थरारक !!
नवीन वर्षाच्या भटकंतीची सुरुवात मस्त झाली. दरवेळी प्रमाणे नवीन वर्षाचा संकल्प सोडताना यावेळी जरा वेगळी कल्पना लढवायचा प्रयत्न केला गेला. तो असा की, दरवेळी ट्रेक ला जाताना व्यवस्थित प्लान करून सगळी सोय बघून घड्याळ्याच्या काट्यावर नियोजन असते त्या प्रकाराला फाटा देऊन नवीन प्रकार.
टोटल सोलीट्युड.
काहीही न ठरवता, कोणालाही बरोबर न घेता, डबा , पाण्याची बाटली इतकेच घेऊन काहीही प्लान न करता, मिळेल ती गाडी पकडून एकटेच हिंडायला जायचे. समोर जे येईल त्याला एकटेच तोंड द्यायचे. कमीत कमी खर्चात आणी मनसोक्त भटकणे.
माणसाळलेला शिवनेरी असो वा एकलकोंडा कोकणदिवा. कधी सिमेंटच्या पायऱ्यानी भेटणारे महादरवाजे तर कधी ऊन पावसाशी अखंड टक्कर देत देत तसूभर ही न झीजणारा उभा प्रचंड कातळ. कधी रुजलेल्या वहिवाटीच्या पायवाटा तर कधी जंगल सदृश्य वाटावी अशी घनदाट झाडातील गुरांच्या वाटा. कधी डोके ढगांच्या दुलईत खुपसून बसलेली शिखरे तर कधी नतमस्तक करणारी सर्वोच्च शिखरावरील मंदिरे.
शांत, गूढ अश्या पुर्वाचीन अश्या लेण्या, त्यात कोरलेली आणी प्राचीन सुवर्ण युगाची आठवण करून देणारी भित्तीचित्रे. अश्या अनेक गोष्टींचा त्या क्षणाचा केवळ एक मूक साक्षीदार. टोटल सोलीट्युड. !!!
असो.
वरती जे काही खरडले आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिला डेमो झाला तो किल्ले शिवनेरी.
ठरल्याप्रमाणे काहीच प्लान न करता जाणे असल्याने त्यातल्या त्यात माणसाळलेले ठिकाण निवडले म्हणजे अगदीच हौस त्यात पडला पाऊस असे नको. फक्त मोबाईल आणी डबा, पाणी घेतले. सकाळी उठून घरी सांगितले. शिवाजीनगर जाऊन जुन्नर बस पकडली. यावेळी कॅमेरा पण नव्हता घेतला मुद्दामून. पण नंतर बरेच काही मिस केले असे वाटायला लागले म्हणून पुढच्या वेळेस कॅमेरा पण बरोबर.
यावेळेस हडसर ला गेलो तेव्हाही असेच. सकाळी उठलो. डबा घेतला निघालो. डायरेक्ट हडसर गाव. तेथे उतरल्यावर एका मुलाबरोबर खुंटीच्या वाटेच्या खिंडीत आलो. वास्तविक किल्ल्याचा अभ्यास केला तेव्हा दोन वाटा माहिती होत्या त्या अतिशय सोप्या होत्या. ही खुंटीची वाट ऐनवेळी आल्यावर कळली.
एकटाच आहात तर या वाटेने जाऊ नका असे सल्ले आले पण म्हंटले जाऊन तर बघू नाही जमले तर परत फिरू.
त्यानंतर जे काही अनुभव आले ते म्हणजे केवळ थरारक. अविस्मरणीय !!
सकाळी काही न खाल्याने पोट गडबड झालेले. त्यातच ऊन लागल्याने डोके जर जड झाले. पायथ्याशी बसून गोड शिरा खून घेतले. थोडावेळ तरतरी आली पण परत चढाई चालू केल्यावर फार त्रास जाणवू लागला. सुमारे १ तास चढाई केल्यावर वाटले कि बास ! आहे इथून परत जाऊ. इथे चक्कर वैगरे आली तर मदत तर सोडाच कोणाला काही कळायलाही वाव नाही. पूर्ण निर्मनुष्य प्रदेश आणी तेथे मी एकटा.
बरेच पाणी पिऊन अजून अर्धा तास चढाई केली. आता मात्र असह्य झाल्यावर एका दगडाच्या सावलीत बसलो.
समोर पाहिले तर ४०-४५ फुटी कातळकडा. पुढे कोठेच वाट सापडेना म्हंटल्यावर तो कातळकडा निरखून पहिला आणी मग साक्षात्कार झाला कि हाच कडा आपल्याला एकट्याला चढून जायचे आहे. हीच ती खुंटीची वाट. उभ्या कातळात खुंट्या मारून हातानं पकडण्यासाठी सोय केलेली आहे. म्हणून खुंटीची वाट.
फार अस्वस्थ वाटायला लागल्यावर परत निघायचा निर्णय घेतला. अजिबात चालवेना. थोडा गार वारा लागल्यावर मग एका पाठोपाठ एक ५ उलट्या झाल्या. मग मात्र थोडे बरे वाटू लागले.
तब्बल अर्धा तास एकाच जागी बसून काढल्यावर मग बरे वाटायला लागले. मग मात्र रिस्क घेतली आणी चढाई चालू केली.
त्यावेळी मनात काय विचार चालले होते माहीत नाही पण आता विचार करता अंगावर काटा येतो. पूर्णतः निर्मनुष्य प्रदेश, जीवाच्या आकांताने आरोळ्या ठोकल्या तरी त्या ऐकायलाही कोणी नाही. अगदीच वाईट काही झाले तर ते कळण्याचाही काही स्कोप नाही. जेव्हा परत कधी कोणीतरी अशी हौस करायला येईल तेव्हा त्याला कळेल तोपर्यंत काहीच क्लू नाही. एकटाच असल्याने सर्व सामान घेऊन जावे लागणार होते. कडा चढताना सामानाने तोल जायचा संभव. अर्धा चढून गेल्यावर पुढे कितीही अवघड असला तरी परत मागे फिरणे शक्य नाही आणी पुढात अजून काय वाढून ठेवले असेल याचाही अंदाज नाही. टोटल रिस्क !!
चढाई चालू केली. बूट घालून चढता येत नव्हते म्हणून बूट काढले. पण आता ते ठेवायचे कुठे असा प्रश्न आला. कॅमेरा bag पण होती.चढाई करताना फोटो काढायची पण खाज होती.
मग, पाठीला sack, डाव्या हातात मानेवरून कॅमेरा bag, उजव्या हातातून मानेला कॅमेरा लटकवला. शूज चा अजून हिशोब लागत नव्हता मग त्यांची लेस सोडून, मोठी करून दंडाला शूज बांधले. T-shirt चे हात छोटे केले आणी अश्या अवतारात चढाई चालू. निव्वळ थ्रिल.
हि उगाच हौस करताना काढलेले काही फोटो. त्यात फ्रेम वैगरे काहीच दिसणार नाही. ते कसे, कश्या परिस्थितीत आणी किती बावळटपणा करून काढलेले आहेत त्याची तुम्हाला कल्पना येईलच. :)
जवळपास ७०% चढाई करून, एक हलणारी, खिळखिळी झालेली हाताने खुंटी पकडून, दंडाला बांधलेले जोडे सांभाळत, कड्याला लगटून चढाई करतानाही, पोट आणी कडा यामधील जुजबी अंतर भरून काढणारी कॅमेरा bag दोन्ही हात बिझी असल्याने हिसका देऊन दूर सरकवत, उजव्या बाजूने थोडे काह्ली डोकावत कॅमेरा पकडला आणी ४-५ खटाखट क्लिक मारले. त्यातही पहिल्यांदी क्लिकच होईनात म्हणून बघितले तर कॅमेरा Manual मोडला ठेवलेला. मग स्वतालाच शिव्या देत दातांनी मोड चेंज केला.
एवढे उपद्याप. का? तर माहीत नाही. उगाच हौस.
Great thrill but total risk !! केवळ थरारक अनुभव !! अविस्मरणीय !!
खाली एका दगडावर पांढरा बाण दिसतोय तो बेस होता.
याचसाठी केला होता अट्टाहास !!
वरून खाली पाहिले मग मात्र भीती वाटायला लागली. येथून खाली उतरणे तर अज्जीबातच शक्य नव्हते. सो तो विचारच सोडून दिला. गणपतीचे नाव घेत पुढे चढत गेलो आणी नशिबाने सुस्थितीत वरती पोहोचलो.
हा पुढचा टप्पा होता. हा तुलनेने सोपा होता. इथे पाय ठेवायला खाचा केलेल्या होत्या. खुंट्याही मोठ्या आणि चांगल्या स्थितीत आहेत.
शेवटच्या टप्प्यात जरा जीवात जीव आला. सुखरूप पुढे पोहोचू शकू असा आत्मविश्वास आला. मग जरा डोकेही चालायला लागले. सामान जर कोंबून कोंबून शिफ्ट केले. अर्धा लिटर पाणी पिउन घेतले आणी जीवाची शांती करून घेतली. माणसात आल्यावर राहिलेले थोडे चढून किल्ल्याच्या मार्गी लागलो.
असो. Lifetime Experiance होता. सोलीट्युड वैगरे बळच हौस होती ती शमली. आता पुढचे दोन आठवडे गप घरी.
अश्या गोष्टीही आपण कधी करणार? असा विचार करून सोलो क्लायंबिंगची मजा अनुभवली. एकट्याने अश्या प्रसंगात डोके शांत ठेऊन निर्णय घेणे किती महत्वाचे असते हे कळले.
किल्ल्यावर १-२ साप दिसल्यावर एकट्यानेच वाळलेल्या गवतातून जाताना मनात असलेली प्रचंड भीती आणी त्यात वाट सापडत नसल्याने हेल्पलेस कंडीशन आणी देवाचा धावा. न सापडणारी वाट सापडल्यावर झालेला आनंद, किल्ल्याचे दुर्गवैभव पाहून निवलेले डोळे,महादेवाच्या मंदिराच्या समोरच गरुडरूपातील हनुमान.वाळलेल्या गवतातून जाणवणारी सळसळ, किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाला एकट्यानेच बसून केलेली टेहळणी, अश्या जन्नत ठिकाणी डबा उघडला असता गोड शिरा आणी लोणचे. अहाहा !! सगळेच शब्दातीत.
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
असो. लोभ असू द्या.
वाचत राहा! भेटत राहा !!