रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ६ : लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी

 


अपरिचीत बागलाण मोहीम ६ 


 

नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 

दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

गेल्या काही वर्षात बागलाण प्रदेश बऱ्यापैकी भटकून झाल्याने बागलाण रांगेतील न झालेला शेंदवड गड करूया आणि कोजागिरी च्या मुहूर्तावर शेंदवड गडावर शतकोशतके विराजमान  भवानी देवीचे दर्शन घेऊया, त्यापुढे खानदेशात प्रवेश करून धुळे जिल्हा पालथा घालावा या विचाराने मंडळी शुक्रवारी रात्री निघाली. 

शुक्रवारी रात्री पुण्यनगरीतून पिंपळनेर प्रस्थान केले. खूप दिवसांनी एसटीचा प्रवास घडणार होता. मधल्या दिड -दोन वर्षात ग्रुपचे आणि गाडीने ट्रेक व्हायला लागल्यापासून एसटी /टमटम/जीपड्याने  प्रवास करून किल्ल्याचा पायथा गाठावा, काटेकोर नियोजनात किल्ला करून , परतीची सोय बघत - कधी जीपला लटकत, टपावर बसून दुसऱ्या किल्ल्याला जाणे, तासनतास एसटीची वाट बघत, डोळ्यासमोर फसत चाललेले नियोजन सावरत भटकंती करणे यातली मजा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. यामध्ये वेळ जातो पण तेथील लोकांचे बोलणे-जगणे अनुभवता येते याविचारातच नाशिक आले. फोनाफोनी करून भूषणने नाशिक रोड स्टेशन वरून पण सेम बस पकडली आणि दोघे निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. 

इतकी वर्षे झाली पण खिडकीतून पिशव्या / बाटल्या टाकून जागा पकडण्याची प्रथा आणि सतत सर्वत्र पचापच थुकणारे गुटकावीर हे चित्र आजही तसेच असल्याचे बघून माझे साडे पाचशे रुपड्यांचे तिकीट धन्य जाहले. "पिंपळनेर! उतरून घ्या"  या कंडक्टरच्या हाळीने झोपेतून जाग आली. सामान उचलले आणि भर अंधारात घराच्या दिशेने चालू लागलो.थंडी आपले अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होती. अर्ध्या तासात भुषणच्या घरी फ्रेश होऊन गाडी घेऊन निघालो ते लाठीपाडा धरणाच्या दिशेने. 

बऱ्याच ठिकाणी विचारत विचारात एकदाचे ते पोहोचलो एका छोट्याश्या डोंगरावर अभेद्य अश्या उभ्या छोटेखानी गढीच्या जवळ. गढीच्या खाली असलेल्या एकमेव घराच्या समोर गाडी लावून गढी बघायला प्रस्थान केले. हि गढी खाली राहणाऱ्या काकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चार भक्कम बुरुज आणि मधोमध केलेले कोरीव दरवाजांचे बांधकाम लक्ष वेधून घेते.गढीच्या माथ्यावर उभे राहिल्यास लांबवर मांगी-तुंगी, न्हावीगड ते शेंदवड गड दर्शन देतात. बागलाण च्या दक्षिण दिशेचा भूभाग तेथून न्याहाळता येतो. गढी बांधली त्या छोटेखानी डोंगरावर महाराजांनी काही दिवस वास्तव्य केले होते आणि म्हणूनच महाराज जेव्हा सुरत लुटून आले तेव्हा जे धन साल्हेर आणि परिसरात लपवले गेले त्यातील काही धन येथे या गढीत लपवले होते. गावातली काही बहाद्दरांनी त्या धनाच्या लोभापायी गढीच्या बुरुजांमध्ये खोदकाम करून बुरुज फोडून टाकलेत. गढीच्या मालकांशी गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी त्याबद्दल निगडित काही पूर्व कथा सांगितल्या. एक एक कथा ऐकत घड्याळात अकरा वाजत आल्याचे लक्षात आले आज मोठा पल्ला तर होताच पण शेंदवड गडाची दोन अडीच तासाची चढाई भर उन्हात करायची होती. नमस्कार करून गाडीला टांग मारली आणि शेंदवडचा रस्ता धरला. 


लाठीपाडा गढी 



गढीच्या बुरुजावरून लांबवर मांगी-तुंगी , न्हावीगड , तांबोळ्या 


धनाच्या लोभापाई गढीमध्ये  खोदलेले खड्डे 


शेंदवडगडाचे भौगोलिक स्थान बघितले असता एकदम इंटरेस्टिंग आहे. गड महाराष्ट्र(धुळे) व गुजरात ( डांग सौन्दणे) यांच्या सीमेवर आहे. गडाच्या मागची बाजू गुजरात, समोरच्या डोंगरसोंडे च्या डावीकडची बाजू धुळे तर उजवीकडची बाजू नाशिक जिल्ह्यात येते. असा तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला असल्याने गडाचे स्थान मोक्याचे आहे. शेंदवडगडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा डोक्यावर तळपता सूर्य येथून ठेपला होता. 

शेंदवाड गड प्रवेशद्वार 

वेळ रामराया जन्मला ती भर बाराची. सामान खाली एक घरात ठेऊन किल्ल्याची चढाई चालू केली. घाम पुसत देवीचा जयघोष करत सुमारे दिड तासात गडमाथा गाठला. गार वारा स्वागताला तयार होताच पण डोळ्यांची पारणे फिटतील असे निसर्गदृश्य समोर रेखाटलेले दिसले. बागलाणचे मुख्य शिलेदार येथून दर्शन देतात. समोर मांगी-तुंगी, न्हावीगड, रतनगड , तांबोळ्या तर उजवीकडे मोरागड -मुल्हेर-हरगड-कपार भवानी - म्हातारीचे दात, साल्हेर-सालोटा , हरीणबारी धरण हे ज्ञात आणि कित्येक अज्ञात अशी शिखरे असे सगळे एकाच फ्रेम मध्ये पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुखद, निव्वळ नेत्रसुख!

बागलाणचे दुर्गवैभव 


घाम काढणारी चढाई आहे 


डोळे भरून हा निसर्ग सोहोळा पाहून देवीच्या दर्शनासाठी निघालो. गडावर देवीचे हे मंदिर आहे आणि पाण्याचे एक टाके दिसले. वरती सुळक्यावर अर्ध्यापर्यंत जाता येते पण ती रिस्क न घेता मंदिरात प्रवेशते झालो. पूर्ण दिड तासांच्या चढाईत आम्हाला कोणीही भेटले नव्हते पण वरती मंदिरात चांगली तीस चाळीस लोक उपस्थित होती. सगळी लोक खालच्या गावातील होती आणि त्यांच्या कुलदैवत असल्याने देवीला आलेली होती. प्रत्येकाने उदबत्ती आणि प्रसाद आणलेला होता. आम्ही आलो आणि त्यांची आरती सुरु झाली. शेंदवड गड हा गुजरात , महाराष्ट्र बॉर्डर वर असल्याने तेथील आदिवासी गुजराती मिश्रित अहिराणी भाषा बोलतात. त्यांनी देवीची आरती पण गुजरातीत केली. 


अर्ध्या चढाईनंतर दिसणारे देवीचे मंदिर 


कमाल लोकेशन आहे मंदिराचे 



मंदिरातून दिसणारा मुर्डी सुळका 




दर्शन घेऊन गडाची उतराई चालू केली. खाली गावात महाप्रसादाची सोय आहे कळल्यावर पोटातील कावळ्यांची शांती झाली. तीन दिवसांची मोहीम असल्याने खाऊ बरोबर होताच पण गावात भंडारा पाहून रस्त्यावर ठाण मांडून बसून उदरम भरणम करून घेतले. 

आताशा चार वाजत आले होते. मुल्हेर येथील रासनहणाच्या कार्यक्रमाला सहा च्या आत पोहोचणे गरजेचे होते. नशिबाने शॉर्टकट सापडला आणि शेंदवड वरून थोडे मागे येऊन चिवटी बारीने आम्ही धुळ्याहुन नाशिकमध्ये प्रवेश केला. मुल्हेर कडे जातानाच रस्त्यात जैतापूर नावाचे गाव लागते. येथील एकविरा देवीला आम्ही दोन वर्ष्यांपुर्वी येऊन गेलो होतो. येथूनही मुल्हेर ते साल्हेर सगळी रेंज दिसते म्हणून आज परत जाणे झाले. येथेही कोजागिरी निमित्त काही भक्तांनी चक्र पूजा बांधली होती. फर्मास पुरणपोळी कुरडई सकट साग्र संगीत जेवण होते मग काय, येथेही जेवायला बसलो!. 

देवीचे दर्शन आणि पुरणपोळीचे जेवण पदरात पडून घेऊन मुल्हेरला पोहोचलो. आज लवकर आल्याने मोक्याची जागा पकडता आली. आठशे वर्ष्यांची परंपरा लाभलेला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे.  यावेळची हि आमची चौथी वेळ होती यावरूनच वाचकांना समजले असेल. 




एकविरा देवीच्या मंदिरावरून दिसणारे बागलाणचे शिलेदार 

असो या उत्सवा विषयी वाचूया पुढच्या भागात ... तूर्तास फोटोंची मजा घ्या!


वाचत राहा.. 

पुढच्या भागात - 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 



महत्वाचे असे काही : 
  • पिंपळनेर पासून मॅप लावून जाणे. रस्ते थोडे छोटे आणि फसवे आहेत. स्थानिकांना विचारात जाणे केव्हाही उत्तम. 
  • नवरात्रीच्या सुमारास भक्तांची खूप गर्दी असते तेव्हा गेलात तर वाट चुकण्याचा प्रश्न नाही. 
  • चढाईस अंदाजे चार तास लागतात. पायथ्याशी एक मंदिर आहे तेथे गाडी लावू शकतो. 
  • येथून दिसणारे बागलाण रेंजचे दृश्य म्हणजे स्वर्गसुखच. 

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

केंजळगड आणि रायरेश्वर

केंजळगड आणि रायरेश्वर 

पुणे - भोर - आंबवडे येथील झुलता पूल - नागेश्वर मंदिर - केंजळगड - रायरेश्वर - धोम येथील नरसिंह मंदिर - मेणवली - वाई - पुणे 



धरतीवर स्वर्गसुख निर्माण करून वरुणराज आता परतीच्या प्रवासास निघालेत. अवघी सृष्टी हिरवाकंच शेला नेसून त्यावर सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांची रत्ने परीधान करून दिमाखात मिरवतीये. असंख्य फुलांच्या रंगबेरंगी अलंकारांनी सजलेले निसर्गाचे हे रुपडे डोळे भरून अनुभवायचे म्हणजे केंजळगडासारखी जागा नाही. रायरेश्वराच्या डोईवरून नाखिंदा टोकावरून पळत पळत येणारे काळेकुट्ट ढगांचे पुंजके, त्याआडून सुर्यदेवांचे डोकावणारे काही चुकार किरणे. स्वराज्याची शपथ घेतली ते महादेवाचे मंदिर, रायरेश्वरावरील सात रंगांची मृदा हे सगळे पाहायचे आणि दिवस सत्कारणी लावायचा. 


मुलाला नुकतीच लागलेली ट्रेकिंगची आवड अजून बहरावी या उद्देशाने या सुंदर ट्रेकचे आयोजन केले. सकाळी पहाटे पुण्यातून निघून भोर गाठले. नेकलेस पॉईंट म्हणजे थांबणे आलेच. येथून पुढे भोर पार करून आंबवडेच्या दिशेने निघालो.  


आंबवडेला पोहोचलो. रस्त्यावरच पंतसचिव वाडा आणी त्याला जोडणारा हा ३०० ते ४०० वर्ष्यांपुर्वी बांधलेला झुलता पूल ( सस्पेन्शन ब्रिज) दिसतो. त्याकाळी याच्या बांधणीस १०,०००/- रुपये खर्च झाले असल्याची नोंद आहे. यावरून चालत गेल्यास आपण पंतसचिव वाड्यात पोहोचतो. वाडा बंद असला तरी जाळीदार दारातून आत डोकावून पाहिल्यावर प्रशस्त असा वाडा, नैसर्गिक प्रकाशयोजना, आणी अर्धपुतळा आपले लक्ष वेधून घेतो.
हा झुलता पूल आणी पंतसचिव वाडा दोन्ही भोर विभागात संरक्षित वारसा मध्ये गणला जातात.

आंबवडे येथील झुलता पूल :



वाडा बंद होता . समोरच मोठाले पिंपळाचे झाड आणी त्याच्या खाली आजूबाजूला अनेक वीरगळ दिसल्या. येथूनच एक वाट खाली नागेश्वर मंदिराकडे जाते. आजूबाजूला निरव अशी शांतता, आंबे, फणसाची मोठमोठाली झाडे, मंदिरासमोर पडलेला आंब्यांचा सडा, पूर्ण दगडात कोरलेला नंदी, गाभाऱ्यात पुजारी काकांचा एक तालात चाललेला अखंड "ओम नमः शिवाय" चा जयघोष ऐकून हात आपोआप जोडले गेले.

दर्शन घेऊन प्रसन्न मनाने निघालो पुढच्या डेस्टिनेशनला.

नागेश्वर शिवमंदिर :





आंबवडेतून सुमारे अर्ध्या तासात पोहोचलो रायरेश्वर/खावली गावात. बसची वाट पाहत असलेल्या एक आज्जीना लिफ्ट दिली आणी थोडेसे पुण्य मिळवले. घाटरस्त्याने गाडी हाकत केंजळगडाचा फाटा दिसला आणी १० मिनिटात केंजळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.


पायथ्याला असलेला गावात सुमारे १०-१२ घरे आहेत. शंभर जवळपास लोकसंख्या आणि जिल्हा परिषदेची प्रार्थमिक शाळा सुद्धा आहे. आज रविवारी 'मास्तर' आल्याने आज शाळेचा पहिला दिवस होता. सगळा बालचमू नवीन कपडे घालून. सगळे आनंदाने शाळेत आले होते. मंदिरापाशी गाडी लावून पोटपूजा करून घेतली आणी निघालो.


केंजळगड चढाई सुरु :


२५-३० मिनिटात उभा कातळ तासून बनवलेल्या पायऱ्यांपाशी आलो. पाऊस नसला तरी वातावरण मस्त झाले होते. ढगांनी सूर्यदेवाना झाकोळले असल्याने सर्वत्र सावली पसरली होती.


उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या.


सुमारे एक तासात किल्ला भटकून झाला. आता परतीचा मार्ग पकडला. अजून रायरेश्वर आणी वाई भटकंती बाकी होती.


  



केंजळगडाच्या पायथ्याच्या गावाशी शाळेपाशी गाड्या लावल्या होत्या. आज रविवार असूनही मास्तर शाळेत आले असल्याने आजही शाळा भरली होती. गावातली मंडळी सर्व कामे उरकून भोजनाच्या तयारीत गुंतले होते. एका घरात आम्ही पाठ-पिशव्या ठेवल्या होत्या त्या उचलल्या, लहानग्यांना थोडा खाऊ दिला. घरातल्या एक सदस्याने मध घ्यायचा का विचारलं, मग कळले की, त्यांनी मे महिन्यात पोळ्यातून मध काढून ठेवलेला आहे. उन्हाळा संपताना शक्यतो वर्षाचा मध काढतात. चव बघितल्यावर २ किलोची खरेदी झाली. 


" तुमच्या पुण्यात कुठे मिळायचा नाही असला मध, तिथे मिळते ते फक्त साखरेचे पाणी!"  आता मात्र काका पेटायच्या आत निघाले पाहिजे. 

येथून निघून रायरेश्वराच्या कुशीत प्रयाण:


रायरेश्वर वरील सप्त मातृका 



हाच ढग किरणांचा खेळ पाहायला खास केंजळगडाच्या प्लॅन केला होता. 



उधळण व्हावी अविरत उन्मेषांची !



ऋतुपर्णाचा २७ व किल्ला 



येथून एक वाट वाई कडे उतरते. आता या वाटेने पुढे धोम तलाव,धोम येथील नरसिंहाचे (नृसिंह-लक्ष्मी)  मंदिर, पुढे मेणवली व वाई. सुमारे २० मिनिटात नृसिंह-लक्ष्मी मंदिरात पोहोचलो. पेशवेकालीन हे मंदीर अजूनही उत्तम स्थितीत असून पुष्करणीची रचना म्हणजे एकमेवाद्वितीय आहे. कमळाच्या आकाराच्या पुष्करणीत कासवाच्या चौथऱ्यावर नंदी आसनस्थ आहे. संपूर्ण पुष्करणीचे कोरीवकाम लाजवाब. पुष्करणी च्या मधोमध कासव शिल्प आजपर्यंत कधी पहिले नव्हते. 


नृसिंह-लक्ष्मी मंदिर:


कासवरूपी पुष्करणी :


येथून पुढचा प्रवास तो म्हणजे मेणवली. स्वदेश, गंगाजल आणी असंख्य हिंदी/मराठी चित्रपटात तुम्ही हि जागा पाहिली असेलच. फक्त अशी वेळ साधायची की येथे आपल्याखेरीज कोणीही नसेल. संथ वाहणारी कृष्णामाई, निरव शांतता, पक्ष्यांचे रुंजन, शिवमंदिरात अवचित वाजणाऱ्या घंटेचा निनाद, झाडांची वाऱ्यासोबत चाललेली चुळबुळ,रम्य घाट, घाटाच्या पायऱ्यांवर येणाऱ्या पाण्याच्या लाटेचा मंद आवाज आणी संध्याकाळी आकाशाला आलेली केशरी झळाळी प्रतिबिंबित करणारी किरणे असे सगळे जमून आले की काही विलक्षण आनंदाची अनुभूती होते. 


या जागेचा इतिहास आणी संपूर्ण माहिती तुम्हाला अन्यत्र मिळेलच. नाना फडणवीसांच्या आठव्या पिढीने या वाड्याचे केलेले जतन केवळ कौतुकास्पद आहे. नाना फडणवीसांचा पुरातन वाडा आजही बघण्यास उपलब्ध असून तेथले सुरक्षारक्षक वा सदस्य आपल्याला आपुलकीने संपूर्ण वाडा दाखवतात. 


आम्ही गेलो तेव्हा नुकत्याच शाळा चालू झाल्या असल्याने शाळेतील मुलांना शालेय साहित्यवाटप चालू होते. पुण्याहून जाऊन स्वतःच्या खर्चाने समाजोपयोगी कामे करणाऱ्या त्या लोकांना अनेक आशीर्वाद नक्कीच मिळत असतील. एक सद्गृहस्थाने आम्हाला संपूर्ण वाडा दाखवला. सागवानी लाकडावरचे शिल्पकाम, छताला केलेल्या वेलबुट्टीचे लाकडी काम, शेण+मातीने लिंपलेल्या भिंती, अंगणात केलेले दगडी कारंजे सगळं काही निव्वळ इतिहासात घेऊन जाणारे!


आज कालपरत्वे केलेले उपाय पाहता पूर्वीच्या काळी या वाड्याने काय गतवैभव पहिले असेल याची प्रचिती येते. एकदा अवश्य भेट द्यायला हवी येथे. नक्की आवडेल अशी जागा आहे. 


मेणवली घाट : 



चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर तेथून आणलेली एक भलीमोठी घंटा येथे पाहावयास मिळते. पंचधातूची हि घंटा असून त्यावर सेंट मेरीचे शिल्प कोरलेले असून १७०७ साल कोरलेले आहे. 1534 मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या म्हणजे १ मीटर व्यासाच्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.


बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.


आजही या तीन  घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून  ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास  हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल.  तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात आहे असे ऐकले आहे. त्याखेरीज अजून २ घंटा पहिला मिळतात त्या म्हणजे -  थेऊरच्या गणपतिमंदिरातील घंटा, आणि मेणवलीमधील नाना फडणिसांच्या वाड्यामागील घाटावरली घंटा ह्या दोन्ही वसईच्याच आहेत.


या घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो. 


मेणवली येथील घंटा :



पूर्वी वसईच्या घंटा या विषयावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक :
वसईच्या घंटेचा शोध

आता उन्हे कलत चालली होती. अजून वाईच्या महागणपतीचे दर्शन घ्यायचे होते. १० मिनिटात वाई गाठून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा करून पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवले. कोठे न थांबता पुणे गाठले आणी एका भटकंतीची कहाणी सुफळ संपूर्ण जाहली . एक सत्कारणी लावलेला दिवस पुढच्या अनेक पोटासाठीच्या धावपळीची ऊर्जा देऊन जातो आज पुन्हा अनुभवल. 
असाच एक उनाड दिवस शोधा, तो तुम्हाला जगायचे का हे शिकवेल आणि निसर्गातली मौजमजा, आनंद हे सगळं बोनस!

वाचत राहा. 

सोमवार, २६ जून, २०२३

यावर्षीचा पहिला वर्षाविहार : नाखिंद डोंगर


आसमंतात पावसाची चाहूल लागलीये. विविध आकाराच्या काळ्या ढगांची आभाळात ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड चालू झालीये तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. मातीचा सुगंध वाऱ्यावर स्वार होऊन अवघे वातावरण शुचिर्भूत करतोय. सोनेरी गवताची पाती हिरवीगार होण्यासाठी आसुसलेली आहेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून वरुणराजाची आराधना करण्यात मग्न झालीयेत. आता पाऊस येणार आणि हा निसर्गसोहोळा अजून अजून खुलत जाणार!

 



असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला एका छोटेखानी पण आगळ्या-वेगळ्या वर्षाविहाराचा. नाखिंद डोंगराचा. पुणे -कर्जत - वांगणी - बेडसेवाडी प्रवास करून किल्ल्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. सकाळचे स्वच्छ वातावरण पाहून माथ्यावरून लांब-लांबपर्यंतचे दर्शन होईल म्हणून मनात उत्साह संचारला. पावसाचा थेंब थेंब अभिषेक चालू होता पण वाऱ्याने मात्र पाठ फिरवली होती. घामाच्या वर्षावात ओले चिंब होत सुमारे पाऊण तासात माचीवरच्या वाडी गाठली. त्याचे नाव वाघिणीची वाडी! येथे सुमारे साठ घरे आहेत आणि पाचवीपर्यंत शाळा सुद्धा आहे. आज येथे गाव आणि शाळा दत्तक घेतलेल्या कंपनीचा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता. तो अजून सुरु झाला नव्हता पण बच्चे मंडळी मोठ्या संख्येने जमलेली. त्यांना गोळ्या वाटप करून शाळेच्या मागून नाखिंद माथ्याची वाट पकडली. 


येथून पुढच्या खड्या चढाईने छातीचा भाता धपापू लागलेला. तासाभरात माथ्यावरच्या डोंगरसोंडेवर पोहोचलो आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या उत्कृष्ठ नजाऱ्याने आणि जोरदार वाऱ्याने घाम पुसायचेही भान राहिले नाही. येथून समोर चंदेरी, म्हैसमाळ, श्री मलंग, ताहुली डोंगररांग तर डावीकडे माथेरान, इर्शाळगड, प्रबळगड, कलावंतीण, कर्नाळा असे दूरवर दिसणारे दुर्गवैभव. येथून सुमारे सत्तावीस किल्ले दिसतात असे तेथील फलकावर लिहिलेले होते. ढगांच्या आणि सूर्याच्या पाठशिवणीच्या खेळामुळे दर थोड्या वेळाने वातावरण बदलत होते. येथील नेढ्यात बसून वारा खात पोटोबा करून घेतला आणि माथ्यावर जायला सज्ज जाहलो. 


माथ्यावरून डोळेभरून आजूबाजूचा परिसर पाहात बसून राहिलो आणि "चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो" या वाक्याची प्रचिती घेतली. एवढा वेळ फक्त डोंगरमाथ्याशी सलगी करणाऱ्या ढगांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकला. बघता बघता समोरचे दिसेनासे झाले एवढे ढग आणि जोरदार वारा. अशी सगळी तयारी पाहून पावसाचे आगमन होणारच होते. चढताना घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेलो तर उतरताना पावसाने ओलेचिंब. हा सगळं सोहोळा आपल्यासाठीच घडत आहे कि काय असे वाटून गेले. डोंगर उतरून परत वाडीवर आलो आणि तेथून बेडसेवाडी. अश्या प्रकारे पावसाळी भटकंतीचा श्रीगणेशा तर झाला. 











असो! फोटोंचा आनंद घ्या!


शनिवार, १ एप्रिल, २०२३

भैरवगड - घनचक्कर - गवळदेव - कात्राबाई - कुमशेत - आजोबा पर्वत

 भटकंती सह्याद्रीतील सर्वोच्च घनचक्कर डोंगररांगेची : 

 शिरपुंजे - भैरवगड - घनचक्कर शिखर - गवळदेव शिखर - मुडा डोंगर - कात्राबाई शिखर - कात्राबाई खिंड - कुमशेत - आजोबा पर्वत शिखर - कुमशेत 

दोन दिवसांची, कुमशेत मुक्कामी ३६ किलोमीटर्सची भटकंती. 



दिवस पहिला  - 

शिरपुंजे - भैरवगड - घनचक्कर शिखर - गवळदेव शिखर - मुडा डोंगर - कात्राबाई शिखर - कात्राबाई खिंड - कुमशेत

पहाटे तीनच्या सुमारास गाडी कळसुबाई -हरिश्चंद्र अभयारण्यातून मार्गस्थ होत होती. संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. रात्री अकराला मंडळी निघालेली, ती झोपेची थकबाकी गोळा करत करत शिरपुंज्यात पोहोचली. आजचा बेत होता सह्याद्रीतील सर्वात उंच डोंगररांग पादाक्रांत करण्याचा. घनचक्कर, गवळदेव, आजोबा पर्वत हि नाव आजपर्यंत लेखात वाचलेली पण आज या सह्याद्रीतील शिखरांच्या  "आजोबांची" भेट घ्यायची संधी आली होती. पूर्वेकडे झुंजूमुंजू होऊ लागलेले पाहून आणलेल्या इडल्या आणि वाफाळता चहा यांना योग्य न्याय देऊन त्यांची पोटात बदली करून घेतली. भैरवनाथाचा उदो करून शिरपुंजे गावातून भैरवगड किल्ल्याची वाट धरली. 

सकाळची कोवळी किरणे भाताच्या पात्यांवर पडून आसमंतात परावर्तित होत होती. भैरवाचा डोंगर निश्चल ऊन खात पहुडलेला तर शेजारी घनचक्कर माथा आपल्या उंचीने ढगांशी गळाभेट घेत होता. पायथ्याच्या मारुती मंदिरात मारुतीचे दर्शन घेऊन चढाईस चालू केले आणि सुमारे तासाभरात भैरवगड आणि पतवडी डोंगरांच्या खिंडीत आलो. सर्वांगाला घामाचा अभिषेक झालेला. शिरपुंजे गावातून यथायोग्य मळलेली वाट गडावर येते. नुकतीच भैरवाची यात्रा झाल्याने ठिकठिकाणी खुणा मारलेल्या दिसल्या. स्थानिक लोक भैरवगडावर जोडे न घालता जातात म्हणून खिंडीत जोडे काढून माथ्यावर कूच केले. 




खिंडीत पोहोचताच समोर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दूरपर्यंत उलगडत गेली. सुखावह नजारे बघत गडाच्या माथ्यावर गेलो ते गुहेमध्ये विराजमान अश्वरूढ भैरवनाथाची सुंदर मूर्ती बघायला. गुहेकडे जाताना पाण्याची टाकी लागतात ते पाहून आपण गुहेमध्ये प्रवेशते होतो. भैरवनाथाला मनोमन नमस्कार करून आणि आमच्या पुढच्या मोहिमेसाठी बळ मागून गडाच्या अत्युच्च ठिकाणी गेलो. येथून समोर आता हरिश्चंद्रगड बालेकिल्ला, तारामती शिखर, सीतेचा डोंगर , टोलार खिंड दिसू लागले तर मागे पाबरगड.  पश्चिमेकडे आमचे पुढचे लक्ष्य घनचक्कर शिखर. गडावरची सगळी १६ टाकी, वीरगळ,गुहा बघून आता घनचक्कर जाण्यासाठी परत खिंडीत उतरलो.  



येथे खिंडीत वनखात्यानेतर कमालच केलेली आहे. बॅरिकेड्स आणि शिड्या लावून भैरवगडाच्या मार्ग गरज नसताना सुकर केला तर पतवडी डोंगराला वळसा घालून जाणाऱ्या वाटेचा खिंडीतूनच शिडी लावून विषयच संपवून टाकला. असो वेळ नक्की वाचला या समाधानाने घनचक्कर शिखराकडे कूच केले. दोन छोट्या टेकड्या चढून महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाच्या घनचक्कर माथ्यावर उभं ठाकलो. चारही बाजूला डोळे दिपवणारे नजारे. समोर भंडारदरा जलाशयाचे प्रथम दर्शन झाले. पश्चिमेला गवळदेव शिखर आमची वाटच बघत होते. गवळदेव आणि कात्राबाई यांच्यामध्ये आजोबा पर्वत ओझरते दर्शन देऊ लागला. उद्या आम्ही आजोबा पर्वत जाणार होतो म्हणून आज लांबूनच हात जोडून साकडं घातलं. दुर्गरत्न रतनगड, खुट्टा, रतनवाडी, स्पष्ट दिसत होती तर त्यामागे अजून कळसुबाई, अलंग-मदन-कुलंग रांग पुसटशी ओळखू येऊ लागली. 




थोडीशी पेटपूजा करून गवळदेव शिखराची पायवाट पकडली. उत्तरेकडे कलाडगड पासून ते हपटा, नाफ्त्या पर्यंत दुर्गवैभव डोळ्यात मावत नव्हते. छोटासा वळसा घालून गवळदेव पायथ्याशी आलो. येथून माथ्यावर जाणारी घसाऱ्याची वाट घेऊन अर्ध्या तासात गवळदेव माथा! तिसऱ्या क्रमांकाचे अत्युच्च शिखर! त्यावरून होणारे सह्यदर्शनही तसेच अत्युच्च! येथून आता कात्राबाई, करंडा समोर तर रतनगड थोडासा उजव्या हाताला अजून जवळ आलेला भासला. सहयाद्रीचे हे पुराणपुरुष आपल्या असंख्य डोंगरधारेरुपी बाहुतून आमचे जणू स्वागतच करत होत्या. गवळदेव माथ्यावर महादेवाची पिंड पाहून आपोआप हात जोडले गेले. गवळदेव माथ्यावर कोठेही पाण्याचे टाक नव्हतं पण तरी ओलावा कसा असे वाटाड्याला विचारताच त्याने एक छोटासा दगड बाजूला केला तर ते छोटेसे छिद्र म्हणजे खालच्या पाण्याच्या टाकीचे तोंड होते. त्या छोट्या छिद्रातून बाटली आत टाकली तर स्वच्छ आणि गारेगार पाणी प्यायला मिळाले. स्थानिकांना लोक बरोबर असतील तर अश्याही काही गोष्टी बघायला मिळतात. 




एव्हाना तीन वाजत आलेले. आता गवळदेव उतरून कात्राबाई खिंडीतून कुमशेत गाठायचे होते. कुमशेत येथे आजचा मुक्काम होता. बाकी सगळी मंडळी कात्राबाई खिंडीतून पुढे निघाली तसे कात्राबाई माथ्यावर पण जाऊन येऊ अशी हुक्की आली. साडे तीन वाजत आलेले. वाटाड्याच्या म्हणण्यानुसार खिंडीतून माथ्यावर जाऊन येऊन दोन अडीच तास लागणार होते म्हणजे कात्राबाई खिंड ते कुमशेत दोन तासांची चाल अंधारात होणार होती. ट्रेक लीडरला विचारले तर त्यांची संमती होती. मग काय गणपतीचे नाव घेऊन, कात्राबाईचे दर्शन घेऊन पळत पंचवीस मिनिटात माथा गाठला. माथ्यावर फक्त आम्ही दोघेच! कात्राबाई शिखरावरून दिसणारे दृश्य तेच पण पूर्वेकडे पाहता भैरवगड - घनचक्कर शिखर - गवळदेव शिखर - मुडा डोंगर अश्या आपण चालून आलेल्या रांगा बघता ऊर भरून आला होता. एकाच दिवसात घनचक्कर रांग पूर्णत्वास आली होती. थोडा वेळ शांत बसून डोळे भरून चौफेर निसर्ग न्याहाळला. रतनगडावरील बुरुज येथून स्पष्ट दिसत होता. रतनगड, खुट्ट्याच्या बरोब्बर मागे AMK आणि कळसुबाई हि फ्रेम फक्त येथेच!




शिदोरीतले शेवटचे पदार्थ पोटात ढकलले आणि सूर्यनारायण अस्ताला जायची चाहूल लागताच खाली उतरायला सुरुवात केली. वीस मिनिटात खिंडीत पळत आलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. सगळं ग्रुप पुढे निघून गेलेला पण उजेड असल्याने वाटेची चिंता नव्हती. एका दिवसात चार डोंगर भटकून मनात समाधानाची भावना होती.  सुमारे दोन तासात देवाची वाडी येथे आलो. गावात पारंब्यांवर झोका खेळणाऱ्या मुलांना फराळाचा खाऊ वाटला आणि कुमशेतच्या दिशेने मंडळी निघाली. अर्ध्या रस्त्यात गाडी आलेली पाहून आणि त्यानंतर कुमशेत पोहोचल्यावर भाकरी, अख्खा मसूर उसळ, खर्डा , सूप असे साग्रसंगीत जेवणाचा बेत बघून आयोजकांचे (STF ग्रुप) आणि ग्रुपमधल्या ट्रेकर दोस्तांचे आभार मानले. "अन्नदाता सुखी भव:" असे आशीर्वाद देऊन तंबूत शिरलो. 

झोप येईना म्हणून रात्री अकरा पर्यंत मोकळ्या जागेत बसून राहिलो. पूर्ण आसमंत आता टीमटीमत्या ताऱ्यांनी व्यापलेला. आपल्याला दुर्लभ असे दृश्य! तारे तुटताना पाहून मनोमन इच्छा करण्याचे खेळही झाले. थंडी आता आपले अस्तित्व दाखवू लागलेली. उद्या "आजोबांची" भेट होणार या खुशीत मंडळी निद्रादेवीच्या स्वाधीन झाली.



दिवस दुसरा - कुमशेत - आजोबा पर्वत शिखर - कुमशेत [ आज्या पर्वताची खतरनाक चढाई आणि शिखरावरून ३६० अंशात दिसणारे दिलखेचक दृश्य.]   



पहाटे पाच वाजता जाग आली तेव्हा अंधाराचे साम्राज्य होते. ग्रुप मधील काही मंडळी पोहे आणि चहाच्या तयारीला जुंपली होती. सकाळचे कार्यक्रम उरकून बूट घालून गावात फेरीला निघालो. काल गावात पोहोचायला अंधार पडल्याने गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहता आला नव्हता. जसा निघालो तसा पूर्वेच्या आसमंतात केशरी झालर उमटू लागलेली. तांबडफुटीची सुवेळ आणि जोडीला हलकीशी थंडी! चारही बाजूला बघतो तर डोंगरच डोंगर. दक्षिणेला अजूनही हरिश्चंद्र पर्वतरांग संगतीला होतीच. गरमागरम चहा, पोहे यांना न्याय दिल्यानंतर पाणी भरून आजोबांच्या भेटीस मंडळी सज्ज जाहली. 


कुमशेत पासून आजोबा पर्वत पायथा अंतर ४-५ किलोमीटर असेल, पण तो वेळ वाचवण्यासाठी आयोजकांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत जायची सोय केली. आता नाकासमोर आजोबा पर्वत बघत वाटचाल चालू झाली. सोनसळी गवतांवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडल्याने वातावरण भारीत झालेले. "आज्या पर्वताचे" सरळसोट कडे पाहून कुठून वाट असेल असे मनोमन ताडीत ट्रेकर मंडळी पायथ्याशी पोहोचली. येथून वाहणारा प्रवाह हा शेवटचा पाण्याचा स्रोत म्हणून पाणी भरून घेतले. आजोबा पर्वतावर पाणी मिळेल याबाबत शाश्वती नव्हती. पाणी भरले आणि प्रवाहाच्या काठाशी असलेल्या मंदिरातील देवतेला मोहीम सुखरूप फत्ते होउदे म्हणून साकडे घातले. 

इथून आता खरी मजा चालू झाली.  सरळसोट घसाऱ्याचा चढाई मार्ग! जसे या घसाऱ्याच्या मार्गाने, पायात चाळीस रुपयांची प्लॅस्टिकची चप्पल असलेला वाट्याडा झरझर चढू लागला तसे अद्ययावत जोडे आणि अख्खे डी-कॅथलॉन अंगावर लेऊन चढाई करणाऱ्या ट्रेकर लोकांची पाकपुक होऊ लागली. मागील दोन वर्षात सगळ्या वाटा मोडून गेल्याचे वाटाड्या वारंवार सांगत होता म्हणजे थोडक्यात पुढे जायचंय का म्हणून इशारा देत होता. बरेचसे लोक कोकणातून म्हणजे डेहेणे गावातून वाल्मिक आश्रम आणि सीतेच्या पाळण्यापर्यंत येतात पण तेथून पर्वताच्या माथ्यावर जाता येत नाही. माथ्यावर जायचे तर हीच एक वाट! मग काय, गणरायाचे नाव घेऊन मंदिरापासून पर्वताकडे सरळ चढाई चालू झाली. प्रत्येक पाऊल टाकताना घसरायची शक्यता तपासून टाकले जात होते. कोणत्या दगडावर पाय ठेवल्यावर तो कधी असहकार पुकारेल याची शाश्वती नव्हती.  काही थोडा भाग तर असा होता कि आजूबाजूला पकडायला ना कुठले झाड ना पाय ठेवायला दगड फक्त भूसभुशीत माती. अश्यात पहिली मावळ्यांची फळी सुमारे पाऊण पर्वत चढून गेली. येथून एका घसाऱ्याच्या पॅचला झाडाला दोरी बांधून चढाई थोडी सोयीस्कर झाली. 

एवढे दिव्य करून चढाई तर करत होतो पण मनात येथून उतरायची भीती होती. येथून उतरायला यापेक्षा दुप्पट मजा येणार होती. ग्रुप मधील एकूण मंडळी या मार्गाने चढून -उतरून नक्कीच संध्याकाळ उजाडेल अशी चिन्हे होती मग ट्रेक लीडरने योग्य निर्णय घेऊन वरती आलेल्या लोकांना पुढे जायची मुभा देऊन बाकीच्या मंडळींना उतरायला सांगितले. सुमारे पाऊण तासाच्या खतरनाक चढाईनंतर कारवीच्या जंगलात घुसलो. येथून वाट गडाला फेरी मारून उत्तरेकडून वर चढत होती. आता मोजकेच लोक असल्याने चढाई गतिमान झाली. येथून आता पुढे काही आश्चर्य आमची वाटच बघत होते. 





डोंगराला ट्रॅव्हर्स मारून पुढे गेलो तसे एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी जागा आणि पुढ्यात खोल दरी. एवढी जागा काळजीपूर्वक पार करून समोर बघतो तर समोर छोट्याश्या तलावांची श्रुंखला! त्यातील निळेशार पाणी आणि पाण्यात पडलेली आजूबाजूच्या अद्भुत निसर्गचित्रांची प्रतिबिंबे. घनदाट कारवीतून वाटचाल करीत पठारावर आलो आणि डोळेच विस्फारले. येथून दिसणारे मायबाप सह्याद्रीचे रुपडे म्हणजे निव्वळ कमाल. सहयाद्रीच्या या सौन्दर्याच्या व्याख्याच वेगळ्या. न मागता दिलेल्या या देणग्या सगळ्या बेहिशेबी! तो अखंड देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार ओंजळीत भरून घ्यायचं बस! 

भीमाशंकर रांगेपासून ते कळसुबाई रांगेपर्यंत एकाच ठिकाणाहून दर्शन देणारी आजोबा पर्वत ही सह्याद्रीतील एकमेव जागा असावी. येथून दिसणारे दुर्गवैभव काय वर्णावे? अश्या जागी एखादा माहितगार माणूस बरोबर असेल तर क्या बात! लांबच लांब पसरलेला सहयाद्री अनुभवणे म्हणजे काय याचा अर्थ आता उलगडू लागला. आजोबाच्या दक्षिणेपासून सुरुवात करून  पूर्वेकडे येताना पहिले दर्शन दिले ते लांबवर सिद्धगडाने. भीमाशंकर रांगेतून थोडासा सुटावलेला सिद्धगड! त्यापुढे लांबवर ढाकोबाचे टेकाड उंच उठलेले. ढाकोबाच्या कॅनवास वर पुढे उभे जीवधन, नानाचा अंगठा, वऱ्हाडी डोंगर. मग दौन्डया, उधळ्या डोंगर. यापुढे नाफ्ता, सीतेचा डोंगर, हरिश्चंद्रगड, तारामती, बालेकिल्लाच काय तर कोकणकडा सुद्धा स्पष्ट दिसत होता. मग टोलारखिंड, कोथळ्याच्या भैरवगड कलाडगड पुढे ओळीने. जरा जवळ खाली बघतो तर कुमशेतचा कोकणकडा, कोंबडा डोंगर. 



पूर्वेकडे बघतो तर समोर काल चढून आलेली घनचक्कर रांग! नाकासमोर दिसणारा करंडा, त्यामागे कात्राबाई, गवळदेव आणि त्याला जोडून बारीक दिसणारा घनचक्कर. पूर्वेकडून उत्तरेकडे बघता, रतनगड, रतनगडाचा खुट्टा, कळसुबाई, धाकटी कळसुबाई, अलंग, मदन कुलंग दे दुर्गत्रिकुट, आणि छोटा कुलंग! त्याखाली साम्रद गाव आणि निसर्गनवल अशी सांदण दरीची सुरुवात डोळ्यांनी स्पष्ट दिसत होती. भंडारदरा आणि घाटघर जलाशय त्या कॅनवास मध्ये निळे रंग भरत होते. येथून माथ्यावर चढाई करून पश्चिमेकडे आलो तर कोकणपट्टा दृष्टीक्षेपात आला. ट्रेक लीडरने हि सगळी ठिकाणे हेरून हेरून दाखवली तर वाटाड्या छोट्यातला छोट्या डोंगरचे पण नाव सांगून माहितीत भर टाकत होता. एका अनामिक ओढीने निसर्गात भटकणाऱ्या डोंगरयात्रींची आनंदयात्रा सुफळ संपन्न होताना भासत होती. 



येथेच्छ फोटो काढून उतरायला सुरुवात केले. आता खरी हौस फिटणार होती. अनेकांचा चार-पाच वेळा घसरत प्रसाद घेऊन झाला. भगवंताचे स्मरण करत तासाभरात हळू हळू का होईना पण सगळे सुखरूप उतरलो. उतरताना झालेल्या अवस्थेचे वर्णन न केलेलेच चांगले ! वाटाड्या मात्र बहाद्दर होता, अश्या खतरनाक चढाई उतराईत तो साधा घसरला पण नव्हता. यथावकाश डोंगर उतरून पायथ्याशी आलो आणि ओढ्यात काचेसारखे स्वच्छ पाणी बघून डुबक्या मारल्या. अंगातला क्षीण तर निघून गेलाच पण अश्या रोमहर्षक आणि लक्षात राहील अश्या दोन दिवसीय मोहिमेची अशी खास सांगता झाली. येथून कुमशेतला येऊन ट्रेक मधल्या भिडूंनी बनवलेले स्वादिष्ट जेवण उदरम! भरणम! करून मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

वाचत रहा ! अभिप्राय कळवत रहा!

सागर शिवदे