शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

वसईच्या घंटेचा शोध

 वसईचा किल्ला (Vasai Fort)

आजकाल जरा वेगळेच वेड  लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.
छोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला. ( का ते विचारू नका, उगाच हौस ) पण ते जास्तच लांब आणि सुट्टीची बोंब, म्हणून मग भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला.
ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला. तसेही आम्हाला निमित्तच हवे असते.
चिमाजी आप्पा यांचा शोध पहिला घ्यायला हवा  … अख्खं जग फेसबुकवर आहे म्हणून त्यांना शोधण्यासाठी तडक फेसबुकवर गेलो. निराश न होता म्हटले जाऊ स्वतःच आणि छडा लावू याचा.
तसे कशाचा कशाशीही संबंध नसतो, पण ठरवले तर सुतावरून स्वर्ग गाठता येतो . 

सकाळची सिंहगड पकडून गेलो कल्याणला, यावेळी भूषण काही आला नव्हता, म्हणून मग फोनाफोनी करून त्याला बोलावले. मुंबईत गेले की माझ्यासारख्या माणसाचे अवघड होऊन जाते. स्वतःला तर काही माहीत नाही आणि दुसऱ्यांना विचारायचे तर काय विचारायचे ते हि माहीत नाही.
मग भूषणचा फोन आला,
"कुठे आहेस ? मग या प्रश्नाला मी प्लाटफोर्म वर आहे असे उत्तर दिले. "
"प्लाटफोर्म वर कुठे?"
"अरे जिथे वडापाव वाला माणूस उभा आहे तिथे."
असे बरेच निरर्थक प्रश्न उत्तरे झाली मग तो म्हणाला आहेस तिथेच थांब, मी शोधतो तुला.

मग थोड्या वेळाने भेट झाल्यानंतर आम्ही लगेच लोकल पकडून 'कोपर' ला जाण्यासाठी निघालो. भूषण ने सगळी माहिती काढलीच होती, आणि लोकल कुठून कशी जाणार हे हि त्याला माहीत होते.
साडे नऊ वाजेपर्यंत कोपर स्थानकावर पोहोचलो. तिथले रेल्वे स्थानक जरा वेगळेच आहे. एका स्थानकावरून, वसई कडे जाणाऱ्या गाडीच्या फलाटावर आम्ही येऊन थांबलो.
सव्वा दहा वाजता ट्रेन होती, जशी वेळ जवळ आली तशी गर्दीही वाढू लागली होती.
आता हि ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो वसई रोड ला. तिथून मग महानगर पालिकेची बस पकडून निघालो वसई किल्ल्याला. बस मध्ये तरुण मंडळी जास्त होती. वाटले की तरुण पिढीला किल्ल्याविषयी वा इतिहासाविषयी अजूनही आस्था आहे. हे वाक्य भूषण ला सांगितले तर तो म्हणाला की,

"तसे नाहीये, "या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. नंतर मात्र मला ऐकवू नकोस की, कुठेही नेतोस मला तू म्हणून. "

ऐतिहासिक संदर्भ :
स.न. 1414 मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला. 1530 मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे 1534 मध्ये तो पोर्तुगीजाकडे आला. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला.12 डिसेंबर 1780 रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. ( नंतर परत आपल्या ताब्यात आला आणि ३०० वर्ष भक्कम अश्या किल्ल्याची दुर्लक्ष केल्यामुळे वाट लागली. )  

भौगोलिक संदर्भ :
 ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला,जलदुर्गभुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो.
किल्ला प्रचंड मोठा असून दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत.  एका बाजूस समुद्र व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत. 
किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. पोर्तुगीज काळात नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. (विकिपीडिया द्वारे)
वसई किल्ल्याचा पोर्तुगीजकालीन नकाशा: 
सौजन्य : विकिपीडिया 

येण्याजाण्याच्या वाटा:
पुण्याकडून जाताना कल्याण ला उतरून, पुढे कोपर पर्यंत दुसरी लोकल पकडून, अजून त्यापुढे कोपर पासून वासी रोड ला जाणारी ट्रेन पकडून नवघर स्थानकावर उतरावे. तिथून वसई किल्ल्याला जाणाऱ्या बऱ्याच बस मिळतात. त्या बस किल्ल्याच्या आत जाऊन सोडतात.

आमचा ट्रेक अनुभव :
 बस मध्ये एक आजोबा म्हणाले की "हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे". मग म्हटले जाऊयाच संस्कृती च्या मागे ( म्हणजे समाज संस्कृती च्या मागे). घंटेचे ही कारण होतेच जोडीला.
थेट बस असल्याने आम्ही किल्ल्याच्या समुद्राकडील प्रवेशद्वारापाशीच पोहोचलो. तेथे चौकशी करून सरळ किल्ल्याच्या वाटेने न जाता प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याच्या वाटेला लागलो. तिकडची एकंदर गचाळ स्थिती पाहून परत फिरलो.

आता किल्ल्याची एक बाजू पकडून नुसतेच चालत सुटलो. तेथे एक कामगार भेटला. तो नाशकातील बागलाण तालुक्यातील होता. "आम्ही नुकतेच साल्हेर,सालोटा, मुल्हेर करून आलो बागलाण मधले" हे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यातला आमचा आदर वाढला. त्याने लगेच "मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे" असे वाक्य टाकल्यावर मग आम्ही आमच्या बाता मारणे बंद केले. आम्हाला कळले की हा पण "कसलेला खिलाडी" आहे. तो २२ वर्षे बागलाण मध्ये वनविभागात कामाला होता. आणि त्याने महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व किल्ले आणि प्रदेश अक्षरशः पिंजून काढले होते.
त्याच्याकडून माहिती काढून पुढे गेलो. तटबंदी वर चढून त्या वाटेने हिंडायला लागलो. पहिलेच समुद्राचे आणि बंदराचे दर्शन घडले.


किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आणि पोफळीची, नारळाची झाडे दूरवर पसरली होती.  हा हिरवळ दिसणारा परिसर दलदलीने वेढलेला आहे . 

 
बिचारी एकाच बोट भर उन्हात काय करत होती देव जाणे, पण मस्त फोटो आला. 

 
भक्कम अश्या तटबंदी मधून तोफा मारण्याची सोय कशी असेल हे बघण्यासाठी आम्ही अजून आत आत जात राहिलो. 
कोपऱ्या-कोपऱ्यात लपून अनेक प्रेमवीर आपल्या "प्रेमलीला" करण्यात मग्न होते. सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना उरले नसावे. पोर्तुगीजांनी छोटे छोटे खंदक बांधून या प्रेमवीरांची चांगली सोय केली होती. 
या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल.  ह्या भूषण च्या वाक्याचा मला अर्थ कळला. 
मगाशी 'हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे" असे म्हणणाऱ्या आजोबा बऱ्याचं वर्षात येथे फिरकले नसावे . 

 
मस्त कैऱ्यांनी फुललेले भलेमोठे झाड बघून तेथेच जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर थोड्या कैऱ्या पडून घेतल्या. 


थोडे खाली उतरून मग आम्ही किल्ल्याचे अवशेष बघायला आलो. 
 

 जेवण करून आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचलो. भक्कम दगडी बुरुजांमध्ये लपवल्यासारखे बांधलेले ते अजस्त्र प्रवेशद्वार बघून त्या काळच्या राजांच्या कल्पकतेची प्रचीती आली. 


 जमिनीवरचा दरवाजा

 परत मागे फिरून वाट फुटेल तिकडे आम्ही हिंडत बसलो. कुठेही खोपदडात आम्ही जात होतो. आमच्या हातातील कॅमेरे बघून प्रेमवीरांची मात्र तपश्चर्या भंग पावत होती.  आम्ही मात्र संपूर्ण किल्ला पालथा घालायचाच अश्या निश्चयाने हिंडत होतो. 
 थोडं पुढे जाऊन नारळीची, सुपारीची असंख्य झाडे, कोंकणाची चाहूल देत होती.


जवळ जवळ पूर्ण किल्ला २ तासात पाहून होईल म्हणून आम्ही संध्याकाळी बोरिवली च्या राष्ट्रीय उद्यानात जायचे ठरवले होते. पण किल्ला इतका मोठा होता की संध्याकाळचे ५ वाजून गेले. 
तटबंदी वरून असेल फिरत एका पडक्या भागाशी आलो. बघतो तर काय, हे काका चक्क झाडावर चढून मस्तपैकी उभे राहून ताडी काढण्यासाठी मडके लावत होते. 

बाकी जीवनाची लढाई कोणाला चुकली नाहीये हेच खरे. 


तेवढ्यात, भूषण ने चतुर मोठ्या चतुरीने टिपून घेतला. 


आता बरेच अंतर फिरून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाशी आलो. तेथे भली मोठी वास्तू खरोखरच अचंबित करणारी होती. बरीच पडझड झाली असली तरी त्याचा साचा आणि आर्किटेक्चर बरेच शिल्लक आहे. 
येथे पूर्वी ख्रिस्त लोकांची दफनभूमी असावी असे वाटत होते. पूर्ण जागेत चौकोन करून त्यावर इंग्लिश सारख्या भाषेत काहीतरी लिहिले होते.  St. Anthony's यांचे चर्च म्हणून हे ओळखतात. 
येथे पुढील बाजूने पाहिल्यास फक्त एक सूर्यकिरण तटबंदीतून बाहेर पडलेला दिसतो . याला रे ऑफ होप ( Ray of Hope) म्हणतात. 


जरा विश्रांती घेऊन मग आम्ही परत हौसेने फोटोग्राफी चालू केली. फोटो काढण्यासाठी उपयुक्त असा प्रकाश पडल्याने प्रकाशाची रंगसंगती जुळून आली.


उगाच हौस करून एका भुयारातून जाऊन बघितले. नशिबाने हा रस्ता वरती जात होता, ( वरती म्हणजे वरच्या मजल्यावर, "वर" नाही हा :) )


वर जाऊन बघितले तर मागच्या चर्च ची वास्तू दिसत होती. 


मध्येच नारळाचे झाड दिसले.


तेव्हाच्या काळी या किल्ल्यामध्येच संपूर्ण नगर वसवले असावे. असे वाटत होते.
त्याकाळी किल्ल्यात ३ चर्च, दवाखाना. न्यायालय तसेच राजवाडा सदृश्य वस्तू होत्या. त्याकाळची स्थापत्य कला किती अवगत होती याची प्रचीती येते. 
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातला जो ऐतिहासिक वसई चा तह झाला तो येथे प्रमाणित झाला असे आंतरजालावरील माहितीवरून कळते. 
पूर्ण किल्ल्याभर अशीच स्थापत्य रचना दिसत होती. सगळीकडे दारे आणि त्यावर दारे असेच दिसले.


सगळ्यात शेवटी आम्ही येथे येऊन पोहोचलो. येथे चर्च होते असा उल्लेख आढळतो. बाकीच्या अवशेषांपैकी हेच जर बऱ्या स्थितीत होते.
दर्शनी भागातील कोरीवकाम खरंच लक्षणीय होते. इतके बारकावे आणि सुंदर नक्षीकाम करायला किती वेळ लागला असावा या विचारातच आम्ही पुढे निघालो. याच द्वारावर वरती सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमाही कोरलेल्या होत्या. एकंदर रचना हि पोर्तुगीज रचनेसारखी भासत होती. पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करून येथे ३ चर्च बांधली होती. हे त्यापैकीच एक होते.


या पायऱ्यांची घडण वेगळीच भासली. एकाच दगडात कोरून केलेल्या वाटत होत्या. किती अचूक मोजमाप त्या काळीही अवगत होते हा विचार करून आमचे डोके चक्रावले.


जवळपास संपूर्ण किल्ला पाहून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी पोहोचलो. आता परत दुसऱ्या बाजूला जायचे त्राण उरले नव्हते.लांबूनच तेथील तटबंदी चे फोटो काढून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी निघालो. 


चिमाजी आप्पांचा घोड्यावरचा ब्राँझ चा पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेत होता. 


चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.


काही काळ येथेच टेकून आता मात्र निघायची तयारी चालू झाली. आता या सगळ्या प्रकारात त्या घंटेचा विषय राहिला बाजूलाच. आमची मात्र मस्त चैन झाली.

किल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे राहण्यार्या काही लोकांना त्या घंटे विषयी विचारले पण कोणाला काहीच माहीत नव्हते. मग थोडा खटाटोप केल्यावर माहिती मिळाली.

 1534 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे जस्त आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.

बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.

आजही या तीन  घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून  ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास ( diameter ) हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल.  तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात असून याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
या तिन्ही घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो. 

भीमाशंकर मंदिरातील घंटा 

२२ ऑक्टोबर २००२  च्या times मध्ये या विषयी लेख आला होता.
http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/For-whom-the-bells-toll/articleshow/26593375.cms?

वसई किल्ल्याचे १७८०  मधले  रेखाटलेले चित्र. 

संदर्भ : ( ब्रिटिश लायब्ररी)
 http://www.webcitation.org/query?url=http://www.geocities.com/unitedit/vasai_hist.htm&date=2009-10-25+23:35:26 )


घंटे विषयी उत्सुकता असेल तर, 'स्थापत्यकलेचे अद्भुत आविष्कार' या ( अजून प्रकाशित न झालेल्या) लेखाचे ४ भाग येणार आहेत. त्याच्या शेवटच्या भागात लवकरच वाचायला मिळेल. 

सागर

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

निमित्त फक्त एका भेटीचे

 निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे  बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.  अश्या साध्या आणि अतिशय निरव अश्या स्थितीतून वेळ काय वेड पांघरते हे त्या विधात्यालाच ठाऊक. नजरेला नजर भिडते अन कुठल्या जन्मांची आणि नात्यांची क्षणात लय जुळते. काहीबाही भूतकाळातील प्रसंग आठवतात.काही थोड्या शब्दांची देवघेव होते. कुठेतरी मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेल्या आठवणी क्षणात दाटतात.  बऱ्याचं वेळ सांभाळलेला संयम सुटून मन आनंदाच्या उचंबळ्या खाऊ लागते. आता शब्द असतात ते फक्त भार वाहायला निरोपाचा, खरी देवाण घेवाण हि हृदयाशीच चालू होते. आणि मग काही क्षणात शब्दांची देवाण घेवाण थांबते आणि संवाद सुरू होतो फक्त डोळ्यातील डबडबलेल्या आठवणीने, अनुभवाने, कृतज्ञतेने.

विजू अशीच बस ची वाट बघत उभी होती घरी येण्यासाठी. साधारणता रात्री आठ, सव्वा आठ ची वेळ असावी. दिवसभर राबून तिने पुरणपोळ्या बनविल्या होत्या. आज वडिलांसाठी पुरणपोळ्या बनवून घेऊन गेली होती बऱ्याचं दिवसांनी, तशी तिची दर शनिवार, रविवार एखादी तरी चक्कर असतेच, पण आज वडिलांच्या आवडत्या पुरणपोळ्या वयाच्या शह्यन्शिव्या वर्षी खाताना बघून तिला वेगळेच समाधान लाभणार होते. आज त्यांचा वाढदिवस हे निमित्त तर होतेच पण आज ती जरा जास्तच आनंदात होती. त्या आनंदात तिला  आपला पाय दुखत असून आपण बस थांब्यापर्यंत चालत आलो हेही जाणवले नसेल. आनंदात माणूस वेदना विसरतो हेच खरे.

खरेतर तिला एकेरी विजू म्हणावे असे तिचे वय नव्हे. पण अशी लोक इतक्या सहजतेने सर्वांना सामावून घेतात की नजरेनेच मनातले भाव कळले तर नावाची गरजच लागत नाही. खरेच ती नावाप्रमाणेच एकापेक्षा एक अश्या सुयोग्य रत्नांची गुंफलेली मालाच. म्हणून रत्नमाला.

विजूची घरी लवकर जायची घाई पाहून का काय माहीत, बसने वेळेत जायचे नाही असा चंगच बांधला. 
मग इकडे तिकडे बघत तिचे काही क्षण गेले. समोरच एक बाई उभ्या दिसल्या. तिच्यापेक्षा जास्तच वयाच्या, साधारणता सत्तर बाहत्तर या वयातील. त्यांनाही घरी जायची लगबग. त्यापण सैरभैर. विजूने त्यांच्याकडे बघताच ती कित्येक वर्ष मागे भूतकाळात हरवून गेली. मेंदूच्या आणि मनाच्या कप्प्यात कित्येक वर्षे जपून ठेवलेल्या त्या नावाने क्षणार्धात मेंदू ते तोंडापर्यंतचा प्रवास केला. श्वास फुलला गेला.

ती कितीतरी वर्षे भूतकाळात वाहत गेली आणि तिचा शाळा सोडतानाचा प्रसंग चटकन तिच्या समोर जिवंत झाला. साधारणता तीस ते पस्तीस वर्षापूर्वीच्या आठवणींच्या दवबिंदूंनी तिच्या मनाचे पर्णपत्र भिजून निघाले.
खरेच, दवबिंदूच ते, कुठून कसे आले कोणास ठाऊक नाही आठवणींसारखे . सुखात वाऱ्याशी मैत्री करत झुलत राहतात आठवणींसारखे, दुसऱ्याचा भावनारूपी प्रकाश घेऊन तोच परावर्तित करत राहतात. उन्हाच्या तप्ततेची चाहूल लागताच विरून जातात का-कु न करता, कोणताही आक्रोश न करता , कधी मातीत तर कधी हवेत.

शाळेचा शेवटचा दिवस हा असा तिच्या पुढ्यात उभा राहिला. आता परत आपण या शाळेत येणार नाही, परत कधीही आपल्या आवडत्या बाई आम्हाला भेटणार नाहीत म्हणून सगळ्या मुलींचे डोळे पाणावलेले. विजूची नजर मात्र "मराठे बाई'ना शोधत भिरभिरत होती. फक्त शिक्षक- विद्यार्थी असे त्यांचे नाते नव्हते. त्याच्याही पलीकडले जपलेले आणि शब्दात न व्यतीत करण्याजोगे असे होते. काहीही घडले तरी विजू मराठे बाईंकडे धाव घेई. आणि त्याही मुलीप्रमाणे तिला जपून घेत.
नेमका त्याच दिवशी योगायोगाने बहुदा, विजूचा वाढदिवस पण होता. त्याच दिवशी मराठे बाईंनी विजूला वाढदिवसाबरोबरच पुढच्या आयुष्यासाठीही शुभेच्छा दिल्या. नुसत्या कोरड्या शुभेच्छा न देत त्यांनी तिला एक शुभेच्छापत्रकच दिले होते. त्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात.  तेव्हा,
त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
त्या दिव्याचा प्रकाश हाच खरा मान, 
आणि त्याच्याशीच प्रामाणिक राहून आपल्या जीवनमार्ग निश्चलपणे आक्रम,
म्हणजे पाऊल कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तर त्याचा मार्ग कायम योग्यच असेल."

विजुसाठी या केवळ काव्यपंक्ती नव्हत्या. तिच्यासाठी ते सूत्र होते जगण्याचे. त्या चार ओळी तिने त्या दिवसानंतर लक्ष वेळा वाचल्या असतील. आतातर तिला त्या पाठही झाल्या होत्या.

शाळा सोडून पुढचे शिक्षण चालू झाले. अर्थात ते हि मराठेबाईंच्या सल्ल्यानेच.नंतर कधीतरी पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबते की काय अशी परिस्थितीत मराठे बाईंनी दिलेला मदतीचा हात. जो ती कधीच विसरू शकणार नव्हती. तिच्या शैक्षणिक कारकीर्दीत 'मराठे बाई' या दोन शब्दांनी कितीतरी आमूलाग्र बदल आणला होता.

लग्न होऊन संसार चालू झाला. आर्थिक परिस्थिती तशी काही जास्त खास नव्हती. मध्ये बरीच वर्षे गेली. संसाराच्या रहाटगाड्याला एकदा जुंपून घेतले की स्वतः साठी जगणे काही प्रमाणात राहूनच जाते. नवी स्वप्ने, नवे जगण्याचे मानदंड.

आता बरीच वर्षे उलटली होती. या कोणत्या गोष्टींचा मागमूसही राहिला नव्हता.परत कोण कोणाला आयुष्यात परत भेटेल अश्या अपेक्षाही मनात नव्हत्या.

काही क्षण गतकाळातील रम्य आठवणींमधून सैर करत, तिचे मन एकदम भानावर आले.

"मराठे बाई"
दोनच शब्द तिच्या मुखातून उत्कटपणे बाहेर पडले. त्या बाईंचे क्षणात लक्ष वेधले गेले अन त्याच वेळेस त्यांच्या डोक्यातील एक डिपार्टमेंट आठवणीच्या फायली शोधण्यात गुंतले.

"कोण गं तू ?" डोळ्यावरील जड काचेचा चष्मा सरसावत त्यांनी विचारले.
"मी … मी … " आता विजूचे शब्दही तिच्या मनातल्या भावनांसारखे जड झाले होते.
"मी रत्नमाला पुराणिक … तुमची विद्यार्थी होते. तुम्ही SNDT च्या शाळेत शिकवायचात न तेव्हापासून."
"अग हो गं हो। तुला कशी विसरेन मी. बऱ्याच वर्षांनी भेटीचा योग आला म्हणून थोडीशी विचारमग्न झाले."
"बाई, तुम्हीच मला घडवले, तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीमुळेच मी माझे पुढचे शिक्षण पूर्ण करू शकले."
"असे काही नसते गं, आपण फक्त निमित्त असतो."
"बाकी बोल, कसे चालले आहे तुझे?"
"सगळे काही व्यवस्थित."
प्रत्येक शब्दागणिक त्या दोघी एकरूप व्हायला लागल्या. मग काही अपेक्षित प्रश्न आणि त्यांची अपेक्षित अशी उत्तरे. 

"आयुष्यातला खूप मोठा काळ खर्ची घालावा लागला, तुमची भेट होण्यासाठी."
"हे चालतच असते गं, ताज्या राहतात त्या आठवणी."
हे ऐकताच विजूच्या मनाचा बांध फुटला.
"बाई, तुम्हाला आठवते का तुम्ही मला शाळेच्या शेवटच्या दिवशी एक शुभेच्छा पत्रक दिले होते. त्याच दिवशी माझा वाढदिवस हि होता."
"हो, त्यात मी काही ओळीही लिहिल्या होत्या तुझ्यासाठी, त्या ओळी मात्र आता काही आठवत नाहीत गं."
"त्या ओळी आजही मला पाठ आहेत. "

या आनंददायी आठवणी जर वस्तुमानाचा आकार घेऊ शकल्या असत्या तर किती बरे झाले असते, असे विजूला वाटले. तसे असते तर तिने त्या असंख्य वेळा कवेत घेतल्या असत्या. त्यांना जर वास असता तर तो तिने मनसोक्त हुंगला असता.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात" 
विजूला कसलेही भान उरले नव्हते.खरेतर, तिला त्या ओळी आठवायची हि गरज नव्हती.पण तरीही त्या ओळी उच्चारणे तिच्यासाठी कष्टप्रद होऊ लागले होते. शब्द तोंडापर्यंत येऊन ठेपले होते पण बाहेर पडत नव्हते.

या एका ओळीतच मराठे बाईंना पुढील ओळी आठवल्या असाव्यात. अनपेक्षित पणे काही तरी घडावे आणि आपल्याला अतीव आनंद देऊन जावे अशी त्यांची स्थिती झाली असावी. तोच भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरूनही  सरसर सरला असावा. त्यांचा हात त्यांच्याही नकळत डोळ्यावरील जाड काचेच्या चष्म्यावर गेला. त्यांच्याही डोळ्यात आता पाणी तरारले होते.

त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
 आता दोघींच्या डोळ्यामधील निर्धाराचा पारा फुटला. त्यांची मूक स्पंदने दोघींमधील शांतता ताडीत  होती. 

त्या दिव्याचा प्रकाश  …… 
आता विजूला पुढे बोलावले नाही. तशी तिला पुढे काही बोलायची गरजच नव्हती. दोघींच्या मनात उमटलेल्या एकाच आकृतीला त्यांना प्रत्यक्षात आणायची गरजच नव्हती. 

आज मात्र विजूला बस वेळेवर न आल्याचाही आनंद झाला असेल हे नक्की.

खरंच, निमित्त होते ते फक्त एका भेटीचे…
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : या लेखातील "विजू" हे पात्र म्हणजे खुद्द आमच्या मातोश्रीच .
सागर 
sagarshivade07@gmail.com
9975713494