रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

"नवसंजीवनी"

"नवसंजीवनी"

नमस्कार लोक्स, आज या पोस्टने माझ्या समाधी अवस्थेत जाऊ घातलेल्या ब्लॉगला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळत आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला शेवटच्या लेखाला.मधील काळात बऱ्याच सुखद घडामोडी घडल्या त्यांना वेळ देत यावा म्हणून हा आमचा लक्ष्मण असाच संजीवनी आणायला गेलेल्या हनुमानाची वाट बघत होता. 

असो, वाचक लोक नवीन लेखांच्या प्रतीक्षेत व्याकूळ झाली आहेत, आणी लेख पडताच त्यावर कधी तुटून पडतोय अश्या आशेने माझ्याकडे नवीन लेखांची लाडीक मागणी करतायेत, लेख आणी अक्षर दोन्हीचे तोंड भरून कौतुक करतायेत असे दिवस आम्हाला कुठले दिसायला? आम्ही मात्र कधी दिवाळीच्या चकल्या संपवतो आणी इथे चकल्या पडायला येतो अशी मानसिक अवस्था घेऊन लाडू संपवतो आहोत. हे ही असो. 

पुरेसे बोर करून झाल्यावर मूळ मुद्द्यावर येतो.मध्यंतरी 'एबीपी माझा'ची 'ब्लॉग माझा' स्पर्धा आयोजित झाली होती. त्यात प्रवेशिका पाठवली होती. आणी अनपेक्षितपणे "शिसारा उवाच" ला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. शेकडो ब्लॉग्जपैकी फक्त 13 दर्जेदार ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान या परीक्षकांसमोर होतं म्हणे :) 
असो, उत्तेजनार्थ बक्षीस का असेना, माझ्याखेरीज अजून कोणीतरी मी खरडलेले काहीतरी वाचतोय हे ही नसे थोडके.

पुरस्कार सोहोळ्या ला पोटापाण्याच्या गोष्टींमुळे उपस्थित राहाता आले नाही याची आता खंत वाटते. नंतर तो कार्यक्रम प्रसारीत झाला आणी एका नातेवाईकाचा फोन आला तेव्हा कळले. गेलो असतो तर तेवढाच लग्नातला ब्लेझर खपवता आला असता. त्यांच्या साईटवर नाव आले आणी चार-पाच लोकानी केलेले 'कवती क' हाच काय तो आमचा आनंद.
त्यांनी आम्हाला पुरस्काराचे बक्षीस ही पाठवले होते म्हणून ते मिळाले की त्याचा फोटू टाकून वाचकांना "पुराव्यांनी शाबित" करून दाखवता येईल म्हणून थांबलो होतो पण त्या देवाचे अजून मंदिरात येणे झालेले नाही.

या वर्षीचे पुरस्कार विजेते आणी उत्तेजनार्थ ब्लॉग्स खालच्या दुव्यावरून बघता येतील. विजेत्यांचे अभिनंदन.
http://abpmajha.abplive.in/mumbai/blog-majha-winners-134721 


मधला शांत काळात आमचे ब्लॉग लिहिणारे हात दोनाचे चार झाले. आता अधिकधिक भटकंती होऊन चार हातानी नवीन उर्जेने लेख लिहीन असे म्हणतोय. तसे मी बरेच दिवस बरेच म्हणतोय पण तूर्तास थांबतो. 

मध्ये एका रविवारी मुंबईच्या 'मी मराठी' नावाच्या दैनिकात ह्या ब्लॉगची एक पोस्ट छापून आली होती. त्याचे चित्र खाली चिटकवत आहे. ( अंधुक दिसत असेल तर चित्रावर क्लिक करून मोठे करा. तरीही अंधुक दिसत असेल तर चष्मा लावा. त्यातूनही अंधुक दिसत असेल तर वरचे अगम्य वाचून तुम्ही भावूक झालेले दिसता, तोंड धुवून या ( स्वतःच).)


 असो तर मग हासत रहा, वाचत रहा , रियाज करत रहा("कट्यार"पासून हे एक नवीन.( घ्या चालवून :) )

निरोप.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: