गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अदभुत अविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय


अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.

"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.

आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?

मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला. बराच दुर्लक्षित असा हा किल्ला असल्याने तेथे जास्त वर्दळ नसते. पायथ्याचे गाव सोडले की क्वचित एखादा गुराखी दिसेल असा निर्मनुष्य. धोडप किल्ल्यावर जायच्या दोन वाटा आहेत. एक "हट्टी" नावाच्या गावातून जे किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे. आणि एक वाट आहे 'ओतूर' नावाच्या गावातून. जे बरेच लांब असून या वाटेने येताना दोन डोंगर ओलांडून यावे लागते. 

धोडप किल्ल्याच्या शेजारीच "विखारा" नावाचा एक किल्ला/डोंगर आहे. गूगल नकाशे वर तो मी लोकेट केला आहे. याचा उल्लेख आजपर्यंत मी कुठेच ऐकला/वाचला नाहीये. पण श्रावणात एक दिवशी ( कोणता तो लक्षात नाही) कुटुंबासहित या किल्ल्यावरच्या मंदिरात जाण्याची  प्रथा ओतूर मध्ये होती.

 या नकाश्यात आपल्याला अंदाज येऊ शकेल. हट्टी गावाच्या वर एक काळा गोल आहे तो लक्षात ठेवा हा. सांगतो तो कसला आहे ते.

हे 'ओतूर' गाव नाशिक मधील कळवण तालुक्यातील आहे. आणि 'अलंग' जे दाखवले आहे तो किल्ला नसून धोडप किल्ल्याच्या माचीवर वसलेले १०-१५ घरांचे छोटे गाव आहे.


असो, मुद्द्यावर येतो. तर धोडप किल्ल्यावर आम्ही निघालो. मी, माझा एक मित्र आणि त्याच्या भाऊ.  त्याच्या भाऊ हा ओतूर गावातच राहत असल्याने त्याला किल्ल्यावर जायची वाट माहीत होती. पण तोही लहान असताना किल्ल्यावर  गेला होता. ( मी पुण्यात राहून शनिवार वाडा किती वेळा गेलो बरे? ).

निघता निघता, मित्राच्या मामाने  सांगितले की "किल्ल्याच्या पायथ्याशी एक 'गाय' आहे ती आवर्जून बघून या. सापडणार नाही तुम्हाला ती कारण ती आता कपारीत घुसली आहे.  पण दिसली तर बघा."

मी म्हटले "गाय काय बघायची? आणि कपारीत घुसली म्हणजे काय?"

मग कळले की, "चुनकळीच्या दगडाची चालणारी गाय"! काय ??????????

त्यानंतर कळलेल्या वर्णनानंतर, "बस्स! ती गाय शोधून काढायचीच" असे ठरले. जाताना ओळखीच्या माणसांना विचारून पाहिले त्यांनीही त्या बद्दल ऐकले होते ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

ऐकलेल्या वर्णनावरून, ती दगडी गाय हट्टी गावाच्या दिशेला असावी असा अंदाज बांधला. आणि परस्पर विरोधी वाट जोडत आम्ही निघालो. पावसाळ्यात असे काही सापडणे शक्यच नव्हते. आम्ही पावसाळ्या पूर्वी गेलो होते हे बरे होते. जवळ जवळ अर्ध्या किल्ल्याला वळसा घालून आम्ही ओतूर गावाकडून येणाऱ्या वाटेने विखारा किल्ल्याच्या खिंडीतून धोडप किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलो. किल्ल्यावर जाणारी वाटही जोडीला होतीच.


पहिल्यांदा लगीन गायीचे मग किल्ल्याचे असा निर्णय करून किल्ला सोडून २-३ तास कडे कपारी धुंडाळत राहिलो.
२-३ तास हिंडून गाय तर काही सापडली नाही पण वेळही चालला होता. मग त्या गायीचे परत कधीतरी 'दर्शन' घेऊ म्हणून किल्ल्याची वाट धरली.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर १-२ घरे दिसत होती. त्यांच्या घराबाहेर प्रचंड मोठ्या आकाराच्या 'कढया' ( कढई) ठेवल्या होत्या. पण आजूबाजूला माणसाचा लवलेशही नव्हता. हट्टी गावातून येणारी वाट एका ठिकाणी ओतूर गावातून येणाऱ्या वाटेला मिळते. तिथपासून हि आम्हाला कोणी गुराखी दिसला नव्हता वा किल्ल्यावर पोहोचल्यावरही खाली कुणी दिसत नव्हते.

मनसोक्त किल्ला हिंडून आलो आणि परतीची वाट धरली. किल्ला उतरून दुसऱ्या प्रवेशद्वार सोडून पुढे आलो. वर जाताना दिसलेली १-२ घरे सोडली आणि पहिल्या प्रवेशद्वारास जाण्यासाठी निघालो. यावेळी 'विखारा' बद्दल माहिती कळली होती. पुढच्या वेळी जाऊ असे ठरले. उगाच जरा हौस म्हणून 'विखाराचे' फोटो काढायला थोडेसे वाट सोडून दरीच्या दिशेने ( हट्टी गावाच्या उताराकडे ) गेलो. थोडा वेळ फोटो काढले आणि निवांत टेकलो.


तेवढ्यात एक माणूस समोर आला. पूर्ण परिसरात एकाही माणूस दिसला नसताना हा कसा काय आला? म्हणून आम्ही त्याला विचारले.

"सकाळीच आलोय. गुरे घेऊन आलोय चरायला. वाट चुकली काय तुमची?"

"नाही, असाच फिरतोय. "

 तो गुराखी होता. एवढ्या वेळ एकाही माणूस नसताना हा मध्येच कसा उगवला? त्याची गुरेही दिसत नव्हती. पांढरा सदरा आणि पायजमा, डोक्यावर दक्षिणोत्तर पांढरी टोपी.  त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या चावल्याच्या खुणा होत्या. त्याचे नाव होते सूरदास.

"ती कुठली कपारीतील गाय कुठे आहे माहीत आहे का हो तुम्हाला"

"हो माहिती आहे"

"काय ????? माहिती आहे?????"

"इथेच आहे का ती? किती वेळ लागेल जायला? आम्हाला जाता येईल का त्या कपारीत? तुम्हाला कशी माहिती ती" असे अनेक प्रश्न आम्ही त्याला विचारले. तो काहीच बोलला नाही.

फक्त म्हणाला "चला, दाखवतो ती गाय"

तडक निघालो. तो घेऊन जाईल तिकडे चालत सुटलो. काही वाटा लागल्या तर थोड्या वेळाने प्रचंड झाडी झुडपे लागली. कुठे चाललो आहे याचे तर भान नव्हतेच पण याच रस्त्याने परत येऊ शकू का याची पण शाश्वती नव्हती.

जाता जाता त्याच्याकडूनच काही माहिती मिळवली. त्याच्याकडून ऐकलेली आणि आतापर्यंत ऐकलेली सगळी एकत्रित माहिती अशी:
"फार पूर्वी, म्हणजे मित्राच्या मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आजोबांनी हि गाय पहिली होती. पूर्णतः दगडाची वा चुनकळीची फरशी असते त्याची. मित्राच्या मामाला ( ज्याचे वय आता ६०-६५ असेल) त्याच्या लहानपणी त्यांच्या आजोबांनी हे सांगितले होते. त्यांचे आजोबांनी जेव्हा त्याच्या डोळ्यांनी ती गाय (म्हणजे गाई चा पुतळा म्हणता येईल.) पाहिली  तेव्हा ती 'हट्टी' गावाच्या आणि धोडप किल्ल्याच्या मधील मोठ्या मोकळ्या जागेवर होती. पहिल्या फोटोत काळा गोल काढला आहे तिथे जवळपास.


हा गायीचा पुतळा इथे होता तर त्याच्या परस्पर विरोधी दिशेला म्हणजे धोडप किल्ल्याच्या उत्तरेकडे खूप लांब अश्या एका गावात असाच चुनकळीच्या दगडाचे वासरू होते. निसर्गाने म्हणजे साक्षात धोडप किल्ल्याने त्या माय-लेकराची ताटातूट केली होती.


हा वासराचा पुतळा जेथे होता तेथे त्या गावातील लोकांनी विटांचा का कसलातरी कारखाना काढला होता. त्या पुतळ्याची अडचण म्हणून एक दिवशी एकाने रात्री तो पुतळा तोडून तो घरी गेला. आणि आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी तो पुतळा तसा च्या तसा होता. त्यानंतर सर्व लोकांच्या साक्षीने तोडलेला तो पुतळा दुसऱ्या दिवशीही तसाच अभेद्य होता.


किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस असलेली गाय आणि वासरू हे एकमेकांच्या ओढीने एकमेकांकडे आकर्षिले जात होते. एकमेकांकडे 'चालत' मार्गक्रमण करत होते. 


हि 'गाय' म्हणजे 'गायीचा पुतळा' दर 'वसुबारस' आणि 'कोजागरीला' काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकते.
त्यानंतर, हि माहिती देणाऱ्या मामांनी त्यांच्या लहानपणी स्वतः हि गाय जेव्हा पाहिली, तेव्हा ती मोकळ्या जागेतून धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी पहिली होती. त्यानंतर खुद्द मित्राच्या आईनेही ती गाय पहिली तेव्हा ती गाय एका कड्याला समांतर अशी होती. म्हणजे ती आता या कड्यांत कपार करून घुसेल की काय अशी. आणि त्यांनी तेव्हा ऐकल्याप्रमाणे विरुद्ध गावातील वासरू हे मार्गक्रमण करीत डोंगरात कपार पाडून त्या कपारीत घुसलेही होते. आता ते वासरू कुठे आहे कोणालाच माहीत नाही. ( पण, आज मला माहिती आहे की ती गाय कुठे आहे.)


या सर्व कथा आणि संदर्भाप्रमाणे आता ती 'गायही' डोंगराला कपार पाडून कपारीत आत घुसली असली पाहिजे. असा तर्क आम्ही केला आणि एका ठिकाणी पोहोचलो.

हे सगळे प्रथमदर्शनी खरे वाटले नाही. म्हणजे 'असे कसे असू शकते?' इथपासून ते 'अंधश्रद्धा असावी' इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर मात्र जे डोळ्यांनी पाहिले आणि हातांनी अनुभवले त्याने माझी मती गुंग झाली. 

माझ्या डोळ्यासमोरच डोंगराचे पोट उभे फाडल्यासारखी कपार होती. जेवढा किल्ला आम्ही फिरलो होतो तेथे कुठेही अशी उभी कपार पहिली नव्हती मी. खतरनाक दिसत होती ती. मानव निर्मित असण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे दिसण्यावरून वाटत नव्हती.

आत जाऊन काही प्रॉब्लेम नको म्हणून दोघांनी एकत्र जायचे ठरले. पण ती कपार इतकी बारीक होती की आत काय चावले-बिवले  तर दोघांना निघतानाही येणार नाही म्हणून मग भूषण पहिल्यांदी आत गेला.


हीच ती खोल दिसणारी कपार. मध्यभागी आत एक गाई सदृश आकृती ( मागून गाय जशी दिसते तशी) दिसते आहे. मागचे दोन पाय स्पष्ट दिसत असून शेपटी हि दिसत आहे. गाय मागून बघितल्यास दुधाचे पान्हे जसे दिसतात तसेच दिसत आहे.
 

आता हे अजून जवळून बघायला आम्ही कपारी मध्ये शिरलो. कोंदट असा वास येत होता. आम्ही आत शिरताच आतली काही वटवाघुळे आमच्या डोक्याला धडकून उडून गेली. आता मी तर फुल टू टरकलो पण भूषण अजून आत गेला.

हा जवळून फोटो. अगदी गायच वाटत आहे नाही? वाटत आहे म्हणजे काय आहेच ती गाय !

विशेष म्हणजे त्या कपारीची साइज पण फक्त गाई एवढीच होती. जर ती नैसर्गिक असावी तर पर्फेक्ट त्याच मापाची कशी?


या गायीच्या पाठीवरून पुढे हात घालून पहिले तर थोडा डोक्यासारखा उंचवटा भासला. फ्ल्याश मारून डोके सदृश भागाचा काढलेला फोटो.


आत कपारीतून बाहेरचा काढलेला फोटो. खूप भीती वाटत होती आत. वटवाघुळे आमच्यावर पेटून गेलीच होती पण मोठाले कोळी पण अंगावर यायला लागले होते. आणि काहीतरी चावले तर इथून बाहेरही पडता येणार नाही अशी स्थिती.


हा मी. आत गेलो कसाबसा पण मावलो नाही त्या कपारीत.
हाच तो अद्भुत 'सूरदास' आणि मागे विखारा किल्ला.



थोडेसे तिथेही फोटो सेशन झाल्यावर आम्ही परत निघालो. त्याने आम्हाला कुठल्या वाटेने इथपर्यंत आणले आणि कुठल्या वाटेने परत नेले हे आजही आठवत नाही. आता मी परत तिथे गेलो तरीही मी ती कपार शोधू शकणार नाही. घरी येऊन मामांना या गायीचे फोटो दाखवले. काय बोलावे त्यांनाही सुचेना. "लहानपणी पहिली होती तेव्हा ती गाय किल्ल्यावर चढत होती. कमाल केलीत तुम्ही पोरांनो!"
जे काही पहिले ऐकले ते केवळ अद्भुत. सांगीव कथांवर विश्वास बसत नाही पण जे पाहिले 'ते तरी कसे काय झाले असेल?' याचाही उलगडा होत नाही. 

याला खोटे म्हणावे तर ते तरी कसे? मामांनी त्यांच्या आजोबांनी आणि मित्राच्या आईनेही ती पहिली होती. गावातील जुन्या लोकांनी पहिली होती. आज आम्हीही स्वतः पाहिली आणि पाहून विश्वास बसला.
 
कळत नाही की सध्या गावात राहणाऱ्या  कोणाला न सापडणारी हि गाय 'सूरदास' ला कशी माहिती होती? त्याला आम्ही जाताना चहा पाण्यासाठी काही पैसे दिले. त्याने तेही घेतले नाहीत. नेमकी तो तेव्हाच तिथे कसा आला? पहिल्यांदा शोध शोध शोधून न सापडलेले हे गूढ रहस्य नंतर आम्हाला अर्ध्या तासात सापडले. याआधी किती जणांना ते सापडले असेल? काहीच उमगेनासे झालेय. 

निळे आकाश, हिरवा निसर्ग,आत आत जाणारी ती कोंदट कपार, मी, माझे प्रश्न ,

त्या दुर्गांवरती मी का माझ्या मनाच्या खोलात हा शंकांचा दुर्ग?

पैसे देऊन मी सूरदासाला मदत केली? का त्याला गरजच नव्हती अश्या मदतीची?

जर तो गुराखी होता, तर त्याची एकही गाय व शेळी कशी दिसली नाही?

आणि जर तो गावातूनच वर आला होता तर त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या कश्या काय चावल्या होत्या?

वाट सोडून गेल्यावर तो दिसला. मग जेव्हा वाटेने जात होतो तेव्हा तो कुठे असावा?

मी परत जाईन तेव्हा कुठे आणि कपारीत किती खोल  गेली असेल ती गाय? मुळात मला सापडेल का ती गाय?

किती खोल पोहोचले आहे तिचे वासरू? कधी भेट होईल त्यांची? होईल का ?

कित्येक वर्षे चालू असेल हे सगळे? 

काय होईल जेव्हा त्यांची भेट होईल? डोंगराच्या पोटात लुप्त होऊन जातील दोघे का डोंगर फोडून बाहेर येतील?

विखार्यावर एक मंदिर आहे, कसले आहे ते? या वासराचेच तर नसावे.?

त्या वासराच्या ओढीने पुढे जाणाऱ्या गाई साठी कोण खणत असेल कपार?

त्या कपारीत अजून आत गेलो तर काय असेल आत?

हे  प्रश्न काही केल्या सुटतच नाही. मी मात्र अजून आत आत जात राहतो त्या गूढ कपारीसारखा. 


असो,
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे, हेही असू शकते आयुष्याचे सार्थक!
सागर


तळटीप : 
लेखातील अनुभव हा खरा आणि याची देही, याची डोळा अनुभव असला तरी लेख गूढकथा अथवा फँटसी प्रकारातील लिहिलेला आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील लेख :
अद्भुत आविष्कार (२): इंद्रवज्र
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्याची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज.  

1 टिप्पणी:

Utkarsh Erandkar म्हणाले...

खूप सुंदर आणि गुढ अनुभव. हा लेख 'सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा' या ई-मासिकामध्ये प्रकाशित करण्याचा मानस आहे. तुम्ही ही पोस्ट वाचल्यास कृपया संपर्क करावा. ९९३०६०९९९०. अथवा ई-मेल utkarsh.erandkar@gmail.com

धन्यवाद.