शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

२०१५! सॉलीट्युड ते दोनाचे चार !

पूर्व लेख :  

 २०१५! सॉलीट्युड ते दोनाचे चार !

लोक्स हो, आमचे पुराण लावण्याआधी सर्व वाचक मित्र-मैत्रीणीना अगदी मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुमचे सगळ्या योजना, संकल्प (थोडे तरी) पूर्ण होवोत ही अपेक्षा. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

असो. आठ-आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही. जरा बारीक ( ते मागच्या वर्षी, यावर्षी गोरा :) ) झालोय पण नजर लागायला नको म्हणून सांगत नाही.

असो, तर "वर्षभरात मी काय काय केले? वा काय कमावले आणि काय गमावले?" अश्या प्रश्नाने आयुष्याचा, वर्षाचा आढावा घेण्याइतके मी काही केले आहे असे वाटत नाही. काय कमावले आणि काय गमावले या दोन्हीचीही उत्तरे मला सुचत नाहीयेत.

या ब्लॉग ने मात्र बरेच काही कमावले. ABP माझा आयोजित ब्लॉग स्पर्धेला या पठ्ठयाला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. नेटाने नेटवर झळकला हे हि नसे थोडके. आमची पण स्थिती अगदी वाईट नाही. आयुष्यभर लक्षात राहील असे काही तरी गवसलेले आहे यावर्षी.

असो,

वर्षाची सुरवात खासच झाली आणी शेवटही अगदी गोग्गोड! आयुष्यभर जपून ठेवावे असे काही क्षण, असे काही आवाज, अशी काही ठिकाणे आणी शब्दातीत अशी नात्यांची ती गुंफण.त्या लाघवी क्षणांमध्ये विरघळून जायचा अवकाश. नवीन नाते आयुष्याला वेगळे वळण देऊन गेले खरे पण त्यातही आमचा मूळ पिंड आम्हाला स्वस्थ बसू देईना आणी मग सुरूच राहिली भटक्या मनाची वाटचाल.
"पुराव्यांनी शाबित करून देईन" या चालीवर वर्षभरात कुठे कुठे भटकंती झाली याची हि चित्ररुपी झलक .

जानेवारी :  सॉलीट्युड शिवनेरी , मल्हारगड 

काहीही न ठरवता, कोणालाही बरोबर न घेता, डबा , पाण्याची बाटली इतकेच घेऊन काहीही प्लान न करता, मिळेल ती गाडी पकडून एकटेच हिंडायला जायचे. समोर जे येईल त्याला एकटेच तोंड द्यायचे. कमीत कमी खर्चात आणी मनसोक्त भटकणे.
शिवाजीनगर जाऊन जुन्नर बस पकडली. यावेळी कॅमेरा पण नव्हता घेतला मुद्दामून. पण नंतर बरेच काही मिस केले असे वाटायला लागले म्हणून पुढच्या वेळेस कॅमेरा पण बरोबर. 
दुसऱ्या वेळेस सरळ गाडी काढली आणि पोहोचलो दिवे घाट. मल्हारगड.  





फेब्रुवारी : सॉलीट्युड हडसर किल्ला 

यावेळेस एकट्याने कोणत्याही साधनांची मदत न घेता कडा चढण्याचे दिव्य केले गेले. ते असे:-
जवळपास ७०% चढाई करून, एक हलणारी, खिळखिळी झालेली हाताने खुंटी पकडून, दंडाला बांधलेले जोडे सांभाळत, कड्याला लगटून चढाई करतानाही, पोट आणी कडा यामधील जुजबी अंतर भरून काढणारी कॅमेरा bag दोन्ही हात बिझी असल्याने हिसका देऊन दूर सरकवत, उजव्या बाजूने थोडे काह्ली डोकावत कॅमेरा पकडला आणी ४-५ खटाखट क्लिक मारले. त्यातही पहिल्यांदी क्लिकच होईनात म्हणून बघितले तर कॅमेरा Manual मोडला ठेवलेला. मग स्वतालाच शिव्या देत दातांनी मोड चेंज केला. 
एवढे उपद्याप. का? तर माहीत नाही. उगाच हौस.



यावर एक डिटेल लेख खरडण्यात आलेला आहे. जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर

मार्च : कोअर कोकण- राजापूर, धोपेश्वर 

जरा कुठे स्वस्थ बसू म्हंटले तर भावाने कोकणात चाललो असल्याची वर्दी दिली. आणी मग काय, आम्हीही गंगेत (राजापूरच्या) आमचे घोडे  नाहून घेतले. 
हि एक कायम लक्षात राहील अशी सफर झाली. कोकण म्हणजे फक्त समुद्र किनारे अशी असलेली समजूत लख्ख पुसून टाकली या ट्रीपने. कोअर कोकण म्हणतात ते हेच काय? रात्नांगीचे ते आंबा पोफळीची वने, चिरंतन निसर्ग सौंदर्य आणी आजूबाजूला अनेक "अंतू बर्वा" सदृश्य मंडळी. कमाल !





यावर बरेच लेख लिहायचे आहेत पण शेवटच्या फोटोतल्या होर्न-बिल पक्ष्याच्या जे काही मी प्रेमात पडलो की त्यावर एक पहिले प्रेम लिहिले गेले.

एप्रिल : सफर जलदुर्गांची- विजयदुर्ग, आंबोळगड, यशवंतगड, कनकादित्य सूर्यमंदिर  

जिथे दर महिन्याला एक ट्रेक जमवायची मारामार त्यात एकाच ट्रिप मध्ये २ दिवसात ३ किल्ले म्हणजे मेजवानीच.



मे : सासवडचिये नगरी- संगमेश्वर,लोणी भापकर

लोणी भापकर तेथील यज्ञवराह - विष्णूच्या वराहवताराचे प्रतिक.
दगडाची चढवलेली झूल आणी त्यावर कोरलेल्या १४२ विष्णू प्रतिमा!! सर्वोत्कृठ शिल्पकलेचा एकमेवाद्वितीय अविष्कार !! कमाल !!





याच साठी केला होता अट्टाहास !!  
या सफरीचा वृत्तांत :  सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर ,
                               सासवडचीये नगरी : लोणी भापकर
                               सासवडचीये नगरी :मल्हारगड / सोनोरीचा किल्ला

जुन : दोनाचे चार हात 

दुनिया किसी पे हारो तो जानो क्या जीत है ये दुनिया,
एक डोर बांधे, सातो जनम को वो प्रीत है ये दुनिया !

आता यावर मात्र कोणताही लेख डकवला जाणार नाहीये तेव्हा वाचकांनी निश्चिंत असावे. :)

जुलै : बंदीपूर अभयारण्य,देडाबेट्टा, मडेकरी(कुर्ग), म्हैसूर 



 

ऑगस्ट:पाबे घाट, तिकोना 

पावसाचा लुफ्त "नव्याने" अनुभवण्यासाठी मग जवळच्या जवळ.


 

सप्टेंबर :विसापूर 

सुटलेले पोट घेऊन परत सह्याद्रीकडे मोर्चा.

 

ऑक्टोबर :भुलेश्वर 




 भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर

नोव्हेंबर :महाबळेश्वर 





 

 

डिसेंबर: मृगगड ( भेलीवचा किल्ला)

लाख ट्रिप्स करा, सह्याद्रीला पर्याय नाही.




वा, खरेच मस्त गेले हे वर्ष. ट्रेकचा आकडा ७१ वर आलाय तर. बरच काही कमावले म्हणजे मी ! डोळ्यात आणि मनात. डोळ्यात साठवलेले क्षण आणि अनुभव हे केवळ शब्दातीत.

चला आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.लोभ असू द्या.


भेटत राहू …… वाचत राहा ….अभिप्राय कळवत राहा !

सागर शिवदे
sagarshivade07@gmail.com
९९७५७१३४९४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: