शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

घाटवाटा भटकंती : आग्याची नाळ - फणशीची नाळ

एकलगाव - फणशीची नाळ उतराई - आग्याची नाळ चढाई - एकलगाव 


                  

फणशीची नाळ 


रामराया जन्मला त्या टळटळीत , आग ओकणाऱ्या उन्हात आग्या नाळेची चढाई चालू होती. सूर्याच्या उष्णतेने दगड अन दगड तापवलेल्या आग्या नाळेच्या पोटातून पुढे सरकण्याची इंच-इंच लढाई चालू होती. समूहातील मंडळी लांबपर्यंत पांगली होती आणि त्यांना दिलेल्या हाकाऱ्या परावर्तित होऊन दुमदुमत होत्या. इलेक्ट्रॉल, काकड्या संत्री इत्यादींची आवर्तने करून उसनी एनर्जी एकवटून मंडळी पायाखालील प्रत्येक दगड तपासत मान खाली घालून मार्गक्रमण करीत होती. सुमारे आठशे मीटरच्या चढाईत उष्णतेने दमटपणाने कस पाहिला होता. दूरवर नाळेच्या मध्यभागी वर्षानुवर्षे भक्कमपणे तळ ठोकून बसलेले उंबर आणि आग्या नाळेच्या कड्यांवर बेमालूमपणे लटकलेली आज्ञा माश्यांची पोळी हि सगळी आमची करामत बघत असाव्यात. दोन तासांच्या चढाईनंतर कसेबसे उंबरापर्यंत पोहोचलो तोच बाकीच्या गाड्यांसाठी थांबलेल्या वाटाड्याने पुढे जाऊ नका म्हणून गलका केला. येथूनच आता पायाचे फक्त पुढचे पाऊल ठेवता येईल आणि ते घसरले तर उजवीकडे असलेल्या घळीत समाधीस्थ होता येईल अशी काहीशी घसाऱ्याची एक वाट कमी वेळात एकलगावात नेईल म्हणून ते पकडायचे ठरले. नाळेतून तसेच पुढे गेलो तर सिंगापूर गावाच्या अलीकडे निघून पाच किलोमीटर्स वाढतील हे शब्द ऐकून मंडळी तयार झाली काट्याकुट्याच्या वाटेतून दोन हात चालवीत आणि उरलेले धैर्य एकवटून एक एक भिडू घसारा, रणरणते ऊन आणि चढाई अश्या तीन गोष्टींशी झुंजू लागला. 



एकलगावं वरून दिसणारा नजारा . लिंगाणा आणि मागे रायगड 

             

                                                                                            फणशीची नाळ उतराई 


हे सगळे क्रमप्राप्त होत असताना निसर्ग रानावनातून वसंताच्या चाहुलीने मोहरलाआहे. रात्री छोट्या होऊन दिवस हळूहळू मोठे होऊ लागले आहेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. एकलगावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय. काटेसावर भडक अश्या फुलांचा जिरेटोप घालून बसलाय तर अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. येथील एक अन एक वाट तुडवीत स्वराज्याचे मावळे स्वराज्याच्या पंढरीत, स्वराज्याच्या विठूमाऊलींचे दर्शन साक्षात श्रीमान रायगडी घेण्यासाठी कोणे एके काळी पोहोचले असतील. रायगड प्रभावळीतील अनेक वाटांचे आणि तेथील वाड्यांमध्ये वसलेल्या सह्याद्रीपुत्रांचे नशीब किती थोर असावे ज्यांना तिन्ही त्रिकाळ रायगडावरील देवाचे दर्शन घडत असावे. आग्या नाळ, फणशीची नाळ, बिंब नाळ, जननीची नाळ, फडताळ नाळ, तवीची नाळ, भिकनाळ , बोराट्याची नाळ अश्या अनेक देशावरून कोकणात उतरणाऱ्या नाळा, त्यांच्या संरक्षणासाठी भक्कम उभे ठाकलेले लिंगाणा, कोकणदिवा असे उत्तुंग दुर्ग रायगडाच्या घेऱ्यात उठावलेले डोंगर ते समोर कोकणदिव्याच्या जवळपास गायनाळ , बोचेघोळ , निसणी अश्या वाटा, काळ नदीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या सहयाद्रीच्या कड्यांचे रौद्रभीषण रूप आणि त्यांनी उजळलेले हे सह्याद्रीचे दुर्गवैभव. अश्या या सहयाद्रीतील पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


            
वाटेत लागलेला पाण्याचा डोह 


तत्पूर्वी, प्रातः प्रहरी मंडळी एकलगाव येथून वाटाड्या घेऊन निघाली आणि फणशीच्या नाळेने उतराई करण्यासाठी जननीच्या डोंगर माथ्यावर पोहोचली. आजपर्यंत मोहोरी गावातून दिसणारा सरळ धारेचा लिंगाणा आणि जिरेटोप दिसणारा रायगड पहिला होता. आज फणशीच्या नाळेतून लिंगाण्याचे आणि रायगडाचे वेगळे रूप पाहावयास मिळाले. ताम्हिणीतील कमलबॅक सारखा लिंगाणा भासत होता तर त्याखालील तवीच्या नाळेतील डोंगर रोहिदास वाटत होता. तासाभरात माथ्यावर पोहोचून जननी मातेच्या ठाण्याशी नतमस्तक होऊन फणशीच्या नाळेने ओढ्यात उतरायला चालू केले. सहयाद्रीच्या धारेवरून फणशीकडे जाताना एका ठिकाणी खाली कोकणपट्ट्याचे आणि जननीच्या नाळेचे दर्शन जाहले. फणशीच्या नाळेतून उतराई चालू झाली तसे चालण्याच्या वेग मंदावला. उतरताना त्यातल्या त्यात मोठा दगड बघून त्यावर पाय ठेवताच तो असहकार पुकारून जागेवरून विस्थापित व्हायचा आणि नाळेचा प्रसाद मिळायचा. ठराविक अंतराने असे प्रसाद घेत घेत पुढे चाललो होतो. फणशीच्या नाळेत गार्ड झाडी आणि जंगल असल्याने उन्हाची काही चाहूल लागली नाही. पूर्ण उतराई मध्ये फणशी नाळेने मान वर करू दिली नाही. सुमारे दिड तासात फणशीची नाळ उतरून आल्यावर खाली ओढ्यात पाण्याचा प्रवास सापडला. येथेच पेटपूजा करून पाठीवरची वजने पोटात ढकलली. नितळ स्वच्छ पाणी भरून त्याच ओढ्याच्या मार्गाने बिंब नाळ सोडून देत पुढे आग्या नाळेला लागलो. 


जननी देवीचे ठाणे 

पाण्याचा एकमेव स्रोत 




जननी देवीचे ठाणे फणशीची नाळ मार्गे 

आग्या नाळ चढाई 




चिरंजिवांच्या व्रतबंध सोहोळ्यामुळे दिड महिना ब्रेक झाला होता तो या घामाच्या बदल्या भरणाऱ्या ट्रेकने भरून काढला. सकाळी सात वाजता सुरु केलेली बारा किलोमीटर्सची भटकंती दुपारी चार वाजता एकलगावात शाळेपाशी पोहोचून संपली. विहिरीवर अंघोळ करून श्रमपरिहार झाला आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. 


असो, फोटोंचा आनंद घ्या


शनिवार, १८ जानेवारी, २०२५

होयसळ सामराज्याचे अद्वितीय शिल्पवैभव : हसन आणि चिक्कमंगळुरुची सफर

होयसळ साम्राज्याचे अद्वितीय शिल्पवैभव : 

हसन आणि चिक्कमंगळुरुची सफर  



२०२४ वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात कर्नाटक मधील हस्सन आणि चिक्कमंगळुरु जिल्ह्यांमधील , आपल्या सनातन हिंदू धर्माचा अलौकिक असा इतिहास उलगडून दाखवणाऱ्या, सुमारे दहाव्या-अकराव्या शतकात होयसळ राजवटीत बांधलेल्या आणि आपल्याला तेथील शिल्पकलेने अचंबित करणाऱ्या मंदिरांना  भेट देण्याचा  योग आला.  ऐतिहासिक होयसळ सामराज्यात निर्माण केल्या गेलेल्या या एकमेवाद्वितीय अश्या मंदिरांना भेट देऊन तेथील शिल्पकलेचा अनुभव घेणे म्हणजे इतिहासातील सोनेरी आणि अमूल्य अश्या पानांना स्पर्श करण्याचा प्रयत्न होता. शेकडो वर्षे खपून घडवलेली हि मंदिरे म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वोच्च अविष्कार आहेत. येथील दगडावर साकारलेला कलाविष्कार आपल्याला मंत्रमुग्ध तर करतोच पण त्याकाळी उपलब्ध साधनानुसार एवढी विलक्षण शिल्पकला साकारणाऱ्या कुशल हातांची आणि तत्कालीन वैभवाची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. येथील एक एक मंदिर बांधायला कित्येक पिढ्यांची मेहनत आहे. बेलुरू येथील चेन्नकेशव मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली तर हळेबिडू येथील होयसाळेश्वर मंदिर बांधायला तब्बल १९४ वर्षे लागली आहेत. इतक्या वर्षांमध्ये आणि पिढ्यानपिढ्या चाललेल्या या कामाचे ज्ञान पुढच्या पिढीत कसे दिले असेल आणि इतकी वर्षे एवढी सातत्यता कशी ठेवली असेल या विचारांनीच माती गुंग होते. 


इथल्या प्रत्येक मंदिराची खासियत आहे. बेलुरू मंदिर मंदिराच्या आतील भागातील अविश्वनीय कलाकुसरीसाठी पाहावे तर हळेबिडू मंदिर मंदिराच्या बाहेरील भिंतींवर चितारलेल्या रामायण , महाभारत, शिव, विष्णू या सचेतन आणि शाश्वत सत्याची अनुभूती देणाऱ्या महापुराणांच्या शिल्पकलेसाठी. अमृतपुरा , बेलवडी, जवागल, अर्सीकेरे प्रत्येक मंदिराची रचना आणि वैशिष्टये वेगळी. होयसळ साम्राज्यात बांधलेली सर्वच मंदिरे दहाव्या ते बाराव्या शतकात बांधलेली असून श्री विष्णू आणि शिव याना समर्पित आहेत. 


रामायणातील / महाभारतातील कथा, उपनिषदांचा संदर्भ, कृष्णाच्या बाळलीला ते भगवद्गीतेचा प्रसंग, महादेवाची वर्षोनुवर्षे तपश्चर्या करून शिव प्राप्त होत नाही म्हणून चिडून कैलास पर्वत डोक्यावर घेऊन चाललेला रावण, डोंगर उचलल्यावर पाताळातील बाहेर आलेले सर्प, पाताळ ,भूलोक आणि स्वर्गलोक सगळे डोक्यावर घेऊन झालेली क्रोधीत मुद्रा ते अगदी या सगळ्या वजनामुळे पायाखालील खचलेली जमीन, महाभारतातील चक्रव्यूव्ह , ते तोडणारा अभिमन्यू , दर्पणसुंदरींची वेगवेगळ्या नृत्य स्थितीतील ४१ शिल्पे, ११०० खांब आणि प्रत्येक खांबांची शिल्पकला वेगळी, मंदिराच्या दर्शनी भागावरील सात पदरी  शिल्परचना, गरुड,  सर्प, द्वारपाल, नरसिंह, वराह यांची निरनिराळ्या स्थितीतील अगणित शिल्पे. विष्णूचे सात अवतार - मत्स्य ,कूर्म ,वराह, भगवान नृसिंह ,वामन ,श्रीराम ,श्रीकृष्ण परशुराम. अशी कित्येक कित्येक डोळे विस्फारणारी शिल्पे. इतके सगळे पाहताना वेळेचे काळाचे भानच उरत नाही. मन इतिहासात वाहून जाते आणि छाती आपल्या सनातन धर्माच्या महानतेने, तत्कालीन वैभवाच्या विचाराने, अभिमानाने फुलून येते हे नक्की. 


यावेळेस उत्तर कर्नाटक मधील हसन जिल्ह्यामधील होयसळ साम्राज्यकालीन मंदिरे बघण्यासाठी प्रथम कडुर नामक गाव गाठले. हसन आणि चिक्कमंगळुरु जिल्ह्यातील जमतील तेवढी मंदिरे बघण्याचा मानस असल्याने पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरणे शक्य नव्हते म्हणून मग कडूर वरून  चिक्कमंगळुरु गाठले आणि तेथून दुचाकी भाड्याने घेतली. आता तीन दिवस फक्त "पेट्रोल भर आणि फिर" असा कार्यक्रम होता. मुख्य फोकस मंदिरे असल्याने ती फिरून मग चिक्कमंगळुरु मधील फेमस स्पॉट्सही फिरणे झाले. आता सह्याद्रीच्या सवयीनुसार कुठेही भटकायला जायचे म्हणजे ट्रेक न करता कसे चालेल म्हणून तीन छोटेखानी ट्रेकही झाले. आपल्याकडे कळसुबाई तसे तेथील कळसुबाई म्हणजे मल्ल्यांगीरी पर्वत चढून २०२४ वर्षाची सांगता केली. 


या भटकंतीचा प्लॅन होता तो असा - 

दिवस १ : पुणे ते कडूर. कडूर ते चिक्कमंगळुरु ( KSRTC बस ने ) 
दिवस २ : चिक्कमंगळुरु ते  मोर्ले ( चेन्नाकेशवा / सिद्धेश्वर मंदिर ) ->  बेलुरू ( चेन्नाकेशवा मंदिर ) - हळेबिडू ( होयसळेश्वर मंदिर ) -> बेलवडी ( वीरनारायण मंदिर ) - > जवागल ( लक्ष्मी नरसिंह मंदिर ) -> आरेकेरे ( चेन्नाकेशवा मंदिर ) -> कडूर  मुक्काम  [ १०५ KM] 
दिवस ३ : कडूर -  अमृतपुरा ( अमृतेश्वर मंदिर ) -> हॅब्बे वॉटरफॉल -> केमेनगुंडी सनसेट पॉईंट -> Z पॉईंट  -> चिक्कमंगळुरु. [ ११५ KM] 
दिवस ४ : चिक्कमंगळुरु -> मल्ल्याणगिरी -> बाबा बुढणगिरी ट्रेक पॉईंट -> झरी वॉटरफाँल्स - चिक्कमंगळुरु -> बेलुरू -> दोड्डागड्डावल्ली  ( लक्ष्मीदेवी मंदिर) -> चिक्कमंगळुरु  ->  कडूर
[ १५३ KM] 
दिवस ४ : कडूर -> अर्सीकेरे (चंद्र मौलेश्वर मंदिर) -> चिक्क तिरुपती -> अर्सीकेरे -> पुणे 


या ट्रीपमध्ये बघितलेल्या प्रत्येक मंदिरावर खास लेख लिहिता येईल एवढे या बोलक्या शिल्पांनी मला प्रभावित केले आहे. हि मंदिरे म्हणजे केवळ आपली सांस्कृतिक ठेव नसून आपला सुवर्ण इतिहास आहे. आज आपण ज्याला मॉडर्न म्हणतो ते बॉबकट,  बॉयकट, स्कर्ट , बर्मुडा हे परिधान केलेली शिल्पे जेव्हा आपण दहाव्या शतकात निर्माण केलेल्या मंदिराच्या शिल्पांवर पाहतो तेव्हा पाश्चत्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या आपल्या पिढीची कीव येते. गॅलिलिओ ने दुर्बिणीचा शोध अठराव्या शतकात लावला असे आपण जाणतो तर बाराव्या शतकातल्या मंदिरावर टेलिस्कोप मधून बघणाऱ्या माणसाचे शिल्प बघून आपल्याकडे हे प्रगत विज्ञान तेव्हापासूनच अवगत होते याची खात्री पटते. काटे चमच्याने खाणारा माणसाचे शिल्प , स्ट्रॉने पिणारे शिल्प, चक्रव्यूव्ह मध्ये जाण्यास आतुर अश्वत्थामा  ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनेक अनुत्तरित प्रश्न देऊनजातात.  हि सगळी मंदिरे आजही सुस्थितीत ठेवल्याबद्दल कर्नाटक सरकारचे करू तेवढे अभिनंदन कमी आहे. या ऐतिहासिक पण जादुई नगरीची सफर एकदा अवश्य करावी अशीच आहे. 


चिक्कमंगळुरु जरा ओव्हर हाईप्ड आहे असे वाटले. कॉफीचे जंगल आणि हिरव्यागार गवतांचे लांबलचक डोंगर/पठारे बघून डोळे सुखावतात. मल्ल्याणगिरी म्हणजे कळसुबाई सारखी गर्दी आहे पण जिल्ह्यातले सर्वोच्च शिखर असल्याने वरून दिसणारे नजारे खास आहेत. सह्याद्रीतील लिंग्या घाटासारखे अनेक  धबधबे  तुफान पाऊसात, रौद्र रूपात आणि फुकटात पाहिल्याने येथील हॅब्बे , झरी धबधबे ७०० रुपये माणशी भरून बघणे अज्जिबात वर्थ नव्हते पण ठीक आहे. स्थानमाहात्म्य म्हणून चालवून घ्यायचे. Z पॉईंट नावाचा ६ किलोमीटर्सचा ट्रेक आहे पण त्यासाठीही माणशी १०८/- रुपडे मोजावे लागतात. "आपणच पैसे भरायचे आणि आपणच काय चालायचे?" या पुणेरी बाण्याने हा ट्रेक गेलो नाही. बाकी भाषेचा प्रॉब्लेम कुठे आला नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट ने फिरताना गुगल लेन्स कामी आले. 


एवढा भरगच्चं भटकण्याचा कार्यक्रम असला कि खादाडी साठी वेळ नसतो. पाचही दिवस डोस्याच्या नानाविध प्रकारांवर पोट भरणे चालू होते. ठरवलेली जवळपास सर्वच मंदिरे वेळ काढून निवांतपणे पाहता आली या समाधानाने पुण्यनगरीचा रस्ता धरला. 


या सहलीत पाहिलेल्या प्रत्येक मंदिरावर स्वतंत्र लेख लिहिण्याचा मानस आहे बघू कसे जमतंय! 
तूर्तास फोटोंचा आनंद घ्या!


अर्सीकेरे (चंद्र मौलेश्वर मंदिर)

चिक्क तिरुपती

दोड्डागड्डावल्ली  ( लक्ष्मीदेवी मंदिर)

मल्ल्याणगिरी 


हॅब्बे वॉटरफॉल

केमेनगुंडी सनसेट पॉईंट

अमृतपुरा ( अमृतेश्वर मंदिर )

जवागल ( लक्ष्मी नरसिंह मंदिर ) 

बेलवडी ( वीरनारायण मंदिर ) 

हळेबिडू ( होयसळेश्वर मंदिर )

रावणाने आपल्या मस्तकावर कैलास उचलला त्याचे शिल्प. रावणाची क्रोधीत मुद्रा, जास्त वजन झाल्याने दुमडलेला दावा पाय आणि हिमालयातील वन्य जीवन किती सुबक कोरले आहे 

चेन्नाकेशवा मंदिर, बेलुरू 

कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तो क्षण . डोंगराच्या खाली आलेले गोकुळ. डोंगर उचलल्यावर पाताळातील साप विंचू सुद्धा बाहेर आलेले दिसत आहेत . केवढे सुंदर डिटेलिंग केलाय 

चक्रव्यूह 

चेन्नाकेशवा मंदिर, बेलुरू 

होयसळेश्वर मंदिर,हळेबिडू 

हळेबिडू मंदिराच्या छतावरील नक्षीकाम 

भीम आणि भगदत्त यांची गोष्ट :  हत्तीच्या अंबारीतील बसलेले वीर आणि त्यांच्यावर हल्ला करणारे शत्रू .. काय सुंदर शिल्पकाम केले आहे. 

होयसळ राज्याचे प्रतीक - सिंहाला मारणारा वीर 

चेन्नाकेशवा / सिद्धेश्वर मंदिर, मोर्ले 





शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

माहुली , भंडारगड, पळसगड

 माहुली , भंडारगड, पळसगड 

शहापूर तालुक्यातील या दुर्ग त्रिकुटाला दिलेली चौथी भेट.   ट्रेक प्लॅन ठरला तेव्हा आधी तीन वेळा झाला असल्याने जायचा विचार नव्हता पण घरी पडून रहाण्यापेक्षा कुठेतरी भटकून येऊ आणि तिन्ही वेळेस पळसगड झाला नसल्याने यावेळी तो पाहून येऊ या विचाराने मंडळी निघाली. इथे पुण्यनगरीत रानावनात गच्च भरलेल्या थंडीने इथे कोकणपट्ट्यात आपला मागमूसही लागू दिला नाही. झुंजूमुंजू झाल्यावर पूर्वेच्या केशरी कागदावर क्षणात बदलणाऱ्या रंगछटा पाहून मात्र आल्याचे सार्थक झाले. कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वेळी जा, सह्याद्री आपल्या रूपाने कायमच मंत्रमुग्ध करतो. 

असो, तर सकाळी सहा वाजता चढाई सुरुवात करून अर्ध्यापेक्षा जास्त चढून आलो तेव्हा आसमंतात उमटलेल्या विस्मयकारी रंगछटांनी डोळ्याचे पारणे फेडले. यथेच्च फोटो काढून महादरवाज्यापाशी पोहोचलो. महादेवाचे दर्शन घेऊन गडफेरीस सुरुवात केली. महादरवाज्यापुढे भालदार चोपदार टाईप पोजचे फोटो आधी तिन्ही वेळा काढले असल्याने याही वेळी तो कार्यक्रम झाला. भंडारगड भ्रमंती करून कल्याण दरवाज्याच्या माथ्यावर पोहोचलो. तेथे बांधलेल्या रोपने खाली उतरून जीवधन किल्ल्यासारखी नाळेत खोदलेली पायऱ्यांची वाट पाहून थक्क झालो. पुढे वजीर सुळका आणि कोकणकड्याची डोळ्यात न मावणारी अद्भुत निसर्गचित्रे डोळ्यात साठवून आल्या पावली महादरवाज्यापाशी पोहोचलो. 

येथून आता काही मंडळी खाली निघून गेल्याने धावतच पळसगडाचा रस्ता धरला. खास पळसगडासाठी वाटाड्या घेतला होता पण त्याने भंडारगडालाच पळसगड आहे असे म्हणत गंडवायचा थोडा प्रयत्न केला. त्याला फाट्यावर मारून शिवपिंडीपासून पळतच पळसगड मार्गे निघालो. एका पॉईंट नंतर जिथे एक भलामोठा दगड आहे तेथून तीन वाट फुटतात. सगळ्यात उजवीकडची पळसगड माथ्यावर जाते तर डावी 'खोर' गावात उतरते. मधली वाट नव्याने उजेडात आलेल्या गणेश दरवाज्यापाशी जाते. थोडेसे भरकटून गणेश दरवाजा शोधला आणि दरवाज्याच्या बरोब्बर वर कातळावर कोरलेल्या गजाननाचा आशीर्वाद घेऊन परतीचा मार्ग धरला. 

असो फोटोंचा आनंद घ्या! 
फोटो सौजन्य : ट्रेकभिडु ऑफबीट ट्रेकर्स