शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

थंडीची चाहूल : वितंडगड

थंडीची चाहूल : वितंडगड


बरेच दिवस हापिस एके हापिस करणारी मंडळी आज सकाळी साडे सहा वाजता जुजबी आवरून तयार झाली होती. पुरते उजाडले तर नव्हतेच, त्यात थंडी मी-मी म्हणतच होती. थंडीशी प्रतिकार  करत मंडळी कोथरूडडेपोच्या एका अर्धवट तुटलेल्या पारावर सूर्यनारायणाची प्रतीक्षा करत बसली. मोजक्या मफलरी अन कानटोप्या पोटापाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. रोज तुडुंब वाहणारा रस्ता कोवळ्या उन्हाची वाट बघत पहुडला होता. थोड्याच वेळात थंडरबर्ड नावाचा आमचा वारू आला आणी तिकोना किल्ल्याच्या दिशेने  मार्गक्रमण झाले.

आत्ता बऱ्यापैकी वाटणारी थंडी पौड जाताच प्रचंड वाटू लागली. धुक्यात वाट काढत काढत जाताना निसर्गाच्या करामतींची मौज वाटू लागली.काही अंतरात वातावरण बदलले होते. नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली पण रानावनात मनसोक्त गच्च भरलेल्या थंडीने त्याला काही दाद लागू दिली नाही. सर्वत्र धुके पसरले होतेच, वाहत्या गारव्याने ते आता माळरानात उतरू पाहत होते. झाडांच्या पानापानातून वाट काढू पाहणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांशी जणू काही त्याची शर्यंतच लागली असावी.


पहाटे पहाटे उठून, गार पाण्याने अजून थंडी वाजेल म्हणून तोंडही न धुता, दिवाळीनंतर कपाटातून खाली काढलेले स्वेटर चढवून, बगलेत हात धरून फिरायला निघालेले बालपणीचे क्षण डोळ्यासमोर असे तरळून गेले. हातमोजे वैगरे अश्या गोष्टी फारच 'वाढीव' म्हणून हात बगलेत घट्ट ठेवून चालत राहिले कि थोडीफार ऊब यायची. पहाटे गाड्यांच्या काचांवर जमलेले  दव, त्यावर आपली कारीगरी करत अन तोंडातून वाफाळलेल्या चहासारखी वाफ काढायची स्पर्धाच जणू लागून जायची आमच्या सगळ्यांच्यात. आजही अजाणतेपणाने आलेल्या जांभईने आज मला स्पर्धक नसल्याने विजेताच केले असावे. पण बदलले मात्र आजही काहीही नव्हते. आजही रोमारोमात थंडी भरली तर होतीच अन हातही निमूट बगलेत विसावले होते.


पौड, कार्मोळी, चाले, कोलवा,जवण अशी छोटी-छोटी गावे मागे पडत गेली तसे तिकोना किल्ला सकाळच्या धुक्यात ध्यानस्थ बसल्यासारखा दिसायला लागला. आजूबाजूच्या शेततळ्यामध्ये सूर्याचे बिंब परावर्तित होऊन सगळं परीसर सोनेरी झाला होता. सगळी गावे सह्याद्रीच्या कुशीत निवांतपणे विसावली होती. ना कुठं कसली धावपळ ना कसला माग.
आळसावलेल्या खेड्यांमध्ये आत्ताशी कुठं मंदिरे जागी होत होती. तुंग किल्ल्याने तर आज आपले अस्तित्वच धुक्याच्या हवाली केले होते. पवना धरणाच्या पाण्याने त्या धुक्याच्या रंगात आपला रंग मिसळून तुंग किल्ला बेमालूमपणे लपवला होता. सूर्यप्रकाशाचा सोनेरी मुकुट घालून तुंगीचा सुळका ढगांशी दोन हात करत उभा असेल असे अपेक्षेप्रमाणे आज काही होणे नव्हते. हा पठ्ठया तर ढगात डोकं खुपसून, पवना नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता. 'तिकोनापेठ' गाव थोडे मागे सारून आता स्वारी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली होती.


जवळपास पाचवी भेट असल्याने मार्ग वैगरे शोधण्याचा प्रश्न नव्हता. एका  दमात मंडळी किल्ल्याच्या पूर्व धारेवर येऊन पोहोचली. पिरॅमिड सारखा त्रिकोणी मुकुट आणि डोंगराला फूटलेल्या तीन धारा व त्यावरच्या  तीन वाटा म्हणून तिकोना. सुमारे अर्धा तासात आपण पहिल्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. पहारेकरीच्या ओवऱ्या ओलांडून पुढे आले की पुरुषभर उंचीची रामभक्त मारुतीची 'पुच्छते मुरुडिते माथा" या ओळींची आठवण करून देणारी उभ्या दगडात कोरलेली मूर्ती पाहून हात आपोआप जोडले जातात. त्यात आज शनिवार.!नमो नमो !

आल्यापावली दर्शन पण घेऊन टाका. 

येथूनच थोडे पुढे एक गुहा लागते. सातवाहनकालीन असावी बहुतेक. गुहेत पूर्वी एक साधू राहायचे, येणाऱ्या प्रत्येकाला हात उंचावून आशिर्वाद देत असत. आज त्याचे काही दर्शन झाले नाही. असो! परिवर्तन म्हणूया ! याशेजारीच देवीचे मंदिर दिसते. गुहेसमोरच जलप्रपाताने तयार झालेल्या पाण्याच्या टाक्याला डाव्या हाताशी ठेऊन आपण गुहेत प्रवेशते होतो. ध्यानस्थ होऊन जातो आपण असे वातावरण. नमस्कार,चमत्कार झाल्यावर गुहेच्या समोरच बघता चुन्याचे भलेमोठे जाते दिसते. हे बघता किल्ल्याची आजपर्यंत अभेद्य तटबंदीचे रहस्य समजते. तटबंदी बांधताना दगडांमध्ये चुन्याचे मिश्रण बाँडींगसाठी टाकले जायचे. 

आता येथून दोन वाटा फुटतात. एक सरळ जाते ती बालेकिल्ल्यावर तर एक उजवीकडून खाली जाऊन चोरदरवाजाकडे . चोरदरवाजा आज काही वापरात नाही आणि वारेमाप वाढलेल्या गवताने शोधणेही महामुश्किल. डोंगराच्या तीन धारेपैकी एक धार पकडून येणारी ही वाट असावी. त्याच्या परस्पर विरोधी बाजूला म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडून 'जवण' गावातून वरती येणारी हि तिसरी वाट आज कालानुरूप योग्य नाही.

गुहेपासून दिसणारा बालेकिल्ला. 

पूर्वेला क्षितिजाकडे बघता आता पुरते उजाडले होते. रेंगाळलेल्या धुक्याची अजूनही मागे हटायची तयारी नव्हती. डोंगरांच्या कुशीत खोल वसलेल्या वस्त्या व गावे आता जागी होत होती. वाटेतील 'जवण' गावात असलेली लगीनघाई स्पिकरवरुन कळत होती पण तेवढाच काय तो कोलाहल. बाकी निरव शांतता. 

सुवर्णमयी सकाळ:मुख्य दरवाजाशी येऊन ठेपलो. अजूनही खूप चांगल्या स्थितीत असंलेल्या किल्ल्याच्या स्थापत्याचे कौतुक वाटत राहते. येथून मग पुढे टुरिस्ट टाईप आलेले असंख्य पब्लिक चुकवत महादेवाचे मंदिर गाठले आणी छोटेखानी किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो.


अजूनही तुंग किल्ल्याची आम्हाला दर्शन द्यायची इच्छा दिसत नव्हती. ५ स्लिप्स  लावल्यावर बॅट्स्मनची अवस्था होते तसे काहीतरी धुक्याने पुरते जखडून ठेवले होते. शोधायचे दोन,तीन व्यर्थ प्रयत्न केले आणी परतीचा रस्ता धरला. थोडा पोटोबा करू म्हणून पाठपिशव्या सोडल्या तर एक उंचपुरा मावळा तेथे अवतरला. कमरेला केशरी शेला आणि डोक्यावर "मी मावळा आहे" सदृश्य टोपी. मावळ्याने महाराजांचा जयघोष केला व उपस्थितांच्या कंठातून "जय ssss " अश्या आरोळ्या फुटल्या. 

सूर्य डोक्यावर आला आणी परतीचा प्रवास चालू झाला. सकाळी ६ ला निघून १ पर्यंत परत घरी पोहोचलो पण. शॉर्ट अँड स्विट. खूप दिवसांनी जरा कुठेतरी भटकल्याचे समाधान मिळाले. रोज वेळ नाही वेळ नाही म्हणताना, दिवस खरा केवढा मोठा असतो हे पुनश्च जाणवले. घरी जाताना पौडला ताजी भाजी मिळते म्हणून घेतली आणी हातातल्या भाजीसकट इहलोकात परतलो.
वाचत रहा. 

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

सातमाळा सप्तदूर्ग : रंगमहाल (होळकर वाडा)

पूर्व लेख :

सातमाळा सप्तदूर्ग : इंद्राई ( Fort Indrai) 

सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर (Fort Rajdeher)सातमाळा सप्तदूर्ग : रंगमहाल (होळकर वाडा)

....आता टार्गेट होते ते म्हणजे रंगमहाल. रंगमहाल म्हणजे सरदार होळकर यांचा वाडा. शनिवार वाड्याच्या तोडीचे नक्षीकाम केलेला हा वाडा भरवस्तीत उपेक्षा भोगतोय. असो..

राजदेहेर किल्ल्याच्या पायथ्यापासून भर उन्हात चालत येताना ब्रह्मांड आठवत होत. त्यात देवदूतासारखा (रिक्षा घेऊन)धावलेल्या माणसाने रिक्षात कोणतेही सीट न घेता चांदवड पर्यंत आणले. "अहो काका, तो होळकर वाडा कुठे आहे हो इथे? तो बघायचंय." वाक्य पूर्ण होतानाच त्याला ब्रेकच्या आवाजाची झालर चढली न पुढून आवाज आला "उतरा मग इथेच. ५ मिनिटे चालत आहे आत."

रिक्षाच्या डिकीतली बोचकी पाठीवर घेऊन मंडळी चालू लागली. डाव्याबाजूने चांदवडचा किल्ला आमच्यावर लक्ष ठेऊन होताच. यावेळेस त्याने आम्हाला हुलकावणी दिली होती. सुमारे १० मिनिटे चालत, विचारात विचारत होळकर वाड्याच्या समोर पोहोचलो. आजूबाजूला तुरळक दुकान होती पण मोजून ३ माणसे तिथं उपस्थित होती. आम्हाला पाहून एका दुकानलक्ष्मीचा  आवाज फुटला. "आबा गिर्हाईक!!"
लगेच आबांनी पायजमा झटकला, तोंडातल्या सुवासिक ऐवजाला जमिनीचा रस्ता दाखवला आणी एकदम पेशवे काळात जाऊन पोहोचले. क्षणात इहलोकातून पेशवेकाळात जाणाऱ्या या महा(न)भागांना टाईम मशीन वैगरेची गरजच नाही. 
गाईड पाहिजे का? या वाक्यानंतर दूसरेच वाक्य थेट "तुमचा पुण्याचा शनिवारवाडा झक मारेल या वाड्यापुढे" हे वाक्य आल्यानंतर आबांना कोपरापासून दंडवत घातला. "तुम्ही पुढची गिर्हाईक बघा काका! नका कष्ट घेऊ आमच्यासाठी!"

पण रंगमहाल या शब्दाने आमच्या मनात वाड्याचे एक वेगळेच चित्र झाले होते आणि ते खरेही ठरले. होळकर कालिन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल. राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यशासन काळात (१७६७-१७९५) किल्ले सदृश्य होळकर वाड्याचा(रंगमहाल) निर्माण केला.  पूर्वीच्या काळी हा वाडा होळकर वाडा म्हणून ओळखला जात असे,
पेशवेकाळात बाजीराव पेशव्यांचे होळकर हे सरदार होते. पेशव्यांनी होळकरांना चांदवड जहागिरी म्हणून दिला होता आणी या वाड्याच्या निर्मितीला पेशव्यांचे पाठबळ दिले होते म्हणतात.
या महाकाय प्रवेशद्वारातून आपला वाड्यात प्रवेश होतो. वाड्याची संरक्षण रचना शनिवार वाड्याशी मिळतीजुळती वाटते. प्रवेशद्वारावर लोखंडी शस्त्रांची ढाल दिसून येते ती म्हणजे बाय डिफॉल्ट हत्तींना रोखण्यासाठीच असावी. :)

वाड्यात सध्या नूतनीकरणाचे म्हणजे थोडक्यात ऑइल पेंट फासून विद्रुपीकरणाचे काम चालू आहे. पूर्ण वाड्यात कामगारांची ये-जा चालू होती. कुमार सानू काकांची दर्दभरी गाण्यांनी वाडा गजबजून गेला होता. पण तरीही पॉलीश न केलेल्या लाकडातील नक्षीकाम नजर वेधून घेत होती. सागवानातील केलेले एकसारखे नक्षीकाम पूर्ण वाडाभर पाहून अवाक व्हायला होते.
 

मुख्य दरवाजातुन आत गेले की मोकळी जागा लागते आणि समोर वाड्याचे दुसरे प्रवेशद्वार. याच्या वर बसायला जागा. येथूनच जनतेसाठी राजसभा, न्यायदान केले जात असे. येथून आत गेल्यावर आपण प्रशस्त अश्या चौथऱ्यावर येतो. येथून दुसऱ्या मजल्यावर जायला जिने आहेत. या वाड्यातील खोल्या आणि जायचे रस्ते म्हणजे खरंच कमाल आहे. दुसऱ्या माळावरील काही खोल्या एकसलग जोडलेल्या आणि प्रशस्त व्हरांडे पाहून "स्त्रीवर्ग राजसभेत येथून भाग घेत असावा " असे ऐकलेले मनोमन पटून जाते.
  


घराच्या उंबऱ्यात घोड्याची नाल असणे शुभ मानले जाते. येथेही वरच्या मजल्यावर काही खोल्यांच्या उंबऱ्यावर नाल ठोकलेली दिसत होती. वाड्यातल्या मान्यवरांच्या ह्या खोल्या असाव्यात.वाड्याच्या बाहेरून एक पायवाट उजवीकडे जाते तेथून थोडे खाली एक तत्कालीन विहीर दिसते. काही दिवसांपर्यंत तेथे जायला बंदी होती पण काम चालू असल्याने गेट उघडले असावे. दगडाच्या भक्कम बांधणीची सुमारे 40-50 फूट खोल असावी. येथेच एक मोट बसवलेली असून त्यासाठी छोटेसे शेड केले आहे. सध्या डागडुजी साठी लागणारे पाणी येथूनच मोटर लावून घेतले जात होते. त्या मोटेवरूनच हा फोटो टिपला. खाली विहिरीत उतरायला प्रॉपर पायऱ्या आणि दरवाजे केलेले आहेत पण तेथे जायला परवानगी नाही.
40 वर्षांपूर्वी येथे वाड्यात अनेक कार्यालये होती. वीजबिल भरणा केंद्र होते. नंतर येथून सगळे हलवले असले तरी 40 वर्ष्यापुर्वीची रद्दी अजूनही पर्यटकांसाठी विरंगुळा म्हणून ठेवली असावी. चांदवड येथील देवीच्या मंदिराची असंख्य रिकामी पावती पुस्तके येथे एका खोलीत पडली होती यावरूनच आपली देणगी नक्की कुठे जाते हे लक्षात येईलच.
बँकेची मिटिंग आहे मार्च मध्ये 11 मार्च 1978. त्यासाठीची नोटीस लावलीये. बघा कोणाला यायचा असेल तर या मीटिंगला. :)

असो तर वाडा बघून लागलीच चांदवड स्टॅन्ड वर आलो. वाटेत एक झोपडीत डब्यातले खाण्यायोग्य पदार्थ देऊन टाकले आणी पुण्यनगरीची बस पकडली. मध्यरात्री पुण्यात पोहोचून स्वारी इहलोकात आली आणी रोजच्या रहाटगाडग्याला जुंपायला सिद्ध जाहली.
वाचत रहा.

शनिवार, १ एप्रिल, २०१७

सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर

सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर आणी रंगमहाल 
Rajdher Fortसाडेचारच्या सुमारास एक बँडची गाडी चांदवडमधील सुपारी "वाजवून" राजधेरवाडीच्या अलीकडील वस्ती पर्यंत चालली होती. घरातले आजोबा गुरांनां चार टाकत होते ते हातातला चारा टाकून रस्त्याकडे धावले आणी त्यांनी सेटिंग करून दिली. वस्तीपासून पुढे चालत जाण्याची मनाची तयारी करत आम्ही गाडीत आसनस्थ झालो.

सुमारे ४-५ किमी गेल्यावर परत सामान खांद्यावर टाकून आमची वरात निघाली. जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात तसे झाले. पुढचे ५ किमी अंतर चालताना आम्ही जे जे काही अनुभवले ते गाडीच्या सरळसोट प्रवासात नक्कीच उमगले नसते. 

गाडीवाल्याचे आभार मानून मंडळी आपल्या पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता उन्हे कलू लागलेलीच होती तशी रस्त्याच्या आजूबाजूच्या वस्तीवरही सायंकाळच्या कामाची लगबग सुरु झाली होती. 

कुठे ज्वारीची कणसे पाखडणे चालू होते तर कुठे पातेचा कांद्याची खुडपणी. घराच्या अंगणात पडलेल्या अंगणातील डेरेदार झाडाच्या सावलीत काहींची वामकुक्षी लांबली होती तर काही लोक द्राक्षाच्या बागेत जुंपले होते. 


सरळसोट रस्ता आम्हाला राजधेरवाडी पर्यंत साथ देणार होता. त्यातही घराघरात 'मावशी, किल्ल्यावर  सरळच ना?"  विचारत जातानाच हे दोघे भेटले आणी अजून भंकस करण्यात आली. 


याची सायकल म्हणजे  दिव्य अनुभव होता. 'ब्रेक नाय बर का सायकलीला !"
तस माझं अर्धा आयुष्य ब्रेक नसलेल्या आणी चेन पडणाऱ्या सायकल चालवण्यात गेले असले तरी आता इतक्या वर्ष्यांच्या खंडानंतर अशी सायकल चालवणे आणी पाय घासत थांबवणे म्हणजे दिव्यच की हो!


त्याला विचारले किल्ल्याला कसे ? तर
इथून सरळ जा अगदी शाळेपर्यंत !
ओके, मग काय लागेल?
शाळा !
चला ! मग पुढच्या पायपिटीत ज्वारीच्या कणसांची पाखडणी झाली, कोवळा हरभरा खुडपून चव बघून झाला. लगेच घरात जाऊन काकांनी ओंजळभर लालभडक मिरच्या आणून दिल्या. 
"आपल्या शेतातल्या हायेत जा घेऊन. किल्ल्यावर खा जेवताना!" इति काका. 
पण हे दिव्य काही आमच्याकडून केले जाणार नव्हते म्हणून राहूदे म्हणत सगळ्या मिरच्या ठेऊन दिल्या. २-३ ज्वारीची कणसे खिशात टाकली आणि कांद्याच्या पातीच्या शेतात मोर्चा वळवला. 

येथे एक आज्जीबाई सगळ्या खुडलेल्या पाता एकत्र करत होत्या त्यांची विचारपुस झाली आणि अजून ३-४ कांदे खिशात जमा झाले. आता जे दिसेल ते मी खिशात भरत चाललो होतो. का? ते शेवटी कळेल तुम्हाला. :) 

आता सूर्यनारायण आपली ड्युटी संपवून निघाले होते. जाता जाता सगळीकडे किरणांचा कटाक्ष टाकून "काही राहिले तर नाही ना?" बघत असावेत. आता पश्चिमेला सुवर्ण झळाळी आली होती. सोनसळी किरणांनी अवघा परीसर व्यापला होता. आमचीही पाऊले आता राजधेरवाडीत येऊन पोहोचली होती. मुक्कामाची सोय माहित असल्याने त्याची चिंता नव्हती. राजधेरवाडीत शाळेच्या समोर एक समाजमंदीर बांधले आहे. ते लिलावात एका ग्रामस्थाने घेऊन त्यात पर्यटकांची राहायची सोय केली जाते. ३०० रु कमीतकमी असून माणसांप्रमाणे भाडे आकारले जाते. सोय चांगली होती पण आम्ही  "फुकट ते पौष्टिक" या न्यायाने मारुती मंदिराचा रस्ता धरला. येथून मोजून ५ मिनिटांवर राजधेर किल्ल्याच्या पायथ्याशी मारुतीचे प्रशस्त मंदिर आहे. अंथरूण पांघरूण आम्ही घेऊनच आल्याने येथे मस्त सोय झाली. 
नळावरून पाणी भरले, सामान मंदिरात एक कडेला नीट लावून मंदिर झाडून घेतले, अवघा शेंदूरमय झालेल्या बाप्पाला मनोमन हात टेकले आणी सूर्यदेवाला आजचा अखेरचा दंडवत देण्यासाठी येथूनच २ मिनिटे असलेल्या छोट्या धरणावर गेलो. 

नाऊ इट्स टाईम फॉर श्रमपरीहार ! पाणी, थोडेफार अबरचबर खायला घेऊन धरणाच्या भींतीवर दोघे बसून होतो. जसा जसा पश्चिमेचा केशरी कागद डोंगराआड सरायला लागला तसे तसे डोक्यावरच्या काळाभोर होत चाललेल्या कागदावर चंदेरी चांदण्यांची नक्षी उमटू लागली. थंडगार वारा प्रत्येक झोतांनिशी आपले अस्तित्व दाखवू लागलाच होता. अश्या वेळी शांत बसून छातीत जास्तीत जास्त वारा भरून घ्यावासा वाटतो. निसर्गाचे कोडे अजून गूढ होत जातेय असे वाटायला लागते. रोजच्या जगण्यातला फोलपणा लक्षात येतानाच त्यापासून आपली सुटका नाही हे हि ध्यानात येते. वाऱ्याने पाण्यावर एखादा तरंग उठला कि आपसुक त्याकडे लक्ष वेधले जाते. मग तो तरंग हळू हळू आपल्या पर्यंत येऊन पोहोचतो आणी आपल्या पायांना एक हळुवार आठवण देऊन जातो. गप्पांची जागा आता शांततेने घेतली असली तरी मनात असे असंख्य तरंग उमटतच असतात. मग मध्येच भानावर येऊन मागे मन वळते आणी मागे भरभक्कम अश्या राजधेर किल्ल्यावरही चांदण्यांचा मुकुट चढलेला असतो. मन अजून हरवत हरवत जात राहते. 

"जुन्नरमधील वनक्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांचे चांदवड येथे स्थलांतर" या कुठेतरी वाचलेल्या बातमी बळच आठवते आणी हरवलेले मन ताडकन वर्तमानात येते. चांदवड,इंद्राई, राजधेर, कोळधेर किल्ल्यांनी वेढलेल्या या डोंगर दऱ्यांमध्ये आणी तेही मानवी वस्तीपासून दूर आपण बसलोय हे एकदम आठवून जाते. त्यात अजून भर म्हणजे "संध्याकाळी जनावरे पाणवठ्यावर येतात" असा ऐकलेले. लॉन्ग एक्सपोजर फोटो साठी लावलेला कॅमेरा उचलला आणी परत मंदिरात येऊन पथारी पसरली. 

मागच्यावेळी सुधागड ला खायचे सामान जास्त नेले नसल्याने खायचे वांदे झाले होते ते नको म्हणून यावेळेला बक्कळ खायचे सामान आणले होते. मंदिरात जेवण करून कट्ट्यावर टेहळणी करत बसलो होतो तोच ४-५ मुले आली आणी मंदिराच्या शेजारी, ग्रामपंचायतीने नव्याने केलेल्या जिम मध्ये गेली. मग आम्हीही आल्या पावली थोडे डंबेल्स मारून हात दुखावून घेतले. सुमारे ९ वाजता मंदिराचे ग्रील लावून, थकलेल्या पायांनी निद्रादेवीच्या अधीन होऊन गेलो. 

रात्री ११च्या सुमारास काळाकुट्ट अंधार पडलेला आणी एक माणूस सदृश्य आकृती मंदिराबाहेर उभी असलेली दिसली. मंदिराच्या पश्चिमेकडे राजधेर अन कोळधेर किल्ल्यांची घळ असल्याने पश्चिमेचा वारा रात्रभर घोंघावत होता. एकुलते एक बेडशीट टिकाव धरू न शकल्याने अंगांची दुमडून पांगोळी करून झोपायचा यत्न चालू असतानाच ताडकन ग्रील उघडले गेले. पांढरा पायजमा, पांढरा सदरा अन डोक्यावर दक्षिणोत्तर टोपी. वाऱ्याने तो पायजमा आणी सदरा फाडफाड उडत होता इतका कि त्याच्या आवाज येथपर्यंत ऐकू येत होता. मंदिरात कसले टेन्शन म्हणत झोपलेलो आम्ही टक्क जागे झालो. टाचणी पडेल तरी आवाज येईल अश्या शांततेत मंदिराची घंटा घणाणून गेली. आम्ही उठून बसलो तोच बॅटरीचा प्रखर झोत आमच्यावर पडला अन आवाज आला. "कोण हाये? झोपा झोपा".... आता कसले झोपा?...  झोपा तर उडाल्याच होत्या. मग कळले की, गावात सिंगल फेज आहे त्यामुळे शेतात पाणी सॊडण्यासाठी मोटर चालू करायला हे महाशय रात्री ११ वाजता आले होते. ११ वाजता शेतीची फेज येणार म्हणजे गावातली लाईट १५ मिनिटे जाणार असे काका म्हणताच समोरचा एकमेव बल्ब गतप्राण झाला.

असो. सगळे सव्यापसव्ये झाल्यावर उजाडले एकदाचे आणी मंडळी सकाळच्या कार्यक्रमासाठी रवाना झाली. ग्रामपंचायतीने घरटी शौचालायाची सोय केल्याने अडचण झाली नाही. गावाने २ वेळा चांदवड मधील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार जिंकला आहे असे कळले. खरंच आवडले हे गाव .. शेतकऱ्यांनी मिळून तळी बनवली आहेत. उतारावर बांध घालून पाणी अडवले आणी साठवले आहे. शाळा, समाजमंदिर, मंदिरे घरे सगळे काही टापटीप न स्वच्छ आहे.  


पाणी भरून चहा साठी चौकशी केली तर एक कुटुंबांनी अगत्याने घरी बोलावून दोघांना चहा दिला. जाताना त्यांचे आभार मानून निघालो तर वाटेत खायला पिशवीभरून भुईमूग शेंगा पण दिल्या. आता शाळेपासुन फुटणाऱ्या वाटेने चढाई चालू झाली. सकाळच्या वेळेत उन्हे यायच्या आतवरती पोहोचायचे होते. 

वाट तशी रुळलेली आहे आणी रस्त्यावर दगडांना पांढरा रंग मारलेला असल्याने वाट चुकत नाही. जरा उंची गाठली तर चांदवडचा किल्ला, साडे-तीन रोडग्याचा डोंगर आणी कालचा इंद्राई किल्ल्या असे तिघांनी मिळून आमचे स्वागत केले. आकाशातून आमच्यावर लक्ष ठेवायला सूर्यदेवही हजर झाले होते. 


आता उत्सुकता होती ती राजधेर किल्ल्याच्या ३० फुटी शिडीची. त्यामुळे पावले झपाझप उभ्या खड्या कातळापाशी पोहोचली पण. 


हीच ती ३० फुटी शिडी. याच्या मध्यभागी ९० अंशातली छोटी शिडी जोडलेली आहे. ती चढताना काही वाटत नाही पण उतरताना वाट लागते. उतरताना तुम्हाला एकदातरी देवाची अन कुटुंबाची आठवण येईल अशी सोय केली गेली आहे. 


किल्ल्यात प्रवेश करायचा म्हणजे शिडी चढून येणे हा एकमेव मार्ग आहे. येथून चढून आल्यावर २ देवड्या लागतात. कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला किल्ल्यावरील विस्तीर्ण पठारावर नेतात. वरती आल्यावर लगेचच तिरप्या कातळात खोदलेली गुहा दृष्टीस पडते. खरेतर या गुहेचा जवळ जाऊ पर्यंत याचा शोध लागत नाही. आत जायला २ फुटांची जागा असली तरी आतमध्ये १ RK फ्लॅट एवढी आहे. 


गुहा पाहून  त्यासमोरच एक दर्गा टाईप काहीतरी आहे. आधी ते मंदिर असावे असे वाटते. त्या समोरच एक छोटेखानी पण दगडी शिवायल. तेथून उजवीकडे पाण्याचे तळे असावे असे तेवढाच भाग हिरवागार दिसतो. येथून पुढे गेलो तर विस्तीर्ण असे तळे आणी त्याच्या आजूबाजूला कढीपत्त्याची असंख झाडे. संपूर्ण परीसर कढीपत्त्याच्या वासाने सुवासिक झालेला असतो. पाणी स्वच्छ व नितळ वाटले. येथे जास्त कुणी फिरकत नाही आणी यायची एकमेव शिडीची वाट त्यामुळे जनावरेही चरायला नाहीत त्यामुळे निसर्गाने आपले काम चोख केले आहे. 


जसा सूर्य आकाशात चमकू लागला तसे पाण्यात त्याच्या किरणांची असंख्य प्रतिबिंबे उमटू लागली. त्याचाच हा एक निष्फळ प्रयत्न. 


बॅग भरून कडीपत्ता भरून घेऊन स्वारी कोळधेरच्या दर्शनासाठी निघाली. डावीकडे पाहता काल संध्याकाळी इंद्राई वरून आलेला पश्चिम कडा आठवला. सुमारे अर्ध्या तासात अजून पुढे अजून ३-४ पाण्याचे टाके दिसले. झाडांच्या पसाऱ्यात लपलेल्या गुहा शोधल्या आणि तासाभरात किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोहोचलो. 


आता किल्ल्याला चढायला एकच शिडीची वाट असल्याने जनावरे नाहीत असे आम्हाला वाटले होते. येथे पहिले तर शेळ्यांची शाळाच भरली होती. या कश्या वर आल्या असाव्यात? 
उतरताना एक गुराखी भेटला त्याच्याकडून कळले की, ते डोक्यावर एक एक शेळी घेऊन शिडीने वरती चरायला आणतात आणी इथेच सोडून देतात. पिल्लू झाले की  विकायला खाली घेऊन जातात. 


आता किल्ला उतरून परतीच्या मार्गाला लागलो. २ वाजता काळी-पिवळी होती म्हणून पळत वेळेवर पोहोचलो तर गाडी आलीच नव्हती. ती येईल आणि मिळेल या आशेने परत बागेचा माथा म्हणजे इंद्राई किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पायपीट झाली. तरीही गाडी येईना म्हणून थकलेल्या पायाने चांदवड रस्ता धरला. 

काल बँड च्या गाडीने जेथे सोडले होते तिथपर्यंत चालत आलो आणी सुदैवाने एक रिक्षा आली. ती पुढे जाऊन परत येऊपर्यंत झाडाचा झाडाचा आश्रय शोधला आणी चांदवड गाठले. ३ दिवसांची सुट्टी सार्थकी लावून अखेरीस घरचा मार्ग धरला.

आता टार्गेट होते ते म्हणजे रंगमहाल. रंगमहाल म्हणजे सरदार होळकर यांचा वाडा. शनिवार वाड्याच्या तोडीचे नक्षीकाम केलेला हा वाडा भरवस्तीत उपेक्षा भोगतोय. असो त्याबद्दल पुढच्या भागात. 

आमचे मित्र व ट्रेकिंग सुरु केल्यापासूनचे साथीदार श्री.भूषण कोतकर उद्या वाढदिवस होता म्हणून बागेचा माथा, मु.पोस्ट राजदेहेरवाड़ी, चांदवड, नाशिक येथे सफरचंद कापुन साजरा करण्यात आला. सर्व उपस्थित म्हणजे इंद्राई किल्ला,राजदेहेर किल्ला, कोळधेर किल्ला आणि अस्मादिक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसानिम्मीत्त त्यांना दोन ज्वारीची कणसे,भुईमूग शेंगा,कढ़ीपत्ता,पातेचे कांदे, कोवळे हरभरा दाणे अश्या भेटवस्तु देण्यात आल्या. त्यांना हा वाढदिवस कायम लक्षात राहील अशी आशा करतो. वाचत राहा.

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

सातमाळा सप्तदूर्ग : इंद्राई


 सातमाळा सप्तदूर्ग : इंद्राई ( Fort Indrai) 


पहाटे पाच वाजून पाच मिनिटे झाली आणी मोबाईलमधील घड्याळाने भर एस्टीत कोलाहल माजवला. लोकांच्या अगदी साखरझोपा नसल्या तरी खांदा टू खांदा उडणाऱ्या डुलक्या मात्र उडाल्या. झोपेची थकबाकी गोळा करायला निघावे तोच चाके थांबली आणी झोपमोड झालेल्या जनतेचे सुस्कारे ब्रेकच्या एअर प्रेशर मध्ये विरून गेले. पिशव्यांची जागेवरून उचलबांगडी झाली आणी कंडक्टर काकांचा "मनमाड !" आवाज स्टेशनवरच्या अजून चार चौघांची झोप उडवून गेला.

भर थंडीत, तुरळक लोक स्टेशनवर थंडीशी दोन हात करत उभे होते. स्वेटर आणी पांघरूण दोन्ही असूनही काढायचा कंटाळा केल्याने रात्रभर हुडहुडी भरली होती. मनमाड म्हणजे अगदी वैराण प्रदेश असेल असे उगाच मला वाटत आले होते. दोन हात बगलेत धरून आता चांदवड एसटीची चौकशी चालू झाली. एक पाठोपाठ चांदवड गाड्या आल्या नी गेल्या पण उसवडमार्गे जाणारी गाडी आम्हाला वडबारे फाटा सोडणार होती.

आता गाडी निघाली तशी थंडीने अजून गुलाबी का काय ते रंग दाखवायला सुरवात केली. जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली तशी तशी शाळेच्या विद्यार्थ्यांची गजबज वाढली. मग लक्षात आले अरे आज २६ जानेवारी. सगळे पहाटेच्या सुमारास अंघोळ पांघोळ करून, आवरुन , खिश्याला झेंडे लावून तयार.

वडबारे फाटा आला आणी समोरच इच्छापूर्ती गणेश मंदीर उभे. आमच्या दोन आकृत्या अंधारातही उमटत होत्या. आता बघता बघता अजून एक तिसरी आकृती जोडीला आली. ते होते वडबारे गावातील शाळेतील शिक्षक. "इंद्रायणी किल्ल्यावर जाताय का?" या प्रश्नाने सुरवात होऊन चांदवड, थंडी, पीक,गणेशयाग, २६ जानेवारी, इथला सुपीक प्रदेश अश्या इतर बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली.

आता तांबडफुटीची वेळ झाली होती. गणरायांचे दर्शन घेऊन ट्रेकची सुरवात करूया म्हणून इच्छापूर्ती गणेश मंदीरात पोहोचलो. गणेश जन्म, गणेशयाग ३ दिवसांवर आल्याने मूर्तीची रंगरंगोटी चालू होती. लांबूनच हात जोडून वडबारे गावाचा रस्ता धरला.

पहिल्यांदी राजदेहेर किल्ला करायचा आणी मग इंद्राई असे ठरले होते. पण राजधेरवाडीला इतक्या सकाळी गाडी मिळणे शक्य नसल्याने पहिले इंद्राईकडे कूच करण्यात आले. गावात पोहोचलो तर शाळेत झेंडा वंदनाची तयारी चालली होती. शिक्षकांची ओळख झाली आणी शाळेच्या हापिसातच घरच्या दुधाचा फक्कड चहा झाल्यावर मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आजपर्यंत मी स्वतः शाळेत जाऊन ध्वजवंदन केले असा दैवी योग या देशाच्या वाटेला आजपर्यंत कधी आला नव्हता तो आज सह्याद्रीच्या आणी ४ दिवस जोडून सुट्टी मिळाल्यामुळे आला. तसा मी एकदा सकाळी उठून जायचा प्रयत्न केला होता पण मी अर्ध्या वाटेत असताना विरुद्ध दिशेने शाळेतली मुले ध्वजवंदन संपवून परत निघालेली दिसू लागली होती. असो हे ही नसे थोडके.

जनता विद्यालय, वडबारे या शाळेचा आणी मुलांचा मला फार हेवा वाटू लागला. इंद्राई किल्ल्याने वडबारे गावाला आणी शाळेला अशी कुशीत घेऊन आपल्यासारखेच अभेद्य व्हा असा सल्लाच दिला असावा बहुतेक. डोंगर दऱ्यांतल्या या वस्त्या आणी अश्या शाळा निसर्गाचा खरा वारसा पुढे देत असाव्यात. शाळेतले विद्यार्थी मागच्याच आठवड्यात वनभोजनासाठी किल्ल्यावर जाऊन आले होते. निसर्गात फिरताना जगण्याचे खरे अनुभव त्यांना जगता येत होते. कमाल!

इंद्राई किल्ला म्हणजे प्रचंड पायपीट आहे. वडबारे गावातून दोन डोंगर ओलांडून मोठ्ठं पठार लागतं. दूरवर नजर फेकायची आणी जिथपर्यंत नजर जातीये तिथपर्यंत चालायचंय अशी खूणगाठ मनात बांधूनच सुरवात करायची. सुमारे ३-४ किमी चालल्यावर एक मोठे वडाचे झाड येते आणी त्या बाजूला छोटेखानी मंदिर सदृश्य वास्तू. हीच खूण आपण बरोबर वाटेवर असल्याची. पूर्ण परिसरात असलेल्या एकमेव झाडाखाली थोड थांबून पोटोबा केला.


आता उन्हे वर चढायला लागलेली होती. आता झपझप पाऊल  टाकणे अनिवार्य होते. झाडाच्या सावलीतूनच मार्ग निश्चित केला. किल्ल्याचा कातळात खोदलेल्या पायऱ्या इथूनच दिसत होत्या.


थोड्याश्या अर्ध्या तासाच्या चढाई करून वरती पोहोचलो अन मारुतीरायांचे दर्शन जाहले. समोरचा तीन रोडग्यांचा डोंगर आमची पाठराखण करतो म्हणाला तर त्यामागून चांदवड किल्ला "भिडा तुम्ही... मी हाये" म्हणत होता.


मारुतीच्या मूर्तीला नमन करून पुढची वाटचाल आता दृष्टीक्षेपात होती. समोरच उभा कातळ खोदून खिंडीत घुसणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. एकंदर सगळ्या किल्ल्यांच्या खोदलेल्या पायऱ्यांची उजळणी झाली आणी हे वास्तुरचना कोणत्या सारखी आहे यावर खलबत चालू झाली. काही असो पण त्या कपारीचा आकार आणी त्याचा स्मूदनेस बघता त्याकाळी असे कातळ खोदण्यासाठी काहीतरी प्रगत तंत्रज्ञान असावे या निष्कर्षावर दोन यथाकथित तज्ञांची चर्चा संपली.


यालाही पायऱ्यांना हडसरसारखे दगडी कव्हर असावे असे वाटून गेले.


पायऱ्या चढून येताच प्रवेशद्वार असावे असे वाटावे अशी वास्तू दिसते. येथेच फारसी भाषेत शिलालेख कोरलेला दिसतो.


आता किल्ल्याच्या शिरोभागावर रणरणते ऊन आणी दोन रिकामटेकडी लोक याशिवाय कोणीही नव्हते. किल्ल्यावर बघण्याची ठिकाणे म्हणजे खोदलेल्या गुहा आणी पाण्याचे टाके. याशिवाय वरून दिसणारे राजधेर-कोळधेर आणी आजूबाजूचा मोकळाढाक परिसराची टेहळणी करत आपण तासन-तास बसू शकतो पण वाढते ऊन आणी मेलेल्या जनावरांचा वास यामुळे पुढे पळणे भाग पडते.


गावातील लोक त्यांची निरूपयोगी जनावरे किल्ल्यावर सोडून देतात चरायला. चारा आणी पाणी दोन्ही असल्याने काही दिवस जगून, निसर्गात विलीन होऊन निसर्गसाखळीस हातभार लावत असावेत. त्यामुळे जागोजागी पडलेली हाडे रस्ता बदलायला भाग पडतात. असो.

बाकी किल्ल्याचा माथा प्रशस्त आहे. गुहांचा शोध घेणे चालू केले तर दूरवर एक खडकावर कोरलेल्या पायऱ्या . बघता तेथेच जवळपास गुहा असावी.


मोठमोठ्या दगड-धोंड्यात बेमालूमपणे लपवलेल्या गुहा शोधायला नक्कीच कष्ट पडतात. यातील पाणी काही पिण्यायोग्य नाही सो निघतानाच दोन अडीच लिटर पाणी घेऊनच निघाले पाहिजे.


दूरवर नजर जाईल तोपर्यंत विखुरलेल्या सातमाळा रांगा भर डोईवर आलेल्या सूर्याने तापून निघत होत्या. राजधेर-कोळधेर यांनी लगेचच एक ब्राह्मणी घार आमच्या स्वागतासाठी पाठवली. धोडप, विखारा आणी कांचना यांचे  पुसटसे दर्शन झाले.


घड्याळात बघता एक वाजून गेला होता. ३ वाजता वडबारे गावातून राजधेरवाडी गाडी आहे असे कळाले होते. पण पोटातील भुकेला पण न्याय देणे बाकी होते. परत फिरून अजून काही सापडते का बघून परत खिंडीत आलो आणी पोटोबा केला.इंद्राई किल्ल्याच्या खिंड़ीत जेवणाचे डबे उघडले तर हे महाशयसुद्धा जेवायला आले.पण त्यांचा बेत "वेगळा" दिसु लागल्याने काढ़ता पाय घेण्यात आला.


आता निघताना आल्या मार्गे न परतता पायऱ्यांच्या समोरच्या मुख्य सोंडेवरून उतरायला चालू केले. समोर बघता अजूनही भयंकर पायपीट बाकी होती. येथून उतरणारा मार्ग पुढे अजून निमुळता होत गेला. एका क्षणी अश्या जागेवर आम्ही येऊन पोहोचलो की येथून खालीही उतरता येईना आणी पुढेही कोठे जात येईना. परत आल्यापावली फिरून उतरायचा पेशन्स तर नव्हताच, मग थोडे मागे फिरून कसरत करत, करवंदांच्या जाळीतून मार्ग काढत, आणी हात-पायावर रक्ताच्या नक्षी काढत एकदाचे काय ते आम्ही माचीवरच्या एकमेव घरापाशी पोहोचलो.

डावीकडे दिसणारा डोंगराच्या मागे वडबारे गाव! हैला तिथपर्यंत जायचंय अजून!घरात तर कोणीच नव्हते आणी आजूबाजूने दूरपर्यंत निवडुंगाचे केलेले कुंपण बघता तेथे जाण्यासाठी फार दिव्य करावे लागणार हे बघून पुढचा मार्ग धरला.

निघताना किल्ल्याला शेवटचा बाय बाय केला. एकंदर पायपीट बघता "पुन्हा भेटू" वैगरे शक्यच नव्हते. तीनच्या सुमारास परत शाळेपाशी पोहोचलो तोपर्यंत जीव अर्धा झाला होता.आमचे बाकीचे सामान शाळेशेजारील ज्या घरात जेथे ठेवलेले होते तिथपर्यंत कसेबसे पोहोचून त्यांच्या अंगणातच डेरा टाकला. माठातले गार पाणी आणी आलेयुक्त चहा झाल्यावर कुठे माणसात आल्यासारखे वाटले.

आज कॉलेज न शाळा सुट्टी असल्याने तीनची गाडी येणार नाही असा साक्षात्कार झाला. आता जे जे होईल ते ते पाहणे याशिवाय काहीही हातात नव्हते. मग ओळखी-पाळखी निघून गप्पा आणी चहात अजून एक तास गेला.

साडेचारच्या सुमारास एक बँडची गाडी चांदवडमधील सुपारी "वाजवून" राजधेरवाडीच्या अलीकडील वस्ती पर्यंत चालली होती. घरातले आजोबा गुरांनां चार टाकत होते ते हातातला चारा टाकून रस्त्याकडे धावले आणी त्यांनी सेटिंग करून दिली. वस्तीपासून पुढे चालत जाण्याची मनाची तयारी करत आम्ही गाडीत आसनस्थ झालो.

सुमारे ४-५ किमी गेल्यावर परत सामान खांद्यावर टाकून आमची वरात निघाली. जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात तसे झाले. पुढचे ५ किमी अंतर चालताना आम्ही जे जे काही अनुभवले ते गाडीच्या सरळसोट प्रवासात नक्कीच उमगले नसते. जाताना लागणाऱ्या द्राक्षाच्या बागा, ज्वारी, मिरची, कांदा,हरभऱ्याची शेते अन बरच काही.... ते पुढच्या भागात. 

तोपर्यन्त सायकलचे मागचे सीट पकडून ठेवा आणी तयार व्हा राजदेहेरच्या सफरीसाठी !प्रकाशनाच्या वाटेवर....
सातमाळा सप्तदूर्ग : हातगड
सातमाळा सप्तदूर्ग : धोडप
सातमाळा सप्तदूर्ग : मार्केंडेय
सातमाळा सप्तदूर्ग : सप्तशृंगी
सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर
सातमाळा सप्तदूर्ग :कोळधेर