गणपती स्पेशल राईड - शिल्पकलेच्या अद्भुत विश्वात
कोथरूड - श्री चिंतामणी गणपती, थेऊर - दौलत मंगळ भुलेश्वर - सुपे येथील नगरे वाडा - श्री मल्लिकार्जुन मंदिर , लोणी भापकर - श्री मयुरेश्वर गणपती , मोरगाव - जेजुरी - सासवड - कोथरूड. [ २२५ KM ]
कोथरूड - श्री चिंतामणी गणपती, थेऊर - दौलत मंगळ भुलेश्वर - सुपे येथील नगरे वाडा - श्री मल्लिकार्जुन मंदिर , लोणी भापकर - श्री मयुरेश्वर गणपती , मोरगाव - जेजुरी - सासवड - कोथरूड. [ २२५ KM ]




आपल्या आयुष्यरुपी अत्तराच्या कुपीत कधीही न विसरता येणाऱ्या अनुभवांचे अत्तर नियमित टाकायला हवं. त्याचा दरवळणारा सुगंध म्हणजेच आठवणी आपल्याला आयुष्यभर जगायला ऊर्जा देतात. आजची आमची ही स्पिती किन्नोर फॅमिली ऍडव्हेंचर ट्रिप अगदी तशीच अत्तरासमान आहे. जेव्हा जेव्हा हिमालयाचा विषय निघेल तेव्हा ह्या ट्रिपची आठवण आल्याशिवाय काही राहायची नाही. हिमालयाच्या अजस्त्र बाहुंमधून भटकत, निसर्ग सौन्दर्याने पोट भरत, साक्षात किन्नोर कैलासाचे पाण्याने तहान भागवत , तारीख वेळ विसरून दहा दिवस मनसोक्त भटकता येणे यापेक्षा मोठे भाग्य ते कुठले?
IF YOU CAN DREAM IT, YOU CAN DEFINITELY DO IT!
ताबो गावापासून काझा कडे जाणाऱ्या रस्त्यावर BRO ने लावलेला हा बोर्ड म्हणजे आमच्या या स्पिती आणि किन्नोर फॅमिली ट्रिपचे सार आहे. सुमारे दशकापासून विश लिस्ट मध्ये असणारे लेह लद्दाखचे फोटो बघून मन भागवून घेत होतो. तो योग लवकरच येईल पण त्या प्रदेशाशी साधर्म्य असणारा स्पिती वॅलीचा प्रदेश सहकुटुंब फिरण्याचा आज तो योग आला आणि दैवी रचना म्हणतात तसे सगळे काही जुळून आले. ते म्हणतात ना .. "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है ... कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है !!"
मागील वर्षी सहकुटुंब केदारनाथ, तुंगनाथ, बद्रीनाथ अशी उत्तराखंड मधील खडतर भटकंती झाल्यावर यावर्षी जरा कुटुंबाला घेऊन जायचा विश्वास वाढला. सुरुवातीला मदमहेश्वर आणि रुद्रनाथ या पंचकेदारांपैकी बाकी असलेल्या दोन केदार स्थानांचा प्लॅन ठरला. पुणे ते हरिद्वार बुकिंग पण झाले. पूर्ण जंगलातून ट्रेकिंग असलेल्या याठिकाणी फॅमिली घेऊन जाणे अवघड आहे म्हंटल्यावर दुसरा ऑप्शन हिमाचल मधल्या आणि HRTC बसने कनेक्टेड, लद्दाखशी मिळताजुळता प्रदेश असलेला स्पिती व्हॅलीचा प्लॅन केला.
प्लॅन झाला तो असा -
दिवस ० : पुणे ते दादर, दादर ते बांद्रा , बांद्रा ते चंदीगड
दिवस १ : चंदीगड स्थलदर्शन , संध्याकाळच्या ६ च्या डिलक्स बस ने रिकॉन्गपीओ.
दिवस २ : रिकॉन्गपीओ ते रोघी गाव. रोघी ते कल्पा. कल्पा येथील विष्णुमंदिर, किन्नोर कैलास दर्शन, रोघी सुसाईड पॉईंट, कल्पा येथून सुरु होणारा चाका पिक ट्रेक. ( १२ KM) कल्पा मुक्काम.
दिवस ३: कल्पा ते रिकॉन्गपीओ, रिकॉन्गपीओ ते ताबो बसने. हा ९ तासांचा प्रवास होता पण एक मिनिटही बोर होणार नाही असे अफलातून नजारे आहेत. ताबो स्थलदर्शन - मॉनेस्ट्री, रिव्हर साईड, ताबो केव्ह्स. ताबो मॉनेस्ट्री मुक्काम.
दिवस ४ : ताबो - काझा मॉनेस्ट्री आणि लोकल मार्केट. बाईक भाड्याने घेऊन बाकी सोपस्कार.
दिवस ५ : काझा ते की मॉनेस्ट्री - किब्बर - चिचम (आशियातील सर्वात उंच ब्रिज) - लान्गझा ( सर्वात उंचीवरची बुद्ध मूर्ती ) - हिक्कीम (जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस )- कॉमिक ( जगातील सर्वात उंच रस्त्याने जोडलेले गाव ) - काझा - धनकर ( ढांकर) मॉनेस्ट्री येथे मुक्काम.
दिवस ६: धनकर मॉनेस्ट्री - धनकर लेक सोलो ट्रेक ( ८ KM ) - पिन वॅली - पिन वॅलीमधील शेवटचे गाव मूद - काझा. काझा मुक्काम.
दिवस ७: काझा ते रिकॉन्गपीओ. रिकॉन्गपीओ ते छितकुल.
दिवस ८ : छितकुल टॉप ट्रेक ( ८ km ), ITBP चेक पोस्ट, छितकुल स्थलदर्शन.
दिवस ९: छितकुल ते बटसरी गाव. बटसेरी विष्णू मंदिर - बटसेरी ते सांगला जंगल ट्रेक. - सांगला - कामरा फोर्ट - सांगला मुक्काम.
दिवस १० : सांगला कांडा लेक ट्रेक आणि ४X४ राईड ( १४ KM), गंगारवं , सांगला ते चंदीगड प्रवास.
दिवस ११ : चंदीगड ते पुणे.
दहा दिवसांचा हा असा भरगच्च प्लॅन फॅमिली स्पेशली आठ वर्षांचा मुलगा घेऊन पूर्ण करता आला याचा आनंदच काही वेगळा आहे. सकाळी नाश्ता करून निघाल्यावर दुपारी जेवण स्किप करून रात्री मिळेल तिथे मुक्काम व जेवण केल्याने १० दिवसात जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देता आली. दहा दिवसात एकदाही फिरण्याचा वेळ खाण्या-पिण्यात घालवला नाही. HRTC बस ने कमी खर्चात आणि अधिक सुरक्षित उत्तम प्रवास झाला. निवांत बसून स्पिती खोऱ्यातील सौन्दर्य न्याहाळण्याची मजाच काही और! स्थानिकांशी बोलून नवीन भटकायच्या जागा कळल्या तर कधी मुक्कामाचे स्थान शोधण्यास मदत झाली. काझा येथे बाईक भाड्याने घेऊन जगातील सर्वोच्च ठिकाणे मनसोक्त भटकता आली. दहा दिवस फक्त सकाळी लवकर उठायचे - आता कुठे कसे जायचे आणि काय बघायचे फक्त हेच विचार डोक्यात! सह्याद्रीमधील ट्रेकिंगची हौस तिथेही चार सोलो ट्रेक करून भागवून घेतली.
हिमाचलच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये वसलेली छोटी छोटी पण अत्यंत सूंदर अशी गावे. स्वर्गाहून सुंदर भासणारी निसर्ग दृश्ये, निळेशार आकाश आणि त्यावर जणू आमच्यासाठीच कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरेशुभ्र ढग. आसमंताशी स्पर्धा करणाऱ्या किन्नोर कैलास पर्वतशिखरांचा शुभ्रधवल असा बर्फाचा जिरेटोप. साक्षात कैलासावरून भूलोकावर येणारा गंगारवं ( ग्लेशिअरचे किंवा गंगेचे पाणी). आपापसात दाटीदाटीने उभ्या उंचच उंच देवदार वृक्षांची चढाओढ. बर्फाने आच्छादित मनमोहक पर्वतशिखरे. किन्नोर मधून स्पिती खोऱ्यात प्रवेश करताच झालेला निसर्गबदल, हिरवागार जंगलाचा प्रदेश काही तासात बदलून समोर आलेले रखरखीत पण तेवढेच उत्तुंग असे शीत वाळवंट. हुडहुडी भरवणाऱ्या ४ अंश तापमानात केलेली भटकंती, निसर्गाच्या आव्हानाला तोंड देत ख्याली खुशालीने जगणारी पहाडी मंडळी, रॉयल एन्फिल्ड घेऊन त्याने रोडने जोडलेल्या जगातल्या सर्वात उंच गावात जाऊन तिथून दिसणारे दिलखेचक नजारे, जगातले सर्वात उंच पोस्ट ऑफिस, रेस्तरॉ , ढाबा , चहावाला असे जे जे जमेल ते सगळं, आशिया खंडातल्या सर्वात उंचावर बांधलेल्या पुलावरून धडधडत जाणारी रॉयल एन्फिल्ड. हजार वर्षे जुन्या संस्कृतीशी नाळ जोडणारे छोटे छोटे लामा मुले त्यांची बौद्ध संस्कृती. तेथल्या पुरातन मॉनेस्ट्री, धनकर नावाच्या मॉनेस्ट्री मधून रात्री दोन वाजता सहज डोळ्यांना दिसू शकणारी मिल्की वे आणि केलेले स्टार गेझिंग, पिन वॅली मध्ये जाताना असलेला खतरनाक आणि आजूबाजूला चिटपाखरूहि नसलेला रस्ता, मूद गावाला जाताना दिसणारे डोळे दिपवणारे, अविस्मरणीय असे राखाडी बर्फीले पर्वत, मोमो, थुक्पा, सिधू अश्या अस्सल तिबेटियन पदार्थांची मेजवानी, तिबेटच्या सीमेकडे शेवटचे पण प्रेक्षणीय असे छितकुल गाव. ट्रीपच्या शेवटी एक सोलो ट्रेकला चक्क वाघोबानी सहकुंटुंब दिलेले दर्शन आणि तेव्हा दरदरून फुटलेला घाम, ऐन त्यावेळेस एकमेव आलेली गाडी आणि त्यांनी दिलेली लिफ्ट! असे अनेक कायम आठवणीत राहतील असे प्रसंग जगता आले. "केल्याने देशाटन" या उक्तीचा पुरेपूर आलेला अनुभव. एकंदर काय तर, कधीही न कोमेजणारी ही आठवणींची सोनपुष्पे, आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं.
गर्दीशो मै जो छिन गया था, सुकून लौटा रही है जिंदगी ।किष्टों मैं ही सही, हम पर भी मेहेरबान हो रही हैं जिंदगी ।।
पूर्ण प्रवास हा पब्लिक ट्रान्सपोर्ट ने करायचा हे आधीच ठरवलेले होते. ट्रेनचे तिकीट सोडून कुठलेही बुकिंग केले नव्हते. स्पिती मधला जून हा सीजन असल्याने ऐनवेळी बुकिंग अवघड होईल असे बरेच ऐकले होते पण प्रत्यक्षात मात्र उलटा अनुभव आला. हिमाचलची लाईफलाईन HRTC च्या बसने सर्व प्रवास उत्तम आणि अर्ध्या तिकिटात झाले. स्पिती आणि किन्नोर खोऱ्यातील आदरातिथ्य तुम्हाला भारावून टाकते. जुन महिन्यातला निसर्ग आणि थंडी तुम्हाला विलक्षण आनंद देतात. अश्या दुर्गम ठिकाणी कोणतेही आगाऊ बुकिंग न करता , फॅमिली घेऊन जाणे हा अनुभव मुळातच खूप काही शिकवणारा होता. हिमाचल मधल्या या सुंदर अश्या ठिकाणांची अनुभूती तुम्ही नक्की घ्यायला हवी.
तूर्तास फोटोंचा आनंद घ्या!
![]() |
| बटसेरी गाव ते सांगला पायवाट |
![]() |
| पिन व्हॅली मधील शेवटचे गाव - मूद |
![]() |
| धनकर तलाव. धनकर मॉनेस्ट्री पासून ८ किमी ट्रेक |
![]() |
| तिबेट बॉर्डर जवळचे शेवटचे गाव : छितकुल |
![]() |
| नाको येथील राखाडी डोंगररांग |
![]() |
| पिन व्हॅली मध्ये जाताना लागलेले ग्लेशिअर |
![]() |
| धनकर लेक |
![]() |
| सर्वात उंच गाव : कॉमिक |
![]() |
| लान्गझा येथील बुद्धमूर्ती |
![]() |
| हिक्कीम कडे जाताना |
![]() |
| किन्नोर कैलास रेंज |
![]() |
| चाका पीक ट्रेक , कल्पा |
![]() |
| हिंदुस्थान तिबेट हायवे |
![]() |
| स्पितीची ओळख : की मॉनेस्ट्री |
वाचत राहा
आपलाच ,
सागर शिवदे
घामाच्या बादल्या भरणारा ट्रेक -
वळवाच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात सुसह्य केलेल्या उन्हातून भटकंतीसाठी लोणावळ्याजवळील दोन घाटवाटांचे नियोजन ठरले. मागच्याच आठवड्यात घोडेजिन- वाघुरघळ ट्रेकवरून परत येताना पश्चिमेच्या केशरी आभाळी उंचावलेला शिवलिंग पॉईंट खुणावत होता. टूरिस्टी पब्लिकच्या गर्दीमुळे कधी या पॉईंट्स वर थांबायलाच जमले नाही. शिवलिंग पॉईंटवर उभे राहिले असता आसमंतात उंचच उंच जाणारा महादेवाच्या पिंडीप्रमाणे भासणारा डोंगर म्हणजे शिवलिंग. त्याचा डावा हात धरून उभा, कोकणातून देशावर येणाऱ्या दोन घाटवाटांचा रक्षक तो मृगगड.
आजचा दोन घाटवाटा आणि एक किल्ला करायचा प्लॅन झाला आणि लगोलग पंधरा वीस मंडळी आपापले रापलेले चेहेरे अजून काळेकुट्ट करण्यासाठी तयार झाली. भल्या पहाटे पुण्यनगरीतून प्रस्थान करून लोणावळा वरून लायन्स पॉइंटला पोहोचलो तेव्हा उन्हाळी ट्रेक आहे का पावसाळी असा प्रश पडावा असे वातावरण होते. मृगगडाच्या दरीतून निश्चल पहुडलेले ढग आता लगबगीने घाटमाथ्यावर येऊ लागेलेले. या सृष्टी सोहोळ्यात सूर्यदेवांचे आगमन जरा लांबलेच. शिवलिंग डोंगर या ढगांच्या जंजाळात ताठ मानेने उभा होता. मागे लांबवर नागफणीच्या डोंगर अधून मधून दर्शन देत होता. मृगगडाचे मात्र इतक्या लवकर दर्शन होणे नव्हते. थोडक्यात काय तर असे सुंदर वातावरण दिवसभर राहील या अपेक्षेने आनंदित झालेली ट्रेकर मंडळी पायमोडी घाटाच्या दिशेने निघाली.
काही वर्ष्यापुर्वी जेव्हा एसटीने ट्रेक करायचो तेव्हा मृगगड करणे म्हणजे बारा तासांचा प्रवास आणि बारा मिनिटांचा किल्ला असा सिन होता. कोथरूड ते शिवाजीनगर भल्या पहाटे गाडी हाणत जाऊन तेथून खोपोली. खोपोली ते पाली बसने, भेलीव फाट्यावर उतरून वडाप ने भेलीवच्या अलीकडचे गाव, त्याहून चालत भेलीव मग किल्ला आणि रिटर्न हेच सगळे असला दमवणारा कार्यक्रम असायचा. आजही तसाच दमवणारा कार्यक्रम होता पण आजची पायपीट घाटमाथ्यावरून होती. असो! हौसेला मोल नाही हेच खरे!
पायमोडी घाटाच्या वाटेने आम्ही कोकणात उतरण्यास सुरुवात केली. ढगाळ वातावरण आता कमी होऊन त्याची जागा उष्म्याने घेतली. घामाच्या धारा पुसत पुसत मंडळी शिवलिंग डोंगराच्या दिशेने निघाली. दोन तीन ट्रॅव्हर्स मारल्यावर वाट संथपणे पायथ्याशी उतरते. वाटेने गुलमोहराची लालबुंद झाडोरा आणि बहाव्याची पिवळीधमक फुले निसर्गातल्या रंगपंचमीची भूल घालत होते. मध्ये एखादा हुप्प्याचा आवाज सोडला तर अत्यंत निरव शांतता. सुमारे दीड तासाच्या चालीत आम्ही दरीमध्ये उतरलो आणि मृगगडाच्या दिशेने चालू लागलो. पायमोडी घाट तसा सोप्या श्रेणीतील म्हणता येईल. सुरवातीला असलेल्या कातळकोरीव पायऱ्या हि वाट फार पूर्वीपासून प्रचलित असावी याची साक्ष देतात.
पायमोडी वाटेने उतरून आल्याचा फायदा हा झाला कि भेलीव गावात न जाता मधूनच मृगगडाची चढाई करता आली. आव्हान सूर्यदेव घाटावरच्या कड्यावरून वरती आल्यामुळे घामाच्या धारा दुप्पट झाल्या होत्या. घाम पुसत मंडळी मृगगडाची चढाई करू लागली. दहा मिनिटांच्या चढाईतच आम्ही गुहेपाशी पोहोचलो. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा गुहा मिस झाली होती. तेव्हा गुहेत आत जाऊन किती मोठी आहे बघून तरी येऊ म्हणून गुहेत शिरलो.
गुहेत शिरतानाच समोरून काही येईल का या विचारानेच पाकपुक झाली. तरी डेरिंग करून आतपर्यंत जाऊन आलो त्याचा हा विडिओ बघा :
गुहेत शिरलो तसे संपूर्ण धुळीचे साम्राज्य. वाघुळांचा घाण वास आणि जाळी जळमटे तोडत आत पोहोचलो. चांगली ३०-४० फूट आत खोदलेली हुह पुढे जाऊन डावीकडे वळते. तेथे एक माणूस उभे राहू शकतो अवधी जागा आणि त्यापुढेही थोडीशी १० फूट खोदलेली. एकंदर थ्रिलिंग अनुभव होता.
गुहेतून बाहेर येऊन गडाच्या दिशेने मोर्चा वळवला. कातळकोरीव पायऱ्यांवर फोटोबाजी करत वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो. येथे पेटपूजा करून गडफेरी उरकली. खाली उतरून गुहेतून थोडीफार फोटोग्राफी करून फल्यांण गावाच्या बाजूला उतरायला चालू केले. गडावरूनच उतरल्याने भेलीव आणि फल्यांण दोन्ही गावात जायची गरज लागली नाही. गडावरून उतरून फल्यांण नाळेत आलो. येथे परत एक ब्रेक घेऊन मग चालू झाली करवंदी घाटाची खतरनाक चढाई.
सुमारे सत्तर टक्के चढाई झाल्यावर एका ठिकाणी घनदाट जंगल लागते. तेथे वर्षानुवर्षे उभी असलेली महाकाय अशी झाडे पाहून सर्व मंडळी उत्साहित झाली. करवंदी नाळेच्या चढाई सुरु झाल्यापासून कोणीही फोटो काढले नव्हते. तब्बल हजार दोन हजार वर्षे वयाची हि झाडे असावीत. पाहताच अचंबा झाला. येथे यथेच्छ फोटोग्राफी करून शेवटच्या टप्पा चढाई चालू झाली.
घाटमाथा जवळ येऊ लागला तसा वाटेवर सर्वत्र कचरा सुरु झाला. स्वर्गसुख देणाऱ्या सह्याद्रीत असा कचरा करणारे आपणच किती करंटे आहोत या विचारातच माथा गाठला. भर उन्हातही गार वारा आता आल्हाददायक वाटत होता. बाकीचे भिडू येईपर्यंत दोन तास लागले तोपर्यंत एक झोप पदरात पडून घेतली. दोन घाटवाटा आणि किल्ला असूनही ट्रेक संपला तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. परतीच्या प्रवासात मोरगिरी, जवण मार्गे जाताना पवना धरणातल्या वाघेश्वर मंदिराला गेलो. येथेही रिल्स पाहून आलेल्या लोकांची गर्दी पाहून जे सटकलो ते सातच्या आत घरात.
वाघेश्वर
असो!, तर एकंदर २२ किलोमीटर्सची, घामाच्या बदल्या भरणारी, दोन घाटवाटांची भटकंती सुफळ संपूर्ण जाहली !
महत्वाचे असे काही :
तैलबैल - घोडेजिन घाटाने उतराई - सुधागड दिंडी दरवाजा - सुधागड - ठाकूरवाडी - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल [ २४ किलोमीटर ]
तळपत्या उन्हातील दोन घाटवाटा आणि दोन किल्ल्यांची अनवट भटकंती - तैलबैल - सुधागड - तैलबैल रेंज ट्रेक .
=================================================================
या काकूंच्या एका वाक्याने तैलबैल गावातील मारुती मंदिरात घोरणाऱ्या ट्रेकर्सची झोप तीन ताड उडाली. पहाटे साडे चारची किर्रर्र वेळ. रुपेशने शांतपणे "काय शिंची कटकट ए! " अश्या अविर्भावात उठून हातात दंडुका घेऊन सापाला पुढच्या दिड मिनिटात यमसदनी धाडले आणि पुन्हा निद्रादेवीची आराधना करण्यास सुरुवात केली. झोप उडालेली ट्रेकर मंडळी कधी नव्हे तो "आज लवकर ट्रेक चालू करू" म्हणत आवरायला लागली.
=================================================================
मागच्या आठवड्यात कोंडनाळ-हातलोट घाट असा फक्कड बेत झाल्याने भर उन्हात अजून काळे पडायला आपण सिद्ध आहोत याचा साक्षात्कार झाला. तैलबैला वरून कोकणात उतरणाऱ्या चार-पाच घाटवाटा सतत खुणावत होत्या. या आधी दोन वेळा ठाणाळे लेणी शोधण्याचे निष्फळ प्रयत्न केले होते. घोडेजिन - भोरप्याची नाळ किंवा वारसदार - वाघजाई घाट या दोनपैकी, घोडेजिनने उतरून वाघूर घळ ने चढायचा प्लॅन फिक्स केला. यामध्ये सुधागड दिंडी दरवाजा पण करता येईल या हिशेबाने भल्या पहाटे ट्रेक सुरु झाला. सुरुवातीला फक्त दोन घाटवाटा करू असे ठरले मग नंतर महादरवाजा बघून परत मागे फिरू आणि मग पूर्ण सुधागड करून दोन्ही वाटा करू असा मारुतीच्या शेपटीसारखा वाढत गेलेला ट्रेकने भटक्या मंडळींची चांगली पाकपुक केली.
चैत्र पालवीचे दिवस, सकाळी सहा वाजताच तैलबैलाच्या कातळभिंती आसमंतात सूर्याची पहिली कोवळी किरणे लेवून सोनेरी जिरेटोप परीधान करून होत्या. वर्षानुवर्षे अभेद्य अश्या कातळभिंती आणि त्यामधोमध स्थानाप्पन्न असे भैरव यांना मनोमन नमस्कार करून घोडेजिन घाटाची वाट पकडली. तैलबैला गावातून कोकणात उतरायला वाघजाई. सवाष्णी, घोडेजिन , वारसदार अश्या चार वाटा आहेत. घोडेजिनही सुधागड ला जाणारी सगळ्यात जवळची वाट. हि वाट तैलबैला पठार आणि सुधागड यातील गणेश खिंडीत उतरते, येथून पुढे नाळेने सुधागडच्या दिंडी दरवाज्याला जाऊन किल्ल्यावरून दुसरे टोक ठाकूरवाडी गाठायचे ठरले. भोरप्याची नाळ उर्फ वाघुरघळ स्थानिक कातकरी सोडून कोणीही वापरत नसल्याने वाट अशी नाहीच. जंगलातून काटेरी झाडांचा प्रसाद घेत अंदाजाने चढाई करणे क्रमप्राप्त.
गावातून अर्ध्या तासात घोडेजिन घाटाच्या तोंडाशी आलो. वाटाड्या घेणे गरजेचे आहे पण या वाटांचा अभ्यास केल्याने gpx फाईलच्या जीवावर जायचे ठरले. तैलबैला कातळभिंती मागच्या बाजूने आता अजून रौद्र भासत होत्या. सकाळचे शुचिर्भूत वातावरण, आंब्याला आलेला मोहोर, कातळामागून उगवणारे सूर्यदेव. वाळलेल्या गवताच्या पात्यांवर कोवळे किरण पडल्यावर चमकणारे गवताचे भाले. पळसाच्या झाडावर चढलली पिवळेधमक तोरणं. समोर स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला भोरप्याचा डोंगर, त्यामागे तळगड, उजवीकडे सरसगड तर मागे बघता घनगड, केवणीचे पठार, नाणदांड घाट असे दुर्गवैभव. डोळे भरून हा निसर्गाचा सोहोळा बघून रामरायाचे नाव घेऊन घोडेजिनच्या घसाऱ्याने उतरायला सुरुवात केली.
घोडेजिन घाटमाथ्यावरून समोर दिसणारा सुधागड
"आमचे रेल्वेच्या इंजिनात रिसर्वेशन झाले असले तरी आम्ही चुकीने गार्डाच्या डब्यातच शिरणार" या उक्तीप्रमाणे नाळ उतरताना पहिल्यांदाच रस्ता चुकला. पूर्ण नाळ उतरून गणेश खिंडीत आलो तर रस्ता गायब. gpx ओरडून ओरडून थकलं कि "बाबांनो रस्ता चुकलाय". मग काय धोंडसे गावातून सुधागड येणाऱ्या वाटेच्या समोर आल्यावर करवंदाच्या जाळीशी दोन हात करत गचपणातून मार्ग काढत कसेबसे योग्य त्या नाळेत आलो. रस्ता चुकल्यामुळे का होईना पण जंगलात घुसून उतरल्याने कमी वेळात धोंडसे गावातून येणाऱ्या वाटेला लागलो. सुरुवातीला वाटले होते कि दिंडी दरवाजा जवळ असेल. तो बघून याच रस्त्याने उतरून गणेश खिंड ओलांडू आणि भोरप्याच्या नाळेला जाऊ. घड्याळात बघता अकरा वाजत आलेले. या प्लॅनने दोन-तीन पर्यंत तैलबैला गावात पोहोचलो असतो पण भर उन्हाचा तडाखा अजून बसला नव्हता म्हणून दिंडी दरवाज्याने चढून सुधागड करून ठाकूरवाडी म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला उतरायचा निर्णय घेतला.
सुधागड दिंडी दरवाज्याच्या दिशेने चढून आलो. वाटेत एक मारुतीचे सुंदर मंदिर लागते. त्यापुढे भैरव आणि चॅन पाण्याची टाकी आहेत. महादरवाज्याचे सौन्दर्य ते काय वर्णावे? महाराजांनी रायगडा आधी सुधागडची निवड का केली असावी याची प्रचिती येते. आजही बुलंद असा गौमुखी पद्धतीचा दिंडी दरवाजा डोळ्याचे पारणे फेडतो हे नक्की.
महादरवाज्याच्या वाटेत असणारे पाण्याची टाकी आणि भैरव
महादरवाजा उर्फ त्रंबक दरवाजा
यथेच्छ फोटो काढून भोराई देवीच्या मंदिरात पोहोचलो. पाठीवरची वजने पोटात ढकलून सचिव वाडा बघून ठाकूरवाडीच्या दिशेने उतरायला लागलो. आत्तापर्यंत झाडीतून चढाई होती म्हणून मंडळी आनंदात भटकत होती. सुधागडच्या माथ्यावरून समांतर जाताना जळता सूर्य डोक्यावर येऊन ठेपला होता. पाठीवरच्या आठ लिटर पाण्याचा साठा अर्ध्यावर आलेला. त्यात पाच्छापूर दरवाजाची वाट चुकून आम्ही पुन्हा भरकटलो. सुधागडची gpx नसल्याने दोन वेळा वाट चुकून कड्यावर उतरलो. एक ठिकाणी अगदी खालपर्यंत उतरून कडा लागल्याने परत उलटी चढाई करणे आले तेथे मंडळींचा पेशन्स संपला. तेवढ्या एक तासात जी काही एनर्जी , वेळ आणि पाणी खर्च झाले त्यांची किमंत पुढे चुकवावी लागणार होती.
सुधागडावरून दिसणारा तैलबैला .. बापरे एवढे अंतर अजून जायचे आहे.
आत्तापर्यंत रमत गमत चाललेली मंडळीची दिड तास वाया गेल्याने वेळेशी स्पर्धा चालू झाली. ठाकूरवाडीत उतरलो तेव्हा तीन वाजत आले होते. पूर्ण सुधागड ट्रॅव्हर्स मारून मागे परत तिवईचा वेढा आणि तेथून वाट शोधत भोरप्याची नाळ चढाईची होती. गावात पोहोचायला रात्र होणार हे नक्की झाले होते. आता झपाझप पाय उचलणे गरजेचे होते पण सुधागडच्या पट्ट्याने आणि उन्हाच्या तडाख्याने ट्रेकर मंडळी पुरती गळपटली होती. एकोले दरीतल्या नाळेत लागलो तेव्हा थोडीशी पेटपूजा करून घेतली. रस्त्यात आत्तापर्यंत कुठेही पाणी मिळालेले नव्हते. भोरप्याच्या नाळेत पाणी मिळेल हि एक अपेक्षा होती. भोरप्याच्या नाळेला स्थानिक वाघुरघळ म्हणतात. म्हणजे वाघ पाणी प्यायला येतो ती वाट. सुमारे तासभर चालल्यावर एक मोठा डोह दिसला. मिनिटा-मिनिटाला येणार घाम दिवसभर पुसत चाललेली मंडळी आहे तशी डोहात डुंबू लागली.
वेळेची आठवण झाल्यावर मंडळी निघाली आणि वाघूळघळ च्या शोधात जंगलात घुसली. असंख्य करवंदाची जाळी व इतर काटेरी झाडे रस्ता थोपवून उभी होती. अंग-खांद्यावर काट्यांची सही घेत मार्गक्रमण चालू झाले. gpx फाईल दाखवत असलेला मार्ग सोडायचा नाही म्ह्णून चालत होतो पण मध्ये मध्ये पडलेली झाडे, लॅन्ड्स्लाईड मार्ग बदलायला भाग पंडित होती. मध्येच एक ठिकाणी भलामोठा रानरेडा आमच्यावर नजर रोखून उभा होता. त्याचे अविर्भाव बघून पुन्हा वाट सोडली आणि नाळेत उतरलो. दोन अडीच तासांच्या काट्याकुट्यांच्या मार्गाने एकदाचे भोरप्याच्या नाळेत पोहोचलो.
आताशा सगळ्यांचे पाणी संपत आले होते. दिवस पश्चिमेकडे कलू लागलेला. समोर केवणीचे पठार मावळतीचे रंग धारण करू लागलेला. येथून आता नाळेतून उभी चढाई करायची होती. प्रत्येक पाऊलागणिक श्वास फुलत होता. पाण्याने आणि उकाड्याने जीव बैचैन झाला होता. प्रत्येकाची इंच इंच लढाई चालू झाली. जवळपास अर्धी नाळ चढून झाली तेव्हा सूर्यनारायण ड्युटी संपवून निघून गेले होते. शेवटच्या संधी प्रकाशात सोळावा ब्रेक घेऊन बॅटरी काढून मंडळी पुन्हा चढाईला जुंपली.
कोंडनाळची आठवण करून देणारी वाघुरघळ चढून माथ्यावर आलो तेव्हा तैलबैल खोरे अंधारात गुडूप झालेले. कातळावरील एकच भैरवाच्या मंदिरातला दिवा चमकत होता. सगळी मंडळी त्यांच्या सगळ्या अवयवांसकट सुखरूप असल्याची खात्री करून गावाच्या दिशेने निघालो. रणरणत्या उन्हातील २४ किलोमीटर्सचा ट्रेक संपवून रापलेल्या चेहऱ्याने घरी पोहोचलो तेव्हा घड्याळ दुसऱ्या दिवसाची तयारी करीत होते.
"लाईफ मैं बहोत कुछ पेहली बार होता है रे " या मुन्नाभाईच्या वाक्याप्रमाणे आठ लिटर पाणी लागलेला हा पहिलाच ट्रेक म्हणावा लागेल. पूर्ण भटकंतीत प्यायला एक घोट पाणी नाही मिळाले पण पोहायला मिळाले अशीही पहिलीच वेळ. सकाळी साप तर संध्याकाळी रानरेड्याशी भेट हेही प्रथमच. असो आयुष्य समृद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या देणग्या आम्हाला वेळोवेळी मिळोत हीच रामराया चरणी प्रार्थना !
शेवटी काय तर ... तू रख यकीन बस अपने इरादों पर ........ तेरी हार तेरे होसलों से बडी नही होगी !
वाचत राहा .