन आनंदाच्या उचंबळ्या खाऊ लागते. आता शब्द असतात ते फक्त भार वाहायला निरोपाचा, खरी देवाण घेवाण हि हृदयाशीच चालू होते. आणि मग काही क्षणात शब्दांची देवाण घेवाण थांबते आणि संवाद सुरू होतो फक्त डोळ्यातील डबडबलेल्या आठवणीने, अनुभवाने, कृतज्ञतेने.

विजू अशीच बस ची वाट बघत उभी होती घरी येण्यासाठी. साधारणता रात्री आठ, सव्वा आठ ची वेळ असावी. दिवसभर राबून तिने पुरणपोळ्या बनविल्या होत्या. आज वडिलांसाठी पुरणपोळ्या बनवून घेऊन गेली होती बऱ्याचं दिवसांनी, तशी तिची दर शनिवार, रविवार एखादी तरी चक्कर असतेच, पण आज वडिलांच्या आवडत्या पुरणपोळ्या वयाच्या शह्यन्शिव्या वर्षी खाताना बघून तिला वेगळेच समाधान लाभणार होते. आज त्यांचा वाढदिवस हे निमित्त तर होतेच पण आज ती जरा जास्तच आनंदात होती. त्या आनंदात तिला  आपला पाय दुखत असून आपण बस थांब्यापर्यंत चालत आलो हेही जाणवले नसेल. आनंदात माणूस वेदना विसरतो हेच खरे.

खरेतर तिला एकेरी विजू म्हणावे असे तिचे वय नव्हे. पण अशी लोक इतक्या सहजतेने सर्वांना सामावून घेतात की नजरेनेच मनातले भाव कळले तर नावाची गरजच लागत नाही. खरेच ती नावाप्रमाणेच एकापेक्षा एक अश्या सुयोग्य रत्नांची गुंफलेली मालाच. म्हणून रत्नमाला.

विजूची घरी लवकर जायची घाई पाहून का काय माहीत, बसने वेळेत जायचे नाही असा चंगच बांधला. 
मग इकडे तिकडे बघत तिचे काही क्षण गेले. समोरच एक बाई उभ्या दिसल्या. तिच्यापेक्षा जास्तच वयाच्या, साधारणता सत्तर बाहत्तर या वयातील. त्यांनाही घरी जायची लगबग. त्यापण सैरभैर. विजूने त्यांच्याकडे बघताच ती कित्येक वर्ष मागे भूतकाळात हरवून गेली. मेंदूच्या आणि मनाच्या कप्प्यात कित्येक वर्षे जपून ठेवलेल्या त्या नावाने क्षणार्धात मेंदू ते तोंडापर्यंतचा प्रवास केला. श्वास फुलला गेला.

ती कितीतरी वर्षे भूतकाळात वाहत गेली आणि तिचा शाळा सोडतानाचा प्रसंग चटकन तिच्या समोर जिवंत झाला. साधारणता तीस ते पस्तीस वर्षापूर्वीच्या आठवणींच्या दवबिंदूंनी तिच्या मनाचे पर्णपत्र भिजून निघाले.
खरेच, दवबिंदूच ते, कुठून कसे आले कोणास ठाऊक नाही आठवणींसारखे . सुखात वाऱ्याशी मैत्री करत झुलत राहतात आठवणींसारखे, दुसऱ्याचा भावनारूपी प्रकाश घेऊन तोच परावर्तित करत राहतात. उन्हाच्या तप्ततेची चाहूल लागताच विरून जातात का-कु न करता, कोणताही आक्रोश न करता , कधी मातीत तर कधी हवेत.

शाळेचा शेवटचा दिवस हा असा तिच्या पुढ्यात उभा राहिला. आता परत आपण या शाळेत येणार नाही, परत कधीही आपल्या आवडत्या बाई आम्हाला भेटणार नाहीत म्हणून सगळ्या मुलींचे डोळे पाणावलेले. विजूची नजर मात्र "मराठे बाई'ना शोधत भिरभिरत होती. फक्त शिक्षक- विद्यार्थी असे त्यांचे नाते नव्हते. त्याच्याही पलीकडले जपलेले आणि शब्दात न व्यतीत करण्याजोगे असे होते. काहीही घडले तरी विजू मराठे बाईंकडे धाव घेई. आणि त्याही मुलीप्रमाणे तिला जपून घेत.
नेमका त्याच दिवशी योगायोगाने बहुदा, विजूचा वाढदिवस पण होता. त्याच दिवशी मराठे बाईंनी विजूला वाढदिवसाबरोबरच पुढच्या आयुष्यासाठीही शुभेच्छा दिल्या. नुसत्या कोरड्या शुभेच्छा न देत त्यांनी तिला एक शुभेच्छापत्रकच दिले होते. त्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात.  तेव्हा,
त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
त्या दिव्याचा प्रकाश हाच खरा मान, 
आणि त्याच्याशीच प्रामाणिक राहून आपल्या जीवनमार्ग निश्चलपणे आक्रम,
म्हणजे पाऊल कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तर त्याचा मार्ग कायम योग्यच असेल."

विजुसाठी या केवळ काव्यपंक्ती नव्हत्या. तिच्यासाठी ते सूत्र होते जगण्याचे. त्या चार ओळी तिने त्या दिवसानंतर लक्ष वेळा वाचल्या असतील. आतातर तिला त्या पाठही झाल्या होत्या.

शाळा सोडून पुढचे शिक्षण चालू झाले. अर्थात ते हि मराठेबाईंच्या सल्ल्यानेच.नंतर कधीतरी पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबते की काय अशी परिस्थितीत मराठे बाईंनी दिलेला मदतीचा हात. जो ती कधीच विसरू शकणार नव्हती. तिच्या शैक्षणिक कारकीर्दीत 'मराठे बाई' या दोन शब्दांनी कितीतरी आमूलाग्र बदल आणला होता.

लग्न होऊन संसार चालू झाला. आर्थिक परिस्थिती तशी काही जास्त खास नव्हती. मध्ये बरीच वर्षे गेली. संसाराच्या रहाटगाड्याला एकदा जुंपून घेतले की स्वतः साठी जगणे काही प्रमाणात राहूनच जाते. नवी स्वप्ने, नवे जगण्याचे मानदंड.

आता बरीच वर्षे उलटली होती. या कोणत्या गोष्टींचा मागमूसही राहिला नव्हता.परत कोण कोणाला आयुष्यात परत भेटेल अश्या अपेक्षाही मनात नव्हत्या.

काही क्षण गतकाळातील रम्य आठवणींमधून सैर करत, तिचे मन एकदम भानावर आले.

"मराठे बाई"
दोनच शब्द तिच्या मुखातून उत्कटपणे बाहेर पडले. त्या बाईंचे क्षणात लक्ष वेधले गेले अन त्याच वेळेस त्यांच्या डोक्यातील एक डिपार्टमेंट आठवणीच्या फायली शोधण्यात गुंतले.

"कोण गं तू ?" डोळ्यावरील जड काचेचा चष्मा सरसावत त्यांनी विचारले.
"मी … मी … " आता विजूचे शब्दही तिच्या मनातल्या भावनांसारखे जड झाले होते.
"मी रत्नमाला पुराणिक … तुमची विद्यार्थी होते. तुम्ही SNDT च्या शाळेत शिकवायचात न तेव्हापासून."
"अग हो गं हो। तुला कशी विसरेन मी. बऱ्याच वर्षांनी भेटीचा योग आला म्हणून थोडीशी विचारमग्न झाले."
"बाई, तुम्हीच मला घडवले, तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीमुळेच मी माझे पुढचे शिक्षण पूर्ण करू शकले."
"असे काही नसते गं, आपण फक्त निमित्त असतो."
"बाकी बोल, कसे चालले आहे तुझे?"
"सगळे काही व्यवस्थित."
प्रत्येक शब्दागणिक त्या दोघी एकरूप व्हायला लागल्या. मग काही अपेक्षित प्रश्न आणि त्यांची अपेक्षित अशी उत्तरे. 

"आयुष्यातला खूप मोठा काळ खर्ची घालावा लागला, तुमची भेट होण्यासाठी."
"हे चालतच असते गं, ताज्या राहतात त्या आठवणी."
हे ऐकताच विजूच्या मनाचा बांध फुटला.
"बाई, तुम्हाला आठवते का तुम्ही मला शाळेच्या शेवटच्या दिवशी एक शुभेच्छा पत्रक दिले होते. त्याच दिवशी माझा वाढदिवस हि होता."
"हो, त्यात मी काही ओळीही लिहिल्या होत्या तुझ्यासाठी, त्या ओळी मात्र आता काही आठवत नाहीत गं."
"त्या ओळी आजही मला पाठ आहेत. "

या आनंददायी आठवणी जर वस्तुमानाचा आकार घेऊ शकल्या असत्या तर किती बरे झाले असते, असे विजूला वाटले. तसे असते तर तिने त्या असंख्य वेळा कवेत घेतल्या असत्या. त्यांना जर वास असता तर तो तिने मनसोक्त हुंगला असता.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात" 
विजूला कसलेही भान उरले नव्हते.खरेतर, तिला त्या ओळी आठवायची हि गरज नव्हती.पण तरीही त्या ओळी उच्चारणे तिच्यासाठी कष्टप्रद होऊ लागले होते. शब्द तोंडापर्यंत येऊन ठेपले होते पण बाहेर पडत नव्हते.

या एका ओळीतच मराठे बाईंना पुढील ओळी आठवल्या असाव्यात. अनपेक्षित पणे काही तरी घडावे आणि आपल्याला अतीव आनंद देऊन जावे अशी त्यांची स्थिती झाली असावी. तोच भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरूनही  सरसर सरला असावा. त्यांचा हात त्यांच्याही नकळत डोळ्यावरील जाड काचेच्या चष्म्यावर गेला. त्यांच्याही डोळ्यात आता पाणी तरारले होते.

त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
 आता दोघींच्या डोळ्यामधील निर्धाराचा पारा फुटला. त्यांची मूक स्पंदने दोघींमधील शांतता ताडीत  होती. 

त्या दिव्याचा प्रकाश  …… 
आता विजूला पुढे बोलावले नाही. तशी तिला पुढे काही बोलायची गरजच नव्हती. दोघींच्या मनात उमटलेल्या एकाच आकृतीला त्यांना प्रत्यक्षात आणायची गरजच नव्हती. 

आज मात्र विजूला बस वेळेवर न आल्याचाही आनंद झाला असेल हे नक्की.

खरंच, निमित्त होते ते फक्त एका भेटीचे…
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : या लेखातील "विजू" हे पात्र म्हणजे खुद्द आमच्या मातोश्रीच .
सागर 
sagarshivade07@gmail.com
9975713494

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

छानच लिहिले आहे.
दुस-या व्यक्तीच्या अंतरंगात शिरून त्याप्रमाणे लिहिणेही सोपे काम नव्हे.तुम्ही त्या भावना छान व्यक्त केल्या आहेत.

Sagar Shivade म्हणाले...

धन्यवाद, आई कडूनच ऐकला असल्याने लिहिताना जास्त रिलेट झाला.
आई ला वाचयला दिल्यावर, "हे तू लिहिला नाहीयेस चोरला असशील" असे उगाच म्हणताना डोळे पुसत होती.