'त्या' बारा दिवसांमधली 'ती' !
आज
खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. आयुष्यभर आपल्या
मुलींच्या सहवासात राहिलेली ती, शेवटचा श्वासही मुलीच्या मांडीवर डोके
ठेवूनच घेत होती. आज तिच्यासोबत सगळे होते. नित्यनेमाचे उद्योग धंदे सोडून
प्रत्येकजण फक्त आणि फक्त तिच्यासाठीच आला होता, हॉस्पिटल मध्ये. हजारदा
आमंत्रणे पाठवून विनवण्या करूनही असे सगळे कोणासाठी एकत्र जमले नसते.
रात्र
जागून काढली तिने हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातनांनी.हार्ट अट्याक असेल
असे तिलाही जाणवले नसावे. "थोडे दुखते आहे छातीत, कशाला ह्यांना उठवा
झोपेतून." शेवटपर्यंत काही तिने दुसऱ्याचा विचार करणे सोडले नाही.
"तुम्ही
लवकर घेऊन यायला पाहिजे होते ह्यांना" हे वाक्य डॉक्टर बोलले ते ऐकायला
ती होतीच कुठे? तिला ऐकू तरी काय येत असावे? आणि ऐकताना त्याचा किती बोध
होत असावा?
बारा दिवस ती ICU मध्ये होती. आयुष्यातले हेच ते बारा
दिवस, जेव्हा तिला सगळे न मागता हातात मिळत होते. यापूर्वी स्वतःसाठी
म्हणून ती होतीच कुठे? चार मुलींची लग्ने लावून दिली तिने. त्याच्यातच
झिजून गेली होती ती. आज त्याच चार मुली रात्रंदिवस तिच्या जवळच बसून
होत्या.
कसे वाटत असावे सर्वांदेखत असे खोल खोल जाताना?
काय वाटत असावे हळू हळू प्रत्येक अवयवाला कार्यमुक्त करताना? काय होत असावे
मनात स्वतःचे मन सोडून जाताना?
आता, बाकीच्यासाठी ति तीच असावी , पण तिच्यासाठी सगळे जग रात्रीत बदलले नव्हते काय?
आज
तिला आपण किती दिवस येथे आहोत हे माहितीही नसेल.सकाळी चहा प्यायचा असतो
आणि तो आपण वर्षानुवर्षे पीत आलोत हे हि माहीत नसेल कदाचित. पण "विजूला
मात्र दुधाचाच चहा लागतो" हे कसे माहीत असावे? मी दिसलो की औषधाच्या हजार
बाटल्यामागे ठेवलेले दही मला द्यावे हे तिला कोण सुचवत असेल?
बारा दिवस एवढी माणसे भोवती हजर असून आतून एकटीच असावी का ती? काय विचार करत असावी वा काही आठवत असावे तिला.
भोर मधील माहेर आणि घरासमोर बसून सागरगोटे खेळायचा तो कट्टा?
पुण्याहून सायकलवरून भोरला येणारा तिचा चाहता आणि मैत्रिणीच्या घरी त्याची राहायची व्यवस्था करून दिलेले ते दोन दिवस?
ज्याकाळी प्रेम हा शब्द उघड उच्चारला जात नव्हता अश्या काळातील तिचा तो प्रेमविवाह?
लहान वयात लग्न होऊन दक्षिण भारतात गेल्यावर फक्त भात खाऊन काढलेले ते सहा दिवस?
पानशेतच्या पुरात उभारता संसार वाहून गेल्यावर झालेली जीवाची तळमळ?
मुलांचा जन्म ते त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास ?
नातीच्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीचा तिच्या चेहऱ्यावरचा तणाव?
नातीच्या लग्नानंतर परत तिच्या सासरी आणि स्वतःच्या माहेरी भोर ला गेल्यावर जिवंत झालेले तिचे ते बालपण?
पणजी होऊन नातीच्या मुलीला तोंडभरून पापा देताना तिचे केलेले कोडकौतुक आणि तिच्या वाढदिवसाला दिलेला दोन पायांचा लाकडी घोडा?
लग्नानंतर सलग अठ्ठावीस वर्षे औसरीच्या देवीचे केलेले नवरात्र आणि गावजेवण देऊन लोकांचे तृप्त चेहरे?
का, भर दुपारी अनवाणी पायांनी जाताना भाजणारे पायाचे तळवे ?
का, गेले बारा दिवस वेगवेगळ्या नळ्या आणि मास्क लावून काळी पडलेली तिची नितळ अशी त्वचा?
का, कालची भयानक कळा देऊन गेलेली रात्र?
कशालाच उत्तर नव्हते, कोणाकडेच !
आज
मात्र गेली त्रेशष्ठ वर्षे चाललेली तिची तपश्चर्या थांबली .पोटच्या
गोळ्याच्या मांडीवर शांतपणे डोके ठेवून. खरंच, आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन
सार्थक झाले असे म्हणता येईल.