बुधवार, १ जानेवारी, २०१४

२०१३! फुल टू कमाई !

 २०१३! फुल टू कमाई !

लोक्स हो, आमचे पुराण लावण्याआधी सर्व वाचक मित्र-मैत्रीणीना अगदी मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुमचे सगळ्या योजना, संकल्प (थोडे तरी) पूर्ण होवोत ही अपेक्षा. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१३..  बघता बघता पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही. जरा बारीक झालोय पण नजर लागायला नको म्हणून सांगत नाही.

असो, तर "वर्षभरात मी काय काय केले? वा काय कमावले आणि काय गमावले?" अश्या प्रश्नाने आयुष्याचा, वर्षाचा आढावा घेण्याइतके मी काही केले आहे असे वाटत नाही. काय कमावले आणि काय गमावले या दोन्हीचीही उत्तरे मला सुचत नाहीयेत. तरीही पूर्ण दिवस काढून यावर विचार केला.(म्हणजे पूर्ण दिवस सुट्टी काढून ५-७ मिनिटे विचार केला.)

काय गमावले?
काहीच गमावले नाही. कारण गमावण्यासाठी प्रथम काहीतरी असावे लागते जवळ. (हे तत्वज्ञान आमचे आम्हाला सुचले आहे.)

आणि काय कमावले?
काहीच कमावले नाही. (खरतर मी याची लिस्ट खूप मोठी केली होती पण तीच बनवताना बँकेतून फोन आला आणि त्यांनीच याचे उत्तर दिले.)

असो,
मग, ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यांच्या वाटेला कशाला जा? म्हणून मग प्रश्नच बदलला.

"वर्षभरात मी कुठे कुठे काय काय केले?
- या अश्या प्रश्नाला मात्र माझ्याकडे 'पुराव्याने शाबित' करण्यासारखे उत्तर आहे. आणि तो पुरावा म्हणजे आमचा कृष्ण वर्ण. वर्षभर भटक भटक भटकून स्व-कर्तुत्वाने मिळवलेला 'कृष्ण वर्ण'. 

हे हि असो.वर्षभर कुठे कुठे हिंडलो याचा थोडक्यात आढावा घेतानाच एक सांगावेसे वाटते कि, मी जिथे जिथे भटकलो, त्याबद्दल वाचकांनाही माहिती मिळावी आणि त्याचा उपयोग व्हावा ह्याच एकाच हेतूने हा लिहायचा घाट घातला गेला आहे. अर्थात स्वतःचा आनंद मी यात शोधतच असतो आणि फोटोग्राफीची आवडही पूर्ण करून घेत असतो.

जानेवारी :  साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, उद्धव महाराज समाधी, मांगी-तुंगी

वर्षाची सुरवातच दणक्यात झाली. पहिल्याच महिन्यात बागलाणातील साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, उद्धव महाराज समाधी, मांगी-तुंगी एकापेक्षा एक असे किल्ले करण्याचा योग आला.
या ब्लॉग चा जन्म पण याच महिन्यातला. :) 
साल्हेर -सालोटा 
 सर्वोच्च किल्ल्यावरचे सर्वोच्च मंदिर- परशुराम मंदिर
 मुल्हेर किल्ला - गणेश मंदिर
 मोरागड
 मांगी -तुंगी
याचे याथासार वर्णन तुम्ही वाचले असेलच. नसेल वाचले तर हे दुवे बघा.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४   - मांगी- तुंगीजी 
  

फेब्रुवारी : कर्नाळा अभयारण्य/ किल्ला 

वर्षाच्या सुरवातीलाच दणदणीत ट्रेक झाल्याने आता थोडे रील्याक्स.

 बालेकिल्ला


यावर एक लेख खरडायचा बाकी आहे अजून.

मार्च : खांडस मार्गे भीमाशंकर  


हा पण एक खतरु ट्रेक होता. अक्षरशः जीव गेला होता भर उन्हात. पण एकदा करावाच असा ट्रेक आहे हा. 
यावर लिहिलेला लेख हि वाचकांच्या पसंतीस उतरलेला दिसतो. 
हौसेने उन्हाचा भिमाशंकर होणे.

एप्रिल : वसई चा किल्ला 

यावेळी जरा इतिहासाचा माग घ्यायचा मूड होता. भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला. ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला.

त्या आणि पोर्तुगीज कालीन इतर ६ घंटांचा शोध लावताना उगाच केलेली हुशारी इथे वाचू शकता. 
वसईच्या घंटेचा शोध


मे : अर्नाळा किल्ला 
बेक्कार ऊन असल्याने जास्त दमवणूक करणारा ट्रेक नको म्हणून मग मोर्चा जलदुर्गांकडे वळवला.  
आता यापुढे जरी कदाचित पोर्तुगीजांची सत्ता आली, आणि त्यांनी विरारला दुसरा नवा किल्ला बांधून त्याच्यासाठी "महान(!!) ट्रेकर(!!)" म्हणून मला बोलावले, तरीही मी विरार ला परत पाऊल ठेवणार नाहीये. अगदी त्यांच्या देशाच्या ग्रीन कार्ड चे आमिष दाखवले तरीही नाही. नाही म्हणजे नाहीच :) सतरा तासांचा प्रवास येथे वाचू शकता. 
चाळीस मिनिटांचा किल्ला,सतरा तास प्रवास : अर्नाळा किल्ला

जून : कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड
पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला.बऱ्याच उशिरा यावर लिहायचा मुहूर्त लागला. 
घनन-घन, घनन-घन घनगड


जुलै : इंग्लंड - बरी सेंट एडमंडस, केम्ब्रिज 
हा आणि पुढचा महिन्याचे केवळ एका शब्दात वर्णन करता येईल. "स्वप्नपूर्ती" 
ज्या गोष्टीची मनापासून आस असते आणि त्याचा प्रचंड ध्यास असतो तेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात येतेच. आमच्या हपिसातर्फे इंग्लंड ला जायची संधी मिळाली. डोळे भरून राणीचा देश पाहून घेतला.  यावर "राणीचा देश" हि ६ भाग असलेली लेखंमालिका लवकरच प्रकाशित करेन.

ऑगस्ट: लंडन , इंग्लंड
एक महिना "Bury St. Edmands" टाऊन मध्ये होतो. त्यानंतर लंडनला आलो. भल्याभल्यांना भुरळ पाडणारे हे शहर "आयुष्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे" असे आहे.  खर्या अर्थाने परदेश प्रवास झाला म्हणता येईल. "डोळ्याचे पारणे फिटणे" म्हणजे काय ते उमगले.

लाख जग हिंडा, आईच्या हातचा गरम वरण भात आणि सह्याद्रीला कुठेच पर्याय नाही.

सप्टेंबर : पुरंदर किल्ला 
आता परत सह्याद्रीकडे मोर्चा वळवला. 

ऑक्टोबर : साल्हेर- सालोटा परत !
साल्हेर -सालोटा ने तर मनात घरच केले आहे. पावसाळ्यातले त्याचे रुपडे टिपण्यासाठी आम्ही परत पोहोचलो वाघाम्बेला.
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य लाभले.
नोव्हेंबर : हरगड किल्ला 
मागच्या वेळेस मुल्हेर मोरा किल्ले झाले होते पण हरगड राहिला होता. तो यावेळी फत्ते जाहला.


यावरही लवकरच एक लेख खरडला जाईल.

माथेरान : 

डिसेंबर: प्रसन्नगड(चावंड),पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर, जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे.यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

 
यावर सध्या लिखाण चालू आहे. खालील दोन भाग प्रकाशित झाले आहेत.


वा, खरेच मस्त गेले हे वर्ष. ट्रेकचा आकडा ४८ वर आलाय तर. बरच काही कमावले म्हणजे मी ! डोळ्यात आणि मनात. डोळ्यात साठवलेले क्षण आणि अनुभव हे केवळ शब्दातीत. त्या बँकवाल्याला काय कळणार आहे म्हणा. असो. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर: या सगळ्या फोटोंमध्ये कुठेही टिपिकल सुर्य मावळतानाचा फोटो टाकला नाहीये. मावळत्या दिनकरा वैगरे अलंकारिक शब्दात वर्षाचा शेवटचा सूर्यास्त वैगरे.
मुळात जी एकमेव गोष्ट या जगात शाश्वत आहे वा ढळढळीत सत्य आहे ती म्हणजे 'सूर्याचे प्रकाशमान चैतन्य. भले तो कसा अस्ताला जाईल? कीव करावी ती आपल्या क्षुद्र विचारांची. कारण तेवढेच आपल्या हातात आहे. मुळात सूर्योदय वा सूर्यास्त हे सगळे आपल्या मनासाठीचे खेळ आहेत. तो मात्र चिरंतन आहे वर्षानुवर्षे वा युगानुयुगे. अगदी आहे तेथेच.
अति अवांतर: अवांतर 'जास्तच' झाले असेल तर माफ असावे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चला आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.लोभ असू द्या.

सागर शिवदे
sagarshivade07@gmail.com

२ टिप्पण्या:

Suyog Dange म्हणाले...

photos apratim aahet !! konta camera waparta?? :)

sagarshivade07 म्हणाले...

टिपण्णी बद्दल धन्यवाद सुयोग,

मी CANON 1100D with Regular 18-55 Lens आणि Sony Cybershot 610 हे दोन कॅमेरे वापरतो. थोडेसे पिकासा मधून एडीट करतो.