शनिवार, २८ मार्च, २०१५

पहिले प्रेम !

आमचे पहिले 'पक्षी' प्रेम !

लेखाचे फक्त नाव वाचून तुम्ही जेवढ्या उत्सुकतेने हा लेख उघडला आहे ती उत्सुकता शिर्षक वाचून मावळली असेल अशी अपेक्षा करतो. :)  तरीही काही उत्सुकता उरली असेल तर ती आता अजून न ताणता तुमचा भ्रमनिरास झाला असेल आणी ज्या अपेक्षेने वाचक येथे आले आहेत ती येथे पूर्ण होत नसली तरी नवीन काही वाचायला मिळू शकेल याची खात्री देतो. शिर्षक अगदीच चुकीचे नसले तरी "आमचे पहिले पक्षी प्रेम" या नावाखाली लेख खपून जायला हरकत नाही.

असो.
मागच्याच आठवड्यात रत्नागिरीची कायम लक्षात राहील अशी सफर करून , (अजून)काळा पडून सुखरूप परत आलो. विशेष म्हणजे या पाचही दिवसात एकदाही समुद्रकिनारी गेलो नाही. कारण गेलो होतो ते फक्त कोअर कोकण अनुभवायला. आंबा, सुपारीच्या हक्काच्या बागेत पडून राहायला.  कौलारू घराच्या मोठ्या परसातील एका झोपळ्यावर निवांत बसून तासन तास पक्षी निरीक्षण करायला. अजून एक "अंतू बर्वा" तेथे अजून आहे त्याला अनुभवायला. कोकणी माणसे, कोकणस्थ टोमणे, वर्षभराचा ऑक्सिजन आणी अनेक आठवणी. कमाल अनुभव !

हे ही असो. तर मुद्दा असा की, पक्षी निरीक्षण आणी पक्ष्यांचे फोटो वैगरे गोष्टींशी माझा तसा काही संबंध नव्हता. जे लोक पक्षी निरीक्षण करून त्यांचे आवाज, त्यांच्या जाती, त्यांची मराठी, इंग्रजी आणी याही पुढे त्यांची शास्त्रीय नावे याची माहिती गोळा करायचे त्यांचे  मला कायम अप्रूप वाटत आले आहे. डोळ्याला दुर्बीण लावून तासन तास (खरे) पक्षी बघत बघायचा पेशन्स मला कधी नव्हता सो त्या वाटेला कधी गेलो नाही.

येथे यावेळी मात्र सगळे जुळून आले. जेथे गेलो होतो त्या घरात बाकीची हौशी मंडळी असल्याने आणी ती याबाबत बर्यापैकी जाणकार असल्याने भारीतल्या दुर्बिणी, कॅमेरे, जाणकार मंडळी, मुख्यत्वे वेळच वेळ इत्यादि हाताशी तर होतेच त्याशिवाय आवर्जून बघावे असे पक्षीही होते. हे खरे महत्वाचे.

पाच-पाच तास झोपाळ्यावर बसून, ठराविक वेळेने चहा नामक अमृत प्राशन करत, दुर्बिणीने पक्षी शोधत, सापडला की तो सगळ्यांनी बघून त्यावर चर्चा करत, एका जाणकाराने मोबाईल मध्ये टिपलेले त्यांचे आवाज ऐकत ५ दिवस काढण्याची मजाच काही और !!

पक्षी निरीक्षणाची सुरवात करताना या तमाम पक्षी दुनियेतला पहिला पक्षी मला खूप आवडला तो म्हणजे "ग्रेट पाईड हॉर्नबिल  किंवा "राज धनेश". प्रेमात पडावा असा पक्षी होता खरच.केरळचे राष्ट्रीय पक्षी असलेले हे महाशय इथे रात्नांगीत काय करत होते देव जाणे पण आजवर मी कधीही न पाहिलेलें हे पक्षी इथे बरेच पाहायला मिळाले. उंचच उंच आणी जास्त झाडी असलेल्या प्रदेशात हे पक्षी दिसत असले तरी त्यांच्या मोठ्या आकारावरून आणी याच्या असामान्य स्वरुपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दिड किमी. वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात.

काही मी काढलेले फोटो येथे डकवले आहेत. बघून जरा एक्स्ट्रा ऑर्डेनरी वाटतच आहे. मोठी पिवळी चोच आणी डोक्यावर घातलेले हेल्मेट सदृश्य  शिरेटोप . ( रत्नागिरीतपण हेल्मेट सक्ती लागू झाली काय? )


सुमारे १५० सेमी. लांबीचा हा राज धनेश दिसायला जेवढा सुंदर तेवढाच त्याचा आवाज डेंजर असतो. करवतीने लाकूड कापताना जसा आवाज येतो त्या सदृश्य ओरडून हे महाशय टोळीने असले कि जबरदस्त कल्ला करतात.

एखादी गोष्ट पाहता क्षणीच आवडावी असे होते न अगदी तसेच माझे याच्या बाबतीत झाले.आधी मी रिओ चित्रपटात हा पक्षी पहिला होता आज प्रत्यक्ष पहिला. माझ्यासाठी हा खूप मोठा अपग्रेड आहे.

 जोड्याने बागडणारे धनेश खूप लाजाळू तर असतातच पण थोडाश्या आवाजाने वा माणसाच्या चाहुलीने उडून जातात. आकाराने मोठे असल्याने ते फारच कमी उंचीवरून उडतात. निरव शांतता असेल तर त्यांच्या उडण्याचा आवाज दीड किमी ऐकू जातो असे ऐकले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रसंग २:
सकाळी सकाळी सुर्योदया पूर्वीची वेळ. थंड वारा आणी अनेक पक्ष्यांची किलबिल. मध्येच ऐकू येणारे वानरांचे चित्कार. वाऱ्याने झाडांची चाललेली ढकलाढकली.
परत निघायचे असल्याने आणि सकळी ७ ची गाडी असल्याने घरात सगळ्यांची लगबग. आवरणे , अंघोळ अश्या फालतू गोष्टीत इंटरेस्ट नसल्याने अस्मादिक एकटेच परसातल्या झोपल्यावर टेहळणी करत बसलेले.

चंद्राचे फोटो काढण्याचे काही निष्फळ प्रयत्न चालू असतानाच अ ते ज्ञ पर्यंत अक्षरांनी लिहिता न येण्यासारखे ओरडण्याचे पण उडण्याचे झूssssssssssssssssssssssssssssप ! झूssssssssssssssssssssssssssssप! असे चमत्कारिक आवाज मोठ्याने यायला लागले. आपल्याकडे हेलीकोप्टर जाताना आवाज येतो तेव्हा आपण लगेच वर बघतो तसे आपसूक नजर कॅमेरातून बाहेर आकाशाकडे गेली. फोटोवरून वातावरणाचा अंदाज येईल.

जसा आवाज वाढत गेला तसे नजर अजून शोधत राहिली. आणि एकदम दोन होर्नबील पक्षी जोड्याने या झाडाच्या आणि घराच्या थोडेसेच वरून उडत गेले. जो काही त्यांचा उडण्याचा आवाज होता न बास ! थेट प्रेमात ! 
-----------------------------------------------------------------------------------------------------------

पक्षांचा विषय चालू असताना डॉ. सलीम अलींना कोण विसरेल? त्यांच्याविषयी माहिती मिळवताना खालचे चित्र मिळाले. आणी त्यांच्याविषयी अजून रिस्पेक्ट वाढला. 

विकिपीडिया वर मस्त माहिती मिळू शकेल. ज्याने कोणी अपडेट केली असेल तोही याचा चाहता असावा.


अजून कोकणाचा वृतांत पुढच्या लेखातून येतच राहील.

वाचत राहा.

1 टिप्पणी:

Prasanna B म्हणाले...

Chhan .... photos surekh aahet