
सुमारे आठच्या दरम्यान व्हॅलीच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारा निसर्ग पाहून हरकून गेलो. डोळ्यांच्या नजरेत न मावणारे निसर्गचित्र. दोन डोंगरांच्या दरीचा संपूर्ण भाग ढगांनी व्यापलेला. कुठे क्षितिज संपते आणि आकाश सुरु होते याचा थांगपत्ताही लागणार नाही असे दृश्य. नारायणाच्या साक्षीने निसर्गात चाललेला मंगलमय सोहोळाच जणू. आणि हा असा निसर्गसोहोळा चालू असताना आपण तिथे उपस्थित असणे म्हणजे डोंगरदेवांचे आशीर्वादच ते.
"य" फोटो काढून दरीत उतरायला प्रारंभ केला. संपूर्ण ढगांनी व्यापलेली दरी सूर्यनारायणाच्या आगमनाने तळ दाखवू लागली. सुरुवातीला "आज काही दिसणार नाही" असे वाटत होते पण दरीच्या तळाशी उतरताच सूर्यकिरणे साथीला येऊ लागली. असंख्य धबधबे खळखळत त्या निरव शांततेत एक नाद निर्माण करत होते. तेथेच एक मोठाल्या दगडावर पथारी पसरून एका भिडूने आणलेल्या न्याहारीच्या आस्वाद घेतला आणि पुढची वाटचाल चालू केली.
घळीत पुढे जाताना सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. पाण्याचे मोठे प्रवाह लागतील याची कल्पना होतीच पण शेवाळे आणि चिखल याची युती होऊन ठिकठिकाणी प्रसाद मिळत होता. गणपतीचे नाव घेत मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या मारत, मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल चालू होती. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. दोन पुराणपुरुष भासावेत अश्या दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीमधून वाटचाल सुरु होती. सूर्यकिरण पडताच झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा आणि तळ दाखवणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. माथ्यावरून अलगद कोसळणारे धबधबे त्या सुंदरतेत भर घालत होते.
आता दरीच्या शेवटच्या टप्य्यात पोहोचलो. समोर दिसणारा निसर्ग काय वर्णावा? येथूनच खाली देवकुंडचा धबधबा आहे. समोर सावळ घाटाने कोकणात उतरणारी घाटवाट, गर्द जंगल, आणि शेवटचे दोन मोठ्ठाले पाण्याचे डोह. डोहात मनसोक्त डुंबून खच फोटोग्राफी झाली. शेवाळ साठलेल्या प्रवाहातून घसरगुंडीचा कार्यक्रमही झाला. एव्हाना बारा वाजत आले होते. चार-पाच वेळा डोहात अंघोळ झाल्यावर दरी चढून परत येताना घामाने अंघोळ झाली. मग त्या श्रमपरिहारासाठी ताम्हिणी घाटातल्या अजून एक धबधब्यात जाणे आले.
असो. अश्या प्रकारे एक नितांतसुंदर भटकंती पदरात पडली आणि यावर्षीचा पावसाळा सुफळ संपूर्ण झाला.
वाचत राहा.