गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

काळू धबधबा अवरोहण आणि माकडनाळ चढाई

काळू धबधबा अवरोहण ( म्हंजी मऱ्हाठित काळू वॉटरफॉल रॅपलिंग )  

खिरेश्वर - काळू धबधबा अवरोहण - वाघ्याची वाडी - व्हालीवरे - माकडनाळ चढाई - हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाज्याने उतरून खिरेश्वर.

                   

ट्रेकिंग चालू केल्यापासून काही दुर्गवाटा वाचून माहित होत्या पण त्यांच्या वाटेला जायचा योग नव्हता आणि खरेतर धारिष्ट्य हि नव्हतं. "आपल्याला जमायचं नाही" म्हणून ह्या वाटा कधी बकेट लिस्ट मध्ये नव्हत्याच. नियमित भटकंतीने जरा कॉन्फिडन्स का काय म्हणतात ते वाढल्याने अश्या वेगळ्या वाटा ढुंढाळण्याचा प्रयत्न सुरु केला. या "आपल्याला जमायचं नाही" लिस्टमधल्याच दोन गोष्टी म्हणजे काळू धबधब्याचे १२५० फुटाचे अवरोहण आणि हरिश्चंद्रगडाच्या सोळा वाटांपैकी अवघड अशी माकडनाळेची चढाई. डोंगरदेवांचा आशीर्वाद लाभला आणि दोन्ही गोष्टी आपसूकच पूर्ण झाल्या. 


सोमवारची सुट्टी टाकून मंडळी शनिवारी रात्री खिरेश्वरला पोहोचली. प्लॅन होता - खिरेश्वर - काळू धबधबा अवरोहण - वाघ्याची वाडी - व्हालीवरे - माकडनाळ चढाई - हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाज्याने उतरून खिरेश्वर. सकाळी सकाळी रॅपलिंगची आभूषणे घेऊन आडराई जंगलाच्या वाटेने काळू धबधब्याच्या तोंडाशी पोहाचलो. आयोजकांनी रॅपलिंगचा सेटअप लावूपर्यंत फोटो-बिटो भंकस झाली आणि मग सुरु झाला अस्सल थरार! कमरेला हार्नेस, त्याला बांधलेली मेनलाईन आणि बिलेची दोरी, पाठीवर भल्यामोठ्या सॅक, तोंडावर "घाबरले नसल्याचे अविर्भाव" आणि पोटात उठलेला  गोळा असे सगळे घेऊन पहिल्या टप्प्याचे  ४५० फुटांचे अवरोहण सुरु झाले. मावळे मोठ्या मानाने दुसर्यांना "जा तू आधी" म्हणून संधी देत होते ( जेणेकरून दुसऱ्यांचे पाहून थोडा धीर एकवटता येईल. ). गणरायाचे नाव घेऊन अवरोहणाला सुरुवात केली आणि दोन पाय कातळाला समांतर ठेऊन, उजव्या हाताने रोप सोडत खाली उतरायला सुरु केले. आधी 'अलंग' आणि 'कांचन' सुळक्यावर रॅपलिंग केले असल्याने पंधरा - वीस फूट खाली ठीकठाक उतरलो आणि जसा पाय टेकवता येणारा कातळ संपला आणि ओव्हरहँग चालू झाला तत्क्षणी आपल्या हिंदू संस्कृतीतील तेहेतीस कोटी देवता क्षणात डोळ्यासमोर दर्शन देऊन गेल्या. जी काही टरकली होती त्याची तुलना कशाशीही नाही. खाली बघता खालची माणसे मुंग्या एवढी भासत होती. भरीस भर ओव्हरहँग मुळे हवेत गोल-गोल फिरायला लागलो तेव्हा तर जी काय तंतरली म्हणता! तो अनुभव विसरणे शक्य नाही!


पहिला ४०० फुटी टप्पा अवरोहण करून खाली आल्यावर मात्र चांगला आत्मविश्वास वाटायला लागला आणि पुढचे चार टप्पे उतरायला त्याची फार मदत झाली. जसे जसे अवरोहणाचे तंत्र जमू लागले तशी मात्र मजा यायला लागली. दुसरा टप्पा उतरताना मध्ये उभं राहायला चांगली जागा होती त्यामुळे तो सोपा वाटला. तिसऱ्या टप्पा उतरताना असाच ओव्हरहँग वर गोल-गोल फिरायला लागलो तेव्हा मात्र आजूबाजूचा निसर्ग छान  न्याहाळता आला. सह्याद्रीच्या अश्या कडे-कपारी जेथून फक्त पाण्याला आणि वाऱ्याला जायची मुभा आहे त्या वाटेने आमचा स्वप्नवत प्रवास चालू होता. चौथा टप्पा वाकून खाली बघितले तर मोट्ठे खोल असे तळे. आपण त्या तळ्याच्या शेजारी उतरतो आणि चार टप्प्यांच्या अवरोहण परिश्रमाचे श्रमपरिहार करायला पाण्यात डुबकी मारायची. निव्वळ कमाल असा अनुभव.  


पाच टप्पे उतरून जेव्हा काळू धबधबाच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला निघालेले. येथून तासा-दोन तासांची चाल करून थिटबी गावाच्या जवळ पोहोचलो. येथून पुढे एक डोंगर चढून वल्हीवरे नावाच्या गावात मुक्कामी जायचे होते. संधीप्रकाशात माकडनाळेचा शेंडी सुळका विलोभनीय भासत होता. अंधार पडल्याने  वल्हीवरे गावात चालत जायचा प्लॅन रद्द करून गाडीने वल्हीवरे पोहोचलो. वाटाड्याच्या घरी आज रात्रीचा मुक्काम होता. तांदुळाची भाकरी, रस्सा, लोणचे पापड असा फक्कड बेत झाल्यानंतर दारात येऊन बसलो. घराच्या दारात बसल्यावर समोर पहिला दिसतो तो म्हणजे हरिश्चंद्राचा कोकणकडा. दारातून कोकणकडयांचे अजस्त्र रूप तिन्ही त्रिकाळ दिसावे म्हणजे '"श्रीमंती" यापेक्षा वेगळे असे काही नसावे!' 


आजचा अविस्मरणीय अनुभव डोळ्यात साठवून मंडळी निद्रादेवीच्या स्वाधीन झाली. उद्याचे लक्ष्य होते - माकडनाळेने हरीशचंद्र गडाची चढाई. 


























वाचत राहा ... 

अभिप्राय कळवत राहा..