सह्याद्रीच्या घाटवाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सह्याद्रीच्या घाटवाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ मे, २०२५

उंबर्डी - देवघाट - धामणओहोळ - निसणीची वाट - उंबर्डी

 रविवारची भटकंती : उंबर्डी - देवघाट - धामणओहोळ - निसणीची वाट - उंबर्डी 


मार्ग :  उंबर्डी - तळाचे पाणी - तलाव अवशेष - चौऱ्याची नाळ चढाई - सातनाळ व्हयू पॉईंट - पाण्याची टाकी - दुर्गाडीची नाळ चढाई - धामणओहोळ विहीर - मुंबई पॉईंट - निसणी वाट उतराई - तळदेव - कोळीवाडा अवशेष - हेमांडपंथी मंदिर उंबर्डी - उंबर्डी  [ १७ KM ] 



मागील आठवड्यात देवघाट करायचा ट्रेकभिडूंचा प्लॅन झाला आणि बरेच वेळा कुर्डुगडाच्या घेऱ्यात जाऊनही आपण कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष पाहिले नाहीयेत याचा साक्षात्कार झाला. या भागातले एवढेच काय ते पाहायचे राहायले आहे असे आजपर्यंत वाटत होते. ट्रेकला लागलीच नाव नोंदवून टाकले आणि नकाशावर वाटा शोधू लागलो. आंतरजालावर थोडेकाही उपलब्ध लेख वाचताना, सातनाळ, चांदीचा होळ , व्हाव्हळाची धार, मंडप , खालचा रहाट, वरचा रहाट , तळच पाणी, तलाव , माडाची नाळ, धामणाची नाळ , कल्कीची पट्टी , दीपाचे रान असा अगम्य नावे असलेला भलामोठा खजाना मिळाला. एका ट्रेकमध्ये एवढ्या गोष्टी बघायला आहेत म्हंटल्यावर उत्सुकता अजूनच वाढली आणि "हा भाग झालाय" या भ्रमाचा भोपळा फुटला. 

भल्या पहाटे तीन वाजता काही अमानवीय वाटावी अशी टाळकी ताम्हिणी घाटाने उंबर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली. सकाळी सहा वाजता गावात पोहोचून वाटाड्या काकांना जोडीला घेऊन लिंग्या घाटाचा रौद्र असा प्रपात ज्या प्रवाहातून मार्गस्थ होतो त्याच्या कडेने चौऱ्या डोंगराला डोळ्यासमोर ठेवत चौऱ्याची नाळ पकडली. दोन दिवसाच्या पावसाने दमटपणा शिगेला पोहोचला होता. झाडाचे पानही हालत नव्हते अश्या वातावरणात चौऱ्या नाळेची चढाई चालू झाली. जसे जसे नाळ चढून वर जात होतो तसे घामाने बादल्या भरत होत्या. 

                      

देवघाटाच्या दिशेने वाटचाल चालू 


वाटेत एक बारमाही पाणी लागते त्याला "तळाचे पाणी" म्हणतात. येथूनच पुढे काही अवशेष आहेत त्यास "तलाव" म्हणतात. येथे चौकोनी दगडाचे पडझड झालेले काही अवशेष दिसले. येथेच सुंदर कोरीवकाम केलेला पण भग्न अवस्थेतला मोठा नंदी होता. समोरच पदके मंदिर आणि त्यात पाचोळ्यात लपलेली शिवपिंड दिसली. आजूबाजूला अनेक वीरगळ आणि सतीशिळा पाहून तत्कालीन वैभव काय असावे या विचारात पडलो. असे कित्येक अवशेष आपल्या श्रेष्ठ सनातन संस्कृतीचे मूक साक्षीदार आहेत. 

तळच पाणी 

तलाव येथील पुरातन अवशेष 

एकदाचे कसेबसे पठारावर पोहोचलो आणि सातनाळ व्हयू पॉईंटला गेलो. संपूर्ण पठार हिरव्यागार गवताने बहरले होते. जणू पावसाळ्याचा ट्रेक असावा असे दृश्य ! 

                 

चौर्या पठारावरून दिसणारे दृश्य 

चौऱ्या पठारावरून आता चौफेर नजारा खुलला होता. खाली लांबवर उंबर्डी पाहून आपण दोन तासात एवढे चालून आलो याचा आनंद झाला. दक्षिणेला कुर्डूगड आणि त्यामागे लांबवर पसरलेली घोळ येथील डोंगररांग. मागे उत्तरेला गेलो तर डोळे विस्फारतील असे दृश्य! वाटाड्या काकांनी एक एक वाट आणि ठिकाण सांगायला चालू केले. आजपर्यंत ऐकलेले वाचलेले अगम्य नावे असलेली ठिकाणी आता अशी समोर पाहत होतो. खरगोलीची नाळ, माडाची नाळ, मंडप, त्याखालील तवी, चांदीचा होळ , कल्कीची पट्टी समोर दिसत होती. मंडपाला जायचा रस्ता सतनाळेतून मोडला असल्याने अजून कुठल्या मार्गाने जात येईल याची चाचपणी चालू होती. अश्या सात नळामधून खळाळत येणारा प्रवाह आणि आणि त्यात लिंग्या घाटाचा प्रपाताचा प्रवाह म्हणजे पावसाळयात येथे कहर पाणी असेल या विचारानेच पोटात गलबला आला. 

सातनाळ दृश्य 


सातनाळ दृश्य पाहून पश्चिमेकडे आलो. येथे कोळीराजाची ऐकीव कहाणीतली भांडी कुठे मिळायची याची जागा सोपानकाकानी दाखवली. कुर्डुगडाच्या पंचक्रोशीत जर कोण घरी लग्नकार्य असेल तर त्या घरची मंडळी चौर्याच्या समोरच्या डोंगरावर जेथे आधी गुहा होती तेथे येईल कोळीराजाला साकडे घालायची, लग्नकार्यात काही कमी पडू नये म्हणून पण-सुपारीचा मान ठेऊन कार्यासाठी लागणारी भांडी मिळोत या आशेने निघून जायची. दुसऱ्या दिवशी परत येताच त्यांना तिथे गुहेच्या दरवाजापाशी भांडी ठेवलेली मिळायची. ती घेऊन जाऊन कार्य आटोपले कि हि मंडळी ती भांडी पुन्हा गुहेपाशी आणून ठेवायची. वर्षानुवर्षे हे चालू होते असे म्हणतात. नजरचुकीने जर कुठले भांडे राहिले तर कोळीराजा स्वप्नात येईन त्याची आठवण करून द्यायचा असे काका आवर्जून म्हणाले. पुढे कडा कोसळून तिथे असलेला दरवाजा बंद झाला म्हणतात. आजही तिथे अमावास्येला ताशा नगाऱ्यांचे आवाज येतात असे ऐकले. अश्या ऐकीव कहाणीवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कोकणात जसे राखणदार असतो तसे डोंगरदऱ्यात हि नक्की कुठले तरी अनामिक डोंगरदेव असावे हे नक्की! 

                   

डोळ्यासमोरच्या सुळका दिसतोय तेथे पूर्वी दरवाजा होता आणि तेथे भांडी मिळायची.. 


                   

दुर्गाडीची नाळ चढाई 


हे सगळे पाहून चौऱ्यावरील पाण्याच्या टाकीपाशी आलो आणि पेटपूजा करून घेतली. समोर कोरडेठक्क पण तेवढाच रौद्र 'लिंग्या घाट' दिसू लागला. येथून आता दुर्गाडीच्या नाळेने घाम पुसत चढाई सुरु झाली. खतरनाक गचपणातून वाट काढताना 'बरे झाले वाटाड्या घेतला' असे वाटले. Gpx वर शक्यच झाले नसते. बारा वाजता मंडळी घाटमाथ्यावर पोहोचली. 

चौऱ्यावरील पाण्याची टाकी 

                 

दुर्गाडीची नाळ माथा 


एव्हाना आकाश भरून आले होते. धामणओहोळ येथील विहिरीपासून वाट वळवून , करवंद चाखीत मुंबई पॉइंटला पोहोचलो. कुर्डुगडाच्या डोक्यावर काळ्या ढगांनी केलेली गर्दी आज आम्हाला ट्रेकमध्ये अंघोळ घालणार या तयारीने निसणीच्या वाटेने उतरायला चालू केले. सर्व भिडू चालायला ताकदीचे असल्याने तासाभरात निसणी उतरून तळदेव करून खालच्या रहाटाला पोहोचलो. येथेही पुरातन वाड्याचे अनेक अवशेष पहिले. चार-पाच वाड्यांचा समूह असावा. प्रत्येक पडलेल्या दगडांवरही इंटर-लॉकिंग साठी खाचा पाहून स्तब्ध झालो. हे असे काम करायला कोणता इंजिनियर आला असावा?  थोडेसे खाली वाड्याकडे येणाऱ्या मार्गावर पायऱ्या दिसल्या. पालापाचोळ्यात लपलेल्या एका दगडाचे शिल्प बघितले असता "शरभ" शिल्प दिसले. शेजारीच अजून एक देवतेचे शिल्प पाहून येथे मुख्य कमान असावी असे वाटून गेले. 


निसणीच्या वाटेने उतराई 

शिवमंदिर, उंबर्डी 


तत्कालीन वैभवाचे आता उरलेले भग्न अवशेष पाहून उंबर्डीचा रस्ता धरला. अजून तासाभरात गावातील हेमांडपंथी शिवमंदिरात आलो. फोटो काढून अंघोळीला विहिरीवर जातो तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. भर पावसात विहिरीवर अंघोळ करून हौस भागवून घेतली. सोपानकाकांना त्यांची बिदागी सुपूर्त करून पुण्यनगरीचा रस्ता धरला. अजून एक सुंदर अशी भटकंती आयुष्याच्या बेरजेत जमा झाली. 


सागर शिवदे

                                          

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

वारसदार घाट - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट

घामाचेही बाष्प होईल अश्या रणरणत्या उन्हातील भटकंती : 


तैलबैल - वारसदार घाट उतराई  - कोंडगाव - ठाणाळे - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट चढाई - तैलबैल  [१९ KM ]


तैलबैल हा आपला आवडीचा परिसर. कधी काळी एकट्याने बाईक हाणत मी कित्येकदा इथे येऊन आभाळाला भिडलेल्या दोन जुळ्या भिंती पाहून प्रत्येकवेळा अवाक होत असे. या खड्या पाषाणाच्या गूढरम्य भिंती न जाणो कधी काळापासून घाटमाथ्यावर कपाळास टिळा लावावा तश्या मिरवत असाव्यात. या अजस्त्र उंचीच्या कातळभिंतींचा रक्षिता भैरवनाथ आपले ठाणे येथे मांडून या जगाचा संसार तेथून चालवत असावा असे कायम मला वाटायचे.  याआधी दोन वेळा ठाणाळे लेणी एकट्याने शोधायचा निष्फळ प्रयत्न करून तैलबैलचे फोटो काढून गेलो होतो. तैलबैल वरून कोकणात उतरणाऱ्या वाटांपैकी वाघजाई , सवाष्णी आधी झाले होते तर मागील वर्षी एप्रिलच्या रणरणत्या उन्हात घोडेजिन आणि भोरप्याची नाळ / वाघुरघळ केल्या होत्या. सलग महिनाभर, भर  उन्हामध्ये भटकून रापलेली स्किन आता अजून रापू शकत नाही या साक्षात्काराने परत आज तैलबैल कडे मोर्चा वळविला. आज योग आला होता बरीचशी अपरिचित अशी वारसदार किंवा सालतर नाळेचा. 


मागच्या आठवड्यात भोजगिरी वरून ढगांची चादर पांघरून बसलेल्या माळशेज घाटाचा नजारा बघून मन तृप्त झाले होते. वैशाख वणवा अनुभवायचा म्हणजे सुधागड जवळचा एरिया बेश्ट! घामाच्या धारांनी निथळत वाघुरघळ चढताना जी काही अवस्था झालेली होती ती आठवत आज परत रात्री नऊला निघून तैलबैल च्या दिशेने प्रस्थान ठेवले. बारा वाजता गावात पोहोचून गावातील मारुती मंदिरात पथारी पसरली. मागील वर्षी याच मंदिरात झोपलो असताना पहाटे एका काकूंनी आम्हाला जणू पुनर्जन्मच दिला होता. तो कसा काय? मग हे वाचा - 

=================================================================

"रुपेश , ए रुपेश ऊठ रे जरा ! त्यो बघ तिथे एक साप आहे घोणस असावी बरं ती! ती माणसे झोपलीयेत तिथे. मार जा तो ! ती माणसं घाबरतील " 

या काकूंच्या एका वाक्याने तैलबैल गावातील मारुती मंदिरात घोरणाऱ्या ट्रेकर्सची झोप तीन ताड उडाली. पहाटे साडे चारची किर्रर्र वेळ. रुपेशने शांतपणे  "काय शिंची कटकट ए! " अश्या अविर्भावात उठून हातात दंडुका घेऊन सापाला पुढच्या दिड मिनिटात यमसदनी धाडले आणि पुन्हा निद्रादेवीची आराधना करण्यास सुरुवात केली. " मेला व साप झोपा तुम्ही!" - इति काकू. 

झोप उडालेली ट्रेकर मंडळी कधी नव्हे तो "आज लवकर ट्रेक चालू करू" म्हणत आवरायला लागली.

=================================================================

आज परत असाच सिन नको म्हणून मंदिराच्या आतमध्ये झोपलो. थंडगार वाऱ्याची झुळूक येत-जात होती. पहाटे पाच ला उठून अबरते घेतले आणि हापस्यावर जाऊन पाणी भरून दिवसभराच्या पायपिटीस सिद्ध जाहलो. 

आजचा प्लॅन होता वारसदार घाटवाटेने कोकणात कोंडगाव येथे उतरून ठाणाळे लेणी बघून वाघजाईने वरती तैलबैल येथे यायचा. वारसदार वाट आम्हाला नवी असल्याने आणि स्थानिकही वापरीत नसल्याने तिथे चुकामुक होण्याची शक्यता होती. पण ज्या gpx फाईलच्या जीवावर  मंडळी निघायच्या तयारीत होती त्या gpx सिग्नल ने असहकार पुकारला. रेंज नसल्याने gpx कोऑर्डिनेट्स मिळत नव्हते. मग काय, सकाळी सहा वाजता गावात दारे ठोठावत वारसदार वाट दाखवायला येणार का विचारपूस सुरु केली. गावातील बोडके नावाचं काका एकदाचे नाळेच्या तोंडापर्यंत दाखावयास यायला तयार झाले आणि आमची पालखी एकदाची हलली. 


वारसदार नाळेच्या तोंडाशी आलो तेव्हा समोर बघताना आजूबाजूचा परिसर डोळ्यात मावत नव्हता. सकाळचे शुचिर्भूत वातावरण, आंब्याला आलेला मोहोर, पाठीमागे अवाढव्य पसरलेला सालतर डोंगर.  सालतर डोंगराच्या आडून  उगवणारे सूर्यदेव. वाळलेल्या गवताच्या पात्यांवर कोवळे किरण पडल्यावर चमकणारे गवताचे भाले. पळसाच्या झाडावर चढलली पिवळेधमक तोरणं. डोळ्यासमोर आकाशात उठवलेला सरसगड, उजवीकडे अनघाईचे डोंगर आणि खाली कोकणात आपले आजचे टार्गेट कोंडगाव धरण.  नाळेत घुसलो आणि मोठ्या मोठ्या दगडधोंड्यानी आमचे स्वागत केले. पाचच मिनिटात घामाचे थेंब चेहेऱ्यावरून टिपटिपू लागले. दोन तासांच्या उतराई मध्ये फक्त दगडधोंडे तुडवत चालत होतो. मान वरती करायचीही संधी या नाळेने दिली नाही. मोठा रॉकपॅच लागला कि कडेने ट्रॅव्हर्स शोधायचा आणि चालत राहायचा असे करत साडे तीन तासांनी ठाकरवाडी पोहोचलो. येथूनच एक वाट अनघाई किल्ल्याला जाते. ठाकरवाडी मध्ये पेटपूजा करून समोरच्या डोंगरच्या धारेने ठाणाळे गावाच्या रस्त्याला लागलो. 

वारसदार घाटाची उतराई 


मोठ्ठाले रॉक पॅच 


कोकणातली दमट हवा आता चांगलीच झोंबू लागली होती. घामाच्या बादल्या भरतील एवढा घामेघूम झालो होतो. सहा लिटर पाणी घेतले होते त्यातच अर्धे इथपर्यंतच संपले होते. काकडी, चिक्की , टोमॅटो इत्यादी मंडळींनी पाठीवरून पोटात बदली करून घेतली. डोक्यावर भर बाराचा जळता सूर्य घेऊन वाघजाईची चढाई चालू केली. 


धबधब्याच्या वाटेने उतराई 


येथे आता खाली ठाणाळे गावात उतरलो तर अतिरिक्त पायपीट वाढणार होती म्हणून वाघजाई घाटाचा रस्त्याला लागायच्या उद्देशाने मधूनच माथ्यावर चढाई केली आणि वाघजाईच्या वाटेला लागलो. हे मधूनच वाट नसताना घुसणे आजूबाजूच्या करवंदांच्या आणि काटेरी झुडुपांना रुचले नसावे. त्यांनी आमच्या हातावर, डोक्यावर त्यांच्या काटेरी सह्या करायला सुरुवात केली. याचा एक फायदा मात्र झाला तो असा कि, झाडीत लपलेले एक हरीण उडी मारून बाहेर आले आणि काही कळायच्या आत गुडूप झाले. येथे जर एक हरीण आहे, म्हणजे कुठेतरी कळप असणारच या विचाराने जोमात निघालो पण नंतर कुठे हरीण दिसले नाही. वाटेत दोन कातकरी भेटले त्यांनी वाट बरोबर असल्याचा दुजोरा दिल्यावर चढाईचा वेग वाढवला. अर्धा वाघजाई चढून आल्यावर एका ठिकाणाहून उजवीकडे वाट ठाणाळे लेण्यांकडे जाते. gpx वर हा स्पॉट नक्की करून आडवं चालायला सुरुवात केली. तासाभरात ठाणाळे लेण्यांपाशी पोहोचलो. एवढ्या दुर्गम ठिकाणी इतक्या सुरेख लेण्या छिन्नी हातोड्याने कोरणाऱ्या अनामिक हातांना मनोमन दंडवत घालून परतीची वाट धरली आणि वाघजाई घाटाला लागलो. 


ठाणाळे लेणी 





तीन मिनिटात वाघजाईच्या स्पॉट ला आलो आणि भर उन्हात दोन वाजता कोकणातला उष्मा सहन करीत चढाई चालू झाली. पाण्याची कमतरता जाणवू लागली होती आणि आता फक्त एक लिटर पाणी शिल्लक होते. वाघजाईच्या ठाण्यापाशी पाणी आहे असे कळले होते पण सापडू शकले नाही. दार दहा मिनिटांनी बसत एकदाचे काय ते तीन वाजता वाघजाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. डोंगरांच्या कुशीतील अश्या वाटांचे रक्षण करणाऱ्या या डोंगरदेवांना हात जोडून माथ्यावर आलो आणि गावाचा रस्ता धरला. 


वाघजाई घाट 


सकाळी साडे सहा ला सुरु केलेला ट्रेक साडे तीन वाजता संपला. जवळपास १८ किलोमीटर्स चाल झाली होती. हापस्यावर अंघोळ करून लगेच गाडीला स्टार्टर मारला आणि कुठेही खाण्यापिण्यात वेळ न दवडता सातच्या आत घरात! अवघ्या ३८५ रुपयात असा फाडू ट्रेक संपन्न जाहला!


शेवटी काय तर ... तू रख यकीन बस अपने इरादों पर ........  तेरी हार तेरे होसलों से बडी नही होगी ! 

असो! फोटोंचा आनंद घ्या!











गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

एक दिवस : चार घाटवाटा -

कोथळीगडाच्या पदरातील अनवट घाटवाटा

मेचकरवाडी -> आंबेनळीचा झुरा  चढाई ->

बैल घाटातील बारव -> चिंचेचा दारा - उतराई  -> बर्फाचा ओहोळ - चढाई ->  घळीची वाट / किल्ल्याची वाट - उतराई



बैलघाटातील सेम फ्रेम पुन्हा पाच वर्षांनी . 

आंब्याचा झुरा 


आंबेनळीचा झुरा  चढाई 

आंबेनळीचा झुरा  चढाई 

कोथळीगडाच्या माचीवरून दिसणारा कौल्याची धार 

सूर्योदय 

बैलबारव दिशेने वाटचाल 


 बैल घाटातील बैलबारव 


बैलघाट 

चिंचेचा दारा उतराई 

पाण्याचा एकमेव स्रोत 

बर्फाचा ओहोळ चढाई 


मागे कोथळीगड 


कामधेनू : हे असे चित्र बघायला मिल्ने म्हणजे भाग्यच ! 

किल्ल्याची वाट / नळीची वाट उतराई 



शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

घाटवाटा भटकंती : आग्याची नाळ - फणशीची नाळ

एकलगाव - फणशीची नाळ उतराई - आग्याची नाळ चढाई - एकलगाव 


                  

फणशीची नाळ 


रामराया जन्मला त्या टळटळीत , आग ओकणाऱ्या उन्हात आग्या नाळेची चढाई चालू होती. सूर्याच्या उष्णतेने दगड अन दगड तापवलेल्या आग्या नाळेच्या पोटातून पुढे सरकण्याची इंच-इंच लढाई चालू होती. समूहातील मंडळी लांबपर्यंत पांगली होती आणि त्यांना दिलेल्या हाकाऱ्या परावर्तित होऊन दुमदुमत होत्या. इलेक्ट्रॉल, काकड्या संत्री इत्यादींची आवर्तने करून उसनी एनर्जी एकवटून मंडळी पायाखालील प्रत्येक दगड तपासत मान खाली घालून मार्गक्रमण करीत होती. सुमारे आठशे मीटरच्या चढाईत उष्णतेने दमटपणाने कस पाहिला होता. दूरवर नाळेच्या मध्यभागी वर्षानुवर्षे भक्कमपणे तळ ठोकून बसलेले उंबर आणि आग्या नाळेच्या कड्यांवर बेमालूमपणे लटकलेली आज्ञा माश्यांची पोळी हि सगळी आमची करामत बघत असाव्यात. दोन तासांच्या चढाईनंतर कसेबसे उंबरापर्यंत पोहोचलो तोच बाकीच्या गाड्यांसाठी थांबलेल्या वाटाड्याने पुढे जाऊ नका म्हणून गलका केला. येथूनच आता पायाचे फक्त पुढचे पाऊल ठेवता येईल आणि ते घसरले तर उजवीकडे असलेल्या घळीत समाधीस्थ होता येईल अशी काहीशी घसाऱ्याची एक वाट कमी वेळात एकलगावात नेईल म्हणून ते पकडायचे ठरले. नाळेतून तसेच पुढे गेलो तर सिंगापूर गावाच्या अलीकडे निघून पाच किलोमीटर्स वाढतील हे शब्द ऐकून मंडळी तयार झाली काट्याकुट्याच्या वाटेतून दोन हात चालवीत आणि उरलेले धैर्य एकवटून एक एक भिडू घसारा, रणरणते ऊन आणि चढाई अश्या तीन गोष्टींशी झुंजू लागला. 



एकलगावं वरून दिसणारा नजारा . लिंगाणा आणि मागे रायगड 

             

                                                                                            फणशीची नाळ उतराई 


हे सगळे क्रमप्राप्त होत असताना निसर्ग रानावनातून वसंताच्या चाहुलीने मोहरलाआहे. रात्री छोट्या होऊन दिवस हळूहळू मोठे होऊ लागले आहेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. एकलगावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय. काटेसावर भडक अश्या फुलांचा जिरेटोप घालून बसलाय तर अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. येथील एक अन एक वाट तुडवीत स्वराज्याचे मावळे स्वराज्याच्या पंढरीत, स्वराज्याच्या विठूमाऊलींचे दर्शन साक्षात श्रीमान रायगडी घेण्यासाठी कोणे एके काळी पोहोचले असतील. रायगड प्रभावळीतील अनेक वाटांचे आणि तेथील वाड्यांमध्ये वसलेल्या सह्याद्रीपुत्रांचे नशीब किती थोर असावे ज्यांना तिन्ही त्रिकाळ रायगडावरील देवाचे दर्शन घडत असावे. आग्या नाळ, फणशीची नाळ, बिंब नाळ, जननीची नाळ, फडताळ नाळ, तवीची नाळ, भिकनाळ , बोराट्याची नाळ अश्या अनेक देशावरून कोकणात उतरणाऱ्या नाळा, त्यांच्या संरक्षणासाठी भक्कम उभे ठाकलेले लिंगाणा, कोकणदिवा असे उत्तुंग दुर्ग रायगडाच्या घेऱ्यात उठावलेले डोंगर ते समोर कोकणदिव्याच्या जवळपास गायनाळ , बोचेघोळ , निसणी अश्या वाटा, काळ नदीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या सहयाद्रीच्या कड्यांचे रौद्रभीषण रूप आणि त्यांनी उजळलेले हे सह्याद्रीचे दुर्गवैभव. अश्या या सहयाद्रीतील पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


            
वाटेत लागलेला पाण्याचा डोह 


तत्पूर्वी, प्रातः प्रहरी मंडळी एकलगाव येथून वाटाड्या घेऊन निघाली आणि फणशीच्या नाळेने उतराई करण्यासाठी जननीच्या डोंगर माथ्यावर पोहोचली. आजपर्यंत मोहोरी गावातून दिसणारा सरळ धारेचा लिंगाणा आणि जिरेटोप दिसणारा रायगड पहिला होता. आज फणशीच्या नाळेतून लिंगाण्याचे आणि रायगडाचे वेगळे रूप पाहावयास मिळाले. ताम्हिणीतील कमलबॅक सारखा लिंगाणा भासत होता तर त्याखालील तवीच्या नाळेतील डोंगर रोहिदास वाटत होता. तासाभरात माथ्यावर पोहोचून जननी मातेच्या ठाण्याशी नतमस्तक होऊन फणशीच्या नाळेने ओढ्यात उतरायला चालू केले. सहयाद्रीच्या धारेवरून फणशीकडे जाताना एका ठिकाणी खाली कोकणपट्ट्याचे आणि जननीच्या नाळेचे दर्शन जाहले. फणशीच्या नाळेतून उतराई चालू झाली तसे चालण्याच्या वेग मंदावला. उतरताना त्यातल्या त्यात मोठा दगड बघून त्यावर पाय ठेवताच तो असहकार पुकारून जागेवरून विस्थापित व्हायचा आणि नाळेचा प्रसाद मिळायचा. ठराविक अंतराने असे प्रसाद घेत घेत पुढे चाललो होतो. फणशीच्या नाळेत गार्ड झाडी आणि जंगल असल्याने उन्हाची काही चाहूल लागली नाही. पूर्ण उतराई मध्ये फणशी नाळेने मान वर करू दिली नाही. सुमारे दिड तासात फणशीची नाळ उतरून आल्यावर खाली ओढ्यात पाण्याचा प्रवास सापडला. येथेच पेटपूजा करून पाठीवरची वजने पोटात ढकलली. नितळ स्वच्छ पाणी भरून त्याच ओढ्याच्या मार्गाने बिंब नाळ सोडून देत पुढे आग्या नाळेला लागलो. 


जननी देवीचे ठाणे 

पाण्याचा एकमेव स्रोत 




जननी देवीचे ठाणे फणशीची नाळ मार्गे 

आग्या नाळ चढाई 




चिरंजिवांच्या व्रतबंध सोहोळ्यामुळे दिड महिना ब्रेक झाला होता तो या घामाच्या बदल्या भरणाऱ्या ट्रेकने भरून काढला. सकाळी सात वाजता सुरु केलेली बारा किलोमीटर्सची भटकंती दुपारी चार वाजता एकलगावात शाळेपाशी पोहोचून संपली. विहिरीवर अंघोळ करून श्रमपरिहार झाला आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. 


असो, फोटोंचा आनंद घ्या