तीन केदार यात्रा : श्री केदारनाथ , मध्यमहेश्वर , तुंगनाथ
त्रितीय केदार : श्री तुंगनाथ ( सर्वोच्च शिवमंदिर )
पूर्व भाग :
तीन केदार यात्रा : प्रथम केदार : श्री केदारनाथ धाम
तीन केदार यात्रा : द्वितीय केदार : श्री मध्यमहेश्वर धाम
सलग पाचव्या दिवशी पहाटे उठून पाचला तुंगनाथ चढाईला प्रारंभ केला. थंडी बेताचीच होती. आठ वाजेपर्यंत अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा समोर नंदादेवी पर्वतरांग सोनेरी उन्हात न्हाऊन निघालेली होती. छोटेमोठे ढग या पर्वत शिखरांशी सलगी करू पाहत होते. अजून जास्त ढग जमायच्या आत आम्हाला शिखरावर पोहोचायचे होते याविचाराने वेग वाढविला. अजून सुमारे तासाभरात वाटेतील गणपतीच्या मंदिरापाशी पोहोचलो.गणरायाचे दर्शन घेऊन पुढे निघालो. मागील वर्षी मुलाला, ऋतुपर्णला घेऊन आलो होतो तेव्हाचे सगळे आठवायला लागले. थोडा वेळात तुंगनाथ मंदिरात पोहोचलो तेव्हा अगदीच किरकोळ गर्दी होती. सगळी मंडळी चंद्रशिला शिखरावर गेली सल्याने शांत चित्ताने देवाचे दर्शन झाले. तुंगनाथ येथे महादेवांनी आपल्या भुजांच्या म्हणजे हातांच्या स्वरूपात दर्शन दिले म्ह्णून याला "स्ट्रॉंगेस्ट केदार" म्हणतात. आम्ही पोहोचलो तहसी आरती चालू झाली. देवाचीच कृपा समजून आरतीला उभे राहिलो. आरती झाल्यावर तुंगनाथ मंदिराच्या तासभर वरती चंद्रशिला शिखरावर निघालो.
चंद्रशिला शिखरावरून हिमालयाचे जे अफाट रूप दिसते त्याला तोडच नाही. नंदादेवी, केदारडोम, पंचचुली, निळकंठ, बंदरपूच ते चौखंबा अश्या हिमशिखरांचे अफाट दर्शन होते. मागील वर्षी जून मध्ये आलो होतो तेव्हा या शिखरांवर खूप जास्त बर्फ होता आता त्यापेक्षा कमी झालेला आल्यामुळे त्यांचे राखाडी-पांढरे शिखरे ठळक दिसत होती. रावणाच्या दहनानंतर रामाने येथे बसून शिवाची आराधना केली होती असे म्हणतात. येथे शिखरावर शंकराची छोटीशी पिंड आहे. येथे ऋतुपर्णने मागील वर्षी बसून लिंगाष्टकं म्हंटले होते ते आठवून मी पण थोडा वेळ बसून लिंगाष्टकं आणि शिवतांडव म्हंटले. सुंदर अश्या आठवणी घेऊन येहून उतराई चालू केली. सुमारे बारा पर्यंत परत चोपता मध्ये आलो आणि गाडीची जुळवाजुळव केली. चोपता वरून थेट हरिद्वार गाडी ठरवून हरिद्वारच्या दिशेने निघालो.
![]() |
Chandrashila Peak |
आजचा दिवस हा पूर्ण रांसी ते हरिद्वार प्रवासाला आणि स्पेअर ठेवला होता पण सगळे प्लॅननुसार काटेकोर झाल्याने अर्ध्या दिवसात तुंगनाथ करून हरिद्वारला निघालो होतो. पाच दिवसात तीन केदार आणि सुमारे ८८ किलोमीटर्सची चढाई-उतराई केल्याचे समाधान आणि तिन्ही ठिकाणी देवांचे सुंदर विनासायास दर्शन झाल्याने कृतकृत्यं वाटत होते. पुढील आठ तास प्रवास करून हरिद्वार पोहोचलो तेव्हा आठ वाजले होते. मुक्कामाची जागा ठरवून रात्री थोडे भटकून दिवस संपवला. शेवटच्या दिवशी दुपारी दिड ला ट्रेन असल्याने सकाळीच लवकर निघून मनसा देवी, गंगा स्नान , शॉपिंग इत्यादी करून गुजरात भवन मध्ये जेवायला आलो. इलायचीदार श्रीखंडाचें जेवण बघून दिलखुष! खूप दिवसांनी असे सांग्रसंगीत जेवण मिळाल्याने त्यावर ताव मारून परतीचा रस्ता धरला. शनिवार , रविवार ट्रेन मध्ये काढून सोमवारी सकाळी पुण्यनगरीत पोहोचलो आणि अविस्मरणीय अश्या तीन केदार यात्रेची समाप्ती जाहली.
ग्रुपचा संपूर्ण प्रवास हा शेअरिंग मध्ये झाला. शेअरिंग गाड्यांची सोय बघत प्लॅन नुसार चालणे हि मोठी गोष्ट यावेळेस शिकायला मिळाली. त्यामुळेच आठवड्याची हि तीन केदार यात्रा अवघ्या ८१३६ रुपयांमध्ये होऊ शकली. हिमालयात नेणारे काही ग्रुप्स यां ट्रेकचे माणशी २५००० रुपये घेतात असे कळले. यां अनुभवांचा नक्कीच पंचकेदार मधील उरलेल्या रुद्रनाथ आणि कल्पेश्वर यात्रेसाठी उपयोग होईल.
असो वाचत राहा! आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा !
।। हर हर महादेव ।।
सलग दोन वर्षे तुंगनाथ येथे दिलेली भेट :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा