रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

निराधार वृद्ध महिलेसाठी मदतीचे आवाहन. 

माझ्या ओळखीच्या एक आज्जी नाव सुमन आज्जी वय ८०+ या निराधार असून त्यांना कोणीही पती अगर मुले नाहीत. त्या अवसरी खुर्द ,ता. मंचर येथे एका खाजगी मंदिरात राहत होत्या आणी देवीची पूजा व येणाऱ्या लोकांच्या मंदिरावर उदरनिर्वाह करत होत्या. 
१ जून रोजी सकाळी मंदिराशेजारील आजूबाजूच्या लोकांना त्या बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्यांनी तेथील डॉक्टरांना बोलावुन प्राथमिक उपचार केले. पक्षाघाताचा(ब्रेनस्ट्रोक)  झटका आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या माहित असलेल्या नातेवाईकांना फोन करून कळवले. आजींच्या कोणत्याही नातेवाईकाने त्यांची जबाबदारी न घेतल्यामुळे,व माझ्या बाबांच्या त्या काकू लागत असल्याने, माणुसकी म्हणून मी त्यांना अवसरी,मंचर येथून पुण्यात आणून दीनानाथ मंगेशकर येथे त्यांचे ब्रेनस्ट्रोक आजाराचे उपचार केले.
त्यानंतर त्यांना एका वृद्धाश्रमात ठेवले असता २५ जून रोजी त्या घसरून पडून त्यांचे खुब्याचे हाड मोडले. त्यांचे दीनानाथ मंगेशकर येथे "हिप रिप्लेसमेंट" चे ऑपरेशन करून सध्या त्यांना भूगाव येथील "सहजीवन" नावाच्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्या सध्या बेड-रिडन आहेत.
या आज्जीना पती अगर मुले कोणीही नसल्याने त्यांचे वरील दोन्ही वैद्यकीय उपचार मी केले आहेत.  त्यांच्या या दोन्ही उपचारासाठी आजपर्यंत सुमारे १,५०,००० रु खर्च केले असून वृद्धश्रमाचे चार्जेस दरमहा ११०००रु व औषधोपचार,डायपर असे १४००० रु मी सध्या भरत आहे.एकदा त्यांची जबाबदारी घेतल्याने त्या हयात आहेत तोपर्यंत हा खर्च करणे मला भाग आहे.
दरमहा हा खर्च करणे आता अवघड होत चालले आहे म्हणून सध्या काही ट्रस्ट, देवस्थाने  वा कोणाची मदत त्यांना मिळवून देता येईल का ते बघत आहे. यातून जी काही मदत मिळेल त्याने मला नक्कीच मोठा मदतीचा हात मिळणार आहे.
आपली कोणाची मदत करायची ईच्छा असल्यास,  थेट "सहजीवन" या वृध्दाश्रमाला तुम्ही या आजींसाठी मदत म्हणून देऊ शकता. वृध्दाश्रमाच्या नावाने चेक ( "Sahajeevan" या नावाने) देऊ शकता  वा अकाउंट ट्रान्सफर करू शकता. या केसच्या सत्यतेबाबत शंका असल्यास तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. हॉस्पिटलचे बिल,वृद्धाश्रमाचे बिल असे शक्य ते पुरावे मी देऊ शकेन.  याखेरीज कोणाला अश्या वृद्ध लोकांचे सोय होईल असे ट्रस्ट , आश्रम असे काही माहित असल्यास त्यांचे संपर्क वा तिकडचे कोणी ओळखीचे लोक त्यांचा संपर्क असे काही असल्यास ती सुद्धा एक मदतच असेल. कोणाला स्वतः त्या वृद्धाश्रमात जाऊन औषधें, डायपर अशी छोटी मदत करायची असल्यास ते स्वतः ही तेथे जाऊ शकतात. पत्ता व डिटेल्स मी देईन.
माझ्याकडे मदत देण्यापेक्षा थेट वृद्धश्रमास "सुमन शिवदे" या नावाने दिल्यास उत्तम होईल. मदत देताना मला कळविले तर मला नक्की किती मदत तिथे मिळतिये ते कळेल आणी तेवढा माझा भार हलका होईल. माझ्याकडे देण्याची ईच्छा आणी विश्वास असेल तर माझा नंबर 9975713494 असून तुम्ही PaytM/GPay  करू शकता.
आपली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याची रिसीट/पावती मी आपल्याशी शेअर करेन.
चेकवर नाव : Sahajeevan


माझा मोबाईल नं - ९९७५७१३४९४
सागर शिवदे

आभार !

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

जाता साताऱ्याला : केंजळगड, रायरेश्वर , धोम , मेणवली , वाई मेणवली

जाता साताऱ्याला : केंजळगड, रायरेश्वर , धोम , मेणवली , वाई

समाधी अवस्थेंत गेलेल्या या ब्लॉग ला आज परत थोडी नवसंजीवनी मिळाली आहे. कालची मस्त भटकंती आणि आजचा हापिसातला रिकामा दिवस असे योग नेहमी जुळून आले तर काय मजा येईल. अहाहा!

आठवड्याची कामे शनिवारी आटोपली आणि पावसाचे स्वागत करायला रविवारचे औचित्य साधून केंजळगड जाण्याचे ठरवले. आता तेथे चाललोच आहे तर आजूबाजूची चांगली ठिकाणे सोडायची कशी? मग ठरला असा प्लॅन.

कोथरूड -> नेकलेस पॉईंट भोर -> भोर राजवाडा -> आंबवडे येथील झुलता पूल आणि नागेश्वर शिवमंदिर -> केंजळगड -> रायरेश्वर -> धोम धरण आणी नरसिंह/शिवमंदिर -> मेणवली घाट -> वाई महागणपती - कोथरूड.

एक दिवसात एवढे सगळे म्हणजे दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखा. पहाटे ५:३० ला पुण्यनगरीतून निघून आरामात पोहोचलो नेकलेस पॉईंट. नीरा नदीच्या पाण्याचा अर्ध वर्तुळाकार प्रवाह पावसाळ्यात जेव्हा दुथडी भरून वाहतो आणी आजूबाजूचे हिरवेगार पठार म्हणजे केवळ लाजबाब !


नेकलेस पॉईंट भोर :


भोरला पोहोचलो. चहा घेऊन निघालो आंबवडे.  भोर राजवाडा अनेक वेळा पाहिल्याने आणी सध्या बंद असल्याने तो गेलो नाही. वाटेल दिसलेला विचित्रगड ( रोहिडा किल्ला). आधी जाऊन आल्यामुळे हा पण स्किप केला.
    


आंबवडेला पोहोचलो. रस्त्यावरच पंतसचिव वाडा आणी त्याला जोडणारा हा ३०० ते ४०० वर्ष्यांपुर्वी बांधलेला झुलता पूल ( सस्पेन्शन ब्रिज) दिसतो. त्याकाळी याच्या बांधणीस १०,०००/- रुपये खर्च झाले असल्याची नोंद आहे. यावरून चालत गेल्यास आपण पंतसचिव वाड्यात पोहोचतो. वाडा बंद असला तरी जाळीदार दारातून आत डोकावून पाहिल्यावर प्रशस्त असा वाडा, नैसर्गिक प्रकाशयोजना, आणी अर्धपुतळा आपले लक्ष वेधून घेतो.
हा झुलता पूल आणी पंतसचिव वाडा दोन्ही भोर विभागात संरक्षित वारसा मध्ये गणला जातात.


आंबवडे येथील झुलता पूल :


वाडा बंद होता . समोरच मोठाले पिंपळाचे झाड आणी त्याच्या खाली आजूबाजूला अनेक वीरगळ दिसल्या. येथूनच एक वाट खाली नागेश्वर मंदिराकडे जाते. आजूबाजूला निरव अशी शांतता, आंबे, फणसाची मोठमोठाली झाडे, मंदिरासमोर पडलेला आंब्यांचा सडा, पूर्ण दगडात कोरलेला नंदी, गाभाऱ्यात पुजारी काकांचा एक तालात चाललेला अखंड "ओम नमः शिवाय" चा जयघोष ऐकून हात आपोआप जोडले गेले.

दर्शन घेऊन प्रसन्न मनाने निघालो पुढच्या डेस्टिनेशनला.


नागेश्वर शिवमंदिर :

आंबवडेतून सुमारे अर्ध्या तासात पोहोचलो रायरेश्वर/खावली गावात. बसची वाट पाहत असलेल्या एक आज्जीना लिफ्ट दिली आणी थोडेसे पुण्य मिळवले. घाटरस्त्याने गाडी हाकत केंजळगडाचा फाटा दिसला आणी १० मिनिटात केंजळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

पायथ्याला असलेला गावात सुमारे १०-१२ घरे आहेत. शंभर जवळपास लोकसंख्या आणि जिल्हा परिषदेची प्रार्थमिक शाळा सुद्धा आहे. आज रविवारी 'मास्तर' आल्याने आज शाळेचा पहिला दिवस होता. सगळा बालचमू नवीन कपडे घालून. सगळे आनंदाने शाळेत आले होते. मंदिरापाशी गाडी लावून पोटपूजा करून घेतली आणी निघालो.

केंजळगड चढाई सुरु :


२५-३० मिनिटात उभा कातळ तासून बनवलेल्या पायऱ्यांपाशी आलो. पाऊस नसला तरी वातावरण मस्त झाले होते. ढगांनी सूर्यदेवाना झाकोळले असल्याने सर्वत्र सावली पसरली होती.

उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या.केंजळाई देवी मंदिर रायरेश्वराची टेहळणी 

सुमारे एक तासात किल्ला भटकून झाला. आता परतीचा मार्ग पकडला. अजून रायरेश्वर आणी वाई भटकंती बाकी होती.
  

केंजळगडाच्या पायथ्याच्या गावाशी शाळेपाशी गाड्या लावल्या होत्या. आज रविवार असूनही मास्तर शाळेत आले असल्याने आजही शाळा भरली होती. गावातली मंडळी सर्व कामे उरकून भोजनाच्या तयारीत गुंतले होते. एका घरात आम्ही पाठ-पिशव्या ठेवल्या होत्या त्या उचलल्या, लहानग्यांना थोडा खाऊ दिला. घरातल्या एक सदस्याने मध घ्यायचा का विचारलं, मग कळले की, त्यांनी मे महिन्यात पोळ्यातून मध काढून ठेवलेला आहे. उन्हाळा संपताना शक्यतो वर्षाचा मध काढतात. चव बघितल्यावर २ किलोची खरेदी झाली. 
" तुमच्या पुण्यात कुठे मिळायचा नाही असला मध, तिथे मिळते ते फक्त साखरेचे पाणी!"  
आता मात्र काका पेटायच्या आत निघाले पाहिजे. 

येथून निघून रायरेश्वराच्या कुशीत प्रयाण:नको तेथे रेलिंग, पेव्हर ब्लॉक्सची पायवाट केलेली, वरती हॉटेल्स, मंदिरात रायरेश्वराच्या दर्शनासाठी डोकं टेकवताच गुरवांची "दानाची" मागणी असे अनुभव घेऊन गप्प आल्यापावली निघालो. 


येथून एक वाट वाई कडे उतरते. आता या वाटेने पुढे धोम तलाव,धोम येथील नरसिंहाचे (नृसिंह-लक्ष्मी)  मंदिर, पुढे मेणवली व वाई. सुमारे २० मिनिटात नृसिंह-लक्ष्मी मंदिरात पोहोचलो. पेशवेकालीन हे मंदीर अजूनही उत्तम स्थितीत असून पुष्करणीची रचना म्हणजे एकमेवाद्वितीय आहे. कमळाच्या आकाराच्या पुष्करणीत कासवाच्या चौथऱ्यावर नंदी आसनस्थ आहे. संपूर्ण पुष्करणीचे कोरीवकाम लाजवाब. पुष्करणी च्या मधोमध कासव शिल्प आजपर्यंत कधी पहिले नव्हते. 

नृसिंह-लक्ष्मी मंदिर:


कासवरूपी पुष्करणी :


येथून पुढचा प्रवास तो म्हणजे मेणवली. स्वदेश, गंगाजल आणी असंख्य हिंदी/मराठी चित्रपटात तुम्ही हि जागा पाहिली असेलच. फक्त अशी वेळ साधायची की येथे आपल्याखेरीज कोणीही नसेल. संथ वाहणारी कृष्णामाई, निरव शांतता, पक्ष्यांचे रुंजन, शिवमंदिरात अवचित वाजणाऱ्या घंटेचा निनाद, झाडांची वाऱ्यासोबत चाललेली चुळबुळ,रम्य घाट, घाटाच्या पायऱ्यांवर येणाऱ्या पाण्याच्या लाटेचा मंद आवाज आणी संध्याकाळी आकाशाला आलेली केशरी झळाळी प्रतिबिंबित करणारी किरणे असे सगळे जमून आले की काही विलक्षण आनंदाची अनुभूती होते. 

या जागेचा इतिहास आणी संपूर्ण माहिती तुम्हाला अन्यत्र मिळेलच. नाना फडणवीसांच्या आठव्या पिढीने या वाड्याचे केलेले जतन केवळ कौतुकास्पद आहे. नाना फडणवीसांचा पुरातन वाडा आजही बघण्यास उपलब्ध असून तेथले सुरक्षारक्षक वा सदस्य आपल्याला आपुलकीने संपूर्ण वाडा दाखवतात. 

आम्ही गेलो तेव्हा नुकत्याच शाळा चालू झाल्या असल्याने शाळेतील मुलांना शालेय साहित्यवाटप चालू होते. पुण्याहून जाऊन स्वतःच्या खर्चाने समाजोपयोगी कामे करणाऱ्या त्या लोकांना अनेक आशीर्वाद नक्कीच मिळत असतील. एक सद्गृहस्थाने आम्हाला संपूर्ण वाडा दाखवला. सागवानी लाकडावरचे शिल्पकाम, छताला केलेल्या वेलबुट्टीचे लाकडी काम, शेण+मातीने लिंपलेल्या भिंती, अंगणात केलेले दगडी कारंजे सगळं काही निव्वळ इतिहासात घेऊन जाणारे!

आज कालपरत्वे केलेले उपाय पाहता पूर्वीच्या काळी या वाड्याने काय गतवैभव पहिले असेल याची प्रचिती येते. एकदा अवश्य भेट द्यायला हवी येथे. नक्की आवडेल अशी जागा आहे. 

मेणवली घाट : शिवमंदिर आणी नंदी :चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर तेथून आणलेली एक भलीमोठी घंटा येथे पाहावयास मिळते. पंचधातूची हि घंटा असून त्यावर सेंट मेरीचे शिल्प कोरलेले असून १७०७ साल कोरलेले आहे. 1534 मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या म्हणजे १ मीटर व्यासाच्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.

बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.

आजही या तीन  घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून  ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास  हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल.  तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात आहे असे ऐकले आहे. त्याखेरीज अजून २ घंटा पहिला मिळतात त्या म्हणजे -  थेऊरच्या गणपतिमंदिरातील घंटा, आणि मेणवलीमधील नाना फडणिसांच्या वाड्यामागील घाटावरली घंटा ह्या दोन्ही वसईच्याच आहेत.
या घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो. 

मेणवली येथील घंटा :


पूर्वी वसईच्या घंटा या विषयावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक :

आता उन्हे कलत चालली होती. अजून वाईच्या महागणपतीचे दर्शन घ्यायचे होते. १० मिनिटात वाई गाठून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा करून पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवले. मुबईकरांना ७:४५ ची शेवटची गाडी पकडायची असल्याने अजून कोठे न थांबता पुणे स्टेशन गाठले आणी एका भटकंतीची कहाणी सुफळ संपूर्ण जाहली . एक सत्कारणी लावलेला दिवस पुढच्या अनेक पोटासाठीच्या धावपळीची ऊर्जा देऊन जातो आज पुन्हा अनुभवल. 

असाच एक उनाड दिवस शोधा, तो तुम्हाला जगायचे का हे शिकवेल आणि निसर्गातली मौजमजा, आनंद हे सगळं बोनस!

काही छायाचित्रांचा आनंद घ्या! पूर्ण लोड होत नसतील तर क्रोम वापरा. 


वाचत रहा ! अभिप्राय कळवत रहा!

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

परमार्थात स्वार्थ : किल्ले नळदुर्ग

परमार्थात स्वार्थ : किल्ले नळदुर्ग

लेखाच्या शिर्षकावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, मंडळी कोठेतरी परमार्थ साधायला गेलेली आणी येता येता त्यांनी किल्ले नळदुर्गची दुर्गवेधी सैर ही पदरात पाडून घेतली.

हो तर झाले असे की, दोनाचे चार हात झाल्यापासून मंडळी कुलदेवतेच्या दर्शनास तुळजापूरला जाऊ जाऊ म्हणत २ वर्षे उजाडून गेली. आता जोडून आलेली सुट्टी त्याकारणी लावावी असे ठरल्यावर उस्मानाबादला जायचेच आहे तर किल्ले नळदुर्ग ही पाहता येईल असे वाटले.

आता उस्मानाबाद म्हंटल्या म्हंटल्या पहिला आठवला तो नळदुर्ग. एरवी उभ्या आयुष्यात मी कधी उस्मानाबादला जाईन असे मला देखील वाटले नव्हते.मला तो कायम अवर्षण ग्रस्त भाग वाटत आलाय. पण तेथे गेल्यावर दिसला तो कमाल असा हा भुईकोट किल्ला. ११४ दगडी बुरुज,  किल्ल्याच्या भोवतीने वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी प्रवाह बदलून किल्ल्यात घेऊन केलेला अद्वितीय पाणीमहाल व नैसर्गिक आणी अभेद्य तटबंदी असलेला या किल्याला भेट देणे म्हणजे मस्ट डू थिंग.


सकाळी ५ ला पुण्यनगरीतून जे निघालो ते सोलापूर हायवेच्या कृपेने ११ वाजता तुळजापूर. इतका मस्त रस्ता होता की टोलच्या पैशांचे दुःख नाही . :)  भिगवणला आल्यावर सूर्यदेवांनी आपण आल्याची वर्दी दिल्यावर त्यांना मान देणे साहजिकच होते.

तुळजापूरला पोहोचल्यावर नमस्कार, चमत्कार,जेवण  वैगरे आवरून १ वाजता मोकळा झाल्यावर मोर्चा वळवला नळदुर्ग किल्ल्याकडे. सकाळी निघताना नळदुर्ग होईल असे वाटले नव्हते म्हणून कॅमेरा घेतला नव्हता. त्यामुळे मोबाईल चे फोटो सांभाळून घ्या या वेळेस.


नळदुर्ग किल्ला म्हणजे गतकालीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. इ स. ५६७ च्या इतिहासात आपण क्षणात  जाऊन पोहोचतो.  इ.स. १३५१ ते १४८० मध्ये तत्कालीन बहामनी राजाने मातीचा हा किल्ला काळ्या बेसॉल्ट दगडांनी बांधून अभेद्य बनवला. आदिलशहाच्या काळात किल्ल्याच्या स्थापत्य रचनेत बदल झाले.

बोरी नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून, तो किल्ल्यातून खंदकातून फिरवून घेतला आहे. चारही बाजूंनी फिरवून घेतलेला नदीचा प्रवाह किल्ल्याला संरक्षण देतो तर त्याच्या जोडीला खंदकास लागून असलेली किल्ल्याची भक्कम दुहेरी तटबंदी आणि त्यासम शंभर एक बुरुज हे किल्ल्याला अभेद्य बनवतात. खंदकातील पाण्यावर बांध घालून बांधलेला पाणी-महाल हा म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अद्वितीय नमुना आहे. या बंधाऱ्याला आत जायला पायऱ्या आहेत. सुमारे ४ मजली असलेला हा बंधारा उतरून आत जाताच आपल्याला एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. "या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल." असा काही अर्थ त्या शिलालेलेखातून उमगतो. पावसाळ्यात जेव्हा या खंदकातून नर -मादी धबधबे जन्माला येतात, तेव्हा आपण पाणीमहालाच्या सज्ज्यात उभे असताना सज्ज्याच्या दोन्ही बाजूने ओघळणारे धबधबे पाहिले कि शिलालेखाचा अर्थाची खऱ्या अर्थाने प्रचिती येते. त्याकाळी या वास्तूने काय वैभव अनुभवले असेल असा विचार करतच आपण किल्ल्यात प्रवेशतो.

दुपारी ३ च्या उन्हात आम्ही नळदुर्ग पोहोचलो. २० रुपडे माणशी तिकिटे काढून किल्ल्यात शिरलो. आम्ही आणी सुरक्षारक्षक एवढेच काय ते किल्ल्यात उपस्थित होते त्यामुळे विदाऊट गर्दी किल्ला पाहता आला. ज्युनिअरची पहिलीच गडफेरी असल्याने त्यांना काखोटीला बांधून आमची मंडळी पायपीट करणार नसल्याने किल्ल्यात पर्यटनासाठी उपलब्ध बॅटरी वरच्या गाडीत माणशी ५० रुपडे देऊन आम्ही विसावलो. एक प्रायव्हेट कंपनी ला हा किल्ला चालवायला दिला असल्याने किल्ल्याची अवस्था चांगली होती. नवबुरुजाचे ( एक मोठ्या बुरुजाला ९ पाकळ्या आहेत) काम चालू असल्याने तिथे गेलो नाही तर मग पोहोचलो ते उपळ्या बुरुज आणि पाणीमहाल बघायला.

 मुख्य प्रवेशद्वार :


किल्ल्यात प्रवेश केल्यावर दिसणाऱ्या देवड्या.

एक मोठ्या बुरुजावरून पाणीमहालाचे दृश्य.

फोटोत दिसणाऱ्या बंधाऱ्यावरून जाऊन आपण पाणीमहालात उतरतो. उजव्या हाताला दिसतोय तो उपळ्या बुरुज. किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज.पाणीमहालाकडे जाताना :

वरती उल्लेख केलेली खंदकाची दुहेरी तटबंदी ती हीच. या दुहेरी तटबंदीतून आपण चालत खाली बंधाऱ्यावर उतरतो.

कमाल आर्किटेक्चर :

 
सुस्थित तटबंदी आणी बॅटरीची गाडी :
पाहीमहालातून घेतलेले दृश्य.
जास्तीचे पाणी बंधाऱ्यातुन वाहून पुढे नदीत जाते.


उपळ्या बुरुजाकडून मुख्य प्रवेशद्वारा कडे जाणारी भक्कम तटबंदी. या फोटोवरूनच किल्ल्याच्या अभेद्यतेची कल्पना येईल.


पाणीमहालाकडून उपळ्या बुरुज :

१५०-२०० पायऱ्या असाव्यात.

उपळ्या बुरुजावरून दिसणारा किल्ला परिसर :उपळ्या बुरुजावरील मगर-तोफ :  देवगिरी किल्लावर पाहिलेल्या मेंढा तोफेशी साधर्म्य वाटते.


बोरी नदीचा प्रवाह व दूरवर दिसणारा बुरुज. यावरून किल्ल्याचा आकार लक्षात येईल.उपळ्या बुरुजावरून दिसणारा धान्य / दारुगोळा कोठार.


पाणीमहाल, उपळ्या बुरुज पाहून परत येताना मध्ये एक बोटिंग स्पॉट आहे. किल्ल्यातील अडवलेल्या पाण्यात बोटिंगची सोय कंपनीने केली आहे. भर दुपारी साडे तीनच्या उन्हातही एक हौशी कुटुंब बोटिंग करत होते.


मशीद, बोटिंग स्किप करून परतीचा रस्ता धरला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बुरुजावर चढून तेथील हत्तीशिल्प पाहून पुण्यनगरीच्या दिशेने निघालो. वाटेत अक्कलकोट ला जाऊन स्वामी समर्थांचे आशिर्वाद घेऊन रात्री घरी पोहोचलो.

हत्तीशिल्प


पावसाळ्यातील नर-मादी धबधब्याचे विलोभनीय दृश्य.

( (आंतरजालावरून साभार )

 पॅनारॉमिक फोटो : वाचत रहा.
सोमवार, ७ जानेवारी, २०१९

२०१८! बॅक टू ट्रॅक
आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. अनुभवांच्या पाठपिशवीत बऱ्यापैकी भर पडली असं वाटतय. काही नवीन प्रसंग,आठवणी,काही लाईफ गोल्स व बरच काही. 
पूर्व भागात दिलेले मागच्या ४ वर्ष्यांचे लेख तुम्ही वाचले असतील तर मात्र सांगणे भाग आहे की या वर्षी ना बारीक झालो ना गोरा झालो. ( आधीच्या लेखातूनच हि लिंक लागेल. नाही लागली लिंक तरी काही फरक पडत नाही हो, चालुद्या !) 

तर, भटकायला सुरुवात केल्यापासून महिन्यात एकदातरी भटकायला निघायचे ठरवलेले आणी आज मागे वळून बघता बऱ्यापैकी साध्य झालंय. जेथे वर्षभरात जाऊन आलो त्याची फोटोरूपी झलक खास ब्लॉग वाचकांसाठी देतो आहे. नियमित वाचक असाल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की, मोठाले डिटेल भटकंती वृत्तांत लिहायचा उत्साह आता केव्हाच मावळून गेलाय. ललित लेख वैगरे तर आता सुचणे आणी खरडणे दोन्ही कष्टप्रद झाल्यात. आधी "जीवन" असा  म्हंटले की प्रतिभेला कसा मोहोर यायचा तर आता "जीवन" म्हंटल्यावर "कोणत्या फॉन्ट मध्ये खरडू साहेब?" अशी गटण्यासारखी स्थिती आहे सो आता फोटोब्लॉगनी तरी ही धग तेवत ठेवावी म्हणून हा प्रपंच. 

असो, सध्या फोकस जरा शिफ्ट झालाय. "एक पाय नाचिव रे गोविंदा" फेज आयुष्यात चालू आहे सो त्या आनंदात ह्या साहित्यिक भोग जरा बाजूला पडले एवढच. या वर्षी पुन्हा नवीन जोमाने लिहायचे ठरवलंय, बघू किती जमतंय. तुम्ही फोटोंचा आनंद घ्या, कोणती माहिती हवी असल्यास बिनधास्त विचारा आणी अभिप्राय कळवत राहा. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतय या विचारानेच लिहायचा उत्साह वाढतो. 


जानेवारी : ठाणाळे लेणी, तैलबैलायावर मागच्या वर्षी खरडलेला एकमेव लेख :

फेब्रुवारी : तोरणा किल्ला, वेल्हे मार्च : नळदुर्ग किल्ला, उस्मानाबाद
एप्रिल : कर्दे, दापोली मे : कुलाबा किल्ला - अलिबाग , पेण 


जुन : पाऊस सोहळा ( निळकंठेश्वर, वरसगाव )


जुलै : पाऊस सोहळा ( शिवनेरी , नाणेघाट)


 

ऑगस्ट: कुंडलिका व्हॅली , ताम्हिणी 

 

सप्टेंबर : सातमाळा सप्तदूर्ग ( कण्हेरगड, धोडप , अहिवंत किल्ला )

 धोडप 

कण्हेरगड

अहिवंत


ऑक्टोबर : राजगड, रामदरा-पुणे 
रामदरा :
पाबे घाट : राजगड
राजगड :

नोव्हेंबर : निजामशाहीत भटकंती (हैद्राबाद ) 

गोवळकोंडा किल्ला :

रामोजी फिल्म सिटी :
चारमिनार :

डिसेंबर: खानदेशी मुशाफिरी ( अंकाई - टंकाई , गाळणा , चौल्हेर )

  अंकाई - टंकाई :

किल्ले गाळणा :

चौल्हेर :

 

वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच क्षण लिहिता येतील असे नाही पण फोटोनी परत हवे तेव्हा जगता मात्र येतील म्हणून हा लेखनप्रपंच. 

तर मग भटकत रहा . कोठे जाऊन काय बघायला मिळेल यु नेव्हर नो!

चला, आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.


भेटत राहू …… वाचत राहा …