रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

ढगातील डोंगरदेवपूर्व लेख: 
3. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
4. हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला


मारुतीचे जन्मस्थान: अंजनेरी पर्वत, ढगातील डोंगरदेव 


तब्बल ८ महिन्यांपेक्षा काळ लोटला आणी दोन संसारी जीव पाठीवर पिशव्या अडकवून आज परत सज्ज झाले अर्थात पूर्व परवानगीने. शुक्रवार कसाबसा संपवून रात्री साडे-दहाच्या त्रंबक यष्टीची वाट पाहणे आले. मुसंडी मारून मिळवलेली जागा आरक्षित असल्याच्या साक्षात्कार यष्टी निघाल्यावर झाल्याने शेवटचा बाक पकडला आणी खांदा पाठीच्या स्नायूंची ड्युरॅबिलिटी टेस्टिंग करून घेतली. आता यंत्रांच्या आवाजात सर्व आवाज विरून गेले आणी पहाटेच्या सुमारास गोदावरी उगमाशी पोहोचलो. 
पहाटे पहाटे एका टपरीवर चहाच्या नावाखाली एक अशक्य भिकार पेय ग्रहण करून शिवमंदिराकडे निघालो. गर्दी बघता देवाला लांबूनच नमस्कार कळवला. कुशावर्त तलावात पापे धुण्यासाठी लागलेली रीघ बघता आल्या पावली यष्टी पकडून अंजनेरी फाटा. दोन वर्षांनी बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. जिथे झोपायचे होते ते कार्तिक स्वामी मंदिर रस्ता मोठा झाल्याने कॉम्पॅक्ट झाले. येथेच पथारी टाकून सूर्यनारायणाची प्रतीक्षा करणे आले. 

उन्हे आली पण अंजनेरी सुळक्यावर ढगांनी ठाण मांडलेच होते. आता दिवसभर यांची साथ निश्चित होती. ढगात डोकी खुपसून बसलेले नवरा नवरी सुळके उजव्या हाताशी ठेवत सिद्ध हनुमान मंदिरात येताच भव्य रूपाने हात जोडले गेले. मागच्या वेळेचाच पुजारी आणी त्याची  जीर्णोद्धारासाठी देणगीची टेप दुर्लक्ष करून गावात शिरलो. 


आज गावातली मुले निवांत उनाडक्या करत होती. शनिवारची शाळा नाही का रे ? नाय आज शाळा. शिक्षक आज गेलेत मोर्च्याला. नाशिक मध्ये त्या दिवशी मराठा मोर्चा म्हणून शाळेतील सगळ्या शिक्षकांना शाळा सोडून यायला सांगितले होते. "चिमुरड्यांचा लक्षणीय सहभाग" या वाक्यासाठी शाळेतली मुले न मुली टेम्पोत भरून नेण्यात येत होती. त्रंबकच्या पुढच्या आदिवासी पाड्यातूनही लोक आज गाडीत भरून आणले गेले होते. एकाकडे विचारपूस केली असता, एक बाटली अन तीनशे रुपये यासाठी  खटाटोप चालला होता. असो. शाळा  बंद ठेऊन मोर्चे काढत फिरणाऱ्या त्या महान शिक्षकांना आरक्षणाची खरी गरज आहे हेच खरे. असो. 

आता पाड्यावरून अंजनी मातेचे दर्शन घेऊन चढाई चालू झाली. रस्ता माहिती असल्याने जवळचे रस्ते घेऊन पहिल्या खिंडीत पोहोचलो. पावसाने आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आणी खिंडीत आल्यावर पावसाबरोबर माकडांनीही आमची साथ करण्याचा निर्धार केला. डागडुजी करण्याच्या हेतूने नको तिथे रेलिंग्स लावून किल्ल्याची यथेच्छ वाट लावलेली आहे. खिंडीतली जैन गुहा ग्रील लावून बंद केलेली होती. मागच्या खेपेस आतून पहिली असल्याने येथे फारसे लक्ष न देता पठारावर आलो. 
आता येथे जोरदार वारा खरंतर ढग इकडून तिकडे घिरट्या घालत पाण्याचा हलकासा शिडकावा करत आमच्या वाटचालीस शुभेच्छा देत होते. थोडेसे ढग बाजूला झाले कि रस्ता दिसायचा. फोटो तर काही धड येत नव्हते पण पठारावर फुललेली रंगांची उधळण मात्र लक्ष देण्यास भाग पाडत होती. सात वर्ष्याने येणारा कारवीचा बहर पूर्ण नजरभर पसरला होता. 

लांबच लांब पसरलेले हिरवेगार गालिचे. त्यावर ही नैसर्गिक मुक्त उधळण. ढगातले पाण्याचे थेंब अंगा-अंगावर थबकून अगदी पापण्यांवरही जमा झालेले दवबिंदू. मोकळ्या आकाशाखालची मुक्त भटकंती. सगळे काही मनाप्रमाणे घडून यावे असे. 
मागच्या वर्षी पावसाळा लवकर संपून वातावरण लवकर क्लिअर झाले होते. हा खालचा मागच्या वर्षीचा सेम फ्रेम फोटो.धुक्यातून वाट काढत अंजनीमातेच्या मंदिरापाशी आलो. २-३ काकड्या सोलून तिखट मीठ लावून खाल्ल्यावर जो काही अमृततुल्य भास झाला त्याची सर कशालाच नाही.
पोटोबा झाल्यावर कारवीच्या फुलांमधून वाट काढत आश्रमापाशी येऊन ठेपलो. ओझरते दर्शन करत सीता गुंफा गाठली.गर्द जंगल आणी दाट धुके यामुळे मस्त माहोल झाला होता. अंधाऱ्या वाटेने कूच करत, दम खात, सुमारे साडे तीन तासाने अंजनेरी पर्वतावरच्या शिखरावर असलेल्या मारुतीच्या जन्मस्थानी पोहोचलो. शिखरावर मारुतीच्या मंदिरात तर कमाल वातावरण झाले होते. मंदिरात देवही दिसत नव्हता एवढे धुके होते. आम्ही नारळ फोडून आल्याची वर्दी देवाला दिली आणी प्रसाद संपवायच्या कामगिरीवर रुजू झालो.
आताशा ४ वाजून गेले होते आणी पायथ्याशी असलेली रामायणकालीन भग्न मंदिरे खुणावत होती. एक संकल्प पूर्ण झाला होता. मंदिरात शांत वातावरणात, ढगांशी मस्ती करत काढलेला अर्धा तास मनाला बराच थंडावा  घेऊन आला.

आल्या पावली निघालो तरीही ढगांनी साथ मात्र काही सोडली नाही. अंजनेरी परीसरात सापडणारी अति दुर्मिळ सेरीजोपिया अंजनेरिका वनस्पती शोधण्याचा बराच खटाटोप झाला पण त्यामुळे बाकीच्या फुलांची मस्त छायाचित्रे मिळाली.
हे बघून अवतार आठवला. स्वयंप्रकाशी वनस्पती तत्सम हे जे काही होत ते कमाल होत.
किल्ल्यावरून उतरून पुरातन मंदिरे पाहण्यात १ तास घालवला. १८ कोटी रुपयांची तरतूद या मंदिरांच्या डागडुजी साठी एप्रिल मध्ये मंजूर होऊनही अजून तरी एकही दगड जागचा हललेला नाही. 
आता डागडुजीचे नावाखाली या रामायणकालीन मंदिरांना सिमेंटने लिंपून पेंट मारला नाही म्हणजे मिळवले. 


अंजनेरी फाट्यावरच असलेल्या हॉटेल मध्ये मागच्या वेळी चांगली ओळख झाली होती. काकूंनी खास आले वैगरे टाकून फक्कड चहा बनवला. येथे २ चहा पिऊन, सामान उचलून यष्टीची वाट बघत बसलो रामशेजला जायला. मोर्च्यामुळे ठप्प असलेलं सर्व कामकाज सुरळीत होऊ लागलं होतं. नेताना गाडीत भरून नेलेली माणसे मिळेल त्या वाहनाने परतत होते. त्रंबकवरून आलेल्या गाडीला हात दाखवला आणी निघालो पेठ. 

६ वर्ष अजिंक्य राहिलेल्या रामशेज किल्ल्याने आमची उत्सुकता तर वाढवलीच होती. रामशेजच्या जवळच भूषणची सासुरवाडी असल्याने रात्रीचा राहायचा प्रश्न निकालात निघाला. 

आता उद्या लक्ष होते रामशेज आणी चामरलेणी. आता त्याबद्दल पुढच्या लेखात. 

वाचत राहा. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: