सोमवार, २० मे, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४   - मांगी- तुंगीजी 

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 

आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस  झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला होता बहुतेक.घरचीही ओढ लागली होती.
पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते.
ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. हे कळायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. आता साधे उभे राहण्याचेही पायात बळ नव्हते, अशात आम्ही सुमारे तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून, गड हिंडून परत तेवढ्याच पायऱ्या उतरणार होतो. चेहऱ्यावरच्या वाढलेल्या आठ्या काही आम्हाला मदत करणार नव्हत्या, म्हणून त्या पुसल्या, फ्रेश झालो, पाय बदलले ( म्हणजे जोडे बदलले) आणि सगळे सामान तेथील ऑफिस रूम मध्ये ठेवून फक्त पाण्याची बाटली आणि थोडे खाद्यपदार्थ घेऊन निघालो.
 
पौराणिक संदर्भ :
मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र आहे. सिद्ध-क्षेत्र याचा अर्थ असा की सिद्धी/ मोक्ष मिळवण्याचा मार्ग (gateway to the state of enlightenment.).
ह्या जैन समाजाच्या सिद्ध क्षेत्री, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि इतर रामायणातील ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला. 

ऐतिहासिक संदर्भ : 
इ. स. ६०० साली कोरलेल्या बुद्ध मूर्ती येथे असून त्या लेप देऊन जतन करून ठेवलेल्या आहेत. 

भौगोलिक संदर्भ : 
मांगी-तुंगी किल्ला ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी पर्वत रंगांमध्ये/ डोंगररांगेतील हा महाराष्ट्रातील उत्तर-दक्षिणेचा शेवटचा किल्ला आहे. येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान हि आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याच्या जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. 

नकाशात दाखवल्याप्रमाणे तीन गोल केलेले किल्ले साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा, आणि मांगी-तुंगी हे आहेत. पांढरी रेषा हि महाराष्ट्र सीमा दर्शवते.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की, या रेषेच्या अलीकडे म्हणजे महाराष्ट्रात मोठी पर्वतरांग दिसते, तर रेषेच्या पलीकडे गुजरात चालू होते, तेथे दूर दूरपर्यंत डोंगर दिसत नाहीत.

बघण्यासारखी ठिकाणे आणि सद्यस्थिती :
हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा , शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात.
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी  फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्ट च्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे. येथे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि तरीही यासाखी सेवा- सुविधा आणि स्वच्छता इतर कोणत्याही मंदिरात व तीर्थक्षेत्री नसेल. 

मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.
तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.
मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.
तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवाड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.

मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? ) 
( पण इतक्या सुंदर ठिकाणी चाललेली हि अशी डोंगरफोड आम्हाला काय पटली नाही बुवा !) 

आमचा ट्रेक अनुभव :

मुल्हेर मधून सकाळी सकाळी ६ वाजता स्थानकावर आलो. पाच पेक्षाही कमी तापमान असावे, फुल टू थंडी. त्यात गरम गरम चहा. लगेच बस आली. त्यात बसून सात वाजता ताहाराबाद.
आता येथे येऊन कळले की मांगी-तुंगी ला जाणारी पहिली बस हि १० वाजता आहे. आता ३ तास येथे थांबून काय करणार? म्हणून निघालो स्थानकाबाहेर.
एका रिक्षावाल्याशी वाटाघाटी करून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत  पोहोचलो. रिक्षावाला सकाळपासूनच फॉर्म मध्ये होता. ह्याला हाक मार. त्याला चिडव, थोड्या थोड्या टाइम इंटर्वलने थुंकणे,  मध्येच गाणी म्हण (आणि याच्या जोडीला रिक्षांतला अजय देवगण आणि कुमार सानू. ).  हे महाराज, भाडे येत नाही म्हणून अर्धा तास थांबले होते.  मी कंटाळून चालत जाऊ म्हणालो ( फक्त म्हणालो, तयारी अजिबात नव्हती) तेव्हा ५ रु जास्त देण्याच्या बोलीवर हे साह्येब निघाले.
मांगी-तुंगी फाट्यापासून जाणाऱ्या ट्रस्ट ची गाडीने आम्हाला मंदिरात आणून सोडले. ( त्याला "किती  द्यायचेय?" असे विचारल्यावर त्याने चक्क 'नाही' म्हणून तो परत निघून गेला. )

 मांगी-तुंगी फाटा 
येथूनच मांगी-तुंगी सुळक्यांचे प्रथम दर्शन झाले. 
आता मंदिरात जाऊन फ्रेश होऊन आदिनाथाचे मंदिर पाहायला लागलो. तेथे फोटो काढायला बंदी होती.
तसेही सगळ्या मुर्त्या मला सेमच वाटत होत्या म्हणून मी कॅमेरा ठेवून दिला. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर भटकून मग आमच्याकडचे सामान तेथील कचेरीमध्ये ठेवले. पाणी भरून घेतले आणि मग निघालो आमच्या बागलाण ट्रेकच्या शेवटच्या डेस्टिनेशन ला.

१५ रु. देऊन गाडी होती पायथ्यापर्यंत, पण आम्ही ती नाकारली आणि चालतच सुटलो. अंगात जीव नव्हता पण ३० तासांची चढाई केलेले पाय हळू हळू का होईना पण निघाले.

 हा मांगी-तुंगी डोंगराकडे जाणारा रस्ता, हा फोटो 'ग्रांड क्यानोन ची ट्रेल " म्हणूनही खपला असता.
आता गावापासून जर लांब आलो होतो. मागे वळून पहिले तर गाव मस्त धुक्यात हरवले होते. आणि फोटोत दिसणारा डोंगर ओलांडला की मागे लगेच मुल्हेर गाव. 


येथूनच समोर पाहिले तर अतिशय नयनरम्य असे मांगी-तुंगीचे जुळे किल्ले नजरेस पडले. डाव्या बाजूस मांगी आणि उजवीकडे तुंगी.


पायथ्याशी अजून एक विश्रामगृह होते. येथे पाणी, खाद्यपदार्थ आणि प्रसाद मिळतो. तेथून निघाले की मग अत्यंत सुबक आणि सुस्थितीतील पायऱ्या चालू झाल्या. कोणीतरी अमेरिका निवासी जैन बांधवाने त्या तीन हजाराहून अधिक पायऱ्या बांधल्या असा तेथे  बोर्ड होता. 'अमेरिका निवासी' असे आवर्जून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.

 
वृद्ध आणि अपंग माणसांना वरती नेण्यासाठी डोली ची हि व्यवस्था आहे. वरती लिंबू-सरबताचे थांबे असल्याने ती लोकही डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन आमच्या बरोबर होतीच.


मांगी कडे जाता जाता तुंगी चा हा नयनरम्य सुळका सारखे आमचे लक्ष वेधून घेत होता. या दोन डोंगर जोडणारी मधली वाटही अभेद्य वाटत होती.


मांगी गिरी हे आमचे प्रथम लक्ष्य होते. अजून बराच बाकी होता. ऊन जाणवू लागले होते. आणि पायही संपले होते.

 बरेच अंतर चालू आलो की आपण…. 

आवरा …. अजून एवढे जायचे आहे. :) 

काही अंतर चालून गेल्यावर पहिली गुहा लागली. त्या गुहेत काही मंदिरे होती. आणि अनेक कोरलेल्या जैन प्रतिमा होत्या.
पहिला थांबा 



जवळ जवळ दीड तासात आम्ही बरेच वर आलो होतो. आता येथून पश्चिमेकडे साल्हेर- सालोटा दिसत होते. दोन दिवसांपूर्वी आपण त्या सर्वोच्च शिखरावर होतो या जाणिवेनेही अंगावर काटे आले. साल्हेरच्या आठवणी मनातून कधी पुसल्या जाणेच शक्य नाही. भूषण ला म्हटले की अजून एक दिवस सुट्टी वाढवू, प्लान रीवाईज करू आणि परत साल्हेर ला जाऊ यार !


खाली बघितले तर आता या पायऱ्या चीनच्या भिंती सारख्या दिसू लागल्या. पायऱ्या मुळे आपल्याला जास्त दम लागतो तर पाय अजून दुखायला लागले. यापेक्षा पायऱ्या सोडून परत ट्रेकिंग करत जाऊया असे मनात आले.


येथून तुंगी चे बरेच फोटो काढले. मोह काही आवरत नव्हता.

अजून तासभर चालून शेवटी पहिल्या कमानी पाशी पोहोचलो.

येथे एक विश्रांती थांबा आणि लिंबू सरबताचे काही स्टॉल होते. येथे एक पायपोई पण होती, पण येथे पाणी ठेवले तर या लोकांचे लिंबू सरबत कोण पिल? म्हणून त्या चाप्टर लोकांनी त्यात पाणी ठेवले नव्हते.

 येथूनच डावीकडे मांगी गिरीकडे तर उजवीकडे तुंगी साठी मार्ग होता. सहलीसाठी आलेली लोक येथूनच परत जात होती. तर काही तुंगी कडे जात होती. म्हणून आम्ही गर्दी टाळण्यासाठी मांगी ला निघालो.

'वर' जाणारा रस्ता :)

एव्हाना दोन हजार पायऱ्या होऊन गेल्या असाव्यात. आता पुढे काही थांबे नव्हते. गर्दीही नव्हती.

मांगी गिरी वर पाण्याचे एक टाके दिसले. बाकी येथे पाण्याची काही सोय नाही.


त्यानंतर वरती पोहचल्यावर आम्ही जे काही पहिले ते केवळ अशक्य होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या थकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत.

काय वर्णन करू शकणार अश्या निसर्ग रूपाचे?

येथून उत्तरेकडे गुजरात सुरू होतो. प्रदूषण कमी असल्याने दूरपर्यंत नजर जात होती. महाराष्ट्रात एकाला एक लगटून अश्या पर्वत रांगा. आणि गुजरातेत मोदिकाकांकडे एकाही डोंगर पण नाही राव. अरेरे ! ( आणि म्हणूनच गुजरात मधले ( नाशिक गुजरात बॉर्डर) एकमेव हिल स्टेशन "सापुतारा" त्यांनी अप्रतिम असे वसवले आहे. )

मान्गीगिरी वरून तुंगी ला जाणारी वाटही आता स्पष्ट दिसत होती.

आता वेळही हाती होता त्यामुळे फोटोग्राफी किडे चालू झाले.

येथे असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या दिसल्या. दोन्ही ठिकाणी कोरीवकाम केलेल्या बऱ्याचं मुर्त्या आहेत. काही मुर्त्या पडझड झाल्या आहेत तर काही ट्रस्ट ने कोटिंग करून जपलेल्या आहेत. पण कोटिंग करून त्याची नैसर्गिक /ऐतिहासिक ओरिजीनालीटी राहिलेली नाही.


एवढ्या उंचावर पायऱ्या नसताना असे कोरीवकाम करायला कोणते कामगार व स्थापत्यअभियंते छिन्नी हातोडा घेऊन आले असतील देव जाणे.



आता मांगी उतरून आम्ही परत पहिल्या प्रवेशद्वाराशी आलो आणि तुन्गीकडे प्रयाण केले. पूर्ण वाटेत रेलिंग लावलेले होते. 


 मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडीतच एक संगमरवरी मंदिर होते. बहुतेक ते कृष्णाचे होते. 
मंदिर आणि मागे मांगी गिरी.

थोडे अंतर चालून खिंड पार केल्यावर पुढे तुंगीवर जायच्या पायऱ्या दिसल्या. कोणी आणि कश्या बधल्या असतील या पायऱ्या? या विचाराने आमचे डोके चक्रावले.
 
 
 आमच्या स्वागतासाठी पूर्वज आधीच उपस्थित होते. त्यांनी आमच्या पिशवीतला चिवडा खाण्यासाठी हल्ला चढवला.

येथेही काही मुर्त्या कोरलेल्या होत्या आणि ३ मंदिरे होती. मला तेच तेच बघून बोर झाले म्हणून कॅमेरा ठेवला आणि पुढे निघालो.

२ वाजेपर्यंत खाली उतरलो. पायथ्याशी प्रसादाची विनामूल्य सोय होती. तेथे खाऊन आणि पाणी भरून निघालो. आता पायथ्यापासून गाडी करावी म्हटले तर गाडी नव्हती. परत पायपीट. मग शेतातूनच शॉर्टकट काढत आलो. मंदिरातून जेवणाचा पास घेऊन जेवायला गेलो. जेवण बरे होते पण चाळीस रुपयांच्या मानाने चांगले होते.
भरपेट जेवण झाल्यावर लगेच घरी जायचे वेध लागले. पाणी एकच बाटली भरली आणि मंदिराच्या माहेर येऊन एका घराच्या सावलीत डेरा टाकला. बुधवारीच आमचा हा स्वप्नवत ट्रेक संपला असल्याने आणि पूर्ण आठवड्याची सुट्टी असल्याने आता कधीही रिक्षा येऊदे आणि पुढे केव्हाही बस मिळूदे अश्या मानसिकतेने आम्ही चक्क तेथेच झोपून घेतले.
 दहा मिनिटांनी असणारी रिक्षा सुमारे अडीच तासांनी आली. दुपारी रिक्षांची वारंवारता कमी असते असे कळले. जी एक आली ती पकडून ताहाराबाद गाठणे गरजेचे होते. रिक्शांत घुसलो आणि आणि अजून एक जीवघेणा प्रवास सुरू. सहा आसनी रिक्शांत,  कल्पना करू शकणार नाही पण तब्बल सोळा लोक. काही कोंबून बसलेली, तर काही बाजूच्या पाय ठेवायच्या जागेवर उभी राहून. तुफान प्रवास होता तो. 

टपावर टाकलेले सामान काढून ताहाराबाद बस स्थानकावर बराच वेळ काढला. तेथून एक गुजरात महामंडळाची बस पकडून निघालो नाशिकला. येथून नाशिक म्हणजे अजून ४ तास. पण तीन दिवस एकत्र असूनही आमच्या गप्पा आणि विषय संपले नव्हते. 

या ब्लॉग चा जन्म यावेळी गाडीत बसून मनात आलेल्या विचारातून झाला हे मला नमूद करायला आवडेल. ह्याच ट्रेक नंतर असे वाटले की ह्या सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी आपण शब्दबद्ध केल्या तर, लोकांनाही या सुरेल निसर्गकवीतेचा अनुभव घेता येईल. साल्हेर-मुल्हेर च्या ट्रेक ला जाऊन आल्यानंतर ब्लॉग चालू केलेला माझ्या पाहणीमधला मी तिसरा. ती जागाच अशी आहे, ते अनुभवच इतके उत्कट आहेत की मनातील विचारांना लेखरूपी कोंदण हे मिळणारच. ( तुमचाही बरेच दिवसांपासून काहीतरी नवे करायचा व लिहायचा मानस असेल आणि तो प्रत्यक्षात येत नसेल तर हा ट्रेक नक्की कराच. ) 

अजून एक असे की जेव्हा खूप नैराश्य येते आणि स्वतः साठी वेळ काढणे गरजेचे आहे असे वाटते. त्याला उपाय असा की, शनिवारचे सटाण्याचे तिकीट आरक्षित करून यावे. विंडो सीट. सकाळी सातची ST दुपारी ४ ला पोहोचते तेथे. (येथे राहून वा ५ ची पुण्याची ST परत रात्री २ वाजता पुण्यात. )
खच वेळ मिळतो आपल्याला स्वतःला न्याहाळायला. स्वतःचे अनालिसिस करायला. सोबतीला लोकांची ओढाताण आणि जगणे जाणवते. आपले झापड लावलेले जगणे म्हणजे जगणे का? असा प्रश्न पडतो. 
(मी जेव्हा लोकांना समुपदेशन करतो तेव्हा हा हि उपाय घुसडतो. )

एक मात्र जाणवत होते की कितीतरी दिवसांनी आपण एवढी माणसे पाहतोय. जरा माणसांमध्ये आल्याचा फील आला. मागील ३ दिवस फक्त मुक्त डोंगररांगा, किल्ले, निसर्ग, सूर्यास्त, पूर्व-इतिहास  आणि सगळे पाश ( निदान ३ दिवस तरी ) सोडून आल्यासारखे आम्ही दोघेच. सोबत रिकामे पोट, रापलेला चेहरा, तुटायला आलेले पाय, ओरखडलेले हात पण तृप्त असे मन आणि स्वप्नपूर्ती झालेले डोळे. सगळे केवळ स्वप्नातीत.

नाशिक ला पोहोचून मुंबईकर आणि पुणेकर म्हणजे भूषण आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या. संपूर्ण ट्रेक ला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास नाशिक वरून पुण्याला येताना झाला. अखेरीस पहाटे तीन वाजता शिवाजीनगर. बाबांना फोन करून घ्यायला बोलावले.ते जेव्हा आले तेव्हा मी पहाटे साडे तीन वाजता शिवाजीनगर च्या फुटपाथ वर मांडी घालून बसलेलो होतो. अवतार तर भिकाऱ्याच्याही वरताण असा झाला होता. 

पाच दिवस, अडतीस तासांपेक्षा जास्त चढाई करून शरीर खिळखिळे झाले होते. पण तेव्हा ट्रेकची धुंदी असल्याने जाणवले नाही. आता घरी पोहोचलो तर पेन किलर घेऊन झोपणे हा एकाच पर्याय.
 'एवढा त्रास होतोय तर जायचेच कशाला, सुखाचा जीव दुःखात घालून" इति आई. पण बाबांनी चेहऱ्यावरचे भाव तेथे फुटपाथ वर बसलो असतानाच ओळखले होते. 
" तेथे काय पहिले?" या प्रश्नाला निदान माझ्याकडे तरी उत्तर नव्हते. केवळ निःशब्द.
 बूट काढून बघितले तर पायाच्या तळव्यातील रक्त पेशी सुट्टीवर गेल्याचे दिसले. बोटांना छोटे फोड आले होते. स्याक मध्ये रॉकेल सांडले होते म्हणून त्याचा खतरनाक वास येत होता. त्याहूनही खतरनाक वास माझा मलाच येत होता. ( पाच दिवस विदाऊट अंघोळ :) ).  बुटाचा सोल शेवटचा श्वास मोजत होता. पण राजे ( म्हणजे आम्ही ) गडावर ( म्हणजे आमच्या घरी) पोहोचुपर्यंत त्याने बाजीप्रभूसारखा जीव राखून ठेवला होता. 
मस्त गरम गरम दूध न मागताच समोर आले. त्या परिस्थितीत, त्या वेळी ते गरम दूध जे काही लागले न…. अहाहा स्वर्ग ! 
पहाटे सहा पर्यंत गप्पांची मैफिल रमली. पुढचा पूर्ण दिवस विश्रांती घेऊन, शुक्रवारी सुट्टी असूनही हापिसात हजर. "साल्हेर-सालोटा- मुल्हेर ट्रेक पूर्ण करून पुढच्या दिवशी आजारी न पडता हापिसात येऊन दाखव" हि पैज जिंकण्यासाठी. 

सगळ्यात ब्रेकिंग न्यूज हि की, तब्बल साडे सहा किलो वजन कमी झाले होते. वर्षानुवर्षे कपाटात पडलेले हाफ शर्ट आता बाहेर यायला लागले. बारीक झाल्याने आता मी कुतूहलाचा विषय होतो हे हि मला कळले. ( आता परत "पहिले पाढे पंचावन्न" झाल्याने लोकांचे कुतूहल शमले आहे.) पण माझे या ट्रेकचे कुतूहल अजूनही शमलेले नाही. 

असो, या ट्रेकच्या आठवणी माझ्या मनात तर आयुष्यभरासाठी कोरल्या गेलेल्या आहेतच. आपणा सर्वांना हि या ट्रेकचा आनंद घरबसल्या मिळावा म्हणून चालवलेला हा चार भागांचा खटाटोप आता संपला आहे. 

---समाप्त---
सागर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: