शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

गडांचा राजा... राजीयांचा गड .. राजगड प्रदक्षिणा

 गडांचा राजा... राजीयांचा गड .. राजगड प्रदक्षिणा 

भुतोंडे खिंड - संजीवनी माची - पाली दरवाजा - पद्मावती माची - सुवेळा माची - संजीवनी माची


मध्यरात्री दिडच्या सुमारास गाडी वाजेघर गावाच्या दिशेने मार्गस्थ होत होती. मार्गासनी पासून साखर कडे वळल्यावर संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. साखर गावापासून गाडीच्या टायरचे मेदुवडे बनतील असा रस्ता सुरु झाल्याने अनेकांच्या एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर डोलणाऱ्या साखरझोपा मोडल्या. भुतोंडे खिंडीत पोहोचलो तेव्हा आमच्या स्वागताला फक्त रातकिडे उपस्थित. पाठपिशव्या चढवल्या, विजेरी हातात घेऊन भुतोंडे खिंडीतून संजीवनी माचीच्या दिशेने चढाई चालू केली. रात्री अडीच वाजता संजीवनी माचीच्या तटबंदी खाली पोहोचलो तेव्हा माचीचा बुरुज अंधारातही उंच उंच आकाशाला भिडलेला. 

आजपर्यंत अनेक वेळा राजगडी जाण्याचा योग आला. अळू दरवाज्याने राजगडाचा निरोप घेऊन संजीवनी माचीच्या अभेद्य तटबंदीखालून तोरण्याकडे जाताना अनेकदा संजीवनीचे रूप मनात भरायचे. साडे तीनशे वर्षे अभेद्य अशी दुहेरी तटबंदी पाहता त्याकाळी येथील दगडा -दगडाने काय दुर्गवैभव पहिले असावे या विचारातच भुतोंडे खिंड यायची. तेव्हाच असे सुवेळा माचीच्या खालून त्याचे दुर्गवैभव पाहताना काय मजा येईल असे वाटायचे. डोंगरदेवांच्या कृपेने आज तो योग आला.

रात्री अडीच वाजता "अमानवीय" वाटावी अशी काही टाळकी घामाच्या धारा पुसत माचीवर पोहोचली. एका मोठ्या दगडावर महाराजांची प्रतिमा स्थापित करून त्या प्रतिमेची पूजा केली. महाराजांनी आयुष्यातला मोठा काळ राजगडावर घालवला असल्याने महाराजांचा जयघोष करून प्रदक्षिणेला सुरुवात केली. "आज आपण उभे आहोत तेथे महाराजांची पावले अनेकदा पडली असतील", "अश्याच रात्रीच्या प्रहरी बहिर्जी नाईक यांसारखे मावळे अनेकदा रूप बदलून टेहळणी करत असतील" अश्या विचारातच कारवीच्या जंगल घुसलो आणि पाली दरवाज्याच्या दिशेने प्रस्थान केले. 




आज आम्ही गडावर जाणार नव्हतो तर संजीवनी, पद्मावती, सुवेळा माचीच्या बुरूजाखालून कड्यांवरून भटकणार होतो. पूर्ण वाटचालीमध्ये विश्वास ठेवावा असा दोस्त बरोबर ते म्हणजे कारवीचे जंगल! कित्येक जागा अश्या होत्या कि येथे हे झाड नसते तर येथून पुढे जाणे अवघड. तासाभरात पाली दरवाज्याच्या वाटेला लागलो. सुमारे दहा पंधरा पायऱ्या चढून परत जंगलात प्रवेश केला. येथून पुढचा टप्पा होता तो चोरदरवाजाच्या वाटेचा. एका ठिकाणी वाट चुकली आणि विजेरीच्या प्रकाशात काही वाट सापडेना,मग जेमतेम उभं राहत येईल अश्या ठिकाणी उभ्यानेच एक डुलकी काढली आणि उजेडायची वाट बघत बसलो. 

झुंजूमुंजू झाले तसे वाट दिसू लागली आणि पुढची वाटचाल चालू झाली. पद्मावती माची खालून चोर दरवाज्याच्या वाटेल पोहोचलो. आज सूर्यनारायांनी ओझरते दर्शन देऊन ढगांच्या मागून आमची मजा पाहायचे ठरवलेले. कालच्या पावसाने ढग खालपर्यंत उतरलेले. भर एप्रिल मध्ये उन्हाळ्यात आपण आहोत यावर विश्वास बसेना असे वातावरण. हि सगळी दैवी योजनाच आहे असे समजून सुवेळा माचीच्या दिशेने प्रस्थान केले. 



बालेकिल्ला उंचीकडे डोक्यावर ठेऊन नेढ्याच्या दिशेने पावले चालू लागली. वाटेत मोठ्ठाली १२-१३ मधमाश्यांची पोळी होती आणि दोन दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडलेली ऐकून येथून हळुवार प्रस्थान केले. दिड तासाच्या चालीत नेढ्याच्या खाली पोहोचलो. "मळे" गावातून येथे एक वाट येते तेथे पोहोचलो. नेढं आणि डुब्याचे काही वेगळेच रूप येथून पाहायला मिळाले. येथून पुढे पोहोचलो सुवेळा माचीच्या बुरुजाखाली. येथून मागे उजवीकडे बालेकिल्ला , मध्ये सुवेळा बुरुज, उजवीकडे काळेश्वरी बुरुज असे दृश्य! काय ते राकट रूप. अहाहा !

येथे थोडी पेटपूजा करून सुवेळा ते संजीवनी हा सगळ्यात अवघड टप्पा चालू केला. सत्तर अंशातले कडे, त्यावर तिरपे पाय टाकत चालण्याने पायात आलेले गोळे, जोडीला दोन्ही हाताशी गळाभेट घेणारे कारवीचे जंगल या सगळ्याचा सामना करत एकदाचे अळू दरवाज्याखाली पोहोचलो आणि महाराजांना वंदन करून भुतोंडे खिंडीत उतरून ट्रेकची सांगता झाली. आजपर्यंत न पाहिलेले राजगडाचे रूप या प्रदक्षिणेच्या निमित्ताने पाहता आले. सुवेळा माची ते संजीवनी माची यामध्ये अशी एकही जागा नाही जेथे तटबंदी नाही. आणि आजही तेवढीच बुलंद तेवढीच अभेद्य! काळेश्वरी बुरुजाखालून दिसणारे बालेकिल्ल्याचे रुपडे हि खासच! 

एकंदर १५ किमीची चाल झाली आणि पावसाळी वातावरणामुळे फार मजा आली. असो! फोटोंचा आनंद घ्या!











वाचत राहा !

सागर  



  

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

परमार्थात स्वार्थ - किल्ले हडसर

परमार्थात स्वार्थ - किल्ले हडसर 





ललितापंचमीचे औचित्य साधून रविवारी मंचर जवळील अवसरी खुर्द येथे देवीच्या दर्शनासाठी जाणे झाले. सकाळी लवकर पुण्यनगरीतून निघाल्याने यथासांग देव दर्शन आणि गावात फेरफेटका मारून झाला. बारा पासून पुढे उपलब्ध असलेला वेळ सत्कारणी लावावा म्हणून,  परमार्थात स्वार्थ साधून जुन्नरकडे प्रयाण केले. आता येथून पुढे दाऱ्या घाट आणि दुर्ग-ढाकोबा यातले काहीतरी करू असे ठरवले होते पण बरोबर छोटा मावळा असल्याने मग मोर्चा वळवला तो स्थापत्यकलेतला अद्वितीय असा नमुना असलेल्या हडसर किल्ल्याकडे. 

हडसर गावात येताच, पूर्वी किल्ल्याची पूर्वेकडील खुंटीची वाट एकट्याने चढून आलो होतो आणि तो किती मोठा वेडेपणा होता यांची आठवण झाली. यावेळेस मंडळी बरोबर असल्याने पेठेची वाडी येथून सोप्या वाटेने चढायला सुरुवात केली. थोड्याफार चढाई नंतर आपण किल्ल्यांच्या खिंडीत पोहोचतो आणि मग प्रशस्त अश्या पायऱ्या चालू होतात. 

पाऊण एक तासात खिंडीतून पायऱ्या चढून तटबंदी जवळ पोहोचलो. किल्ल्यापासून वेगळ्या झालेल्या छोट्या टेकडीला किल्ल्यात सामावून घेण्यासाठी बांधलेली अभेद्य अशी तटबंदी बघता , आपल्याला पुढे काय नवल बघायला मिळणार आहे याची प्रचिती देते. या खिंडीतून फक्त पाण्याला खाली जाण्याची आणि वाऱ्याला वर येण्याची मुभा. येथून डावीकडे वळताच नजरेस पडतो गोमुखी रचनेचा कातळात खोदून तयार केलेला अद्वितीय असा कलाविष्कार. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बघता क्षणी टाच आपटून सॅल्यूट !

प्रवेशद्वाराचे कातळ सौंदर्य बघून थक्क व्हायला होते. मूळच्या कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, त्याला अंगच्या कातळाचेच पुन्हा कठडे, पुढे या कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, आतमधील चौकीदारांच्या खोल्या देवड्या, त्यावर कड्यावरचे वहाते पाणी येऊ नयेत म्हणून खोदलेली पन्हाळी आणि त्यामुळे भरपावसात ही कोरड्या असलेल्या पायऱ्या... सगळे शब्दातीत. 

मुख्य दरवाज्याने थोडे वरती चढून आल्यावर खिंडीपलीकडच्या टेकडीवर एक वाट जाते. तेथे गणपतीची एक मूर्ती कोरलेली दिसते. डावीकडे "U" आकाराचे वळण घेऊन दिसतात कातळात बेमालूमपणे लपलेल्या खड्या चढाईच्या पायऱ्या. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गाचा अंदाज येत नाही. येथून पुढे अजून एक गोमुखी रचनेचे दुसरे प्रवेशद्वार लागते. द्वारांच्या कमानी एकाच लयीच्या आणि मितीच्या. येथून अंतिम पायऱ्या चढून किल्ल्यावर पोहोचलो. 

किल्ल्यावर महादेव मंदिर, तलाव, धान्य कोठार/गुहा, वाड्याचे अवशेष अश्या बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. समोर उभा ठाकलेला निमगिरी हनुमंतगड ही जोडगोळी ,लांबवर दिसणारे माणिकडोह आणि किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य.

छोट्या मावळ्याचा उत्साह बघून शिवमंदिराच्या दिशेने प्रस्थान केले. घंटेचा नाद आसमंतात घुमला. मंदिरातील कोनाड्यात स्थानापन्न असलेले गणेश, मारुती आणि विष्णुभक्त गरुड मूर्ती बघून आपोआप हात जोडले गेले. मंदिराच्या शेजारी असलेले कमानी टाकं तुडुंब भरलेले होते. येथून उजवीकडे थोड्या अंतरावर गुहा दिसते. टाकं पूर्ण भरलेले पाहून त्याच्या जवळ भूभागाला समांतर खोल खोदलेल्या गुहेत कसे काय पाणी साठत नसेल या विचारातच गुहेत शिरलो. गडाच्या माथ्यावर एकटाच असल्याने मनसोक्त फोटोग्राफी झाली. पुढे थोडेफार अवशेष बघून परतीचा मार्ग धरला.  

किल्ला उतरून वाडीत येऊपर्यंत उन्हे कलू लागली होती. पश्चिमेला आभाळात केशरी झालर पसरली होती. आता पावले लगबगीने घराच्या दिशेने पळू लागली. 

आपल्या कालातीत अश्या इतिहासाचा ठेवा आपणच आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला पाहिजे. गोष्टीतले महाराज आणि त्यांचे गडकिल्ले जेव्हा ते स्वतः अनुभवतील तेव्हाच त्यांची रुची वाढेल. 


या चढाईचा युट्युब व्हिडीओ - 

2015 मध्ये खुंटीच्या वाटेने केलेल्या चढाईचा वृत्तांत येथे वाचू शकता. 

जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
थरारक !!








गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

ऐतिहासिक मढे घाट आणि सातसडा, लक्ष्मी , नाणेमाची तीन नेत्रसुखद धबधब्यांची मेजवानी.

 
केळद - मढे घाट उतराई - लक्ष्मी धबधबा - पडवळ कोंड - सातसडा धबधबा - शिवकालीन बारव - धनगरवाडा - नाणेमाची  धबधबा - मढे घाट चढाई - केळद. अशी २१ किलोमीटर्सची भटकंती. 

पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. दुधासारख्या जलप्रपातांचा साज अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!

 

असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला ऐतिहासिक मढे घाट आणि तीन नेत्रसुखद धबधब्यांची मेजवानी अनुभवण्याचा. ऑगस्ट महिन्यात विश्रांतींनंतर दोन छोटे ट्रेक झाले होते त्यामुळे आजचा बेत म्हणजे अंतराचे, वेळेचे गणित सांभाळत जोरदार तंगडतोड करण्याचा. कोथरूड ते केळद प्रवासात भट्टी खिंड ओलांडली तशी कोकणपट्ट्यात ढगांच्या चादरीने आजचा ट्रेक सुंदर होणार याची वर्दी दिली. पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. मढे घाटातून दिसणारा सकाळचा नजर काय वर्णावा! 



यथेच्छ फोटो काढून घाट उतरायला सुरुवात केली. लक्ष्मी धबधब्याचे लोभस रूप पाहून पडवळ कोंड या वस्तीपाशी पोहोचलो.  पुढचे लक्ष्य होते सातसडा धबधबा. वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रवाहाने कातळ कापून या आविष्काराची निर्मिती झालेली. पाण्यात उतरून फुल टू मजा. प्रवाहाचा जोर इतका होता की आत जायचे धाडस न करता मंडळींनी डुंबून घेतल. येथून पुढे महाराजांनी बांधून घेतलेली शिवकालीन बारव पाहायला निघालो. रस्त्याने चालताना सहज एका आजोबांना विचारले तर तेथून ९० अंशात वळण घेऊन ती बारव होती. योग्य ठिकाणी योग्य वेळेस ते बाबा भेटले. आज सर्वपित्री असली तरी सगळे मनासारखं होणार याची खात्री पटली. 




 
बारव पाहून नाणेमाचीच्या दिशेने मोर्चा वळवला. रस्त्याने नाणेमाची गावात जाऊन फार लांब पडले असते त्यामुळे धनगरवाड्यातून दिसणारा समोर आभाळात उठलेल्या नाकाडाच्या डोंगरसोंडेचा मार्ग धरला. एव्हाना सूर्यदेव ढगांमधून आपली किरणे सोडवून त्यांची दखल घ्यायला भाग पाडत होते. कोकणातले दमट हवामान, प्रखर ऊन आणि छातीवरची ७० अंशांतलीं खडी चढाई.  या चढाईने छातीचा भाता धपापू लागलेला. तासाभरात माथ्यावरच्या डोंगरसोंडेवर पोहोचलो आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या उत्कृष्ठ नजाऱ्याने आणि जोरदार वाऱ्याने घाम पुसायचेही भान राहिले नाही. ढगांच्या आणि सूर्याच्या पाठशिवणीच्या खेळामुळे दर थोड्या वेळाने वातावरण बदलत होते. फोटो काढायचेही त्राण उरले नव्हते. एका छानश्या झाडाखाली विश्रांती घेऊन नाणेमाची धबधब्याच्या दिशेने मंडळी निघाली.  






नाणेमाची धबधब्याचा आवाज अवघ्या परिसरात घुमत होता. येथे थोडीफार गर्दी होती पण त्या रौद्र जलप्रपाताच्या सौदर्यापुढे सगळे प्रश्न थिटे! धबधब्याकडे तोंड करून दोन मिनिटे सुद्धा उभे राहू शकत नाही असा वारा आणि पाण्याचा प्रवाह होता. पाण्याच्या चक्क लाटा बनून अंगावर येत होत्या एवढा जोरदार वारा. आमच्या ग्रुपमध्ये एका भिडूकडे वॉटरप्रूफ कॅमेरा असल्याने त्याचीही मजा करून झाली. आता हा आनंद द्विगुणित करायला पावसानेही हजेरी लावली. अर्ध्या तासापूर्वी निळेशार दिसणारे आकाश आता ढगांनी व्यापून गेले. दोन वाजत आले होते आणि येथून आता आल्यापावली मढे घाट परत चढून जायचा असल्याने जास्त वेळ न घालवता आम्ही निघालो. वाटेत पोटोबा करून परत धनगरवाड्यात उतरणारी घसरगुंडीची वाट धरली. 



मगाशी चढाई करताना जोरदार ऊन आणि खडी चढाई परवडली पण आता पावसाने घसारा झालेली उतराई नको अशी अवस्था झालेली पण पर्याय नव्हता. मग गणपतीचे नाव घेऊन, चिखलाचा प्रसाद घेत घेत खाली उतरलो. चढताना घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेलो तर उतरताना पावसाने ओलेचिंब. आता वेळ घालवून चालणार नव्हते नाहीतर मढे घाट माथ्यापर्यंत अंधार झाला असता. धनगरवाड्यापाशी साखळी करून पाण्याचा मोठा प्रवाह ओलांडला आणि मग येथून न थांबता दीड तासात मढे घाटाची चढाई करून पश्चिमेचे मावळतीचे रंग बघायला लक्ष्मी कड्यावर पोहोचलो.  पश्चिमेच्या केशरी कागदावर नयनरम्य रंगसंगतीचा कोरस उमटलेला. मावळत्या दिनकराला नमन करून आजची २१ किलोमीटर्सची कसदार भटकंती संपली. 

असो! फोटोंचा आनंद घ्या!










मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली

  

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली 




ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस गणपती बाप्पा पेण वरून घरी आले तेव्हापासून महिनाभर भटकंतीला विराम मिळाला होता. जसे बाप्पा कैलासी परतले तसे मग आमच्या पण दिंड्या सह्याद्रीकडे परतायला सुरुवात झाली. पाऊस पण अजून मस्त लागून राहिलाय तर मग एका छोटेखानी पिकनिक ट्रेकला जायचे ठरले. सकाळी सहाला मंडळी ताम्हिणी घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पौड सोडताच ढगांच्या दुलईत अलगद पहुडलेल्या डोंगररांगा स्वागतास सज्ज जाहल्या. प्लस व्हॅली मध्ये उतरून मजा करून पुढे सावळ घाटाने अर्ध्यात उतरून ताम्हिणी परिसराचा निसर्ग न्याहाळणे एवढाच आजचा बेत असल्याने मंडळी निवांत होती. 


   


सुमारे आठच्या दरम्यान व्हॅलीच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारा निसर्ग पाहून हरकून गेलो. डोळ्यांच्या नजरेत न मावणारे निसर्गचित्र. दोन डोंगरांच्या दरीचा संपूर्ण भाग ढगांनी व्यापलेला. कुठे क्षितिज संपते आणि आकाश सुरु होते याचा थांगपत्ताही लागणार नाही असे दृश्य. नारायणाच्या साक्षीने निसर्गात चाललेला मंगलमय सोहोळाच जणू. आणि हा असा निसर्गसोहोळा चालू असताना आपण तिथे उपस्थित असणे म्हणजे डोंगरदेवांचे आशीर्वादच ते. 





 "य" फोटो काढून दरीत उतरायला प्रारंभ केला. संपूर्ण ढगांनी व्यापलेली दरी सूर्यनारायणाच्या आगमनाने तळ दाखवू लागली. सुरुवातीला "आज काही दिसणार नाही" असे वाटत होते पण दरीच्या तळाशी उतरताच सूर्यकिरणे साथीला येऊ लागली. असंख्य धबधबे खळखळत त्या निरव शांततेत एक नाद निर्माण करत होते. तेथेच एक मोठाल्या दगडावर पथारी पसरून एका भिडूने आणलेल्या न्याहारीच्या आस्वाद घेतला आणि पुढची वाटचाल चालू केली. 


घळीत पुढे जाताना सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. पाण्याचे मोठे प्रवाह लागतील याची कल्पना होतीच पण शेवाळे आणि चिखल याची युती होऊन ठिकठिकाणी प्रसाद मिळत होता. गणपतीचे नाव घेत मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या मारत, मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत  वाटचाल चालू होती. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. दोन पुराणपुरुष भासावेत अश्या दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीमधून वाटचाल सुरु होती.  सूर्यकिरण पडताच झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा आणि तळ दाखवणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. माथ्यावरून अलगद कोसळणारे धबधबे त्या सुंदरतेत भर घालत होते.  



आता दरीच्या शेवटच्या टप्य्यात पोहोचलो. समोर दिसणारा निसर्ग काय वर्णावा? येथूनच खाली देवकुंडचा धबधबा आहे. समोर सावळ घाटाने कोकणात उतरणारी घाटवाट, गर्द जंगल, आणि शेवटचे दोन मोठ्ठाले पाण्याचे डोह. डोहात मनसोक्त डुंबून खच फोटोग्राफी झाली. शेवाळ साठलेल्या प्रवाहातून घसरगुंडीचा कार्यक्रमही झाला. एव्हाना बारा वाजत आले होते. चार-पाच वेळा डोहात अंघोळ झाल्यावर दरी चढून परत येताना घामाने अंघोळ झाली. मग त्या श्रमपरिहारासाठी ताम्हिणी घाटातल्या अजून एक धबधब्यात जाणे आले.  


असो. अश्या प्रकारे एक नितांतसुंदर भटकंती पदरात पडली आणि यावर्षीचा पावसाळा सुफळ संपूर्ण झाला. 
वाचत राहा. 













शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

आंबी-काळ नदीचे खोरे : घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल

आंबी-काळ नदीचे खोरे :   घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल [ १५ किमी. ]




पहाटे पहाटे भर पावसात मंडळी घोल गावाच्या दिशेने रवाना झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच सात वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक वर आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथील निसर्ग आजही तसाच आहे. गावातून वाट्याड्या घेऊन सुरु झाली अजून एक वेगळ्या वाटेवरची भटकंती.

घोल गाव चहुबाजूनी उंचच उंच डोंगरांनी वेढले आहे. दोन दिवसात एकदा मुक्कामी एसटी येते. पण पानशेतचा रस्ता खचल्याने सहा दिवस गाडी आलेली नव्हती. पावसाळी शस्त्रे अंगावर चढवून, चहा घेऊन खिंडीची वाट धरली. खिंडीतून उजवीकडे चढत सुमारे तासाभराच्या चढाईने माथ्यावर येऊन पोहोचलो. येथून डोंगरांनी वेढलेला आजूबाजूचा नजारा आणि कोकणपट्टा बघणे म्हणजे नेत्रसूखच पण आज पावसाच्या कृपेने हे होणे नव्हते.




माथ्यावर एके ठिकाणी सतीमंदिर लागते ते सोडले तर पूर्ण घनदाट जंगल. इथे हरवला तर आठवडाभर भेट होणे नाही असा भाग. त्यात जोरदार पावसाने चिखलमय झालेल्या वाटा तुडवत, घसरगुंडी करत जायची मजाच वेगळी. सती मंदिरापाशी नमन करून उजवीकडच्या धारेने आंबे धनगरवाडीची वाट धरली. स्थानिक आंब्याचा दांड म्हणतात. येथे वाटाड्या नसेल तर अवघड आहे. सगळ्या वाटा पावसाने मोडून गेलेल्या आहेत. वाट काढत आणि असंख्य प्रवाहांमधून प्रवास करत अंदाजे तीन चार तासांनी धनगरवाड्यात पोहोचलो.



येताना घरून लहान मुलांचे दोन पोती कपडे आणले होते. घोल आणि गारजाईवाडी गावात एकही लहान मुलं नाहीये. लहान काय तरुण लोकही सगळी बाहेर. म्हणून मग ग्रुपमधील सवंगड्यांच्या मदतीने ती दोन पोती इथपर्यंत आणली होती. भर पावसात- सोसाट्याच्या वाऱ्यात बिनधास्त बागडणाऱ्या छोट्या मित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून आजची पायपीट वसूल झाली म्हणता येईल.

आंब्याचा दांड येथे पोटोबा करून धारेवरून खाली उतरायला चालू केले. दिवसभर पाऊस येत-जात होता पण जशी उतराई चालू झाली तशी आमची मजा बघायला तो पुन्हा जोरात आला. डोक्यावर अखंड पाऊस सोसत, लाल मातीच्या चिखलातून सटकत, प्रसाद घेत मंडळी एकदाची गारजाईवाडीत पोहोचली. गावात जाऊन दोन फणस डोईवर घेऊन यात्रा पुढे निघाली. आता येथून मोठाल्या धबधब्याची रांग लागलेली. कुठे भिजू कोठे नाही असे झालेले. शेवटचा जलप्रपात तर केवळ कमाल. अर्धा तास तेथे डुंबत राहिलो. गावात पोहोचलो, येथील इंद्रायणी तांदूळ म्हणजे अहाहा! मग इंद्रायणी,नाचणी, वरई खरेदी झाली. चहा पिऊन सात तासांची १५ किमीची भटकंती संपवली आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

घोळ खिंडीत पासून पश्चिमेकडे पडणारा पाऊस कोकणातून सुमारे हजारभर किलोमीटर चा प्रवास करून अरबी समुद्रात विलीन होतो तर खिंडीच्या पूर्वेकडील पाऊस पानशेत वरून देशावरील जवळपास पंधराशे किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात जातो. हाये की नाय आपल्या सह्याद्रीची गम्मत !