मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

दसरा पालखी स्पेशल भटकंती : कुडाळ, नरफदेव मेरुलिंग , वैराटगड

 दसरा पालखी स्पेशल भटकंती : 

कुडाळ, नरफदेव मेरुलिंग , वैराटगड, ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर (धावडशी)


मागील आठवड्यात उत्तराखंड मधील तीन केदार यात्रेनिमित्त सह्याद्रीतील रानफुलांचे स्पेशल ट्रेक करता आले नव्हते. ती कसर भरून काढायची म्हणून साताऱ्याजवळील मेढा परिसरात भटकंतीचे नियोजन झाले. तशी ही दरवर्षीची मँडेटरी ट्रिप पण यावेळेस कुडाळ मधील दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर देवांच्या पालख्या बघण्यासाठी खास मंडळी रविवारी सकाळी रवाना झाली. सकाळपासून आसमंतात जमू लागलेले ढग बघता मेरुलिंग वरून अफाट दृश्य दिसणार याची खात्री झाली. खंबाटकी घाट ओलांडला तसे वातावरण पूर्ण बदलले आणि निळ्याशार अवकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांची नक्षी विधात्याने चित्र रेखाटावे तसे भासू लागले. 

डोंगर शिखरावरील नरफदेव मेरुलिंग मंदिर , त्यापल्याडचे धावडशी येथील पुरातन धाटणीचे ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, कुडाळचे ग्रामदैवत श्री  पिंपळेश्वर वाकडेश्वर देवांच्या पालख्या, नरफदेव पठारावरची फुललेली रानफुले, निळ्याशार आसमंतात ढकलाढकली करणारे ढगांचे गुच्छ, मावळतीच्या रंगसंगतीत न्हाऊन निघालेला वैराटगड,वीरगळींचे गाव  किकलीचे हेमांडपंथी धाटणीचे भैरवनाथ मंदिर असे सगळे नजारे पाहात दिवस समाप्त जाहला. 

भटकंतीचा मार्ग : 

पुणे - भुईंज फाटा - कुडाळ - वैराटगड - मेरुलिंग - मेढा रोड - धावडशी - मेढा रोड - हायवे - बारा मोटेची विहीर (शेरी लिंब ) - पाचवड फाटा - किकली - पुणे 

 

असो , फोटोंची मजा घ्या! 

मेरुलिंग पठारावरून दिसणारा मनमोहक नजारा 


श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर पालखी सोहोळा , कुडाळ 

मेरुलिंग, नरफदेव 


नभ मेघांनी आक्रमिले 


श्री ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, धावडशी 

श्री ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, धावडशी 

श्री ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, धावडशी 

मेरुलिंग येथील एकमेव उजव्या सोंडेचा गणपती 



वाचत रहा !

सागर शिवदे 

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

गणपती स्पेशल राईड - शिल्पकलेच्या अद्भुत विश्वात

 गणपती स्पेशल राईड - शिल्पकलेच्या अद्भुत विश्वात 


कोथरूड - श्री चिंतामणी गणपती, थेऊर - दौलत मंगळ भुलेश्वर - सुपे येथील नगरे वाडा - श्री मल्लिकार्जुन मंदिर , लोणी भापकर - श्री मयुरेश्वर गणपती , मोरगाव - जेजुरी - सासवड - कोथरूड. [ २२५ KM ]



मागचा पूर्ण महिना गणपती मूर्तीच्या स्टॉल वर गेल्यामुळे भटकंतीस ब्रेक लागला होता. ती कसर भरून काढायला वाघजाई - सवाष्णी घाटाचा तंगडतोड ट्रेक ठरवलेला पण ट्रेकभिडु न जमल्याने रद्द झाला. मग काय दहा वर्ष्यांपूर्वी केलेल्या या रूट वर परत जायचे ठरवले. निमित्त होते ते -  थेऊर मोरगाव गणेश दर्शन आणि जोडीला भुलेश्वर मंदिरातील एकमेवाद्वितीय असे गणपतीचे स्त्री रूप दर्शन - विनायकी गणेश. 


पहाटे पाचला कोथरूडवरून  दोघे निघालो. श्री चिंतामणी गणपतीच्या दरबारात पोहोचलो तेव्हा झुंजूमुंजू होऊ लागले होते. प्रत: प्रहरी गणेशाचे ते लोभस रूप आणि मंदिरात फक्त तीन लोक! मनोभावे नमस्कार करून,  अथर्वशीर्षाचे आवर्तन करून गाडीला टांग मारली ते भुलेश्वरच्या दिशेने. येथेही नुकतीच पूजा सुरु झाली होती आणि गर्दी शून्य. महादेवाच्या चरणी लीन होऊन कातळ शिल्पांकडे मोर्चा वळविला. आजही येथे येण्याची पाचवी वेळ पण प्रत्येकवेळी हि शिल्पे तितकीच संमोहित करतात. येथेही शून्य जनता असल्याने छान छान फोटो काढून माळशिरस गावाचा रस्ता धरला. 





माळशिरस येथून सरळ गेल्यास पांडेश्वर नावावंजे अतिशय सुंदर  मंदिर लागते. उजवीकडे जेजुरी तर डावीकडे सुपे, लोणी भापकर. सुपे गावाचा रास्ता धरून सुप्यात पोहोचताच नागरे गढी वाडा विचारला तेव्हा बऱ्यचश्या लोकांच्या चेहेऱ्यावर आठ्या उमटल्या. शेवटी एक फरसाणवाल्या काकांनी शेवेचे दोन घास तोंडात टाकून एकदम साक्षात्काराच्या अविर्भावात - "अहो गढी कुठली म्हणताय, नगरे मळा म्हणा की " असे म्हणल्यावर आम्ही तो किवर्ड विचारात फिरू लागलो. एसटी स्टॅन्ड वासून जवळच रोड टच असलेल्या वाड्याला शोधण्यास कष्ट पडले नाहीत. 





साडे तीनशे वर्षे जुना पण आजही इतिहासाच्या सुवर्ण क्षणांना जपणारा तेवढाच भक्कम आणि देखणा वाडा पाहून डोळे सुखावले. वाड्यात एक महादेवाचे मंदिर आहे. बाजूला तीन-चार खोल्या. दक्षिणेकडे पूर्वीचा राहायचा वाडा होता पण तो आता नामशेष झालाय असे कळले. शेजारीच भुयारी विहीर, चिंचांची अगणित डेरेदार वृक्षसंपदा, सीताफळांनी लगडलेली झाडे बघून मोह काही आवरला नाही मग काही सीताफळांनी झाडावरून बॅगेत उडी मारली. 


वाड्याची माहिती घेऊन निघालो लोणी भापकर येथे. बरोब्बर दहा वर्षांपूर्वी मी असाच एकटा गाडी हाकत येथे आलो होतो. सुदैवाने आजही गाव तसेच सुंदर होते. येथील खास आकर्षण म्हणजे - हेमाडपंथी रचनेचे श्री मल्लिकार्जुन मंदिर, विष्णूच्या १४२ प्रतिमा अंगावर कोरलेला यज्ञ वराह आणि काचेसारख्या पाण्याची भलीमोट्ठी पुष्करणी. येथील दत्तमंदिराच्या समोर कोरलेले रामायणातील प्रसंग आणि विष्णूचे नऊ अवतार पाहून तर आपल्या हिंदू संस्कृतीचा इतिहास किती वैभवशाली असेल असे वाटून गेले. इथे प्रत्येक दगडाची अशी कथा आहे आणि प्रत्येक दगडाला सांगता येईल अशी कथा आहे. ( मराठी भाषिकांसाठी अनुवाद -  Every stone has story tail and story to tell ). मंदिर बंद होते पण एक आजोबानी उघडून पूर्ण शिल्पे दाखवली. कृष्णलीला , रामायणातील प्रसंग , शिव-पार्वती विवाह सोहोळा प्रसंग, युद्धशिल्प , कामशिल्पे अश्या अनेक शिल्पांची मेजवानी. 




                           

भुलेश्वर आणि येथील शिल्पकला पाहून आजच मन भरले होते पण पोट रिकामे असल्याची जाणीव झाली. लोणी भापकर गावातील भैरवनाथाच्या मंदिरात गेल्यावर भंडारा चालू पाहून तेथे बसकण मारली आणि उदरण-भरणम करून घेतले. एव्हाना अर्धा दिवशी सरला नव्हता. अकरा वाजता येथून निघून मोरगाव गेलो तर सुमारे तासाभराची लाईन होती. गणरायाचे दर्शन घेऊन मंडळी परत निघाली. जेजुरी जवळ येताच पावसाने गाठले. पुढे सासवड येथील सुंदर मंदिरे पाहायचा प्लॅन होता पण तो स्किप करून पुण्यनगरीचा  रस्ता धरला. 


असो, फोटोंची मजा घ्या!
सागर शिवदे 

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

हिमालयीन फिरस्ती : स्पिती आणि किन्नोर वॅली ऍडव्हेंचर ट्रिप २०२४

 हिमालयीन फिरस्ती : स्पिती आणि किन्नोर वॅली ऍडव्हेंचर ट्रिप २०२४


 

आपल्या आयुष्यरुपी अत्तराच्या कुपीत कधीही न विसरता येणाऱ्या अनुभवांचे अत्तर नियमित टाकायला हवं. त्याचा दरवळणारा सुगंध म्हणजेच आठवणी आपल्याला आयुष्यभर जगायला ऊर्जा देतात. आजची आमची ही स्पिती किन्नोर फॅमिली ऍडव्हेंचर ट्रिप अगदी तशीच अत्तरासमान आहे. जेव्हा जेव्हा हिमालयाचा विषय निघेल तेव्हा ह्या ट्रिपची आठवण आल्याशिवाय काही राहायची नाही. हिमालयाच्या अजस्त्र बाहुंमधून भटकत, निसर्ग सौन्दर्याने पोट भरत, साक्षात किन्नोर कैलासाचे पाण्याने तहान भागवत , तारीख वेळ विसरून दहा दिवस मनसोक्त भटकता येणे यापेक्षा मोठे भाग्य ते कुठले? 

 

IF YOU CAN DREAM IT, YOU CAN DEFINITELY DO IT! 


ताबो गावापासून काझा कडे जाणाऱ्या रस्त्यावर BRO ने लावलेला हा बोर्ड म्हणजे आमच्या या स्पिती आणि किन्नोर फॅमिली ट्रिपचे सार आहे. सुमारे दशकापासून विश लिस्ट मध्ये असणारे लेह लद्दाखचे फोटो बघून मन भागवून घेत होतो. तो योग लवकरच येईल पण त्या प्रदेशाशी साधर्म्य असणारा स्पिती वॅलीचा प्रदेश सहकुटुंब फिरण्याचा आज तो योग आला आणि दैवी रचना म्हणतात तसे सगळे काही जुळून आले. ते म्हणतात ना .. "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है ... कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है !!"


मागील वर्षी सहकुटुंब केदारनाथ, तुंगनाथ, बद्रीनाथ अशी उत्तराखंड मधील खडतर भटकंती झाल्यावर यावर्षी जरा कुटुंबाला घेऊन जायचा विश्वास वाढला. सुरुवातीला मदमहेश्वर आणि रुद्रनाथ या पंचकेदारांपैकी बाकी असलेल्या दोन केदार स्थानांचा प्लॅन ठरला. पुणे ते हरिद्वार बुकिंग पण झाले. पूर्ण जंगलातून ट्रेकिंग असलेल्या याठिकाणी फॅमिली घेऊन जाणे अवघड आहे म्हंटल्यावर दुसरा ऑप्शन हिमाचल मधल्या आणि HRTC बसने कनेक्टेड, लद्दाखशी मिळताजुळता प्रदेश असलेला स्पिती व्हॅलीचा प्लॅन केला. 


प्लॅन झाला तो असा - 
दिवस ० : पुणे ते दादर, दादर ते बांद्रा , बांद्रा ते चंदीगड 
दिवस १ : चंदीगड स्थलदर्शन , संध्याकाळच्या ६ च्या डिलक्स बस ने रिकॉन्गपीओ. 
दिवस २ : रिकॉन्गपीओ ते रोघी गाव. रोघी ते कल्पा. कल्पा येथील विष्णुमंदिर, किन्नोर कैलास दर्शन, रोघी सुसाईड पॉईंट, कल्पा येथून सुरु होणारा चाका पिक ट्रेक. ( १२ KM)   कल्पा मुक्काम. 
दिवस ३: कल्पा  ते रिकॉन्गपीओ, रिकॉन्गपीओ ते ताबो बसने. हा ९ तासांचा प्रवास होता पण एक मिनिटही बोर होणार नाही असे अफलातून नजारे आहेत. ताबो स्थलदर्शन - मॉनेस्ट्री, रिव्हर साईड, ताबो केव्ह्स. ताबो मॉनेस्ट्री मुक्काम.  
दिवस ४ : ताबो - काझा मॉनेस्ट्री आणि लोकल मार्केट. बाईक भाड्याने घेऊन बाकी सोपस्कार.  
दिवस ५ : काझा ते की मॉनेस्ट्री - किब्बर - चिचम (आशियातील सर्वात उंच ब्रिज) - लान्गझा ( सर्वात उंचीवरची बुद्ध मूर्ती ) - हिक्कीम (जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस )- कॉमिक ( जगातील सर्वात उंच रस्त्याने जोडलेले गाव ) - काझा - धनकर ( ढांकर) मॉनेस्ट्री येथे मुक्काम. 
दिवस ६: धनकर मॉनेस्ट्री - धनकर लेक सोलो ट्रेक ( ८ KM ) - पिन वॅली - पिन वॅलीमधील शेवटचे गाव मूद - काझा. काझा मुक्काम.
दिवस ७: काझा ते रिकॉन्गपीओ. रिकॉन्गपीओ ते छितकुल.  
दिवस ८ : छितकुल टॉप ट्रेक ( ८ km ), ITBP चेक पोस्ट, छितकुल स्थलदर्शन. 
दिवस ९: छितकुल ते बटसरी गाव. बटसेरी विष्णू मंदिर -  बटसेरी ते सांगला जंगल ट्रेक. - सांगला - कामरा फोर्ट - सांगला मुक्काम. 
दिवस १० : सांगला कांडा लेक ट्रेक आणि ४X४ राईड ( १४ KM), गंगारवं , सांगला ते चंदीगड प्रवास. 
दिवस ११ : चंदीगड ते पुणे. 



दहा दिवसांचा हा असा भरगच्च प्लॅन फॅमिली स्पेशली आठ वर्षांचा मुलगा घेऊन पूर्ण करता आला याचा आनंदच काही वेगळा आहे. सकाळी नाश्ता करून निघाल्यावर दुपारी जेवण स्किप करून रात्री मिळेल तिथे मुक्काम व जेवण केल्याने १० दिवसात जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देता आली. दहा दिवसात एकदाही फिरण्याचा वेळ खाण्या-पिण्यात घालवला नाही. HRTC बस ने कमी खर्चात आणि अधिक सुरक्षित उत्तम प्रवास झाला. निवांत बसून स्पिती खोऱ्यातील सौन्दर्य न्याहाळण्याची मजाच काही और! स्थानिकांशी बोलून नवीन भटकायच्या जागा कळल्या तर कधी मुक्कामाचे स्थान शोधण्यास मदत झाली. काझा येथे बाईक भाड्याने घेऊन जगातील सर्वोच्च ठिकाणे मनसोक्त भटकता आली. दहा दिवस फक्त सकाळी लवकर उठायचे - आता कुठे कसे जायचे आणि काय बघायचे फक्त हेच विचार डोक्यात! सह्याद्रीमधील ट्रेकिंगची हौस तिथेही चार सोलो ट्रेक करून भागवून घेतली.


हिमाचलच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये वसलेली छोटी छोटी पण अत्यंत सूंदर अशी गावे. स्वर्गाहून सुंदर भासणारी निसर्ग दृश्ये, निळेशार आकाश आणि त्यावर जणू आमच्यासाठीच  कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरेशुभ्र ढग. आसमंताशी स्पर्धा करणाऱ्या किन्नोर कैलास पर्वतशिखरांचा शुभ्रधवल असा बर्फाचा जिरेटोप. साक्षात कैलासावरून भूलोकावर येणारा गंगारवं ( ग्लेशिअरचे किंवा गंगेचे पाणी). आपापसात दाटीदाटीने उभ्या उंचच उंच देवदार वृक्षांची चढाओढ. बर्फाने आच्छादित मनमोहक पर्वतशिखरे. किन्नोर मधून स्पिती खोऱ्यात प्रवेश करताच झालेला निसर्गबदल, हिरवागार जंगलाचा प्रदेश काही तासात बदलून समोर आलेले रखरखीत पण तेवढेच उत्तुंग असे शीत वाळवंट. हुडहुडी भरवणाऱ्या ४ अंश तापमानात केलेली भटकंती, निसर्गाच्या आव्हानाला तोंड देत ख्याली खुशालीने जगणारी पहाडी मंडळी, रॉयल एन्फिल्ड घेऊन त्याने रोडने जोडलेल्या जगातल्या सर्वात उंच गावात जाऊन तिथून दिसणारे दिलखेचक नजारे, जगातले सर्वात उंच पोस्ट ऑफिस, रेस्तरॉ , ढाबा , चहावाला असे जे जे जमेल ते सगळं, आशिया खंडातल्या सर्वात उंचावर बांधलेल्या पुलावरून धडधडत जाणारी रॉयल एन्फिल्ड. हजार वर्षे जुन्या संस्कृतीशी नाळ जोडणारे छोटे छोटे लामा मुले त्यांची बौद्ध संस्कृती. तेथल्या पुरातन मॉनेस्ट्री, धनकर नावाच्या मॉनेस्ट्री मधून रात्री दोन वाजता सहज डोळ्यांना दिसू शकणारी मिल्की वे आणि केलेले स्टार गेझिंग, पिन वॅली मध्ये जाताना असलेला खतरनाक आणि आजूबाजूला चिटपाखरूहि नसलेला रस्ता, मूद गावाला जाताना दिसणारे डोळे दिपवणारे, अविस्मरणीय असे राखाडी बर्फीले पर्वत, मोमो, थुक्पा, सिधू अश्या अस्सल तिबेटियन पदार्थांची मेजवानी,  तिबेटच्या सीमेकडे शेवटचे पण प्रेक्षणीय असे छितकुल गाव. ट्रीपच्या शेवटी एक सोलो ट्रेकला चक्क वाघोबानी सहकुंटुंब दिलेले दर्शन आणि तेव्हा दरदरून फुटलेला घाम, ऐन त्यावेळेस एकमेव आलेली गाडी आणि त्यांनी दिलेली लिफ्ट! असे अनेक कायम आठवणीत राहतील असे प्रसंग जगता आले. "केल्याने देशाटन" या उक्तीचा पुरेपूर आलेला अनुभव. एकंदर काय तर, कधीही न कोमेजणारी ही आठवणींची सोनपुष्पे, आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं.


गर्दीशो मै जो छिन गया था, सुकून लौटा रही है जिंदगी ।
किष्टों मैं ही सही, हम पर भी मेहेरबान हो रही हैं जिंदगी ।।


पूर्ण प्रवास हा पब्लिक ट्रान्सपोर्ट ने करायचा हे आधीच ठरवलेले होते. ट्रेनचे तिकीट सोडून कुठलेही बुकिंग केले नव्हते. स्पिती मधला जून हा सीजन असल्याने ऐनवेळी बुकिंग अवघड होईल असे बरेच ऐकले होते पण प्रत्यक्षात मात्र उलटा अनुभव आला. हिमाचलची लाईफलाईन HRTC च्या बसने सर्व प्रवास उत्तम आणि अर्ध्या तिकिटात झाले. स्पिती आणि किन्नोर खोऱ्यातील आदरातिथ्य तुम्हाला भारावून टाकते. जुन महिन्यातला निसर्ग आणि थंडी तुम्हाला विलक्षण आनंद देतात. अश्या दुर्गम ठिकाणी कोणतेही आगाऊ बुकिंग न करता , फॅमिली घेऊन जाणे हा अनुभव मुळातच खूप काही शिकवणारा होता. हिमाचल मधल्या या सुंदर अश्या ठिकाणांची अनुभूती तुम्ही नक्की घ्यायला हवी. 

तूर्तास फोटोंचा आनंद घ्या!


बटसेरी गाव ते सांगला पायवाट 

पिन व्हॅली मधील शेवटचे गाव - मूद 

धनकर तलाव. धनकर मॉनेस्ट्री पासून ८ किमी ट्रेक 

तिबेट बॉर्डर जवळचे शेवटचे गाव : छितकुल 

नाको येथील राखाडी डोंगररांग 

पिन व्हॅली मध्ये जाताना लागलेले ग्लेशिअर 


धनकर लेक 

सर्वात उंच गाव : कॉमिक 

लान्गझा येथील बुद्धमूर्ती 


हिक्कीम कडे जाताना 

किन्नोर कैलास रेंज 

चाका पीक ट्रेक , कल्पा 

हिंदुस्थान तिबेट हायवे 

स्पितीची ओळख : की मॉनेस्ट्री 


वाचत राहा 

आपलाच ,

सागर शिवदे 

गुरुवार, २३ मे, २०२४

ट्रेक : लायन्स पॉईंट - पायमोडी घाट - मृगगड - करवंदी नाळ - शिवलिंग पॉईंट

घामाच्या बादल्या  भरणारा ट्रेक - 

लायन्स पॉईंट - पायमोडी घाट - मृगगड - करवंदी नाळ - शिवलिंग पॉईंट 



    वळवाच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात सुसह्य केलेल्या उन्हातून भटकंतीसाठी लोणावळ्याजवळील दोन घाटवाटांचे नियोजन ठरले. मागच्याच आठवड्यात घोडेजिन- वाघुरघळ ट्रेकवरून परत येताना पश्चिमेच्या केशरी आभाळी उंचावलेला शिवलिंग पॉईंट खुणावत होता. टूरिस्टी पब्लिकच्या गर्दीमुळे कधी या पॉईंट्स वर थांबायलाच जमले नाही. शिवलिंग पॉईंटवर उभे राहिले असता आसमंतात उंचच उंच जाणारा महादेवाच्या पिंडीप्रमाणे भासणारा डोंगर म्हणजे शिवलिंग. त्याचा डावा हात धरून उभा, कोकणातून देशावर येणाऱ्या दोन घाटवाटांचा रक्षक तो मृगगड. 


आजचा दोन घाटवाटा आणि एक किल्ला करायचा प्लॅन झाला आणि लगोलग पंधरा वीस मंडळी आपापले रापलेले चेहेरे अजून काळेकुट्ट करण्यासाठी तयार झाली. भल्या पहाटे पुण्यनगरीतून प्रस्थान करून लोणावळा वरून लायन्स पॉइंटला पोहोचलो तेव्हा उन्हाळी ट्रेक आहे का पावसाळी असा प्रश पडावा असे वातावरण होते. मृगगडाच्या दरीतून निश्चल पहुडलेले ढग आता लगबगीने घाटमाथ्यावर येऊ लागेलेले. या सृष्टी सोहोळ्यात सूर्यदेवांचे आगमन जरा लांबलेच. शिवलिंग डोंगर या ढगांच्या जंजाळात ताठ मानेने उभा होता. मागे लांबवर नागफणीच्या डोंगर अधून मधून दर्शन देत होता. मृगगडाचे मात्र इतक्या लवकर दर्शन होणे नव्हते. थोडक्यात काय तर असे सुंदर वातावरण दिवसभर राहील या अपेक्षेने आनंदित झालेली ट्रेकर मंडळी पायमोडी घाटाच्या दिशेने निघाली. 


ढगात हरवलेला शिवलिंग डोंगर 

काही वर्ष्यापुर्वी जेव्हा एसटीने ट्रेक करायचो तेव्हा मृगगड करणे म्हणजे बारा तासांचा प्रवास आणि बारा मिनिटांचा किल्ला असा सिन होता. कोथरूड ते शिवाजीनगर भल्या पहाटे गाडी हाणत जाऊन तेथून खोपोली. खोपोली ते पाली बसने, भेलीव फाट्यावर उतरून वडाप ने भेलीवच्या अलीकडचे गाव, त्याहून चालत भेलीव मग किल्ला आणि रिटर्न हेच सगळे असला दमवणारा कार्यक्रम असायचा. आजही तसाच दमवणारा कार्यक्रम होता पण आजची पायपीट घाटमाथ्यावरून होती. असो! हौसेला मोल नाही हेच खरे! 

पायमोडी घाट  उतराई 

पायमोडी घाटाच्या वाटेने आम्ही कोकणात उतरण्यास सुरुवात केली. ढगाळ वातावरण आता कमी होऊन त्याची जागा उष्म्याने घेतली. घामाच्या धारा पुसत पुसत मंडळी शिवलिंग डोंगराच्या दिशेने निघाली. दोन तीन ट्रॅव्हर्स मारल्यावर वाट संथपणे पायथ्याशी उतरते. वाटेने गुलमोहराची लालबुंद झाडोरा आणि बहाव्याची पिवळीधमक फुले निसर्गातल्या रंगपंचमीची भूल घालत होते. मध्ये एखादा हुप्प्याचा आवाज सोडला तर अत्यंत निरव शांतता.   सुमारे दीड तासाच्या चालीत आम्ही दरीमध्ये उतरलो आणि मृगगडाच्या दिशेने चालू लागलो. पायमोडी घाट तसा सोप्या श्रेणीतील म्हणता येईल. सुरवातीला असलेल्या कातळकोरीव पायऱ्या हि वाट फार पूर्वीपासून प्रचलित असावी याची साक्ष देतात. 


पायमोडी वाटेने उतरून आल्याचा फायदा हा झाला कि भेलीव गावात न जाता मधूनच मृगगडाची चढाई करता आली. आव्हान सूर्यदेव घाटावरच्या कड्यावरून वरती आल्यामुळे घामाच्या धारा दुप्पट झाल्या होत्या. घाम पुसत मंडळी मृगगडाची चढाई करू लागली. दहा मिनिटांच्या चढाईतच आम्ही गुहेपाशी पोहोचलो. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा गुहा मिस झाली होती. तेव्हा गुहेत आत जाऊन किती मोठी आहे बघून तरी  येऊ म्हणून गुहेत शिरलो. 

गुहेत शिरतानाच समोरून काही येईल का या विचारानेच पाकपुक झाली. तरी डेरिंग करून आतपर्यंत जाऊन आलो त्याचा हा विडिओ बघा :




गुहेत शिरलो तसे संपूर्ण धुळीचे साम्राज्य. वाघुळांचा घाण वास आणि जाळी  जळमटे तोडत आत पोहोचलो. चांगली ३०-४० फूट आत खोदलेली हुह पुढे जाऊन डावीकडे वळते. तेथे एक माणूस उभे राहू शकतो अवधी जागा आणि त्यापुढेही थोडीशी १० फूट खोदलेली. एकंदर थ्रिलिंग अनुभव होता. 



गुहेतून बाहेर येऊन गडाच्या दिशेने मोर्चा वळवला. कातळकोरीव पायऱ्यांवर फोटोबाजी करत वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो.  येथे पेटपूजा करून गडफेरी उरकली. खाली उतरून गुहेतून थोडीफार फोटोग्राफी करून फल्यांण गावाच्या बाजूला उतरायला चालू केले. गडावरूनच उतरल्याने भेलीव आणि फल्यांण दोन्ही गावात जायची गरज लागली नाही. गडावरून उतरून फल्यांण नाळेत आलो.  येथे परत एक ब्रेक घेऊन मग चालू झाली करवंदी घाटाची खतरनाक चढाई. 

मृगगडाच्या कातळकोरीव पायऱ्या 

वाटेच्या नावाप्रमाणेच सुरुवातील करवंदीची जाळी लागली. करवंद अजून पिकली नसल्याने मंडळींचा हिरमोड झाला पण त्यातही कच्ची करवंदे खाऊन स्वारी करवंदीच्या नाळेने निघाली. या वाटेत अजूनही म्हणजे भर उनहाळ्यातही पाणी असते. INS शिवाजी येथे जे छोटे धरण बांधले आहे त्याचे पाणी वर्षभर पाझरत असते. आताशा सूर्यदेव डोईवर येऊन ठेपले होते. रामराया जन्माला ती भर दुपारी बाराची वेळ. टोप्या हातपाय पाण्यात ओले करून मंडळी खिंड लढवण्यास सज्ज जाहली. 


जोरदार झालेले जेवण आणि डोईवर वाढते उन्हाने काही ट्रेकर मंडळींच्या गाड्या मंदावल्या. संपूर्ण शरीर घामाने डबडबले होते आणि अंगावरचा चढ संपायचे नाव घेत नव्हता. सुदैवाने बरीचशी वाट जंगलातून असल्याने चढाई सुसह्य होत होती. पाच लिटर पाणी संपून वाहत्या प्रवाहातून भरल्या पाण्याची अनेक आवर्तने जाहली. जसा जसा माथा जवळ येऊ लागला तशी वाट बिकट होऊ लागली. डोक्यावर राक्षसी उन्हे आणि तापलेले रॉक पॅच यांनी घामाच्या बदल्या भरू लागल्या. काकडी, कोकम , चिक्की, इलेक्ट्रॉल इत्यादी मंडळींनी काही काळ खिंड लढवली पण खड्या चढाईमुळे सगळ्यांचीच चाल मंदावली. 



सुमारे सत्तर टक्के चढाई झाल्यावर एका ठिकाणी घनदाट जंगल लागते. तेथे वर्षानुवर्षे उभी असलेली महाकाय अशी झाडे पाहून सर्व मंडळी उत्साहित झाली. करवंदी नाळेच्या चढाई सुरु झाल्यापासून कोणीही फोटो काढले नव्हते. तब्बल हजार दोन हजार वर्षे वयाची हि झाडे असावीत. पाहताच अचंबा झाला. येथे यथेच्छ फोटोग्राफी करून शेवटच्या टप्पा चढाई चालू झाली. 


घाटमाथा जवळ येऊ लागला तसा वाटेवर सर्वत्र कचरा सुरु झाला. स्वर्गसुख देणाऱ्या सह्याद्रीत असा कचरा करणारे आपणच किती करंटे आहोत या विचारातच माथा गाठला. भर उन्हातही गार वारा आता आल्हाददायक वाटत होता. बाकीचे भिडू येईपर्यंत दोन तास लागले तोपर्यंत एक झोप पदरात पडून घेतली. दोन घाटवाटा आणि किल्ला असूनही ट्रेक संपला तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. परतीच्या प्रवासात मोरगिरी, जवण मार्गे  जाताना पवना धरणातल्या वाघेश्वर मंदिराला गेलो. येथेही रिल्स पाहून आलेल्या लोकांची गर्दी पाहून जे सटकलो ते सातच्या आत घरात. 


वाघेश्वर 


 असो!,  तर एकंदर २२ किलोमीटर्सची, घामाच्या बदल्या भरणारी, दोन घाटवाटांची भटकंती सुफळ संपूर्ण जाहली !


महत्वाचे असे काही : 

  • दोन्ही वाटा मळलेल्या आणि सुस्थितीत आहेत त्यामुळे गाईडची गरज नाही. 
  • घाटमाथ्यावरून समोर भेलीव आणि फल्यांण गाव दिसते त्यामुळे वाट चुकली तर भरकटण्याची शक्यता नाही. 
  • gpx फाइल्स ramble.com वर उपलब्ध आहेत. 
  • करवंद नाळ चढताना जो पाण्याचा प्रवाह आहे त्यावरच वरती एक सुंदर कुंड आहे. भर उन्हाळ्यातली तेथे वहाते पाणी असते. हे कुंड पाहून परत करवंदी नाळेला दोन तासात येता येते. 
भटकंतीचा नकाशा : 










तळटीप : 
या लेखातील काही फोटो सौजन्य : ऑफबीट ट्रेकर्स