मंगळवार, २५ जून, २०१३

बागलाणचे शिलेदार:- साल्हेर,सालोटा,मुल्हेर,मोरागड,हरगड,मांगी तुंगी

बागलाणचे शिलेदार 
ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. नाशिक मधला ऐतिहासिक बागलाण प्रदेश,पाठीवर १५ किलो वजन घेऊन जवळ जवळ ३८ तासांची चढाई,४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, सूर्यास्ताला पश्चिमेकडे आलेली केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य,  गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर चंद्राचे प्रतिबिंब आणी उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले, डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा,  उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत  येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा. स्वप्नवत अश्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो.
ओह, ह्या सुखाची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगर रांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच... साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड,हरगड,मांगी तुंगी, तांबोळया, न्हावी रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्स ची इथे पार चैन असते. एकापेक्षा एक अवघड आणि सरस असे किल्ले चढताना दमछाक तर होतेच पण त्यांचा इतिहास ऐकल्यावर मन वेडे होऊन जाते. 

साल्हेर-सालोटा :
आमच्या स्वप्नातीत ट्रेकची सुरवात झाली ती साल्हेर सालोटा ट्रेक ने. एका शनिवारी पूर्ण दिवस प्रवास करून (पुणे- सटाणा- वाघाम्बे) साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाशी पोहोचलो. साल्हेर हा  महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची ५१४१ फूट ( १५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून ४९८६ फूट आहे.
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
वाघाम्बे गावातून जाणारा रस्ता हा थोडा अवघड असला तरी कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या वाटेने गेल्यास सालोटा किल्ला पण करता येतो.
 उजवीकडे साल्हेर आणि डावीकडे सालोटा 
सर्व वाट रुळलेल्या असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता कमी आहे. तरीही सामान जास्त असेल तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना सामान घेऊन न जाता साल्हेर सालोटा मधल्या खिंडीमध्ये ठेवून जायचे असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो.

सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदून केलेल्या वाटा जास्त उंचीचा असल्याने सुमारे एक तासात आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा पूर्वी साठवण करण्यासाठी उपयोग होत असावा. या किल्ल्यावर पाणी नाही. येथून साल्हेर किल्ल्याचे पिर्यामिड सारखे रूप डोळ्यात भरते. 


साल्हेर हा किल्ला कळसूबाई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून त्यास अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक  पार्श्वभूमी आहे. सालोटा उतरून खिंडीत आल्यावर, येथून आपण चार ते पाच तासात साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी जाऊ शकतो. साल्हेर वर जाण्याच्या मार्गात अनेक गुहा आणि पाण्याची टाकी दिसतात. किल्ल्यावर दोन गुहा असून राहण्यासाठी योग्य आहेत. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी असून गुहेच्या समोरच गंगासागर तलाव आहे. या तलावात कायम पाणी असते. ते पिण्यायोग्य नसले तरी उकळून पिणे चांगले.
या किल्ल्यावरचे सर्वात बघण्यासारखे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच असे परशुराम मंदिर. गुहेपासून ४५ मिनिटे चालून गेल्यावर सर्वात उंच अश्या ह्या किल्ल्यावर छोटी टेकडी दिसते. त्यावर हे मंदिर बांधलेले असून तेथून आजूबाजूच्या परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य आपले डोळे दिपवून टाकते. थंड गार वारा, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, तेथून दिसणारा सालोटा, सूर्यास्ताला पश्चिमेकडे येणारी केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य. केवळ अप्रतिम असे अनुभव.
या किल्ल्याच्या दोन्ही वाटांनी जाताना प्रत्येकी ६ दरवाजे लागतात. वाटेत प्रवेशद्वाराजवळ कोरलेले शिलालेख, दगडात कोरलेले गणपती, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बुलंदी असे बुरूज अन तटबंदी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात.
वाघाम्बे गावातून चढाई करून दुसऱ्या दिवशी साल्हेर वाडी गावातून उतरावे. वाघाम्बे गावातून पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. येथे पाहण्यासारखी अनेक स्पॉट असल्याने येथे जास्त वेळ हाताशी ठेवावा.

मुल्हेर आणि मोरागड
येथूनच पुढे मुल्हेर गावी जाऊन पुढच्या दिवशी मुल्हेर आणी मोरागड दोन्ही करता येतात.मुल्हेर गावातील शाळा, देवालय आणि उद्धव महाराज समाधी पाहण्यासारखी आहे.

मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये असून किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९०  फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. 
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५  किमी अंतर आहे. 
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी सधन आहेत.
 मुल्हेर किल्ल्याला लागूनच हरगड असून दोन दिवसात हे तिन्ही किल्ले करणे शक्य आहे.

मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घरापासून सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.  पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेले आहेत. ते पाहून वाट बरोबर असल्याची खात्री होते.
तेथून थोडे पुढे गेल्यास गणेश मंदिर आणि सोमेश्वर मंदिर लागते.गणेश मंदिरासमोर असलेल्या तलावात पडलेले मंदिराचे प्रतिबिंब पाहून डोळे सुखावून जातात. चौदाशे साली किल्ल्यामध्ये गाव वसलेले होते, त्याच्या खुणाही येथे सापडतात.
 सोमेश्वर मंदिर:
'सोमेश्वर मंदिर' हे १४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो. गाभारा पाताळात असून तेथे जाण्यासाठी भुयारी पायऱ्या आहेत. मंदिरात असलेले पुरुषभर उंचीचा नंदी आणि दगडात कोरलेले कासव आपले लक्ष वेधून घेते.
येथून  गडावर जाण्यास सुमारे तीन तास लागतात. येथून अनेक 'गुरांच्या वाटा' फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. वाटेत मोती टाके असून त्याच्या उजवीकडून रस्ता वर जातो. वाटेत अजून एक कातळात कोरलेला मारुती दिसतो.
किल्ल्याला अतिशय भक्कम अशी सात प्रवेशद्वारे असून एका-आड  एक अशी त्यांची रचना आहे. वाटेत दोन  गुहा असून किल्ल्यावर पोहोचल्यावर नऊ पाण्याची टाकी आहेत. मुल्हेर वरून मोरगडा वर जाताना वाटेत राजवाड्याचे भग्न अवशेष आणि भडंगनाथाचे मंदिर लागते.
किल्ल्यावरून विस्तीर्ण अशी पर्वतरांग दृष्टीस पडते. दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नाहीत.
मुल्हेरवरून मोरा कडे जाणाऱ्या प्रवेशद्वारात दरड कोसळली असल्याने जायचा मार्ग छोटा बनला आहे.  मुल्हेर आणि मोरागडाच्या खिंडीत अभेद्य अशी तटबंदी असून तेथून  दगडात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला मोरागडावर घेऊन जातात.

मोरागडाचा हा पहिला व अभेद्य दरवाजा आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो.
पुढे मोरागडावर काही विशेष पाहण्यासारखे नाही. येथून मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, ताम्बोळ्या असे अनेक दुर्गांचे दर्शन होते.

मांगी-तुंगी :
मांगी-तुंगी हे जुळे किल्ले ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हे किल्ले  गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान ही आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याचे जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. येथून पुढे गुजरात राज्य चालू होते

हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्टच्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे.
मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.
मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? )  
मांगी गडावरून तुंगी शिखराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते.

दोन्ही गडांवर असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यातला काही कोटिग करून जपलेल्या आहेत. 
येथून आजूबाजूच्या परिसराचे सुरेख दर्शन होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या ठाकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे असे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत. 
येथून उतरून तुंगी शिखरावर जाता येते. जवळपास तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून आपण येथे पोहोचतो.
पायथ्याशी प्रसादाची आणि पाण्याची सोय असून मंदिरात ट्रस्ट तर्फे जेवणाचीही सोय होते. 

हे सहाही किल्ले व्यवस्थित प्लानिग केले तर चार दिवसात होऊ शकतात. सटाण्यापासून पुणे- मुंबई ला जाणाऱ्या अनेक गाड्या मिळू शकतात. या पूर्ण ट्रेक ला तिकीट भाडे धरूनही रु. १५०० पेक्षा जास्त खर्च येत नाही. 
निसर्गाचे खरे रौद्र रूप अनुभवायचे असेल तर हा खरेच तुफान ट्रेक होऊ शकतो. महाराष्ट्रात असे काही अविस्मरणीय गडकिल्ले आहेत, याबाबत आपण खरेच सुदैवी आहोत. 
------------------------------------------------xxxxxx ------------------------------------------------

हा लेख महाराष्ट्र टाइम्स मधेही प्रकाशित झाला होता. या किल्ल्यांबद्दल अजून यथासांग माहिती आपण खालील दुव्यांवरून मिळवू शकता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी


सागर शिवदे 
sagarshivade07@gmail.com
9975713494

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: