शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

मिस्टी पिकॉक बे

मिस्टी पिकॉक बे
नवीन वर्षाचा विकांत कोठे जायचे याचा विचार चालला होता. सुट्टी टाकून मोठ्या ट्रेकला जायचे का घरीच पडून राहून घरच्यांना सरप्राइज द्यायचे ह्या विचारातच "नवीन वर्षाचे तरी घरात थांबा जमले तर! " अश्या वाक्याने आता घरच्यांना वेळ द्यायला पाहिजे हे जाणवले. बऱ्याच दिवसांनी घरात आमचे पाऊल थांबल्याचे बघून मातोश्रींना ही जरा बरे वाटले होते. पण त्यांचा तो आनंद जास्त टिकू न देता त्यांच्यासकट कुठेतरी जायचा प्लान केला.
कुटुंबा बरोबर फिरायचीही मजाच वेगळी हेच खरे. रविवारी सकाळी ६ वाजता सगळ्यांना गाडीत भरून निघालो पिकॉक बे ला. २-३ तासात परत यायचे असल्याने खाण्या पिण्याचे काही घेतले नव्हते. त्यामुळे ते लटांबर कमी झाले. १० पर्यंत घरी येऊ असा अंदाजाने रविवार हि वाया जाणार नव्हता.
मोर आणि हरीण पाहायला जायचंय म्हणून बच्चे मंडळी फुल खूश होती. सकाळी सहालाच  उठून सगळे तयार.

कोथरूड पासून वारजे कडे जाणाऱ्या रोड ने कोंढवे धावडे कडे जावे. NDA ची हद्द चालू होते तसा मस्त निसर्ग दिसू लागतो. कोंढवे धावडे गावापासून कुडजे पर्यंत जो रोड आहे तिथे सकाळी मोर आणि हरणे दिसतात. तोच रोड पुढे एक फाटा फुटून डोणजे-सिंहगड तर सरळ गेल्यास खडकवासला (उजवी बाजू), निलकंठेश्वर, पानशेत ते थेट वेल्हे येथे जाते. निलकंठेश्वर येथून २५ किमी आहे. पावसाळ्यात पानशेत परिसर पण फार भारी असतो.
 

थंडीचे दिवस असल्याने भन्नाट धुके होते. रोड हि चांगले होते. फार मजा आली गाडी हाकायला.
सगळीकडे मिस्टी असे वातावरण होते, कमाल!


गाडी एकदम संथ चालली होती. जंगल सफरीला निघाल्याचाच भास होत होता. सगळेजण गाडीतून कुठे काय दिसतंय ते बघत होतो, तेवढ्यात भाच्ची ला झाडावरचे हे महाशय दिसले.

या स्पॉटला हरणे दिसतात. मस्तपैकी सकाळी सकाळी अंघोळीला येत असावीत. पण हरणे अंघोळ करतात का? आणि त्यात आज रविवार. अंघोळीला सुट्टी असेल तर?
तसेच झाले. एकही हरीण दिसले नाही. येथेच एक दोन वेळा हरणे पाहिली होती.  

रविवार सकाळी ७ वाजता साखरझोपेत असणारे आमच्यासारखे लोक्स आज चक्क अश्या नयन रम्य ठिकाणी होते. नवीन वर्षाचा इम्पॅक्ट असावा बहुतेक. :)



हरीण तर नाही पण आता मोर तरी दिसतोय का नाही या विचारातच गाडी चालवताना थोडेसे अंतर गेल्यावर लगेच थोडेसे कोवळे ऊन पडलेले दिसले आणि मोरांचे अख्खे कुटुंब किडे खात ब्रेकफास्ट करताना दिसले. गाडीतून न उतरताच हे फोटू काढले. उतरले की आपली चाहूल लागून ते दूर पळून जात होते.

सगळ्यात पहिले लक्ष वेधले ते या मोराने. वाह कमाल! निसर्ग कोणाला किती सुंदर बनवू शकतो काही लिमिटच नाहीये. पाहताक्षणी प्रेमात पडावे असा, ३-४ फूट उंचीचा हा मोर डौलात हिंडत होता. डोक्यावरचा तुरा पण अहाहा.
तो मोर पाहताक्षणीच मनात संदीप च्या दोन ओळी आल्या. 
ना अंदाज कसले, ना अवधान काही, 
कुठे जायचे यायचे भान नाही. 
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा,
न कुठले नकाशे, ना अनुमान काही !





यातला डावीकडून २ नंबर चा मोराची मान बघा कसला भारी कलर आहे.

प्राणी-पक्षी स्वातंत्र्यात, मुक्त असताना अजून नजाकतदार दिसतात. मागे कर्नाळ्यात मोर पहिला होता पिंजऱ्यात. लांडोरीने कानफटात मारल्यासारखा दिसत होता.

मोर आणि लांडोर.

सगळेजण खाण्यात मग्न होते. त्यांना कोण आपले फोटो काढतंय वैगरे काही पडलेली नव्हती. सकाळची वेळ असल्याने रहदारीही जास्त नव्हती. त्यामुळे त्यांना त्रास द्यायला कोणीही नव्हते आजूबाजूला.

२०-२५ मिनिटे तेथेच थांबून होतो. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. येथून गाडी वळवली आणि घरी.
अजूनही धुके सरलेच नव्हते.

अवतार मधल्या पॅन्डोरा वर आल्यासारखे वाटत होते.

हा आम्हाला घेऊन गेलेला इंडो-जॅपनीज प्राणी. याची खाण्यापिण्याची व्यवस्था तेवढाच काय तो खर्च. बाकी अगदीच नो खर्च. पुण्यातच बरीच बघण्यासारखी ठिकाणे आहेत. फक्त गर्दी चुकवायचे गणित जमले पाहिजे.


दहापर्यंत परत घरी आल्यावर कुटुंबासोबत नाश्ता, गप्पा टप्पा, फोटो. खऱ्या अर्थाने रविवार सत्कारणी लागला म्हणता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: