ढवळे गाव - चंद्रगड - मढीमहल - क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक
शाळेच्या इतिहासात वाचलेले जावळीच खोरं, क्षितिजाशी स्पर्धा करणाऱ्या सह्याद्रीच्या बेलाग डोंगररांगा ,दरीत कोसळणारे अभेद्य, अतिदुर्गम डोंगरकडे, खडा चढ छातीवर घेऊन घनदाट जंगलातून वाट काढताना चंद्रराव मोरेंच्या "येता जावली, जाताल गोवली" ह्या धमकीची आजही येणारी अनुभूती, ढवळ्याच्या घाटवाटेचे शेकडो वर्षे रक्षण करणारे चंद्रगड, मंगळगड किल्ले , चंद्रगडाच्या माथ्यावरील महादेवाचा आणि घुमटीतील डोंगरदेवतांचा लाभलेला आशिर्वाद, रात्रीच्या पावसामुळे आसमंतात उमटलेला निळाशार असा साज, "कापूस पिंजून ठेवलाय जसा!" कवितेची आठवण व्हावी असे डोंगरमाथ्याशी सलगी करू पाहणारे ढगांचे पुंजके,सूर्योदयाला सह्याद्रीच्या डोंगरधारेवर चढलेला सोनसळी मुकुट, मढीमहालावरून दिसणारे डोळ्यातही न मावणारे
सह्याद्रीचे अफाट, राकट रूप. असे आयुष्याचे मोती डोळ्यात गोळा करायचे आणि पाहून नतमस्तक व्हायचे.
असा सगळं यथासांग साजश्रुंगार चढला की एकच वाक्य मनात येते ...
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
२०२२ वर्षाच्या सुरवातीलाच "मोरधन, कावनई, गडगडा, रांजणगिरी, ब्रह्मगिरी, भंडारदुर्ग आणि मेटघर किल्ल्याची हत्तीच्या मेटाची वाट" असा सेवन स्टार बार उडवल्यानंतर आजचा बेत होता मुलुख जावळी.
ढवळे घाट , चंद्रगड , बहिरीची घुमटी , जोरचे पाणी , मढीमाळ/ गाढवाचा माळ, मढीमहाल अश्या अदभूत वाटणाऱ्या ऐतिहासिक जागांचा आज अनुभव घेता आला. सकाळी साडे सहाला ढवळे गावातून चालू केलेला ट्रेक दुपारी दोनला मढीमहाल / आर्थर सीटपाशी समाप्त झाला. सात तासांची ही पायपीट खऱ्या अर्थाने शरीराचा आणि मनाचा कस पाहणारी आहे. कोकणातुन सुमारे ३०० मीटर उंचीवर ढवळे गावातून आपण आर्थरसीटला १२४५ मीटर उंच चढून येतो.
मागील वर्षी जानेवारीतच हा ट्रेक केला होता तेव्हाच दरवर्षी येथे यायचंच असं ठरवलेलं. मागच्या वेळेला चंद्रगड झाला नव्हता मग यावेळेस डोंगरदेवांच्या आशीर्वादाने चंद्रगड माथ्यावरच्या महादेवाच्या दर्शनाचे पुण्य लाभले. सकाळी पाच वाजता ढवळे गावात पोहोचलो. वाटाड्या ठरवून निघूपर्यंत सूर्यनारायण ड्युटी वर रूजू झाले होते. सुमारे पाऊण तासात चंद्रगडाच्या माची पर्यंत पोहोचलो तेव्हा सर्वांगाला घामाचा अभिषेक झाला होता. आदल्या रात्री पाऊस पडल्याने वातावरण एकदम स्वच्छ झालेलं. सूर्याच्या किरणांनी डोंगररांगांना सोनसळी ढगांचा मुकुट चढवलेला. ऊर धपापत तासाभरात चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचलो. "हर हर महादेव" चा जयघोष सह्याद्रीच्या कडे-कपारीत दुमदुमला.
चंद्रगडावरील महादेव आणि नंदी
चंद्रगड माथा
पूर्वेकडे उंचीवर बहिरीची घुमटी आणि लांबच लांब आर्थर सीट दिसू लागले. सूर्य अजूनही मेघांच्या गर्दीतून आपली किरणे सोडवण्यात मग्न होता. माथ्यावरच्या थंडगार वाऱ्याने घामाघूम झालेल्या शरीरात तजेला आला. महादेवाला नमन करून दक्षिण टोकाला निघालो. दोन्ही बाजूला तटबंदी आपले थोडेफार अस्तित्व टिकवून होती. दक्षिण टोकाच्या बुरुजावरून काही पायऱ्यांनी खाली उतरून पाण्याच्या टाकीजवळ पोहोचलो तर येथून जावळीच खोरं अजून अजिंक्य वाटू लागलेलं.
रायरेश्वर, कोळेश्वर, महाबळेश्वर या भावंडांचे चौफेर दर्शन घेऊन परतीची वाट पकडली. किल्ल्यावर एकूण १४ टाकी आहेत पण त्यातली काहीच आज बघता येतात. शक्य तेवढे सगळे पाहून आता सुरु झाली घसाऱ्याची उतराई. बरोबरच्या ग्रुपला आम्हाला बहिरीची घुमटी येथे गाठायचे होते म्हणून गतीने चालणेही महत्वाचे होते. त्यात पाऊसामुळे नाळेतले दगड ओले झाल्याने घसरा-घसरी सुरु झाली. चंद्रगड उतराई आणि बहिरीच्या घुमटीपर्यंतची खडी चढाई हा ट्रेक मधला सर्वात अवघड टप्पा होता
बहिरीची घुमटी
धुक्यात रायरेश्वर, कोळेश्वर
जोरदार घसाऱ्याची वाट उतरून आता आम्ही चंद्रगडाला वळसा घालून येणाऱ्या वाटेला मिळालो. येथून ढवळे घाटाने मोठ्या चढाईची वाट चालू झाली. गोळ्या, चिक्की, काकड्यांची आवर्तने सुरु झाली. सुमारे दोन तासांच्या अंगावरच्या चढाईने श्वास फुलाला होता. "आता येईल" "मग येईल" "आलीच बघ खिंड" म्हणता म्हणता येत नव्हती. एकदाची खिंड आली आणि "C" शेप ट्रॅव्हर्स चालू झाला. शेवटच्या टप्प्यात कातळात खोदलेल्या पावट्यांवरून चढताना कोणी अनामिक शक्ती आपल्यावर वरदहस्त ठेऊन आहे असे वाटत होते. घुमटी पोहोचलो आणि डोंगरदेवाना नमस्कार करून तिथेच झाडाच्या सावलीत पथारी पसरली.
गुळाची पोळी त्यावर साजूक तूप, खवायुक्त गाजराचा हलवा या घरून इथवर आणलेल्या पदार्थाना योग्य न्याय दिला. जोरला जाणाऱ्या वाटेवरील टाक्यातले थंडगार पाणी पिऊन वाटचाल चालू झाली "मढी माळ". येथून आर्थरसीट आणि प्रतापगड दिसतो पण आज ढगांनी ती संधी दिली नाही. वाटेतला छोटासा रॉक-पॅच चढून मढीमहाल सज्ज्यावर पोहचलो तेव्हा अडीच वाजत आलेले. साडे सात तासांच्या कष्टाचे चीज झालेसे वाटत होत. आज एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली ती अशी की , रविवारचा दिवस असूनही आर्थर-सीट पॉईंटला फक्त आम्ही आणि माकडे होतो. भविष्यात हे होणे नाही म्हणत त्या सज्ज्यावर एकट्याचे फोटो काढून घेतले. गर्दी नसल्याचे कारण नंतर कळले कि गेले ७ दिवस क्षेत्र महाबळेश्वर येथून रस्ता बंद केला आहे आणि आम्हाला आता पुढे ५ किलोमीटर्स अजून पायपीट करायची आहे. सुमारे तीन किमी ढकलगाडी केल्यावर एक वनविभागाचा अधिकारी भेटला त्याच्याशी गप्पा टप्पा आल्यावर त्याने खडी टाकायला आलेल्या डंपर मधून आमची श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरापर्यंत जायची सोय केली.
घुमटी येथून दिसणारा चंद्रगड
जाताना महाबळेश्वर मध्ये कुठेही बस थांबणार नव्हती म्हणून मग पंचगंगेच्या मंदिरामागे पळत जाऊन एक स्ट्रॉबेरीचे शेत गाठले. कालच्या रात्रीच्या पावसाने नुकसान नको म्हणून आज सकाळीच शेतातून स्ट्रॉबेरी काढल्या होत्या. लालचुटुक स्ट्रॉबेरी घेऊन रात्री १० ला पुण्यनगरी गाठली. आज दिवसभरात १६ किलोमीटर्स ची चाल झालेली पण नशिबाला तो आकडा आवडला नसावा. स्टॉपवर उतरल्यावर बघतो तर गाडी पंक्चर! मग दोन किमीची अजून पायपीट आणि अकराला घरी!
सहयाद्रीच्या उत्तुंग आणि देखण्या घाटवाटांपैकी हि एक वाट आहे. चंद्रगड, घुमटी येथून दिसणारे सहयाद्रीचे रौद्रभीषण नजारे म्हणजे निव्वळ अप्रतिम! निसर्गाचं कसं देवासारखं असतं, तो देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार आयुष्याच्या माळेत माळत राहायचं !
पहाटे तीनच्या सुमारास गाडी गुंजवणेच्या दिशेने मार्गस्थ होत होती. मार्गासनी पासून आत वळल्यावर संपूर्ण अंधारचेच साम्राज्य. गुंजवणे पोहोचलो, पाठपिशव्या बांधल्या तोच "गाडी फूड झाडाखाली दाबा" असा किर्र अंधारातून आवाज आला. "गाडी जाणार आहे" हे समजल्यावर तो आवाज उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला निघून गेला.
विजेरीच्या प्रकाशात पहाटे साडेचारला चढाई चालू झाली. पद्मावती माचीवर चंद्र ताऱ्यांची आरास खास जुळून आली होती. सुवेळा, डुबा अंधारातच आकार घेत होते. पन्नास मिनिटात पद्मावती मंदिरासमोर उभे ठाकलो तेव्हा सर्वांगाला घामाचा अभिषेक झाला होता. तांबडफुटीला देवीचे दर्शन घेऊन तडक मंडळी बालेकिल्ल्याला प्रस्थान झाली.
बालेकिल्ल्याला पोहोचलो तशी आसमंतात केशरी झालर उमटायला सुरुवात झालेली. भाटघर जलाशयातील पाण्यात शांत पहुडलेली प्रतिबिंबे आणी त्यावर स्वार होण्यासाठी खालपर्यंत उतरलेली ढगांची चादर. इकडे पश्चिमेकडे तोरणा, भट्टी वेळवंड खोरी हळूहळू जागी होत होती. नारायणाचे आगमन झाले आणी संपूर्ण प्रदेश सोनसळी किरणांनी नाहून निघाला.या शब्दातीत सुखाची अनुभूती ज्याने त्यानेच घ्यायला हवी.
चंद्रकोर तळे, बालेकिल्ला प्रवेशद्वारात आता गर्दी जमू लागलेली. तडक सदर गाठून संजीवनी माचीचा मार्ग पकडला. दिवाळीच्या नंतर दृश्यमानता कमी होईल या विचाराने आज राजगड तोरणा बेत आखला होता तो योग्य ठरताना दिसत होता. निळेशार आकाश, हिरवेगार डोंगर आणी सोनेरी गवत यांनी निसर्गाच्या रूपात अनोखे रंग भरले गेले. ढगांची सूर्यनारायला झाकोळून आमच्यावर कृपादृष्टी चालू होतीच.
संजीवनी माचीचा मार्ग पकडल्यापासून जनता शून्य झाली होती. आता फक्त आपण आणी आपल्या दोन्ही बाजूला सह्याद्रीचे दोन पुराणपुरुष भासतील असे राजगड - प्रचंडगड. त्यांच्या बाहूं सदृश डोंगररांगेतून आमची डोंगर यात्रा.
संजीवनीचे डौलदार आणि अभेद्य रूप पाहून अळू दरवाज्याने राजगडाचा निरोप घेतला. माचीखालुन जाताना दिसणारी सुमारे ६०० वर्षे अभेद्य अशी दुहेरी तटबंदी पाहताना, त्याकाळी काय सुवर्णमयी दिवस या वास्तूने पाहिले असतील आणी तत्कालीन दुर्गवैभव काय असावे याचा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.
भुतोंडे खिंडीत पोहोचलो तसे आजूबाजूच्या पाड्यातील व मेटातील लोक ताक आणी पाणी विकण्यासाठी पोहोचले होते. पूर्वीच्या काळी किल्ल्याच्या घेऱ्यात अश्या लढाऊ वृत्तीच्या लोकांची वस्ती वसवली जायची त्यांना "मेट" म्हणत. लढाईच्या वेळी शत्रूचा पहिला मुकाबला यांच्याशी होई. आजही हि लढाऊ लोक जीवनाची लढाई समर्थपणे लढतायेत. लहान मुले दिसली कि त्यांना गोळ्या वाटप करत आमची पालखी पुढे निघाली. कचरेवाडीत उदरभरणमं झाले आणि थंडगार घरच्या ताकाने क्षुधाशांती करून घेतली.
आता डोईवरच्या ढगांनीही थोडी विश्रांती घेतल्याने तोरण्याची चढाई खडतर बनली. भर उन्हात रडतोंडी बुरुजाचा काळाकभिन्न कातळ चकाकू लागलेला. शेवटच्या टप्प्यात शिडी चढून कोकण दरवाज्याने तोरणा किल्ल्यात प्रवेशते झालो. एव्हाना मध्यान्ह प्रहार झाला होता. बुधला माचीवरून मेंगाई देवीच्या मंदिराकडे जातानाच लिंगाणा आणि त्यामागे रायगड किल्ल्यांचे दर्शन झाले. दृश्यमानता खूप चांगली असल्याने लांबचा प्रदेश नजरेत येत होता. मेंगाई मंदिरात देवीचे दर्शन घेऊन बिनी दरवाज्याने उतराई चालू केली.
आज राजगडाच्या आणि तोरणा किल्य्यांच्या प्रत्येक प्रवेशद्वारात आणि मोक्याच्या ठिकाणी एकही माणूस नसलेले फोटो मिळाले. दुपारी दिडला वेल्हे गाठून मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने रवाना झाली. आठ तासात वीस किलोमीटरची कस पाहणारी, दमदार आणि प्रेक्षणीय भटकंती झाली.
सोळाशे शतकातला काळ असावा. महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची सुवर्ण घडी जवळ आलेली. मुरुंबदेवाच्या डोंगरावर आनंदी आनंद पसरलेला. तांबडफुटीच्या "सुवेळी" महाराजांनी "सुवेळा" माचीवरून नारायणाच्या उदयाचा सोहोळा बघून संजीवनी माचीकडे प्रस्थान ठेवले असेल.मोहिमेस निघण्यापूर्वी आपल्या आद्य गुरूंचे दर्शन घ्यायचे म्हणजे सुंदर मठासी जाणे प्राप्त. श्री समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनार्थ अळू दरवाज्यातून भुतोंड्याकडे उतरून शिवथर घळीकडे प्रयाण केले असेल. वाटेत येणारी बेळवंडी नदी आणि कुंबळ्याचा डोंगर पार करून गोप्या घाटाच्या खिंडीतून उतरून शिवथरघळी जलप्रपातातील पवित्र पाणी घेऊन समर्थांच्या चरणी अर्पण केले असेल. "जय जय रघुवीर समर्थ" चा निनाद अवघ्या जावळीत दणाणला असेल.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
गोप्या घाटाची चढाई करताना घामाच्या धारांबरोबर हा असा कल्पनाविलास मनातल्या मनात रंगत होता. आज आपण चाललो आहोत त्या मार्गाने कधीकाळी महाराजांनी, समर्थांनी आणि स्वराज्याच्या अनेक लढवय्यांनी अनेक वेळा येणे जाणे केले असेल या विचारानेच स्फूर्ती येत होती. इथल्या दऱ्याखोऱ्यात "जय जय रघुवीर समर्थ" चा नाद अनेक वेळा घुमला असेल. बहिर्जी नाईकांचे गुप्तहेर खाते रात्रंदिनी या घाटवाटांनी स्वराज्याच्या गडकिल्ल्यावर लक्ष ठेऊन असतील. अश्या या ऐतिहासिक वाटा आपणच जागत्या ठेवल्या पाहिजेत. दगडाशी ईमान राखले तरच दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील.
असो, तर मागच्या रविवारी भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी अशी बारा तासांची, तीन घाटवाटांची ३५ किलोमीटर्सची तुफान तंगडतोड झाल्यामुळे आज जरा बेताचा ट्रेक पाहून मंडळी आनंदाने पहाटे उठून जमलेली. पुण्यनगरीतून साडेचारला पहाटे प्रस्थान ठेऊन वरंधा घाटात कावळ्या किल्ल्याच्या जोडीने थोडीशी पेटपूजा झाली. शिवथरघळीत पोहोचलो तेव्हा गुहेत कोणीही नव्हते. चारशे पाचशे वर्षांपूर्वी समर्थानी हि जागा कशी काय शोधली असेल याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. "धबाबा तोय आदळे" या वाक्याची प्रचिती आजही येते.
आंबे शिवथर गावातून ट्रेक चालू झाला. अग्निशिखा प्रजातीच्या फुलांनी सुरवातीलाच स्वागत केले. या फुलांना बाहेर आला कि अख्खे रान पेटल्यासारखे वाटते. जमिनीवर सुरु झालेली मुंगळ्यांची लगबग पाहून पाऊस पडणार असे वाटून गेले. सह्याद्रीतल्या या गमतीजमती कोणी अनुभवी माणूस बरोबर असल्याशिवाय कळणे अवघड. रमतगमत सुमारे तासाभरात माचीवर येऊन पोहोचलो. येथून समोर डोंगरच्या कपारीत घाटाची खिंड दिसत होती. उजवीकडे सुपेनाळ तर डावीकडे आंबेनळी, उपांड्या घाट डोंगररांगेत लपून बसलेले. भूस्खलन झाल्याने बरीचशी वाट मोडलेली. आज माचीवरची विहीर त्यामुळे गायब झालीये. वाटेच्या शोधार्थ थोडफार भरकटलो तोच रानात जनावरांना घेऊन आलेल्या एका आज्जीनी पुढची वाट दाखवली. खड्या चढाईला येथून सुरवात झाली. सर्वांगाला घामाचा अभिषेक जाहला. याचे निमित्त साधून लिंबू पाणी, ताक, इलेक्ट्रॉल, चिक्की इत्यादी पदार्थानी पाठपिशवीतुन पोटात बदली करून घेतली. सुमारे अडीच तासांच्या चढाईनंतर गोप्या घाटाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर एक कोरीव पाण्याचे टाकं आणि वीरगळ आहे. त्या अज्ञात शूराला वंदन करून त्यासमोरच आमच्या पथाऱ्या पसरल्या.
नुकतीच दिवाळी झाल्यामुळे मंडळींनी चकली चिवडा लाडू फराळाच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. भरल्या पोटाने आता पुढची वाटचाल सुरु झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव बोपे डावीकडे ठेऊन आम्ही उजवीकडे भोर तालुक्यातील सांगवी गावाची वाट धरली. मागे लांबवर तोरणा दिसत होता. छोट्या छोट्या टेकड्या पार करत सांगवी पर्यंत दीड एक तासाचे पायपीट झाली. जोडीला काठोकाठ भरलेले भाटघर धरणाचे पाणी. पाण्यात चार पाच डुबक्या मारल्यावर जीवाची शांती झाली.
संपूर्ण ट्रेक मध्ये निर्मनुष्य अश्या जंगलातून भटकताना खासकरून गोप्याघाट ते सांगवी या कसल्याही आधुनिकतेचा मागमूस नसलेल्या प्रदेशातून जाताना समर्थांच्या खालील पंक्ती आजही खऱ्या ठरतात!
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥
वरंधा घाटातली सकाळची पेटपूजा
समर्थांच्या गुहेत डोंगरदेव
अग्निशिखा फुलांना आलेला बहर
सुपे नाळ
दुपारचं झोपूनही देत नाहीत हि लोक! पूर्वीच पुणे राहिलं नाही छ्या !
थम्सअप डोंगर
गोप्या घाटाची चढाई चालू
गोप्या घाटाच्या माथ्याशी लागलेली घनदाट झाडी.
घाटमाथा
घाटमाथ्यवरील पाण्याचे टाके. हे पाणी निःश्चिन्त होऊन प्या. आजारी पडलात तर मी स्वतः डॉक्टरकडे घेऊन जाईन असे समूहाच्या नेत्याने सांगितले. २००% ऑक्सिजन.
भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी
शिवथरघळ - गोप्या घाट - सांगवी
कुंडलिका व्हॅली - सावळघाट
कर्नाटक, गोवा, सिंधुदुर्ग कोस्टल रोड ट्रिप
पुणे - खानापूर - दांडेली - अंकोला - गोकर्ण - मिरजन किल्ला - याना केव्ह्स - मुरुडेश्वर - कारवार - खोलगड - म्हापसा - पारा - तेरेखोल किल्ला - रेडीचा यशवंतगड - निवती किल्ला - सिंधुदुर्ग - कुणकेश्वर - देवगड किल्ला - श्री क्षेत्र विमलेश्वर - श्री क्षेत्र रामेश्वर - विजयदुर्ग किल्ला - गगनगिरी किल्ला / मठ - पुणे
किल्ले कांचन मंचन , चंद्रेश्वर किल्ला नाशिक
डिसेंबर -
वैशाखरे - नाणेघाट - घाटघर - जीवधन किल्ला - नाणेघाट
दिवस १ : किल्ले कांचना आणि कांचन सुळका प्रस्तरारोहण
दिवस २ : चांदवडचा किल्ला, इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि चंद्रेश्वर मंदिर.
मागचा पूर्ण आठवडा सुट्टी मिळाल्याने कर्नाटक ते सिंधुदुर्ग किनारी भागाची १६०० किमी.ची भटकंती झाली. गुरुवारी परत आल्यानंतर उरलेले तीन दिवसही सत्कारणी लागावे म्हणून नाशिकला जायचा बेत केला. अजिंठा सातमाळ रांगेतले कांचन आणि कोळधेर हे दोनच किल्ले राहिले होते त्यामुळे कांचन करून चांदवड मार्गे कोळधेर जायचा प्लॅन असलेला एका संस्थेच्या कार्यक्रमात सामील झालो. मुख्य आकर्षण होते ते १५० फुटी कांचन सुळक्याचे प्रस्तरारोहण करण्याचे. या क्षेत्रात कधी अनुभव नसल्याने सुरक्षिततेचे उपाय योजून प्रस्तरारोहण (Rock climbing) व अवरोहण (rappelling) करायला मस्त मजा आली.
शनिवारी तांबडफुटीची वेळ कांचनबारीत पोहोचलो. १७ ऑक्टोबर १६७० चा इतिहास असा डोळ्यासमोर तरळून गेला.
आज आत्ता आपण उभे आहोत त्या ठिकाणी साडेचारशे वर्षांपूर्वी सुरतेची लूट घेऊन येणाऱ्या मराठ्यांची मुघल सरदारांशी सुमारे पाच हजार सैन्य ताकदीने लढाई झालेली. महाराज स्वतः त्यांच्या रणधुरंधर सहकाऱ्यांसमवेत लढाईस उभे. दाऊदखानाचा सैन्याची धूळधाण उडालेली. उभे असलेल्या कांचनबारी मधून परास्त सैन्य सैरावैरा धावतय.... सगळे काही कल्पित असे डोळ्यासमोर येऊन गेले.
चढाई चालू केली पण सर्व वाट मोडल्याने कांचन किल्ल्यावर पोहोचायला मोठी कसरत झाली. मुघलांशी लढताना सह्याद्रीच्या गवताच्या पात्याचे भाले झाले असे ऐकलेले त्याचा आज याची देही याची डोळा अनुभव आला. गवताची कुसळ कपडे बुटांमध्ये शिरून सुई सारखे टोचत होते. त्याच्याशी लढत मंचन माथ्यावर पोहोचलो. कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याची टाकी, उध्वस्त प्रवेशद्वाराचे अवशेष बघून कांचन च्या दुसऱ्या टप्प्यात आलो. कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती आणि दगडांच्या आकाराने बनलेला गणपती पाहून कांचन सुळक्याचे दिशेने चढाई चालू झाली. अंगावर येणारा चढ चढून कोरीव पण तुटलेल्या पायऱ्यांनी सुळक्यापर्यंत पोहोचलो. आता वेळ होती सुळक्याला भिडायची. गणेशाचे स्मरण करून एक शिलेदार फ्री क्लाईम करून वर पोहोचला आणि सुळक्याच्या माथ्यावरून "जय भवानी जय शिवाजी" घोषणा आसमंतात दुमदुमल्या.
कांचन किल्ल्यावर .. मागे कांचना सुळका
कांचन सुळका प्रस्तरारोहण चालू.
चढाई करताना अस्मादिक
जमतंय... जमतंय ...
बाकीची मंडळी योग्य ती काळजी घेऊन चढाई करून पोहोचली तेव्हा दुपारचे तीन वाजत आलेले. आरोहण करताना मनगटातली खरी ताकद कळाली. चहूबाजूला अजंठा सातमाळ डोंगर रांगांचा हा गगनचुंबी, अजस्त्र, राकट, बेलाग असा पसारा. पश्चिमेकडे ओळीने हंड्या, विखारा सुळका, त्यामागे या रांगेतला सर्वात उंच किल्ला धोडप, त्यामागे रवळ्या -जावळ्या, मार्केंडेय तर पूर्वेकडे कोळधेर, राजदेहेर, इंद्राई, चंद्रगड आसमंताशी स्पर्धा करत उभे ठाकलेले.डोळ्यात साठवून ठेवावा असा अफलातून नजारा.
हंड्या, विखारा सुळका, त्यामागे या रांगेतला सर्वात उंच किल्ला धोडप, त्यामागे रवळ्या -जावळ्या, मार्केंडेय
विखारा सुळका आणि किल्ला धोडप
कोळधेर, राजदेहेर, इंद्राई, चंद्रगड रेंज
कांचना सुळका उतरून उर्वरित किल्ला पाहून निघण्यास सूर्यास्त झाला आणि संधीप्रकाशात उतराई चालू झाली. ज्या वाटेने चढून आलो त्या वाटेचे दिव्य बघून तेथून उतरणे शक्यच नव्हते म्हणून कांचन सुळक्याला प्रदक्षिणा मारून दुसऱ्या वाटेने निघालो. वीस मिनिटात अंधाराने गाठले तेव्हा माचीसुद्धा उतरले नव्हतो. आता चालू झाली दुहेरी लढाई. एक अंधारातून विजेरीने मोडलेली वाट शोधण्याची आणि दुसरी गवताचा भाल्यासारख्या कुसळांशी. महत्प्रयासाने कांचना गावाच्या समोरील खिंडीत आलो तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले. येथून वाट सापडेना. विजेरीने गावाच्या दिशेने प्रकाश टाकला तसा गावातून प्रकाश आमच्यापर्यंत आला. कोणीतरी किल्ल्यावर वाट शोधतंय हे गावात कळल्याने काही लोक बॅटरी घेऊन आमच्या दिशेने वरती चढून आले. देवासारख्या धावलेल्या त्या माहात्म्यांना अनेक धन्यवाद देऊन गावात पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आलेले. पोटोबा करून टेन्ट लावून झोपून घेतले.
प्रस्तरारोहण व रात्रीच्या सुटकेचा विलक्षण अनुभव गाठीशी जोडून आजचा दिवस संपला.