शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

एकमेवाद्वितीय इंद्रवज्र

साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.


सकाळची वेळ, सह्याद्रीचा महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला,कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे आकाशात डोक खुपसून बसलेले उंचच उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! सह्याद्रीच्या साक्षीने हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.इंद्रधनुष्य हे मी आजपर्यंत अमाप वेळा पहिले असेल. पण कधीच त्याच्या खोलात गेलो नाही. आज अत्यंत दुर्मिळ असा निसर्ग अविष्कार पहिला  आणि मन वेडे होऊन गेले. इंद्रवज्राची महत्वाची बाब म्हणजे जो हा निसर्ग सोहळा अनुभवत असतो त्याचीच सावली / प्रतिबिंब त्या सातरंगी  गोलाकृती आकृतीत उमटते.

दुसर्यांदा केलेली साल्हेर वारी आज फळाला आली.  जणू इंद्रदेव आमच्यावर तुडुंब खुश असावा. जे पाहण्यासाठी लोक तीन- तीन दिवस हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर जातात, ते दृश्य अनपेक्षितपणे समोर अवतरले होते. आज माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह टॉप पोजिशन ला असावेत.


इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )


खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल. अंतर्जालावर काही मजकूर सापडला. (http://thinkmaharashtra.com/node/1812)
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

आजपर्यंत इंद्रधनुष्य पाहून त्यावर डोक लढवायची गरजच नव्हती पडली. आज मात्र याची देही याची डोळा जे काही पहिले त्याने विचार करायला प्रवृत्त केले. ( म्हणूनच हा एवढा लेखनप्रपंच).
असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?

सागर